|
अंतरात आमच्या... अंतरात आमच्या गणेश नांदतो मार्ग आमुचा अम्हा गणेश दावतो सागरात एकटीच नाव आमुची वादळात नाव ही गणेश तारतो जे तुम्हास पाहिजे, तुम्हास ते मिळेल प्रार्थना तुम्ही करा, गणेश ऐकतो करेन मी सदैव फक्त कर्म आपुले कर्म पाहुनीच हे गणेश तोषतो!
|
Kshipra
| |
| Thursday, September 08, 2005 - 3:46 am: |
| 
|
वंदन करूनी गणरायाला शुभकार्या आरंभ करू सुखकर्त्याचे नाव घेऊनी भवसागर हा पार करू जय लंबोदर गजानना जय शिवसुत जय विनायका || ध्रु || दे आम्हांसी विपुल मती आणि असू दे ती सुमती तारक होऊनि तारून ने तू, तव पदस्पर्शे आम्ही तरू जय लंबोदर गजानना जय शिवसुत जय विनायका || १ || कर्तव्याची धरू दे कास ने आम्हां तू पैलतीरास विघ्नेश्वर तू मंगलमूर्ती, तव चरणी प्रणिपात करू जय लंबोदर गजानना जय शिवसुत जय विनायका || २ || सर्व सिध्दीचा कारक तू रिध्दीसिध्दीचा नायक तू चित्त जडू दे तुझिया पायी, तू आम्हांसी कल्पतरू जय लंबोदर गजानना जय शिवसुत जय विनायका || ३ || गणपती बाप्पा मोरया सगळी विघ्ने दूर करा
|
गणपतीची बडबड आरती (चाल : आओ बcचो तुम्हे दिखाये!) गणपती बाप्पा माझ्यासाठी एवढं तरी करशील का अंगात माझ्या शक्ती देउन डोक्यात बुध्दी भरशील का बाप्पा मोरया... बाप्पा मोरया... मनिमाउचे मौ मौ शेपुट चिवचिवणे चिउताईचे माकडदादाचे ते हुपहुप गुरगुरणे वाघोबाचे मला सांग तू या मित्रांशी दोस्ती माझी करशील का अंगात माझ्या शक्ती देउन डोक्यात बुध्दी भरशील का बाप्पा मोरया... बाप्पा मोरया... बाबा गेले ऑफिसात अन आई गेली भूर कुठे एकटाच मी घरात आणि सगळे गेले दूर कुठे उशीर त्यांना झाला तर तू धम्मक लाडू देशील का अंगात माझ्या शक्ती देउन डोक्यात बुध्दी भरशील का बाप्पा मोरया... बाप्पा मोरया... मला वाटते तेंव्हा होवो घणघण घंटा शाळेची अभ्यास सारा पटपट संपुन मधली सुट्टी खेळाची कितीही खेळलो तरी मला तू पहिला नंबर देशील का? अंगात माझ्या शक्ती देउन डोक्यात बुध्दी भरशील का बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...
