|
Supermom
| |
| Tuesday, February 13, 2007 - 8:44 am: |
| 
|
वरच्या मजल्याच्या खिडकीतून रेवतीने खाली एक नजर टाकली. सगळीकडे नोकरमाणसांची गडबड उडालेली दिसत होती. सत्यनारायणाची जय्यत तयारी सुरू होती.सुगंधी अत्तराचा, फ़ुलांचा अन सुग्रास अन्नाचा वास कसा एकात एक मिसळून गेला होता. हातात केळीचे खांब, शेवंतीचे हारे घेऊन गड्यांची लगबग चालली होती. खिडकीपासून दूर होऊन रेवती आपल्या भल्यामोठ्या कपाटाकडे गेली. ते कपाट उघडताना जुन्या सागवानी लाकडाचा किंचितसा करकर आवाज झाला. त्या आवाजाने का कोण जाणे, तिला जरा शहारल्यासारखं झालं. 'एकच दिवस झाला या घरी येऊन आपल्याला. खरंतर या वाड्याची, इथल्या सार्या वैभवाची मालकीण आहोत आपण. पण कालपासून काहीतरी रुखरुख वाटतेय मनाला. काय ते सांगता नाही येत......' अंतरीचे सारे उदास विचार तिनं झटकून टाकले. 'लग्नाला एकच दिवस तर झालाय आपल्या. कालच्या दगदगीनं, सीमान्तपूजनाच्या जागरणानं थकून गेलोत आपण. म्हणून ही हुरहुर वाटतेय. दुसरं काही नाही.लवकर तयार व्हायला हवं आता.' सासूबाईंनी कालच तिचं म्हणून सांगितलेल्या त्या कपाटात तिनं एक नजर फ़िरवली. तिच्या दोन्ही सूटकेसेस मधले कपडे रात्रीच सत्यभामेनं नीट आत लावून ठेवले होते. सासर माहेर दोन्ही सधन असल्याचा ते सारे कपडे जणू पुरावाच देत होते. त्यातल्या सलवार कमीजच्या घड्यांकडे बघून तिच्या मुद्रेवर एक हलकीच हास्यरेखा उमटली. 'या वाड्यात हे कधी घालणं शक्यच नाहीय. इथलं सारं वैभवी खरं, पण अगदी जुन्या पद्धतीचं. इथल्या सुना गर्भरेशमी जरीच्या साड्यांमधेच वावरणार सतत.' तिच्या मनात आलं. हलक्याशा टकटकीनं तिची तंद्री भंगली. दार हळूच ढकलून सासूबाई आत आल्या. 'अजून तयार नाही झालीस बाळ?' त्यांच्या चेहेर्यावर स्मित होतं. गर्द जांभळ्या शालूत त्या विलक्षण रेखीव दिसत होत्या. इतक्या की ' आज आपल्यापेक्षा लोक कदाचित ह्यांच्याकडेच बघतील' असा गमतीशीर विचार रेवतीच्या मनात चमकून गेला. हातातल्या पैठणीची घडी त्यांनी उलगडली, अन रेवती भान हरपून बघतच राहिली. फ़िकट गुलाबी रंगाचं, चंदेरी बुट्ट्यांनी सजलेलं ते महावस्त्र खरंच फ़ार सुंदर होतं.
|
Supermom
| |
| Tuesday, February 13, 2007 - 11:05 am: |
| 
|
'बघ, आवडेल का तुला ही नेसायला? तुझ्या मनानं हं. नाहीतर तुझा शालू नेसणार असशील तरी चालेल.' 'आवडेल मला आई. खरंच फ़ार सुरेख रंग आहे हा....' रेवतीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सत्यभामा एक सुबक कोरीव काम केलेली मोठी पेटी घेऊन आली. हातातलं मखमली कापड तिनं हलकेच पलंगावर अंथरलं अन अदबीने दार ओढून ती बाहेर गेली. पेटीतले दागिने काढून उर्मिलाबाई- रेवतीच्या सासूबाई त्या मखमलीवर एकेक करून ठेवू लागल्या. 'बघ तुला काय काय घालावंसं वाटतंय या पैठणीवर.....' त्या अलंकारांकडे बघताना रेवती अगदी विचारमग्न झाली. 'खरंच, आईबाबांची एकुलती एक मुलगी आपण. बाबाही मोठ्या हुद्यावर. लग्न त्यांच्या परीने अगदी उत्तम केलं त्यांनी. पण या वाड्यातल्या श्रीमंतीची कल्पनाच नाही यायची कोणाला. आपण नुसतेच सधन, पण हे लोक खरे गर्भश्रीमंत.....' ते सारे दागिने बघून झाले, तशी अगदी आर्जवानं ती म्हणाली, 'आई, खरं सांगायचं तर लग्नात घातलेल्या दागिन्यांचंच ओझं होतंय मला. त्यापेक्षा असं करू का? मी या पैठणीवर सगळे मोत्यांचेच दागिने घालू का? हलकंही वाटेल मला, अन छानही दिसेल.' 'पण.... बरं, तुला आवडेल तसं.' जराशा साशंकतेनंच उर्मिलाबाई म्हणाल्या. मात्र,रेवती सारा जामानिमा करून आली, अन त्यांच्या मनातल्या सार्या शंका पार नाहीशा झाल्या. त्या साडीच्या गुलाबी रंगावर मोत्यांचे दागिने खूपच खुलून दिसत होते. नाकातली नथ त्या सगळ्या शृंगाराला एक वेगळाच उठाव आणीत होती. समाधानानं तिच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकून उर्मिलाबाईंनी सत्यभामेनं आणून दिलेला चमेलीचा गजरा तिच्या केसांत माळला, अन त्या जाण्यासाठी उठणार.... तोच रेवतीचं लक्ष त्या पेटीतल्या दोन सुवर्णसाखळ्यांवर गेलं. 'हा कसला दागिना, आई?' नवलानं तिनं प्रश्न केला. 'त्या पायातल्या साखळ्या आहेत बाळ. आपल्या घरात फ़ार पूर्वीपासून चालत आलेल्या. पण त्या कोणीच फ़ारशा वापरलेल्या नाहीत.' 'असं का आई?' 'अं... म्हणजे काय आहे की... रेवती, सोनं पायात घालू नये म्हणतात ना. लक्ष्मीचा अपमान होतो तो. फ़क्त राजघराण्यातल्या व्यक्तींनी, किंवा अतिशय भाग्यवान व्यक्तींनीच घालावं म्हणतात ग....' रेवतीचं कुतुहल आता चांगलंच जागृत झालं होतं. पण उर्मिलाबाईंनी भर्रकन विषय आवरता घेतला. त्या बाबतीत बोलायला जरा नाखुशच दिसत होत्या त्या. तोच तयार होऊन माधवही खोलीत आला, अन त्यानं सांगितलं, 'गुरुजी वाट बघताहेत. चला लवकर.' रेवतीकडे बघून तो क्षणभर थबकला अन मग पसंतीची मान डोलावून बाहेर गेला. दोघी सासवासुना घाईनं उठल्याच.
|
Vadini
| |
| Tuesday, February 13, 2007 - 4:31 pm: |
| 
|
Supermom,दिवाळी अंकातली एखादी कथा वाचतो आहोत की काय असे क्षणभर वाटून गेले.पुढील भाग कधी?
|
Supermom
| |
| Tuesday, February 13, 2007 - 10:03 pm: |
| 
|
जिना उतरून तिघं खाली येतात ना येतात तोच बाबासाहेब, म्हणजे रेवतीचे सासरे लगबगीनं सामोरे आले. 'किती उशीर? गुरुजी केव्हाचे खोळंबले आहेत.' त्यांच्या सुरात नाराजी होती. उर्मिलाबाई काहीतरी उत्तर द्यायच्या बेतात होत्या, तोच बाबासाहेबांची नजर रेवतीवर गेली. त्यांच्या नजरेतही तीव्र नाखुशी उमटलेली दिसली तिला. एक क्षणभर आपलं काय चुकलं हे तिला कळेचना. 'अन हे काय? अंगावर दागिने का नाहीत सूनबाईंच्या?' ' अहो, कालपासून अवजड अलंकार घालूनच वावरतेय. म्हणून आज तिला वाटलं........' उर्मिलाबाईंचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच बाबासाहेब उसळले, 'तिला काहीही का वाटेना- तुम्ही या घरच्या जाणत्या, तुम्हाला अक्कल नको?' संताप अन अपमानानं उर्मिलाबाईंचा चेहरा पुरता विवर्ण झाला. पन दुसर्याच क्षणी खालचा ओठ घट्ट दाबून त्यांनी रेवतीचा हात धरला. 'चल जा बाळ. सत्यभामेकडून पेटी घे अन दागिने घालून ये सारे.' इतका वेळ सारं जणू स्वप्नात घडतंय असं वाटणार्या रेवतीला भान आलं. तिच्या डोळ्यात रागाची एक लहर तरळली. झटक्यानंच तिनं माधवकडे पाहिलं.त्याचा चेहेरा अगदी निर्विकार होता. या प्रसंगी तो आपली बाजू घेईल असं रेवतीला फ़ार फ़ार वाटलं होतं. पण त्याच्या दगडी मुद्रेकडे बघून ती थक्कच झाली. वर येऊन सारे दागिने तिनं यांत्रिकपणेच अंगावर चढवून घेतले. पूजेला बसल्यावरही तिचं कुठेच लक्ष नव्हतं. भल्यामोठ्या आकडी मिशा अन हातात चांदीच्या मुठीची काठी अशा थाटात बाबासाहेब समारंभात वावरत होते.मधूनच डोळ्यांच्या कोपर्यातून रेवती त्यांच्याकडे बघत होती. 'ही काय पद्धत झाली बायकोशी वागायची? अन सासूबाई बिचार्या एक शब्द बोलल्या नाहीत.' तिच्या मनात आलं. रात्री माधव खोलीत आल्यावरही ती रुष्टच होती. तिच्या मुद्रेकडे बघून तो उलट गंभीर झाला. 'रागावलीस ना रेवा? पण बाबांचा स्वभाव जरा विक्षिप्त असल्याचं मी बोललो होतो ग तुझ्याजवळ. अन एक महिनाभरच तर निभवायचंय तुला. मग लंडनच्या घरी आपणच राजाराणी. अगदी तुझ्या मर्जीनं होईल सारं.' त्या कल्पनेनं ती खुदकन हसून त्याला बिलगली.
|
Maku
| |
| Thursday, February 15, 2007 - 4:37 am: |
| 
|
supermom mast chalu aahe lavakar lihi
|
Jhuluuk
| |
| Thursday, February 15, 2007 - 5:49 am: |
| 
|
सुपरमॉम, सहि चालु आहे, वाड्याचा फ़िल आला अगदि..
|
Supermom
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:57 am: |
| 
|
सकाळी रेवतीला लवकरच जाग आली. खाली वाड्यात चाललेली धावपळ,लगबग, वरही स्पष्ट ऐकू येत होती. माधवची झोप मोडणार नाही याची खबरदारी घेत ती उठली अन भराभर आंघोळ करून तयारच झाली. जिना उतरून खालच्या मजल्यावर येताच रेवतीला कुणाचातरी चढलेला आवाज ऐकू आला. मनात नसतानाही तिची पावलं सासूबाईंच्या खोलीशी रेंगाळली. हा बाबासाहेबांचाच आवाज होता. शंकाच नको. मधूनच उर्मिलाबाईंचा दबलेला आवाज अन त्यांचे हुंदके ऐकू येत होते. रेवती चांगलीच बुचकळ्यात पडली. आत जाणंही शक्य नव्हतं तिला. अन तिथे उभं राहाणंही प्रशस्त वाटेना. काय करावं या संभ्रमात ती नुसतीच उभी राहिली. तेवढ्यात त्यांच्या खोलीच्या दाराची कडी काढल्याचा आवाज आला. रेवती चपळाईनं खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. जणू बाहेरची बाग बघतोय असा देखावा करत. पाठमोरी असूनही तिला बाबासाहेबांच्या पायातल्या बुटांचा आवाज कळला. ताडताड ते बाहेर निघून गेलेलेही कळलं तिला. पण ती तशीच स्तब्ध उभी राहिली जागेवरच. उर्मिलाबाईंच्या हातातल्या बांगड्या किणकिणल्या, अन ती मागे वळली. त्यांच्या चेहर्याकडे बघताच त्या रडत होत्या हे तिच्या ध्यानात आलं. 'उठलीस का बाळ? ये चल स्वैपाकघरात. नीट घरही दाखवते तुला सवडीनं.' मघाच्या वादळाचा लवलेशही त्यांच्या आवाजात नव्हता. डोळ्यांच्या किंचितशा लालसर कडा अन कोमेजलेला चेहरा मात्र सहज समजून येत होता. शब्दही न बोलता ती त्यांच्या पाठोपाठ गेली. प्रत्यक्षात मात्र सारं विचारावसं फ़ार फ़ार वाटत होतं. 'काय दुःख असेल या ऐश्वर्यात न्हाणार्या रेखीव पुतळीला? दिसायला इतक्या सुरेख, प्रेमळ. अगदी खानदानी सौंदर्याची मूर्तीच जणू. अन नवर्याचं असं वागणं का सहन करतात ह्या?' विचारांचं काहूर मनातच ठेवून ती सहजपणे त्यांनी दाखवलेली एकेक खोली नजरे आड घालू लागली.मात्र माधवशी सारं काही स्पष्ट बोलायचा ठाम निर्धार करूनच. घर, घर कसलं छोटासा महालच होता तो. सारं बघून झाल्यावर उर्मिलाबाईंनी तिला स्वैपाकघरात नेलं. सत्यभामेनं तिच्यासाठी चांदीच्या फ़ुल्यांचा पाट अन समोर केशरी दुधाच्या पेल्याबरोबरच सांज्याची ताटली तयारच ठेवली होती. 'तुम्ही नाही घेणार आई?' 'नाही ग. मी सकाळी फ़क्त दूध घेते उठल्याबरोबर. अन संकोच न करता खाऊन घे. माधवनं मला सांगितलंय तुला नाश्त्याची सवय आहे म्हणून.' 'अं... थांबू का ते उठेपर्यंत?.' 'नको. घे तू खाऊन. तुझी आंघोळ झाली की आपण दोघी देवळात जाऊन येऊ .' रेवतीनं चवीनं नाश्ता केला. गेल्या दोन दिवसात प्रथमच आपण पोटभर खातोय असं वाटत होतं तिला. त्या दोघी देवळातून आल्या, तोवर माधवही उठला होता. तयार होऊन तो झोपाळ्यावर बसून त्यांची वाटच पहात होता. 'आई, रेवतीला बागा दाखवून आणतो जरा. तू येतेस का?' 'नको रे. जा तुम्ही दोघंच. जेवायच्या वेळेपर्यंत या परत. अन फ़ार उन्हात हिंडवू नकोस रे तिला. अजून हळदही वाळली नाहीय पुरती.' 'आलोच लवकर. आज तू माझी आवडती खांडवी करणार आहेस ना ग?' उर्मिलाबाई माधवकडे बघून स्निग्धपणे हसल्या. त्यांच्या त्या शांत डोळ्यांकडे बघून देवघरातल्या समईचीच आठवण आली रेवतीला.
|
SuperMom, नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर कथा आहे............ जुन्या वाड्यात जाऊन आल्यासारखं वाटतयं!!!!!!!!!!!!!
|
Sas
| |
| Friday, February 16, 2007 - 1:44 pm: |
| 
|
Supermom तुम्ही खुप छान लिहितात, वाचतांना कथा प्रत्यकक्षात होत आहे अस वाटत. तुमच्या मागच्या कथा ही खुप छान होत्या पण Mod ने Post घेण बंद केल त्या कथांच्या thread वर so I could not post all this on those but you really are a good Writer.
|
|
|