Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मल्हारगड आणी कानिफ़नाथ

Hitguj » Culture and Society » इतिहास » दुर्गभ्रमण » मल्हारगड आणी कानिफ़नाथ « Previous Next »

Dhumketu
Tuesday, July 24, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



malhargad


ईथे gs ने मल्हारगड आणी कानिफ़नाथ ह्या विषयी लिहीले आहे. त्यात जराशी भर म्हणून काही माहीती देत आहे.

पुण्याजवळचा मल्हारगड हा तसा दुर्लक्षीत किल्ला. एका दिवसाची सहल मारायची असेल तर हे एक ठिकाण विचारात घ्यायला काहीच हरकत नाही. ह्याच्या बरोबरच कानिफ़नाथही जोडता येते. वरपर्यंत गाडीमार्ग जात असल्यामुळे चढण फ़ार नाही..
विकीमॅपिआ वरचे कानिफ़नाथ आणी मल्हारगड

कानिफ़नाथ ...
पुण्यावरून जाताना हडपसर मधून सासवड कडे एक फ़ाटा जातो.. हडपसर चा फ़्लायओव्हर च्या खालून हा फ़ाटा असल्यामुळे हा फ़्लायओव्हर न घेता खालून गेले तर उत्तम.. नाहीतर परत मागे येऊन रस्त्याला लागावे लागते.

ह्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर वडकी गावापाशी, दिवेघाटाच्या अलीकडे, एक कमान लागते. त्या कमानीच्या जवळपास २०० मी. अलीकडे कानिफ़नाथाकडे असा बोर्ड लावला आहे ( विकीमॅपिआ ). वडकी गावात कोणालाही विचारले तरी तो रस्ता सांगेल.. आम्ही ज्याला विचारले तो बिहारी निघाला.. तो बहुतेक आम्हाला मराठीत बोलताना बघून घाबरला आणी मालूम नही म्हणून चालू लागला.. नंतर तोच परत आला आणी पहाडका मंदीरना असे विचारून रस्ता सांगितला.

हा रस्ता आहे छोटेखानी ट्रेककरता.. ह्या रस्त्याच्या आजूबाजूला शेती असल्यामुळे पावसाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो. वाटेवर एक बंधाराही बांधला आहे. त्याला फ़ोटो मध्ये मी न्याय देऊ शकलो नाही.. पण प्रत्यक्षात हे तळे १०-१५ मिनिटे बसून डोळ्यात साठवून घेण्यासारख़े आहे. जरासे पुढे गेल्यावर रस्ता एका ओढ्याच्या कडेने जातो.. पावसाळ्याच्या दिवसात हा ओढा भरून वाहत असल्यामुळे गाड्या इथेच सोडून पायी निघावे लागते. पावसाळा नसेल तर गाड्या पुढे कुठल्यातरी घरात लावता येतील. पण पावसाळ्यात उघड्यावर (बीना राखणीच्या) गाड्या लावून पुढे जावे लागते. वाट तशी मोठी आणी बर्‍यापैकी मळलेली आहे.. कानिफ़नाथाचे मंदिरही दिसत असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाहीच.. जवळपास ५-६ पर्वती इतकी चढण आहे( फ़ोटो ). चढायला १ ते १:१५ तास खूप झाला.. वाटेत सावलीला झाडे कमी आहेत... त्यामुळे उन्हाचे चढणे टाळावे.. हे आहे वाटेवरून खाली दिसणारे दृश्य

वरती गेल्यावर दोन मंदिरे दिसतात. एक उंचावर आहे ते कानिफ़नाथाचे. डावीकडून एक गाडीरस्ता वरपर्यंत आलेला दिसतो. तो सासवड कडून आला आहे. खाण्याच्या टपर्‍या, पाण्याची टाकी इथे असल्यामुळे खाण्याचे काही नेले नाही तरी चालू शकते.

कानिफ़नाथाच्या मंदिरासाठी अजून काही पायर्‍या चढून वर यावे लागते ( फ़ोटो ).. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे. त्यात सरपटत आत शिरावे लागते. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो.. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. कदाचित ह्यामुळेच महिलांना आतमध्ये प्रवेश नसेल.. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणी थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मशीदी सारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसले. बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते..

मंदिराच्या इथून पुण्याचे दर्शन होते. लांबवर कात्रज मधले जैन मंदिर, बापदेव घाट असे दिसते. कानिफ़नाथ ते बापदेव घाट ह्यामध्ये डोंगरावर बांधकाम दिसले. विचारल्यावर कळले की ती जमीन आता बंगले बांधण्यासाठी कुणीतरी विकत घेतली आहे. दिवे घाटाच्या पलीकडे दूरवर मल्हारगडाचा एक भाग दिसतो.

कानिफ़नाथाला एक वाट दिवे घाटातूनही येते. डोंगराच्या माथ्यावरून चालत चालत कानिफ़नाथापर्यंत येता येते.
वरती ज्या गाडीरस्त्याबद्दल सांगितले आहे तो सासवडमधून येतो. सासवड मध्ये एक चौक आहे..( विकीमॅपिआ ) त्यातील एक रस्ता नारायणपूर ला जातो. एक जेजुरी ला जातो. आणी एक बापदेव घाटाकडे येतो. हाच बापदेव घाट पुण्याला कोंढव्याला (लुल्लानगर) निघतो. बापदेव घाटाच्या रस्त्यावरून निघाले की जवळपास १०-१२ कि.मी. वर कानिफ़नाथाकडे फ़ाटा फ़ुटतो ( विकीमॅपिआ ). एक मोठी कमान असल्यामुळे हा फ़ाटा चुकण्याची शक्यता नाही.. कोणाला फ़क्त कानिफ़नाथ करायचे असेल तर कोंढवा-बापदेव घाट ह्या मार्गाने करता येईल.. सासवडपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही..


मल्हारगड ..
पुण्यावरून येताना दिवे घाट पार केल्यावर झेंडेवाडी म्हणून एक गाव लागते ( विकीमॅपिआ ). काळेवाडीतूनही घुसता येते.. दोन्ही रस्ते नंतर एकमेकांना मिळतात.. तिथून हा किल्ला जवळ आहे... रस्ता पार वरपर्यंत जातो. सोनोरी गावातूनही रस्ता आहे.. पण त्यासाठी दिवे घाट ओलांडून जरा अजून पुढे जावे लागते.. सोनोरी गावात बरीच देवळे सुद्धा आहेत.

झेंडेवाडीतून पुढे गेल्यावर मल्हारगड दिसायला सुरुवात होते ( फ़ोटो ). रस्ता खडीचा आहे.. पण बाइक नेण्यासारखा आहे ( फ़ोटो ). आजूबाजूला शेती आहे आणी पावसाळ्याच्या दिवसात सगळे हिरवेगार दिसते. ( फ़ोटो )
गडाच्या जवळपास वरपर्यंत गाडी जाऊ शकते ( विकीमॅपिआत वरपर्यंत रस्ता दिसत आहे). पण खाली पायथ्याशी गाडी लावून वरती चालत गेले तरी १५-२० मिनिटांत माथ्यापर्यंत पोचता येते. डोंगर बोडका असल्यामुळे आपण चढू ती वाट असे म्हणायला हरकत नाही..( फ़ोटो ) ह्या बाजूने दरवाज्याचे अवशेष दिसत नाहीत. पण बुरूज पूर्णपणे ढासळला आहे त्यावरून चढून गडात प्रवेश करू शकतो.. ( फ़ोटो )

गडाचा पसारा मोठा नाही. जराश्या उंचीवर बालेकिल्ल्यासारखी तटबंदी आहे.. त्यात दोन मंदिरे ( फ़ोटो ) आणी काही जोती दिसतात ( फ़ोटो ). २ विहिरी आणी एक मोठे टाकेही गडावर आहे. टाक्यात उतरून पाणी सहज काढण्याजोगे आहे. ( फ़ोटो )

सोनोरी गावाच्या बाजूला गडाचा मुख्य दरवाजा आहे.. हा दरवाजा बर्‍यापैकी शाबूत आहे. ( फ़ोटो ) गडाच्या कडेकडेने पूर्ण गडाला प्रदक्षिणा घालता येते. उत्तरेकडे अजून एक दरवाजा दिसतो.. पण तिथून कोणी आताशी चढत नसावे..

वरती असलेल्या दोन मंदिरांपैकी एक शंकराचे आहे तर दुसरे मल्हारदेवाचे असावे ( फ़ोटो ). शंकराच्या मंदिरात कुणीतरी राहत असल्यामुळे कुलूप होते..पण दुसर्‍या मंदिरात आतमध्ये बसून विश्रांती घेता येईल. ६-७ जण बसू शकतील एव्हढे मोठे हे मंदिर आहे.

वरून पुरंदर, कानिफ़नाथ वैगरे दिसू शकतात ( फ़ोटो ). कानिफ़नाथ, मल्हारगड ही सर्व भुलेश्वरच्या रांगांवरील ठिकाणे. जास्ती उंचही नाहीत. पूर्वेकडे पाहिले तर लांबच लांब पठार दिसते. बाकीच्या गडांसारखे मनोहारी दृश्य दिसत नसल्यामुळे हा किल्ला तसा उपेक्षीतच आहे. (मनोहारी हा शब्द व्यक्तीसापेक्ष आहे) .
गडावरून दिसणारे दृश्य .

वरती मस्तानी तलावाविषयी लिहायचे राहिले. दिवे घाट चढताना मस्तानी तलाव दिसतो. तलाव बर्‍यापैकी मोठा आहे.. आणी जुन्या पद्धतीचे बांधकाम आहे. दिवेघाटातून दिसणारा मस्तानी तलाव ( फ़ोटो ).

बापदेव घाटाच्या माथ्यावरही एक मंदिर आहे. ह्या घाटातूनही पुणे मस्त दिसते. बापदेव घाटापासून कानिफ़नाथा पर्यंत जागा बहुतेक विकली गेली असावी. तिथे तालाब असा बोर्ड आहे.

एका दिवसात मल्हारगड-कानिफ़नाथ करून संध्याकाळच्या आत पुण्यात येता येते.

सकाळी ८:३० ला निघून वडकी वरून आम्ही कानिफ़नाथ केले आणी झेंडेवाडी तून जाऊन मल्हारगड केला.. येताना बापदेव घाटातून परत पुण्यात ३:१५ च्या आसपास पोचलो.

:-आनंद




Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators