|
Admin
| |
| Monday, January 22, 2007 - 12:04 am: |
| 
|
मी आणि मायबोली सहस्त्र शब्दांच्या कोंदणात मायबोलिविषयी 'मी'ला व्यक्त करण्याची संधी लाभली ती एखाद्या हृदय मित्रापुढे हृदय व्यक्त करावे तशी वाटते आहे, ती अशी तशी सोडता येईल का? शोनूताईच्या केवळ एकाच वाक्यात 'मी'ला व्यक्त करण्याचा अट्टाहास बाळगणार्या प्रश्नासारखी ती जड नाही! अक्षर - अशरिर चेहर्याची आणि मिंग्लिश भाषा अवगत असलेली मायबोलि सुमारे पाच वर्षांपुर्वी भेटली त्यावेळी मनाची अवस्था ग्रेसच्या 'नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे; दिक्काल धुक्याच्या वेळी, हृदयाला स्पंदविणारे' ओळींप्रमाणे होती. तिचा आगळावेगळा चेहरा आणि तिने सामावून घेतलेल्या तमाम मायबोलिकरांचा प्रांजळपणा त्यावेळी मायमराठीपासून दूर राहणार्या बेघर जिवाला असीम भावला आणि आम्ही दोघांनी एकमेकांसाठी आपापल्या हृदयात थोडी जागा निर्माण केली. ही भेट दृढ होऊन कुणाकुणा आणि कशाकशासाठी हृदयाची स्पंदन आता वाढली आहेत. उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीत नविन जगाशी परिचय करताना आजवर आपण ज्या वातावरणात राहत आलो आहे त्यातून अख्ख बाहेर पडून नविन संस्कृती, तिची बंधनं, तिच्या चालीरिती-रुढी-परंपरा-भाषा, आहार्-विहार्-क्रिडा ह्या सर्वांशी मेळ बसविताना आपल्या रितीभाती, सणवार, फ़्राईज-पित्झापेक्षा ठेचा-भाकरीची वाटणारी अविट गोडी, बोलून कुणाशी संवाद न साधल्या जाण्याची तडफ़ड, संपर्कात न राहिल्यामुळे गळून पडणारे मित्रमैत्रीणी, जिभेवर रेंगाळून अधाशीपणे बाहेर पडण्याची संधी शोधणारी मातृभाषा मराठी -- अशा अनेक प्रश्नांवर तोडगा काढून पत्कराव्याच लागणार्या जीवनशैलीत सहजता आणण्यात स्थानिक महाराष्ट्र मंडळाचा जसा वाटा आहे तसा ह्या संकेतस्थळाचाही. हे दोन पर्याय जर मला मिळाले नसते तर खचितच मी सिंगापोर नावाच्या हरित बेटावर आनंदाने रुजु शकलो असतो. ही भावनिक गरज ध्यानात घेता घेता मायबोलिचे अनेक पैलू मला हितावह वाटलेत. ते शब्दबद्ध करायला माझी प्रतिभा निश्चितच तोकडी पडेल, तरीही मनापासून केलेला हा एक प्रयास आहे. माझ्यामते मायबोलि ही नुसतीच मराठी आहे आणि मीही मराठी असल्यामुळे ती मला आनंद देते येवढेच सिमित कारण नाही तर ती बर्याच वेगवेगळ्या व्यंजनांपासून तयार झालेल्या रुचकर आणि पौष्टीक मेतकुटाप्रमाणे आहे. इथे प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी आहे आणि त्या गरजा मायबोलिवर येऊन ज्या अर्थी पुर्ण होतात त्या अर्थी तिच्यातली वैविधता आणि वैश्विकता खूप व्यापक होत आहे हे अगदी निश्चीत आहे. सकाळच्या ८ वाजल्यापासून ते रात्रीच्या ८ पर्यंत किंवा त्याहूनही अधिक जास्त आपला वेळ निळेभोर अभ्ररहित आकाश दिसणार्या Monitor screen समोर बसून काम करणारे कैक संगणक अभियंते देशात आणि विदेशात आहेत हे IT country म्हणून जगात आपली ओळख निर्माण करणार्या भारतीयांना सांगणे गरजेचे नाही. ह्या व्यतिरिक्त हे सर्व देशी बांधव जगाच्या कुठकुठल्या कानाकोपर्यात विखुरले गेलेले आहेत. ह्या सर्वांना एकदम एकत्रीत आणण्याचे काम खूप धाडसाचे आहे. हेच काम अगदी थोड्या प्रमाणात केले तर ते उत्तम आणि सुसह्य होईल म्हणून मराठी भाषेचा पुल आखून आम्ही जर कानाकोपर्यात दडलेल्या मराठी माणसांपर्यंत पोहचू शकलो तर ती मराठी लोकांना एकत्रीत आणण्याची एक मोलाची कामगिरी होईल. जग हे आता global होत आहे. पण माणसामाणसांमध्ये दुवा साधणारी भाषा English असल्यामुळे अनेक भाषेपासून आजवर जो इतिहास निपजला आहे आणि मानवजात पुढे आलेली आहे त्या भाषाच जर ह्या global होण्यात नष्ट झाल्या तर समस्त मानवजातीसाठी ती एक खूप मोठी हाणी होईल. तेंव्हा भाषा टिकवण्याचे काम ही सर्वस्वी तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. तिचे फ़ायदे - तोटे पै - पै रुपात तोलता येणार नाही. मायबोलिवर येण्याच्या कैक कारणांमध्ये हेही एक कारण सामिल आहे. 'स्वान्त्य् सुखाय्', टाईमपास, मन रिझविण्यासाठी, क्षणिक विसावा मिळावा म्हणून, गप्पा मारण्यासाठी, मित्र जोडण्यासाठी, मेंदूची भूक भागवण्यासाठी, वेळेचा व्यय करण्यासाठी, मायबोलि नावाच्या एका मराठी कट्ट्यावर जमण्यासाठी -- मायबोलिवर येण्याची अशी आणखी कैक कारणे देता येतील. मला मात्र, ह्या सर्वांपासून मिळत जाणारे अनुषांगिक फ़ायदे अनमोल वाटतात. एखाद्या गुरुकिल्लीत सर्व प्रश्नांची उत्तरे धडाधड सापडावीत आणि आपली फ़रफ़ट कमी व्हावी तशी मला मायबोलि वाटते. हे अनुषांगिक फ़ायदे असे आहेत. शाळेत शिकलेली कवी - लेखक मंडळी १२वी संपल्यानंतर अभियांत्रीकीच्या गद्य जीवनात केंव्हाच उपेक्षित झालेली होती. पुढे आपली आणि ह्या कवी - लेखकांची परत नव्याने ओळख होईल असे कधीच अपेक्षित नव्हते. १०० गुण ठेवलेल्या प्रश्नपत्रिकेचा ती एक भाग होती, त्यांचे आपल्या जीवनातील स्थान कळले ते साहित्यीकांच्या कट्ट्यावर -- मायबोलीत साहित्यीकांच्या बीबीवर! इथे, ह्या मायबोलिवर पहिल्यांदाच जेंव्हा साहित्यीकांचा बीबी पालथा घातला तेंव्हा आपण वर्गात मराठीच्या तासाला बसलो आहे असे वाटले. ग़ुलमोहरावर चार ओळी खरडुन त्यावर जेंव्हा स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला त्यावेळी आपली आतली उर्मी, आपले नविन बळ जागृत झाले इतकी प्रेरणा मला ह्या बीबीवरील प्रतिक्रियांनी दिली. माझे उणे-दुणे सर्व मला प्रिय झाले आणि माझी लेखणी आणखीच बोलकी झाली. ह्या परकीयांमध्ये, जिथे मला पदोपदी माणसांचा कट्टा हवा असतो कारण मीही सामाजिक जीवन प्रिय असलेली एक साधीसरळ व्यक्ती आहे, जिथे मला एक जिवंत संवाद साधल्यासारखा प्रत्यय कित्येक दिवस येत नाही - तिथे माझे मनःस्वास्थ्य राखण्यासाठी बोलके होता येणे किती गरजेचे आहे ते इथे शून्य समाजजीवन जगणार्या संवेदनशील मनुष्यालाच कळेल. शाळेतल्यापेक्षा आता खूप छान मराठी लिहिता येतं ते खूप मोठा झालो म्हणून नाही तर इथे रोज लिहून लिहून होत गेलेला सराव. माझ्यास्तव मराठी भाषेचे स्थान हे आईसारखे आहे. माझी शब्दसंपदा, मराठी माणूस म्हंटल्यानंतर माहितीच असाव्या अशा गोष्टी मला इथे माहिती झाल्यात हे सर्व ह्या संकेतस्थळाचे एक देणे आहे. अडीअडचणीला शेजारणीला वाटीभर पिठ मागावे आणि त्या दिवसाची संध्याकाळ निभवून न्यावी तशी मदत पाककलेच्या बीबीवर जावून तिथल्या सुगरणींना आपली अडचन व्यक्त करताना मिळ्यासरखी वाटते. वेळेचा उत्तम फ़ायदा म्हणून मायबोलि वाचन आणि विवेचन करण्यास एक चांगली सोय झालेली आहे. तिला व्यसन जरी कुणी म्हणत असेल पण मला वाटते जी गोष्ट आपल्याला सुसंस्कृत - समंजस करते तिला व्यसन म्हणून तिचा अवमान का करावा? UNIX आणि NT वर काम करताना multitasking mode मध्ये असे अनेक छोटे छोटे programs execute होत असतात तेंव्हा आपणही आपल्यात multitasking mode implement करुन बघावा जमत असेल तर! महाराष्ट्र मंडळात जशी जगभरात विखुरलेली मराठी माणसे गोळा होतात आणि त्यांची बोलण्याची वेगळी शैली, भाषेचे वेगवेगळे लहेजे - हेल ऐकावयास मिळतात, खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कळतात, एका परकीय मातित एक समूदाय आपल्या अस्तित्त्वाचे बीज उगवू शकतो ह्याला समांतर मायबोलि आहे, नव्हे ती काकणभर आणखी सरशी आहे कारण ती मुक्तपणे चर्चा करायला वाव देते म्हणून. फ़रक इतकाच इथे सर्वांचे चेहरे अक्षर - अशरीर आहेत. पण आपले अंतरंग व्यक्त करण्यास मायबोलिकर कुठेच कमी पडत नाही. खर्या अर्थाने समर्थांचा संदेश - 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! - जोपासणारी अशी ही अमुची मायबोलि! यशवंत काकड, सिंगापूर
|
Saee
| |
| Tuesday, February 13, 2007 - 1:18 pm: |
| 
|
हेही छान लिहीलं आहेस रे. काही काही वाक्ये तर जमली आहेत अगदी. परिच्छेदही ओघवत्या क्रमाने आलेत. भावना अगदी नीटच पोचवल्यास.
|
|
|