Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ईर्शाळगड

Hitguj » Culture and Society » इतिहास » दुर्गभ्रमण » ईर्शाळगड « Previous Next »

Dhumketu
Thursday, June 28, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईर्शाळगड...
Irshalgad

पुणे-मुंबई गाडीने जाताना खोपोली ते पनवेल किंवा आगगाडीतून जाताना कर्जत ते पनवेल ह्या मार्गावर डावीकडे दोन सुळके दिसतात. (
फ़ोटो) टेबलावर दोन व्यक्ती बोलत आहेत असे वाटते. हाच ईर्शाळगड. प्रबळगडाच्या जवळ असणारा हा गड म्हणजे चौकीचे ठाणे असावे.
डावीकडचा सुळका हा दक्षिण दिशेला आहे.. तर उजवीकडचा उत्तरेकडचा (धरणाच्या बाजूकडचा) (फ़ोटो)

ह्या गडावर वरती एक नेढे (फ़ोटो), ३ टाकी, देवाची मूर्ती (फ़ोटो) आणी ५-६ जण झोपू शकतील अशी एक गुहा आहे. सर्वात वरती जायला दोर वैगरे असे रॉक क्लांयबींगचे साहित्य लागते.
गडावरून लांबवरचा प्रदेश दिसतो.. त्यात कर्नाळा (फ़ोटो), माणीकगड(फ़ोटो), चंदेरी, म्हसाळ (फ़ोटो), माथेरान, प्रबळगड (फ़ोटो) असे गड किल्ले दिसतात.

गडावर जायचा मार्ग एकदम सोपा आहे. चौक गावाजवळून हा रस्ता जातो. चौक गावाबाहेर गावचे रेल्वे स्टेशन आहे.. ते स्टेशन ओलांडून मागचा रस्ता पकडवा. (विकीमॅपीया) नानवली गावातून हा रस्ता जातो. समोर दिसणारी सोंड ही नजरेसमोर ठेवावी... त्या सोंडेवरून वरच्या वाडीला रस्ता जातो.. स्टेशन वरून डांबरी रस्ता जातो तो थेट धरणाकडे. मध्येच सोंडेकडे जायचा फ़ाटा फ़ुटतो.. जर सोंड धरून चाललो, तर हा फ़ाटा चुकणार नाही.. हा फ़ाटा सरळ एका गावातून जातो. हे गाव बहुतेक मोरबे असावे. धरणामुळे विस्थापित झाले असावे.. गावची आखणीच हे सांगून जाते. आखलेले रस्ते, घराचे कुंपण, पाण्याचे पाईप रस्त्याच्या कडेने नेलेले आहेत, हे सर्व मोजून मापून केले आहे.. नाहीतर गावे अशी आखीव कधी दिसत नाहीत. ह्या गावपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो. (खालून गडाचा फ़ोटो)
ह्या गावातूनच सोंड वर चढते. (गडावरून दिसणारा मार्ग) चढण तशी खडी आहे. सावलीला झाडे आहेत. पण पुरेशी नाहीत.. त्यामुळे उन्हाळ्यात भर उन्हात चढणे टाळावे. खडी चढण, कोंकणातली दमट हवा ह्यामुळे पाणी पाणी होते. वरती चढतानाच वरची वाडी दिसायला लागते.
पठारावर वाडीत पोचायला जवळपास २ तास लागतात. (पावसाळी हवा आणी वेगात आल्यामुळे आम्ही सव्वा तासात वाडीत होतो) ( वाडी आणी गड)

वाडीत विहीर आहे. पण पाणी उन्हाळ्यातही असते का नाही ते कळले नाही. वाडीतून वरती गडावर जायला अर्धा-पाऊण तास पुरेसा आहे. (वाडीवरून दिसणार गड)