|
Sukhada
| |
| Friday, September 09, 2005 - 6:11 am: |
| 
|
श्री राम जय राम जय जय राम दर्शनाची आस मज मनी तुझे नाम असू दे सदा मुखी रामनाम घुमू दे या मनी तुझे नाम पाश सारे तोडी रामनाम विरवी देहबुद्धी तुझे नाम श्री राम जय राम जय जय राम दुःखात बळ देई रामनाम आधार संकटी तुझे नाम मन निर्मळ करी रामनाम षड्रिपूस हरवी तुझे नाम श्री राम जय राम जय जय राम एकाचा अंत करी रामनाम निर्गुणाकडे नेई तुझे नाम आशीर्वच देई रामनाम भवसागरी तारी तुझे नाम श्री राम जय राम जय जय राम
|
हे शिवनंदन, करितो वंदन हे शिवनंदन, करितो वंदन विघ्नांचे करुनी निर्दालन सुख शांती दे अम्हा चिरंतन गगनी भरल्या रंगांमधुनी अन फुललेल्या कुसुमांमधुनी तव रूपाचे होते दर्शन हे शिवनंदन, करितो वंदन कोसळणार्या धारांमधुनी सळसळणार्या वार्यामधुनी तव सूरांचे होते गुंजन हे शिवनंदन, करितो वंदन श्वासांमधुनी तुला पूजितो देहाचे या फूल अर्पितो स्पंदांतुनही तुझेच कीर्तन हे शिवनंदन, करितो वंदन विघ्नांचे करुनी निर्दालन सुख शांती दे अम्हा चिरंतन
|
Pama
| |
| Friday, September 09, 2005 - 4:35 pm: |
| 
|
श्री गणेश नामावलीतील काही नामे घेऊन केलीय... जय देव जय देव जय श्री गणराया, भक्त घालती साद, यावे सत्वर ताराया. देवांचा ही देव तू विद्याप्रदायका लंबोदर तू वक्रतुंड तू बुद्धीदायका सर्व सिध्दीच्या नायका, तू धनदायका, भक्त घालती साद यावे सत्वर ताराया. कार्यारंभी गणाधिपा तू इcछित फलदाता, विघ्नविनाशक शंकरनंदन, तू सुखदायका, भक्तिमुक्तिच्या प्रदायका, तुज नमितो शिवात्मजा, भक्त घालती साद यावे सत्वर ताराया. प्रियदर्शना सर्वज्ञा तू वरदायका, शरण आलो तुजला देवा तू गणनायका, तुझ्या कृपेचा हस्त असू दे, हे क्षमायुक्ता, भक्त घालती साद, यावे सत्वर ताराया.
|
Itsme
| |
| Sunday, September 11, 2005 - 4:08 am: |
| 
|
देव गजानन शिव गौरी नंदन गजमुख साज़िरे मनी वसते चांदीचा पाट सोन्याचे ताट मोत्याची माळ गळा शोभते दुर्वांची रास फुलांची आरास मोदक नैवेद्या भक्त देतसे चंदनी मखर जरी पितांबर माणिक मुकुट शोभा वाढवी सजली स्वारी संतोष भारी गणांच्या मनी दाटुन येई मनीcई आस सांगे गणेशास सदबुध्दी दान नित्य मीळुदे !! जय गजानन
|
आग्रह घ्या ना गणपती बाप्पा अजून एक मोदक खा वाटल्यास उत्सवानन्तर खुशाल dieting वर रहा dieting पेक्षा मी म्हणतो थोडा व्यायाम का नाही करत ? उंदराला विश्रान्ती देऊन काही दिवस पायीच का नाही फिरत ' पोहणे ' सर्वोतम exercise आहे शिकायला हरकत नाही म्हणजे दरवर्षी फिरुन असे तुम्ही पाण्यात बुडणार नाही. पण विचार करा... पोट कमी झाले तर भक्तांना चालेल का लंबोदर म्हणून तुमचा सांगा, महिमा राहील का दहा दिवसांचे जाग्रण आहे नीट काळजी घ्या माझ्या आग्रहाखातर तरी बाप्पा, अजून एक मोदक खा ~ प्रसाद
|
Kshipra
| |
| Tuesday, September 13, 2005 - 4:47 am: |
| 
|
