Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
तुझ्यासाठी

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » ललित » तुझ्यासाठी « Previous Next »

Nandini2911
Saturday, February 10, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पहिल्यादा मी तुला काहीतरी लिहितेय.. तुला वाचायला आवडत नाही तरीही... मी लिहितेय.

कारण मी आज लिहिलं नाही तर उद्या याला काहीच अर्थ उरणार नाही.

मी आज पर्यंत जे काही केलं ते फ़क्त तुझ्यासाठी... पण तुला ते कधी कळलंच नाही.

आणि आज सांगूनही काही उपयोग नाही... पण सांगितल्याशिवाय राहवणार पण नाही ना...

एकच वाक्य सांगायचय.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आजपासून नाही... खूप वर्षापासून आहे... चमकलास? म्हणून म्हटलं ना आज तरी तुला हे सांगायलाच हवं.

आज तुझं लग्न आहे ना? माझ्याशी तासनतास वाद घालयचास की लग्न म्हणजे फ़ालतुगिरी.. पायातली बेडी आणि आज ती बेडी तूच अडकवायला निघालास? तू आयुष्यभर स्वतंत्र राहणार होतास... मग आज का ही कैद स्विकारतोयस?
खरं सांगू.. तुझ्या या लग्नाच्या निर्णयाचा मला आनंदच आहे.. पण कधीकधी भिती पण वाटते रे.. लग्नानंतरही असाच भरकटलास तर?

पाहिलस माझं हे असं होतं.. सांगायचं काही वेगळं असतं आणि जाते कुठेतरी भलतीकडे...

ह्म्म्म.. चल आपण सुरुवातीपासून सुरुवात करू...

तुला आठवतं मी तुझ्या वर्गात होते? तू खूप मस्ती करायचास.... सगळ्याशी बोलायचास.. मी सोडून.. तसंही वर्गात माझ्याशी कुणी बोलायचं नाहीच...
बिना आईची मुलगी म्हणून सगळ्याची सहानूभूती मात्र न मागता मिळायची.

तेव्हापासूनच मला तू फ़ार आवडायला लागलास. पण तू माझ्याकडे कधीच लक्ष नाहीस. परवाच मी तुला विचारलं.. शाळेत असताना कधी वाटलंच नाही ना आपण परत भेटू म्हणून.. तर तू म्हणालास.. शाळेत आपण कुठे एकमेकाना ओळखत होतो?

शाळेनंतर मात्र आपले मार्ग भिन्न झाले. तू सायन्सला गेलास आणि मी आर्ट्सला... पण तरीही मी तुझ्यावर प्रेम करतच राहिले. तू मला परत कधीच मिळणार नाही हे माहित असूनही... मी झुरतच राहिले.. तुझ्यासाठी...

आता वाचताना तुला हादरे बसतायत ना....

खरंच मी कधी बोलले नाही तुला.. पण म्हणून तू समजून घ्यायचा प्रयत्न केलास का?

नाही ना? कारण तो तुझा स्वभावच नाही.....

चर्चगेट स्टेशनवर संध्याकाळी सात वाजता नवरा बायकोला ओळखत नाही तिथे तू चक्क मला ओळखलेस आणि तेही सात वर्षानंतर.. मी तर तुला ओळखलंच नसतं.
तू तुझं नाव सांगितल्यावरही मला कळायला वेळ लागला.... तुम्हा मुलाच्या चेहरेपट्टीत किती बदल होतो ना....

तुला नुकताच जॉब लागला होता आणि तू घर शोधत होतास..
योगायोगावर विश्वास बसायला माझी त्या क्षणापासून सुरुवात झाली होती.
पुढच्याच आठवड्यात तू माझ्या बाजूच्या फ़्लेटमधे राहायला आलास.

तुला एकटेपणा जीवघेणा वाटायचा. मला त्या एकटेपणाची सवय झाली होती.

रात्री दररोज जेवायला तु माझ्याकडे यायचा. तुझ्या डब्यातलं ते गार जेवणापेक्षा मी बनवलेला पिठले भात तुला आवडायला लागला.

तू आणि मी किती वेगळे होतो ना? मला जुनी गाणी आवडायची तर तुला धांगडधिंगा रिमिक्स. मला चांदण्या रात्री फ़िरायची आवड. तुला डीस्को आणि पबची..

प्रत्य्क क्षणी मला तुझ्या आणि माझ्यामधल्या या फ़रकाची जाणीव व्हायची मी माझ्या मनात तुझी एक प्रतिमा बनवली होती. तु या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होतास. पण तरीही तू मला आवडत राहिलास. का ते माझं मलाही माहित नाही.

तुझ्या मैत्रीणीचे सतत फ़ोन यायचे.. तुमच्या चावट गप्पा चालायच्या.. मी बाल्कनीतून खाली गाड्या बघत बसायचे.

तुझे आणि माझे वाद तासनतास रंगायचे. मला कडक मंगळ म्हणून मी जप तप करायचे.... तुला तेव्हाच माझी चेष्टा करावीशी वाटायची.

तुझ्या मते, लग्न ही गोष्ट गरजेची नव्हती. मला माझ्या वाढत्या वयाची चिंता होती.

पण ज्याच्यावर माझं प्रेम होतं तो मुलगा तर अजूनही माझ्याकडे बघायला तयार नव्हता. त्याच्याशिवाय दुसर्‍याबरोबर आयुष्य घालवायला मी तयारही झाले असते पण.......

कुठच्यातरी एका अनामिक क्षणी तू माझ्या खूप जवळ आलास आणि सगळ्या नात्याच्या पलीकडे आपलं एक नातं
तयार झालं.

त्या दिवशी मी खूप रडले. स्वत्:ला खूप दोष दिला. तू मला समजावलंस.. कुठल्याही commitment चा आधार न घेता हे नातं विणत गेलं.

मी तुझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवली नव्हती आणि ठेवणारही नाही. पण कधी कधी मला वाटायचं.... अजूनही वाटतं.... की मी तुला आधी सांगायला हवं होतं. तू मला कधी तशी संधी दिलीच नाहीस...

तुझ्या रात्राच्या धसमुसळेपणानंतर सकाळी मला तुझा खूप राग यायचा... पण पोळी करताना भाजलेल्या हातावर तू हलकेच फ़ुंकर घालायचा आणि माझा राग वाफ़ेसारखा निघून जायचा.

खरं सांगू.... आता मला कधी लग्नाची गरज वाटेनाशी झाली. तू फ़क्त माझ्या शरीराशी एकरूप झालास.. मी तुझ्यात विरघळून गेले.

पण परत योगायोग हा असतोच ना?

आता तुला लग्न करावंसं कुणीतरी भेटलं. तुला आता बंधनात अडकायचं होतं. मग तुला माझी काय पर्वा?

एक सांगू... जसा माझ्याशी वागलास तसा बायकोशी नको वागूस. कारण तुझं आणि माझं काही नातं नव्हतंच पण आता तू तिची जबाबदारी घेतोयस. आणि तिच्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न कर.

मला तुला लग्नानंतर खूप आनंदी बघायचय. माझी ही एकच अपेक्षा....... please ..........

बकी काय लिहू... एवढंच पत्र वाचतान दमला असशील ना..

ता. क.
हे पत्र वाचण्यात जास्त वेळ घालवू नकोस. मी कोर्टामधे तुझी वाट बघत बसणार नाही. कमीत कमी स्वत्:च्या (आणि माझ्या) लग्नाला तरी वेळेवर ये. आणि येताना नीट कुलुप लावून ये.







Maku
Saturday, February 10, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry पण नीट कळाले नाही.


Zakasrao
Saturday, February 10, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरवातीपासुन छान वाटल पण शेवट काहिच कळल नाही.

Bsk
Saturday, February 10, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे त्या दोघांचच लग्न होतं, rite?, छान लिहीलयस.. आवडल..

Srk
Sunday, February 11, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, लिहीलस छान. पण वाचल्यावर पोरीची काळजी वाटायला लागली. लग्नानंतर कसं व्हायचं हीच? बरच काही करायला वेळ मिळाला असतांना, "माझं शाळेत असल्यापासुन तुझ्यावर प्रेम आहे" एवढं सांगु नये? जनरली नवर्‍यांना बर्‍याच गोष्टी सांगितल्याशिवाय कळत नाहीत(सन्माननीय अपवाद वगळता). असो

Marathi_manoos
Sunday, February 11, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nice one Nandini. Keep writing

Chinnu
Sunday, February 11, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा.. गुड वन नंदिनी! धक्क्यावर धक्के, पण शेवटचा सहीच! नीट कुलुप लावुन ये! :-)

Manuswini
Monday, February 12, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला शेवट काहीच कळला नाही जो पर्यन्त मी बाकिच्यांच्या पोस्ट्स वाचल्या.
तरी confuse आहे की नात्यात एवढी पण जवळीक नाही मी 'माझे तुझ्यावर शाळेपासुन प्रेम आहे' हे सांगण्याईतपत??
काही कळत नाही बाबा आपल्याला anyways हे माझे मत.


Himscool
Monday, February 12, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी अजुन एक सुरेख लेख.. प्रत्येक ओळीत धक्का तंत्र

Prasik
Monday, February 12, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमीत कमी स्वत्:च्या (आणि माझ्या) लग्नाला तरी वेळेवर ये...........
स्तुती साठी शब्द कमी पडतायेत.

Dineshvs
Monday, February 12, 2007 - 10:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी छान आहे.
पत्राला मायना आणि सहि हवी होती.
srk प्रमाणेच माझे मत आहे. मला स्वतःला हे दबलेपण रुचत नाही.


Prasik
Tuesday, February 13, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमीत कमी स्वत्:च्या (आणि माझ्या) लग्नाला तरी वेळेवर ये.
.........म्हणजे त्या दोघांचच लग्न होतं, rite?,..
...............एक दुसरी शक्यता, (Sorry आगोदरच म्हणतो) पण समजा तीने आणि त्याने वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केले तर?...............

Abcd
Wednesday, February 14, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, तु खुप छान लिहीतेस हे ही मस्तच!!!
एकच खटकल, जी व्यक्ती सहज
"Physical relations " ठेवु शकते, ती साध प्रेम व्यक्त करु शकत नाही?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators