Gandhar
| |
| Friday, January 06, 2006 - 1:09 am: |
| 
|
बाहेर आभाळ दाटून आलं होतं.. कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वाटत असतानाच त्याचं बरसणं चालू झालं.. पावसाचं ते तांडव बघत असताना मन मात्र भूतकाळात चाललं होतं.. डोंगरांच्या कुशीत वसलेलं सातारा माझं गांव.. घर अगदी डोंगराच्या पायथ्याशी होतं आमचं..घराभोवती छोटीशी बाग.. मातीचं अंगण.. बाबांना बागकामाची खूप आवड होती त्यामुळे खूप वेगवेगळ्याप्रकारची झाडं बागेत होती.. बाग कायम नीटनेटकी असायची..पावसाळ्याच्या दिवसांत डोंगर उतारावरून येणारं पाणी अंगणात साचायचं.. पाणी साचून साचून मग संपूर्ण अंगणभर मऊ हिरव्यागार शेवाळ्याचा थर साठायचा.. निसरडं व्हायचं पण तरीही त्यावरुन चालताना पावलांना होणारा ओला मऊ स्पर्श छान वाटायचा.. अगदी लहानपणी एक समजूत होती ( शाळेत पाऊस कसा पडतो हे शिकवण्यापूर्वी ) की पाऊस समोरच्या डोंगराच्या पाठीमागून येतो..म्हणून मग आकाशात ढग जमा झाले की पहिल्यांदा पावसात आपल्याला भिजायला मिळावं म्हणून आमची वानरसेना डोंगरावर धूम ठोकायची.. ( आता आठवलं तरी हसू येतं ) .. बहुतेकवेळा डोंगरावर पोचण्यापूर्वीच पावसाला सुरुवात होउन सर्व सेना चिंब भिजायची.. घराजवळून डोंगराला टेकलेले जे ढग दिसायचे ते तिथे गेल्यावर कुठे गायब व्हायचे याचं आश्चर्य वाटायचं.. डोंगरावरुन एका बाजूला आमची कॉलनी दिसायची आणि एका बाजूला गांव दिसायचे.. मग ढगांचं आश्चर्य ओसरुन जायचं अन ओळखीच्याच गोष्टी डोंगरावरुन पुन्हा एकदा ओळखण्याचा खेळ व्हायचा.. पावसात चिंब भिजलेलो असलो तरी डोंगरातून वाहणार्या पाण्याच्या ओहळांमध्ये पुन्हा भिजायचो.. मुद्दाम निसरड्या वाटा शोधून तिथे घसरगुंडी खेळायला खूप मजा यायची.. अशा वाटा शोधून काढण्याची जणू एकमेकांत स्पर्धाच असायची.. आपण शोधून काढलेली वाट जणू आपल्याच मालकीची वाटायची.. चिखलात लोळून, मनसोक्त खेळून झाल्यावर आम्ही घरी परतायचो.. साधारण पाचवी, सहावी पर्यंत दरवर्षी हाच आमचा नित्यक्रम बनून गेला होता.. तसं बाराही महिने आम्ही डोंगरावर खेळयला जायचो पण पावसाळ्यातला डोंगर त्या न कळण्याच्या वयातही वेगळा भासायचा... थोडं मोठं झाल्यावरही पावसात भिजण्यावरुन आई बाबांचा ओरडा खाल्लेला तितकासा आठवत नाही पण ओरडा बसायचा तो घरासमोर अंगणात साचलेल्या पाण्यात खेळताना.. कारण थोड्यावेळात पाणी ओसरायचे आणि मग नुसतंच शेवाळं आणि चिखल असायचा.. आम्ही चिखलातच विटी - दांडू किंवा क्रिकेट, अबाधुबी, चिप्परपाणी वगैरे खेळायचो..मनसोक्त खेळून झालं की आमची रवानगी बागेतल्या हौदावर व्हायची.. तिथे हातपाय धुवून मग घरात जायचे.. पण चिखलात इतकं माखलेलं असायचो की थोडासा तरी चिखल घरात जायचाच.. मग मात्र बाबांचा रागाचा पारा एकदम चढायचा.. खूप राग यायचा तेंव्हा बाबांचा.. पण तो व्यक्त करण्याची हिंमत कधीच नव्हती.. मग आई आंघोळीला गरम पाणी द्यायची.. किती मस्त वाटायचं... नंतर जेवताना कधी कधी बाबांच्या हातची गरम भाकरी, कुळीथाचं पिठलं, जोडीला खास काटदर्यांची लसूण चटणी.. व्वा.. मजा यायची.. तेंव्हा बाबांवरचा राग थोडा कमी व्हायचा.. घरी टि. व्ही. नसल्यामुळे इतर गोष्टींत वेळ न घालवता थोडा अभ्यास ( ? ) करुन झोपी जायचो.. सतत पाण्यात खेळल्यामुळे बर्याचदा पाय दुखायचे.. त्यावेळी न सांगता तेल, अमृतांजन लावून पाय चेपणार्या बाबांची मूर्ती मला आजही स्पष्ट आठवते.. तो स्पर्श न बोलताही खूप काही सांगून जायचा.. त्यावेळी मी त्यांच्यावर परत कधी रागवायचे नाही असा पक्का निश्चय करु झोपी जायचो पण तो निश्चय दुसरे दिवशी सकाळी उठेपर्यंतच टिकायचा... मुळात बाबांचा स्वभाव थोडा अबोलच.. निटनेटकेपणा, शिस्त हे त्यांचे अंगभूत गुण होते.. त्यामुळे मग एखादी गोष्ट थोडी जरी नीट नाही झाली नाही की त्यांना राग येत असे.. राग आला तरी ते जास्त ओरडत नसत तर उलट जास्तच अबोल होत. गौरवर्ण असल्यामुळे अशावेळी त्यांच्या चेहर्यावर आलेली लालसर छटा स्पष्ट दिसायची.. एखाद दुसरा अपवाद वगळता त्यांनी मला कधी मारल्याचे स्मरत नाही.. नियमीतपणा त्यांच्या रक्तातच भिनलेला होता.. दररोज उठल्यापासून त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा.. शेवटपर्यंत त्यात कधी बदल झालेला मला स्मरत नाही.. देवधर्म, सोवळे ओवळे ते कटाक्षाने पाळत.. पण त्याचे त्यांनी कधीच अवडंबर माजवले नाही ना आमच्यावर तशी कुठलीही सक्ती केली.. एक नक्की की बाबांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे आम्हा भावंडांना खूपशा चांगल्या आणि नेटक्या सवयी आपोआपच लागल्या.. लहानपणी त्यातल्या काही गोष्टी जाचक वाटायच्या पण आज त्याचे फायदे जाणवतात.. त्यांनी आमचे फाजिल लाड कधीच केले नाहीत पण आमचे सुलभ बालहट्टही कधी पुरवले नाहीत असंही नाही.. स्वतःचे खूप शिक्षण झाले नसले तरी आम्हाला पुरेसं शिकवलं.. आम्ही काय शिकावं, काय करावं हे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.. सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम संस्कारांची आम्हाला आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी दिली.. आज माझ्या हातून जर काही चांगले घडत असेल तर ती माझ्या आई - बाबांची पुण्याई. जर काही वाईट घडत असेल तर तो सर्वस्वी माझा दोष...... असो.... आज पावसामुळे या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.. बाबा आजही आठवणींच्या रुपात कायम माझ्या बरोबर असतात.. फक्त कधी कधी ते असे भेटून जातात जसे आज पावसाच्या रुपात भेटून गेले..........
|
Pendhya
| |
| Friday, January 06, 2006 - 1:36 am: |
| 
|
वा! गंधार, सुंदर. आपल्या हातून घडणार्या वाईट कॄत्यांचा दोष, आपण स्वत : वर घेण्यातच, आपल्यावर झालेल्या संस्कारांचा मोठेपणा दिसून येतो. हे, आई - वडलांचे आपल्यावर झालेले संस्कारच असतात, जे आपल्याला एक चांगली व्यक्ति बनवण्यासाठी ऊपयुक्त ठरतात. सुंदर लिहिलयस.
|
गंधार, 'बालपणीचा काळ सुखाचा'! ' वोह कागज की कश्ती वोह बारीश का पानी'!!!! छान लिहिल आहेस, एकंदरीत HG वर थंडीच्या season मधे 'लगी आज सावन की फ़िर वोह झडी है' अस दिसतय
|
Karadkar
| |
| Friday, January 06, 2006 - 2:11 am: |
| 
|
गंधार, छान लिहिले आहेस रे. मस्तच एकदम.
|
Charu_ag
| |
| Friday, January 06, 2006 - 2:25 am: |
| 
|
वा! सुंदर. पाऊस, त्याचे जुणे नवे संदर्भ....... निव्वळ अप्रतिम.
|
Milya
| |
| Friday, January 06, 2006 - 4:22 am: |
| 
|
गंधार खासच... जितके निरागस तितकेच touching लिहिले आहेस तू कायमच चांगले लिह्तोस पण एवढे सलग लिहिलेले मी तरी प्रथमच वाचले... कुठला दोंगर रे हा. अजिंक्यतारा का रे?
|
Moodi
| |
| Friday, January 06, 2006 - 4:33 am: |
| 
|
वा गंधार मनाला भिडणारे लिहिलेस. आपण घरच्यांपासुन दूर गेल्याशिवाय किंवा स्वता आई बाप बनल्याशिवाय आपल्या आईबाबांचे प्रेम अन काळजीयुक्त रागवणे समजत नाही, पण काही घटनांसोबत मग ह्या आठवणी पण जाग्या होतात.
|
Kandapohe
| |
| Friday, January 06, 2006 - 8:40 am: |
| 
|
गंधार सुंदर!! बालपणाच्या अशा आठवणी आल्या की मन पावसाशिवाय भिजून जाते हेच खरे. 
|
Dineshvs
| |
| Friday, January 06, 2006 - 11:56 am: |
| 
|
छान गंधार. आता वाटेत अजिंक्यतारा दिसला कि पाऊस आठवणार. अजुनहि सातार्यात अजिंक्यतारावर ढग आहेत का हे बघुन, सातारकर पावसाचा अंदाज बांधतात.
|
Zelam
| |
| Friday, January 06, 2006 - 12:02 pm: |
| 
|
छान लिहिलंय गंधार. शेवटचा para एकदम touching .
|
Arch
| |
| Friday, January 06, 2006 - 5:02 pm: |
| 
|
गंधार मस्तच हं. तुझ घर आणि आईबाबा आमच्या डोळ्यासमोर उभे केलेस. आमची आईपण शाळेतून यायच्यावेळी पाऊस पडत असला तर पाय धुवायला पाणी गरम करून खिडकीतून आमची वाट बघत असायची.
|
Atul
| |
| Friday, January 06, 2006 - 6:26 pm: |
| 
|
गन्धार, खूपच सुन्दर, छोटेसे पण खूप काही सन्गणारे लिहीलेस.
|
Paragkan
| |
| Friday, January 06, 2006 - 6:29 pm: |
| 
|
वा गंधार! छानच रे! ---------------------------------- पावसाळ्यातला अजिंक्यतारा! आय हाय .... डोळे खिळून राहणे म्हणजे काय ते तिथे समजलं. लहानपणी एक वर्षभर फुटक्या तळ्याजवळ घर होतं. घरातून परसात गेलं की समोरच तो उभा असायचा. पावसाळ्यात तर त्याचं रूप आणखीनच राजबिंडं दिसत असे. डोंगराच्या अर्ध्यापर्यंत उतरलेले ढगांचे पुंजके, त्याखाली विरळ होत गेलेलं धुकं आणि पावसाच्या सरी! किल्ल्याची काळी तटबंदी त्या ढगांमधून चुकून कुठेतरी दिसायची. पाऊस बराच झाला असेल तर मग डोंगरालगत खाली झेपावणारे पाण्याचे ओहोळ, एखादा धबधबा .... सगळं कसं घरातूनच दिसायचं. घराच्या पहिल्या मजल्यावर एकच खोली होती. ती माझ्या ताब्यात असे. त्याचं एक दार स्वयंपाकघरावरच्या पत्र्यावर उघडत असे. आणि एक मोठ्ठी खिडकी होती ... अजिंक्यतार्याच्याच दिशेला. जुन्या पद्धतीचं घर होतं. त्यामुळे आरामात अक्षरशः बसता येईल एवढी मोठी होती खिडकी. मग काय? वाटीभर चुरमुरे दाणे घ्यायचे आणि त्या खिडकीत जाऊन बसायचं ... पत्र्यावर नाचणार्या थेंबांचा मल्हार ऐकत. सातार्यात कुठेही जा ... अजिंक्यतारा दिसतोच. कधी अंगणातून, कधी परसातून, कधी गच्चीतून, कधी गॅलरीतून. गेल्या वर्षी वडिलांची बदली पुन्हा एकदा सातार्याला झाली. आधी जेव्हा जेव्हा सातार्यात होतो तेव्हा तेव्हा घरातून अजिंक्यतारा हमखास दिसायचा. आता नव्या घराच्या आजूबाजूला म्हणे उंच इमारती आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरच्या कोपर्यावर गेल्याशिवाय अजिंक्यतारा दिसतच नाही अशी बहिणीची तक्रार असते.
|
Chinnu
| |
| Friday, January 06, 2006 - 7:36 pm: |
| 
|
गंधार, तुझ्या आठवणी वाचता वाचता चिंब भिजले मी! मला carpet वर पण माझे चिखलाचे पाय उमटलेले दिसतहेत! खुप सरस छे!! पी. के. तुमचा पत्र्यावरचा मल्हार, लहानपणीच्या शाळेत घेवुन गेला की थेट!
|
Pama
| |
| Friday, January 06, 2006 - 7:38 pm: |
| 
|
गंधार, खूप छान लिहिलयस. मला पण तुझ्या घरी राहून आल्यासारख वाटतय आता..
|
Ashwini
| |
| Saturday, January 07, 2006 - 12:57 am: |
| 
|
गंधार, मस्त लिहीलं आहेस. मला पण माझी पर्वती आठवली. आणि DJ, कागज की कश्ती खरच ग! पर्वतीच्या पायर्यांवरून पावसाचं पाणी वाहात यायच आणि आम्ही त्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो. किती निरागस दिवस होते ते...त्या पाण्यासारखेच वाहून गेले.
|
Daizy
| |
| Saturday, January 07, 2006 - 4:46 am: |
| 
|
वा ! छानच.. माज़्याही वडिलाची माया आम्हाला त्याच्या क्रूतीतुन कळत असे. आज आठवण जरी झाली तर आपण किती दुष्ट होतो असे वाटते.
|
वा गंधार ! तुझ्या आठवणी वाचून छान वाटलं ... परागकण, तुझही लहानस पोस्ट मस्त. जरा विस्ताराने लिही ना.
|
Shyamli
| |
| Saturday, January 07, 2006 - 6:50 am: |
| 
|
गन्धार छानच तूझा श्रावण वाचून आम्हालाहि सगळ्यान्ना लहानपणिचा पाऊस आठवला बघ आणि हो पराग तुझ अजिन्क्यतारा बघावासाच वाटायल लागलय
|
Gandhar
| |
| Monday, January 09, 2006 - 11:19 pm: |
| 
|
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार!!!
|
Milya
| |
| Tuesday, January 10, 2006 - 3:10 am: |
| 
|
अजिंक्यतारा अंधुक अंधुकसं आठवतोय आम्ही शनिवारात ( शनिवार पेठ्) रहायचो.. अजिंक्यतारावरुन जो रस्ता थेट खाली यायचा तो शनिवारातच. रस्त्याला खूप उतार होता अजिंक्यातारावर एक देउळ आहे बहुतेक हनुमानाचे का देवीचे ( आता नक्की आठवत नाही) तिथे आम्ही जवळजवळ रोज जायचो खेळायला. त्या देवळाजवळ एक प्रचंड शिळा होती. तिच्यावर चढुन जाउन वर बसायला आणि तिथेच बसुन चुरमुरे आणि फ़ुटाणे, दाणे खायला खुप मजा यायची गं, पीके जुन्या आठवणी जागा केल्यात रे अगदी.... आता सातारा खुप बदलल असेल अगदी माझ्यासारखच पण ती जुनी शिळा अगदी तशीच असेल भुतकाळाची साक्ष देत...
|
>>>>> भुतकाळाची साक्ष देत... होऽऽना, आणि वर्तमानकाळीन युगुलान्ची साक्ष घेत असल! ddd
|
Bgovekar
| |
| Tuesday, January 10, 2006 - 6:52 am: |
| 
|
गंधार, पराग तुमच्या मनच्या बरसलेल्या आभाळाने सारं झाकोळुन टाकलत. तुमच्या लिहिण्यातुन त्या प्रसंगाचा अनुभव तुंम्ही दृश्य केलात.. खुप छान वाटल वाचुन.. गंधार तुझ्या आठवणीतले बाबा आंम्हालाही भेटले जणु!!
|
गधार ... वाचताना सुरुवातीला केवळ तुमच्याशी निगडीत वाटणारया आठवणींनी हळू हळू माझ्या किंवा सगळ्यांच्याच आठवणी कश्या जाग्या केल्या समजत नाहिये ... पुन्हा पुन्हा वाचतोय ... अं हं ... हे असं माणसाला भलतीकडेच नेवून सोडणं बरं नव्हे पराग ... थेंबांचा मल्हार ... काय बोलु ?
|
Champak
| |
| Tuesday, January 10, 2006 - 1:05 pm: |
| 
|
मस्त च लिव्हलय रे दोघांनी ही!
|
Tulip
| |
| Saturday, January 14, 2006 - 12:13 pm: |
| 
|
अगदी सुरेख आठवणी गंधार. खुप छान वाटल वाचून
|
Lampan
| |
| Monday, January 16, 2006 - 1:04 am: |
| 
|
Aa^iÔsa maQyao basauna ho vaacalaM AaiNa vaaTlaM ik baahor gaolyaavar AakaXaat ZgaaMcaI gadI- AsaNaar
AaiNa qaÜDasaa mast vaasa... maatIcaa gavatacaa ... AaiNa sa^kmaQyao baalaBaartIca navaM kÜrM ba`a}na poprca kvhr GaatlaolaM pustk AsaNaar .. sauMdr laoK ²²²
|
Athak
| |
| Monday, January 16, 2006 - 1:21 am: |
| 
|
गंधार , छानच लिहीलेस , keep it up
|
नेमक्या शब्दात मान्डलयस त्यामुळे मनाला स्पर्शुन गेल. आईवडिलानी केलेले सन्स्कार, दिलेली शिकवण हीच तर आपली खरी सम्पत्ती आहे. पण आजकाल काही मुलाना शिस्त किन्वा सन्स्कार हा प्रकार जाचक वाटो, त्यान्ची कीव करावी तेव्हढी थोडी ! आईवडिलाना त्याच्या वृद्धापकाळी देखभाल करायला सुद्धा मुल पुढेमागे बघतात त्यासाठी कायदा करावा लागतो यासारखी दुःखद गोष्ट दुसरी नाही.