गडाचा रस्ता वाडीच्या डावीकडून आहे. गडाच्या डावीकडच्या सोंडेवरून रस्ता वरती चढतो. हा रस्ता नंतर काढला असावा. आधीचा रस्ता गडाच्या उजवीकडच्या सोंडेवरून असावा (उतरताना आम्ही तिथून उतरलो). चढताना डावीकडूनच चढावे. उजवीकडची वाट पटकन सापडणार नाही. हा रस्ता गडाच्या डावीकडच्या सुळक्याच्या मागे नेतो. जवळपास नेढ्याच्या खाली आले की वरती रस्ता जातो. आम्ही तिथे पोचलो तेव्हा ढग असल्यामुळे आम्ही पुढे गेलो. पण रस्ता चुकलो हे ध्यानात येताच मागे फ़िरलो. जरी चुकलात तरी तुमची गडाला प्रदक्षिणा होईल. चौक मधून वाडीवर येतानाचे दिशादर्शक बाण वाडी ते गड ह्यात अजिबात दिसत नाहीत. (सुरुवातीचा पॅच)
इथून वरती चढताना जरा रॉक पच आहे. उन्हाळ्यात तो काहीच अवघड नाही पण पावसाळ्यात हाच निसरडा होतो. आम्ही गेलो तेव्हा पावसाळा सुरू झाला होता. आम्हालाही पाऊस लागला. त्यामुळे पॅच जरासा निसरडाच होता.
वाटेतच पहिले टाके लागते. त्यात बर्‍यापैकी पाणी होते. पूर्ण गडावर दिसलेले हेच नितळ पाण्याचे टाके. बाकीच्या टाक्यात शेवाळे आहे. टाके उजवीकडे लागते तर शेंदूर फ़ासलेला देव डावीकडे. टाक्याच्या इथूनच एक ५-६ पाययांची शिडी लावलेली आहे. (शिडी, शिडी चढताना) दगडापेक्षा त्या शिडीचीच भीती जास्ती वाटली.. नुसती टेकवून ठेवल्याने कधी पडेल हे सांगता येत नाही.. त्यामुळे चढताना डोंगराच्या बाजूसच भार देऊन चढावे लागते. हा रॉक पच शेवटी नेढ्याला जाऊन थांबतो.

नेढ्यातून समोर मोरबे धरण, वाडी, वैगरे नयनरम्य परिसर दिसतो.. (फ़ोटो१,फ़ोटो२) जरासा प्रयत्न केला तर नेढ्याच्या वरतीही जाता येते (फ़ोटो). आताशी गडावर खूप ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत हे ही आढळून येते..(दरडीचा फ़ोटो, आणी त्या दरडीत) नेढ्यालाही भेगा पडल्या आहेत.. त्यामुळे कुठेही आधार घेताना भेगा गेला नाही ना ते पाहूनच हात लावावा..
नेढ्याकडून उजवीकडे छोटासा रॉकपॅच चढला की दक्षिणेकडच्या सुळक्या च्या जवळ जाता येते.. हा भाग आणी सुळका ह्यात सलग रस्ता नाही.. त्यामुळे बहुतेक सुळक्याच्या पायथ्याशी जाणारा मार्ग वेगळा असावा. पाऊस आणी ढग ह्यामुळे जास्त पुढे जाऊन पाहता आले नाही..
परत उतरून नेढ्यात येता येते... नेढ्याच्या पलीकडून वाट उत्तरेकडच्या सुळक्यावर (धरणाच्या बाजूकडच्या) नेते.. वाटेवरच एक मोठे टाके आणी खोदिव गुहा दिसते.
पाण्यात शेवाळे भरपूर आहे.. त्यामुळे आधी येताना (रॉकपॅच चढताना) जे टाके दिसले तेच उत्तम आहे.
खाली उतरताना जिथून रॉकपॅच सुरू झाला तिथे उतरावे..

आल्या वाटेने परतही जाता येते.. पण आम्ही गडाला प्रदक्षिणा घालायची ठरवली आणी दुसरी वाट कुठली तेही पाहायचे ठरवले.. त्यामुळे धरणाच्या दिशेने (उत्तरेकडच्या सुळक्याच्या कडेकडेने) वाट जाते ती पकडली.. ती वाट सुळका जिथे संपतो तिथे पोचली. म्हणजेच गडाची अर्धी प्रदक्षिणा झालीच.. वाटेत अजून एक पाण्याचे टाके दिसले. आकाराने ते गुहेशेजारी जे टाके आहे त्याच आकाराचे आहे. तसेच ह्याच वाटेवर नेढ्याकडे जाणारी अजून एक वाट असावी असे दिसले. ही वाट बहुतेक रॉकपॅच वरील देव आहे तिथे निघत असावी.. ही वाट जिथे वरती चढायला सुरुवात केली तिथून ५० मी. वरच आहे.. ही वाट, टाके.. ह्यामुळे असे वाटते की गडावर यायची जुनी वाट ही वाडीतून उत्तरेकडच्या सुळक्याला वळसा घालून असावी. आम्ही वरती लिहिल्याप्रमाणे वाडीतून डावीकडच्या वाटेने वरती आलो.. गावकर्‍यानीही तीच वाट सांगितली होती. एक गावकरी म्हणाला की उजवीकडून तुम्हाला वाट घावनार नाही. ती वाट कुठली हे पाहण्यासाठीच आम्ही इकडे आलो. (फ़ोटो).
ही वाट आता बर्‍याच दरडी कोसळल्यामुळे वापरात नाही.. कदाचित धरणाच्या कामात सुरुंग फ़ोडले त्यामुळेही दरडी कोसळल्या असतील
हीच वाट सुळक्याच्या टोकावरून खाली उतरत नाही.. सुळक्याला वळसा घालून परत सुळक्याच्या कडेकडेने दक्षिणेकडे जाते (यू टर्न). आणी तिथूनच एक सोंड वाडीत उतरते.

