|
Admin
| |
| Monday, January 22, 2007 - 12:14 am: |
| 
|
प्रिय सखी मायबोली, वाटलं होतं की तुला पत्र लिहिणं अगदी सोपं जाईल.. कारण सांगण्यासारखं इतकं काही आहे..पण नेमकं त्यामुळेच मला जरा अडायलाच होतय ग ! आपण मराठी लोक रागबिग कसा पटकन दाखवतो पण स्नेह,प्रेम असं बोलून दाखवणं आपल्याला कठीणच ! ए मायबोले, बघ तुझ्यासाठी , फक्त तुझ्यासाठी मी माझा " मराठी बाणा " घटकाभर बाजूला ठेवतेय. तुझ्यासाठी मी काही करतेय असं म्हणायलाही लाज वाटावी खरं तर इतकं केलयस तू माझ्यासाठी. चारच वर्षांपूर्वीची ओळख पण फार फार जुनी आणि गाढ वाटावी अशी मैत्री आपली. व्यसन लागावं तशी अंगात भिनलेली ! आता आपण रोज भेटतोच आणि प्रत्यक्ष भेट नसते तेव्हाही माझ्या बोलण्यात तुझेच उल्लेख आपोआप येतात. मैत्रिणीचा प्रभाव आचार्-विचारांवर, वागण्या बोलण्यावर व्हावा यात नवल ते काय. तुझी प्रतिभा,तुझा रंगीबेरंगी स्वभाव, प्रत्येक गोष्टीत तार्किक चर्चा करण्याची तुझी सवय, तुझं पाककौशल्य या सार्याचं मला आकर्षण वाटतं ! अनेक गोष्टीत पारंगत असण्याच्या तुझ्या कसबाबद्दल किंचित असूयाही वाटते आणि कौतूक तर दाटूनच येतं ! आणि तुझ्या काही सवयी मात्र मी तंतोतंत उचलल्या आहेत हं. मला आता सगळ्या मायबोलीकरांविषयी अत्यंत आपुलकी वाटते, त्यांच कौतूक करावसं वाटतं आणि हल्ली मी खूप हसले असं म्हणत नाही तर माझी hhpv होते ! अगं आणि हे सगळं किनई आपोआप होतं. माझा नवरा, मुलं , इतर मैत्रिणी यांना हे जाणवतं. त्यांनाही आवडतच ग माझं " मायबोली-प्रेम " आणि त्यातून कधी त्यांनी माझी त्यावरून चेष्टा केलीच तर मी आपले दिवे घेते !! रुढार्थानं extrovert नसलेल्या मला तुझ्यासारखी मैत्रीण लाभली हे केवळ माझं नशिब. आदर्श मैत्रीणीचे सगळे गुण तुझ्यात एकवटलेले आहेत. तू मला समजून घेतेस, मला फुलवतेस. तुझ्या " चौदा विद्या आणि चौसष्ठ कला " यांच दालन माझ्यासाठी खुलं असतं. तुला इतर मित्रमैत्रिणीही चिकार आहेत आणि तुझ्यामुळे ते मलाही आपलेच वाटतात. तुमचं हितगुज चालू असताना मी हक्कानं डोकावते. मग मला ताजं लिखाण वाचायला मिळतं , त्यावर प्रतिसाद देता येतो, तुमच्या चर्चांमधून नवी माहिती , वेगळी मतं कळतात. सुंदर चित्र आणि फोटो बघायला मिळतात , वेगवेगळ्या रेसिपीजची "home edition" काढली जाते , आणि कुठला सिनेमा बघायचा(किंवा नाही) तेही मी पटकन ठरवून टाकते. महत्वाचं म्हणजे तुझ्यामुळे लिहिण्याची स्फुर्ती मिळते आणि लेखनाला तुझा प्रतिसाद मिळाला की अगदी " लेक चांगल्या घरी पडली हो " असं वाटतं. मला आठवतं पहिली कविता " पोस्टली " होती तेव्हा केवढी धाकधूक होती मनात ! कुणालाच ओळखत नव्हते ना मी तेव्हा. पण कवितेला छान दाद मिळाली. अनोळखी लोकांकडून आलेली ती पावती मला तुझ्या जगाची वेगळीच ओळख करून देऊन गेली. इथे चांगल्या कलाकृतीचं चीज होण्यासाठी आधीची ओळख असावी लागत नाही हा मोठा दिलासा होता. तुझ्या हरहुन्नरी मित्र-परिवारात सामिल होताना म्हणूनच मला अभिमान वाटतो ! जगाच्या कानाकोपर्यात विखुरलेले ते दोस्त मराठीचं प्रेम , साहित्य - कला क्षेत्राची आवड या अनोख्या बंधानं किती बांधले जातात हे मी स्वानुभवाने जाणते. मी आतापर्यंत एकाच GTG ला हजर राहिलेय पण त्यावेळी प्रथमच भेटलेल्या आपल्या मित्रांशी अशा गप्पा रंगल्या की जणू आम्ही शाळेपसूनच एकमेकांना ओळखतोय ! तुला माहितच असणार तरी सांगते आमच्या गप्पांचा विषय तेव्हा आणि नंतर कुठेही भेटलो तरी " तू आणि तुझ्या अनेक लिला " हाच असतो. विषय एकच पण वेळ पुरत नाही इतकं बोलतो आम्ही तुझ्याचविषयी. गंमत सांगू, गेल्या महिन्यात माझा नवरा UK ला चालला होता एका महत्वाच्या मिटींग साठी. त्याला जरा माहिती हवी होती तिथल्या एका जागेबद्दल. मी लगेच म्हटलं " थांब , मी " मूडी " किंवा " मिलींदाला " विचारून सांगते !! त्यानेही विचारलं नाही की "हे कोण" म्हणून. ताडलं त्यानं !! नंतर मी चौकशी न करताच त्याचं काम झालं ते सोड पण मी किती विश्वासानं बोलले बघ या एकदाही न बघितलेल्या आपल्या मित्रांविषयी ! असच एकदा मला एका शब्दाचा नेमका अर्थ हवा होता तेव्हाही मी वेलणकरांना मेल पाठवली होती आणि त्यांनीही मला लगेच उत्तर पाठवलं होतं. एकदा S.Korea मध्ये एक माझ्या मनातल्या " बेटी " च्या प्रतिमेशी जुळणारी मुलगी विमानात चढली तेव्हा न राहावून मी तिच्याशी ओळख करून घेतली होती.. ती बेटी नव्ही हे कळल्यावर थोडी नाराजच झाले होते मी ! आणि यावर्षी देशात जाणार सुटीसाठी,पुण्यातही एखादा दिवस असेन हे कळल्यावर आपली " लिंबोणी " आहे ना ती महणाली " तुला अभिश्रुती भेटली तर मी विचारलय म्हणून सांग. " त्यांची प्रत्यक्ष ओळख नाही. तुझ्याशी होणारे अभिश्रुतीचे संवाद लिंबोणीला आवडतात म्हणून केवळ तिला तस सांगावसं वाटलं म्हणे. आणि आपली " अज्जुका " तिने तर तुझ्या मित्रपरिवारातील काही जणांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम बसवलाय. किती छान कल्पना आहे ना ! असे आणखी कितीतरी किस्से आहेत. तुझ्यामुळे आम्ही सगळे जोडले गेलोय या मैत्रीच्या बंधनात... प्रत्यक्ष भेट झालेली नसतानाही अम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी , लकबी माहीत झाल्यात. This is so phenomenal!! पण कधीकधी अकल्पित होतही .. म्हणजे मला तुझा राग सुद्धा येतो!! निरभ्र आकाशात क्रोध,उपेक्षा,मत्सराचे काळे ढग जमतात. वाटतं मग की आपणच गुंतत चाललोय उगाच. कारण मैत्री सुद्धा प्रेमासारखीच two-sided हवी.पण कधीतरी आपली अवहेलना होतेय असं वाटतं मलाच नव्हे तर बाकीही आपल्या काही मित्रांना. मला कस कळलं विचारू नकोस, तूच सांगतेस ना आम्हाला की तुझ्याविषयी काय अनुभव आले ते सरळ येऊन सांगायचं म्हणून! आणि त्यांनी प्रत्यक्ष शब्दात नाही सांगितलं तरी त्यांच्या मूक होण्यातूनही मला जाणवतं कधी रंगाचा बेरंग झालाय ते ! पण सुदैवाची गोष्ट अशी की हे वाद मिटतात. सगळे एकमेकांची समजूत घालतात .. माफ्या, जाहीरनामे होतात आणि वादावर पडदा पडतो! गेल्या चार वर्षात आपले काही जिवलग मित्र आपल्यापासून थोडे लांब गेलेत. I miss them so much! पण तुझा पसारा एवढा मोठा की हे असं होणंही अपरिहार्यच! तरी मनात मात्र इच्छा असते की त्यांनी परत येऊन इथलं त्यांच स्थान भूषवावं ! माझी तुझी ओळख अगदी नवी होती तेव्हा तू नव्या लोकांपेक्षा जुन्यांची जास्त आहेस असा वाद होता. त्या काळात मलाही कधीकधी मान डोलवाविशी वाटलेली आहे ते पटून ! पण आता मी " मधली " होऊन बसलेय तेव्हा कळतय की तो वाद तर चिरस्थायी आहे. फरक इतकाच की आता मी थोडी जुन्या जाणत्यांच्या बाजूची झालेय ! म्हणजे नव्यांच्या धडाधड पोस्ट आणि " आमची उपेक्षा होतेय " चा नारा ऐकून कानशिलं तापत नाहीत. उलट " असं काही नाही रे ! चिडून दूर जाण्यापेक्षा हक्कानं सामिल व्हा बरं इथे " असा विचार मनात येतो ! माझ्यापुरती मी काही पथ्य आखून घेतली आहेत : काहीजणांशी आपली जास्त मैत्री जुळली असली तरी इथे बोलताना ते मुद्दाम दाखवलच पाहिजे असं नाही. " अहो रुपम अहो ध्वनी " तर एकदम no no! प्रतिक्रिया जर अगदी मनाच्या तळातून आल्या तरच टाकायच्या! प्रामाणिकपणा हा कुठल्याही नात्याचा आधारस्तंभ असतो हे लक्षात ठेवलं की पुरे !! पत्राचं " वाढता वाढता वाढे " चाललय .. आपल्या एडमिनना मोठाली posts आवडत नाहीत आणि संपादकांनीही शब्दांच बंधन घातलय (बरोबरच आहे त्यांचं , नाहीतर आम्ही सगळे सुटलो असतो ) म्हणून, म्हणूनच केवळ थांबते. आणि हो ! एॅडमिन , माॅडस , संपादक यांना नमस्कार सांग. बाई ग..त्यांच्या श्रमावर तर हा सगळा डोलारा उभा आहे ! माझ्या आईची एक कविता मला आवडते ( माझ्या माय ची बोली ग !) , त्यातल्या काही ओळी इथे लिहाव्याशा वाटतात : मैत्री तुझी माझी, पानाआड कळी झुळूकीनं आठवाच्या फुलणारी मैत्री तुझी माझी , हवेवर झुला जमीन आकाश पावलाशी ! होय की नाही! तुझीच, हेम्स हेमांगी वाडेकर सॅन होझे
|
अप्रतिम लिहलयस हेमांगि, मी इतक्यातच मायबोलि चि सदस्य झाले. तशि अजुन इथे फ़ारशि कोणाशि ओळख नाहि पण तु म्हणालिस तस दाद मात्र मनापासुन देतेय.
|
Maitreyee
| |
| Wednesday, January 24, 2007 - 6:50 am: |
| 
|
हेम्स, मस्त लिहिलयस गं 
|
Storvi
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:10 pm: |
| 
|
हेमांगी, छान! मस्त!
|
Bee
| |
| Wednesday, January 24, 2007 - 9:29 pm: |
| 
|
हेम्स, वर्णन एकदम सुरेख केलस.. खूपच छान..
|
>>>> प्रामाणिकपणा हा कुठल्याही नात्याचा आधारस्तंभ असतो हे लक्षात ठेवलं की पुरे !! लाखातलं बोललीस!! छानच आहे लेख, हेम्स.
|
Sashal
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:55 pm: |
| 
|
छान लिहीलंय अगदी .. कविता पण मस्त आहे ..
|
Saee
| |
| Tuesday, February 13, 2007 - 2:10 am: |
| 
|
आहा! हेम्स, फारच सुरेख.. वाचताना मी अगदी मान डोलवत होते
|
Athak
| |
| Tuesday, February 13, 2007 - 3:12 am: |
| 
|
हेम्स , छानच लिहीलस , आमच्याही मनातल तु आमच्या वतीने लिहीलस
|
मस्तच लिहिलय! छानच! पण काय ग? या सगळ्यात तुला इवलुस्सा मी दिसलोच नसेन ना कुठे???? आता बघुन घे! DDD
|
|
|