|
Bhagya
| |
| Wednesday, January 18, 2006 - 7:21 pm: |
| 
|
पराग, वाटीभर चुरमुरे दाणे ????? माझा मागच्या जन्मी बिछडलेला जुळा भाऊ तर नव्हेस अशा वेळी पुस्तक पण हवेच ना हातात? गांधार, 'छेडि सुरावट मल्हाराची धारांच्या तारांवर वारा' हे पाडगावकरांचे शब्द आठवले.
|
Paragkan
| |
| Thursday, January 19, 2006 - 2:32 pm: |
| 
|
माझी हरकत नाही असायला. खरंतर ते अनुवांशिक आहे. माझ्या आईच्या माहेरी तमाम जनता चुरमुरे आणि पोहे यावरच जगली आणि तगली आहे. पूर्वी म्हणे गावी घरात चुरमुरे आणि पोहे या गोष्टी पिशवीतून वगैरे नाही ... पोत्यातून भरून ठेवलेले असत. अर्थातच त्याबरोबर दाणे आणि गुळाची ढेपही असायचीच. अशा वेळी पुस्तक पण हवेच ना हातात >>>> मी काही फार मोठा पुस्तक प्रेमी वगैरे नव्हतो तेव्हा ( अजूनही वाचन बेताचंच आहे ) . त्यामुळे अशा पावसात वाचन वगैरे नाही जमलं कधी. पण त्या वरच्या खोलीतल्या त्याच खिडकीत बसून माझ्या वाचनाला सुरुवात झाली हे ही अगदी खरं. तिथे असतानाच उन्हाळ्याच्या सुट्टीत ' श्रीमान योगी, छावा ' पासून सुरुवात झाली होती. खोलीवर ऍसबेस्टॉसचा पत्रा होता. त्यामुळे दुपारच्या उन्हात खोली झकास तापायची. वाचता वाचता अनेकदा उकाड्याने ग्लानी आल्यागत झोप लागायची.
|
Manuswini
| |
| Saturday, January 21, 2006 - 2:25 am: |
| 
|
गंधार खरेच आई पप्पाचे प्रेम हे दुर राहिल्यावर ज्यास्त कळते ह्या आठवणिने माझ्या पप्पाची पाय चेपायची सवय आठवली ते लहानपणी आमचे पाय चेपायचे गोष्ट सांगत रात्री झोपताना ... आणी आता त्याचे पाय दुखतात आणी मी जवळ नाही anyways लहानपणीचा काळ सुखाचा
|
Meghdhara
| |
| Saturday, January 21, 2006 - 12:23 pm: |
| 
|
गंधार खुपच हळवं लिहिलं आहेस वाटलं छे आत्ता जाऊन आई बाबांना भेटुन यावं. मेघा
|
Gandhar
| |
| Tuesday, January 24, 2006 - 6:35 am: |
| 
|
पराग आणि मिल्या तुम्ही तुमच्या आठवणी लिहून खरच बहार आणलीत... मनापासून धन्यवाद!! पावसाळ्यात उमटलेल्या आठवणी, आत्ता मस्त थंडीच्या दिवसांत, जानेवारी महिन्यात लिहिण्याचं कारण म्हणजे या महिन्यचां बाबांशी असलेलं नातं.. २५ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आणि २८ जानेवारी हा त्यांचा स्मृतीदिन.. बाबांच्या अनेक आठवणी कायम मनात असतात प्रत्येकवेळी त्याला शब्दरुप देता येत नाही.. तरी हा एक छोटा प्रयत्न केला होता त्याला तुम्ही सर्वांनी भरभरुन दाद दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद!!
|