श्री गजाननाच्या चरणी श्लोकरूपी शब्दफुले चुकले माकले तुझेच लेकरू पोटाशी घेई रे नको राग धरू तूच माझा बाप तूच माऊली रे चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे नसे तुज आदि तुज नसे अंत शुन्यात व्यापुनि राहे तू अनंत निवारील चिंता तुझिया दर्शने चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे मागते मी तुज हेचि दान देवा पापण्यात दे रे आसवांचा ठेवा दुखभार सारा तूच नित्य साहे चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे चित्ती तुझे रूप मुखी तुझे नाम आलिंगुनि प्रेमे तुजला पूजीन तुझिया चरणी लीन आम्ही सारे चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे प्रसन्ना होवोनि वर दे आम्हांसी सुख शांती अवघी लाभू दे विश्वासी ओंकार स्वरूपी तल्लीन होऊ रे चला मोरयाला स्मरू रे स्मरू रे
|
मुलाखत मी : काय गणेशा, या वर्षीचा गणेशोत्सव कसा वाटतोय श्री : खड्ड्यांमुळे हाल झाले बाबा, अजुन गुडघा ठणकतोय. मी : गणपती बाप्पा, या वर्षी एवढा पाऊस का हो पाडला श्री : इंद्रावर माझा control नाही आता , त्याने वेगळा पक्ष काढला. मी : दहा नंतर ध्वनीवर्धकावरची बंदी तुम्हाला आवडली श्री : ठीक आहे तशी, पण माझी favorite गाणी ऐकायची राहीली. मी : बाप्पा, तरुण पिढीला तुमचा काही संदेश वगैरे आहे का श्री : मायबोलीशी एकनिष्ठ रहा, रोज एकदा तरी चक्कर टाका ~ प्रसाद
|
आरती आरती गणराया भक्त पडती पाया सर्वसुख पखरण तव कृपेची छाया धृ|| आरती गणराया गजमुख पाहुनिया वाटे मना आधार जाई भव सागराच्या नाव आपुली पार १ आरती गणराया... ओन्काराचा अवतार सृष्टी सर्व साचार श्वासा नि भासात वसे पार्वती कुमार २ आरती गणराया... विद्या कला अधिपती नाम तुझे गणपती पूजीता मनोभावे मना येई अनुभूती ३ आरती गणराया भक्त पडती पाया सर्व सुख पखरण तव कृपेची छाया ~ प्रसाद
|
Peshawa
| |
| Wednesday, September 14, 2005 - 12:07 pm: |
| 
|
जय हो दयाघना हत्तीदेवा झांज मन, ढोल मन, घुमा घुमा वाजे उंदरावरती स्वार माझे गणराज आले ध्रु|| गुलालाची शीळ, वार्याच्या कानात पाय घे फ़िरत उन्मादी तालात वाजत गाजत सुख दारात हे आले माझे गणराज आले मोत्यापवळ्याची खाण, डोळ्यास गावते तुझ्या नामाचा गजर, जिव्हा सुखात नाचते मन आनंदाचा डोह आज काठोकाठ झाले माझे गणराज आले
|
Peshawa
| |
| Wednesday, September 14, 2005 - 2:22 pm: |
| 
|
हेरंबा प्रारंभा ओंकारस्वरूप आदिनादा मुढशब्दाची ही वंदना स्विकारा गौरीनंदना रुपे अनंत, अनंत हेतू अनंत अर्थ, तुझे आनंदसेतु गौण मती माझी स्वयेतच दंग जागवा जागवा तुम्ही धुम्रकेतु उजळेल ज्योत, अंधक्कार गहनातले पाशात भोग जिथे अंकुशले एकुलेसे बिज चतुर्थाचे लावियले मनमानसी गजानना रे धन किर्ती वैभवी ओढ ही गर्ता कळीकाळी खोल भक्तिची दोर, जुळलेल्या हाती द्यावी जागा चरणासी, गणाध्यक्षा!
|
Upas
| |
| Friday, September 16, 2005 - 2:55 am: |
| 
|
जयदेव जयदेव जय जय गणराया उदंड राहो तुमची भक्तावरी माया... वक्रतुंडा लोभस तेजोमय मुर्ती एकदंता तुमची त्रैलोकी कीर्ती कार्यारंभ करती वंदूनी तव पाया उदंड राहो तुमची भक्तावरी माया... जयदेव जयदेव जय जय गणराया तुमचे गुण वर्णाया द्या आम्हा स्फूर्ती अशीच राहो अमुची तुम्हावर भक्ती संकटी धावून या देवा आम्हा कलियुगी रक्षाया उदंड राहो तुमची भक्तावरी माया... जयदेव जयदेव जय जय गणराया वैश्विक शांती राहो लाभो सुख सम्पत्ती विद्या धन देउनिया देई मनशांती आशिर्वच द्या आम्हा तव महिमा गाया उदंड राहो तुमची भक्तावरी माया... जयदेव जयदेव जय जय गणराया
|
|
|