परत येताना रेल्वे स्टेशन ओलांडून पुणे मुंबई महामार्गावर यावे. तिथून खोपोली वा कर्जत ला जायला ६ सीटर मिळतात.. कर्जत ला जाणार्‍या रिक्षा जास्त आहेत.. आम्हाला अर्ध्या ते पाऊण तास थांबावे लागले. कर्जत्-पनवेल वा खोपोली-पनवेल अशा ह्या रिक्षा चालतात.. त्यामुळे पनवेललाही जाता येईल. पनवेल ला जातानाच शेडुंग गाव लागते.. तिथून प्रबळगडावर जाता येते..
खोपोली ते चौक हे रिक्षाचे आणी ST चे भाडे १०-११ असे आहे.

इर्शाळगडावरुनही एक वाट प्रबळगडावर जाते (फ़ोटो).१.५ दिवसात प्रबळगड आणी ईर्शाळगड होऊ शकतो.. शनीवारी संध्याकाळी रात्री ईर्शाळगडावर मुक्काम करता येईल. रवीवारी सकाळी प्रबळगडावर जाता येईल. हे अंतर पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ३ तास आहे.

प्रबळगडाचा पसारा तसा मोठा आहे. (प्रबळगडाचे फ़ोटो) पण महत्त्वाची ठिकाणे पाहून ३-४ वाजता परत गडावरून उतरता येईल. शेडुंग ते प्रबळगडाचा पायथा ह्या वाटेवरही संध्याकाळ ६:३०-७ पर्यंत रिक्षा चालतात.

:-आनंद


Dineshvs
Thursday, June 28, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंद छान आहेत फोटो. रोजच्या पाहण्यातला ईर्शाळगड, आज जवळुन बघता आला.
मला तो आकार खेकड्याच्या नांगीसारखा वाटतो.


Cool
Friday, June 29, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मस्त रे धुमकेतु, आमच्या सोबत परत यावे लागेल तुला आता ..
वृत्तांत सुद्धा छान लिहिलास


Limbutimbu
Saturday, June 30, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिन्कसहीत छान वृत्तान्त लिहिलास रे! :-) खुपच कष्ट घेतलेस! पण सन्दर्भासाठी मस्त झाला हे हा लेख!

याला आम्ही "इरसाळ" असे म्हणतो
हा ट्रेक मी बहुतेक १९८८ की १९८९ मधे केला होता!
या ट्रेकची आठवण म्हणजे आदल्या सन्ध्याकाळी शाखेत घोडसवार युद्धा खेळत असताना माझ्यावर चारपाचजण तुटुन पडले आणि पाठीवरच्या बाल स्वयन्सेवकास काही होवु नये म्हणुन मी खाली पडता पडता सगळा भार एका गुढग्यावर पेलला, त्यामुळे गुढग्याला जखम होवुन तो दुखावला!
दुसर्‍या दिवशी या इरसाळ करता रवाना झालो, तेव्हा चढतानाच जाम दुखत होते, उतरताना अक्षरषः एका काठीच्या आधाराने एक पायाची लन्गडी घालत उतरत होतो! तेव्हा लागलेला पाय काठीभोवती गुन्डाळुन घेतल्याने व तो पाय लटकत असल्याने जान्घेत (आडसन्डीत) तडस लागली ती लागलीच शिवाय उरलेल्या दुसर्‍या पायात पोटरीत आणि तळव्यात महा भयानक पेटगे येवु लागले
अरुन्द धारेवरुन खोल उतार, शरीराचे व सामानाचे आख्खे वजन पेलवत एका पायावर तोल साम्भाळत उतरताना ज्या वेदना होत होत्या त्या शब्दात सान्गणे शक्य नाही! अति वेदनेमुळे शेवटी पाय लट लट थरथरू लागले होते
शेवटी कसाबसा उतरलो!
आजही मुम्बईला जाताना तो गड बघितला की त्या प्रसन्गाची आठवण झाल्या खेरीज रहात नाही
आणि आजही, जेव्हा केव्हा चढण चढतो तेव्हा उतरताना गुढगा जाम दुखतो, कारण त्यावेळेस गुढगा जो दुखावला, तो कायमचाच, त्यावेळेस औषधे बरोबर नसायची, हल्ली स्प्रे मलमे वगैरे बरोबर असते! (
सन्दर्भ्: माझी राजगडची ट्रिप)



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators