|
Dineshvs
| |
| Friday, January 19, 2007 - 8:42 am: |
| 
|
हा लेख मी हितगुजच्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता. पण या विषयावर स्पर्धा असल्याने, आणि या स्पर्धेत भाग घेणे मला प्रशस्त न वाटल्याने, या लेखाचा, तिथे अंतर्भाव झाला नव्हता. तो आज सगळ्यांसाठी पोस्ट करत आहे. माझी मायबोली. खरे तर मी तसा जुन्या पिढीतला. नेटसर्फींग सारख्या गोष्टी माझ्यापर्यंत यायला जरा वेळच लागला. ५ वर्षांपुर्वी मी दुबईत काहि काळ वास्तव्य करुन होतो, त्या काळात मी काहि ईमेल्स चेक करत असताना, शेजारचा मुलगा, कानाला हेडफोन लावुन अरेबिक गाणी ऐकत होता, मी हि फारशी अपेक्षा न ठेवता, मराठी गाणी असा शोध घेऊन बघितला, त्यावेळी मायबोलीवरच्या अनंताक्षरीशी गाठ पडली. त्यावेळी अति उत्साहाने एक गाणे टाईप करुन टाकले. मग मेसेज आला कि ही खाजगी साईट आहे आणि फक्त सभासदानाच ईथे भाग घेता येईल. सहज सभासदत्वाचा फ़ॉर्म भरुन टाकला, आणि त्या दिवसापासुन एका नविन नात्याची सुरवात झाली. हे तंत्रज्ञान, बाकि सगळ्याना फारसे अप्रुपाचे वाटत नसले तरी मला फारच हरखुन गेल्यासारखे झाले होते. एकतर समोरच्या स्क्रीनवर काहितरी देवनागरीत दिसतेय आणि त्याचे लेखक आपण आहोत, हिच भावना फार सुखावणारी होती. देवनागरीतली ती वळणदार अक्षरे, डोळ्यानाच नव्हे तर मनालाहि सुखावत होती. माझे पुर्ण शालेय शिक्षण मराठीतुन झालेले असले आणि बारावीपर्यंत मी उच्च मराठी घेतलेले असले तरी त्यानंतर माझा मराठीशी फारसा संबंध उरला नव्हता. रोज कुणाशी मराठीत बोलण्याचा प्रसंगहि येत नव्हता. त्यानंतर रविवारचे वर्तमानपत्र आणि काहि साप्ताहिके सोडल्यास मराठी वाचन नव्हते. घरी लिहिलेली पत्रे सोडल्यास, हातुन काहि मराठी लिहिलेहि जात नव्हते. पण त्याच दरम्यान, डॉ. शरदिनी डहाणुकराना पत्रं लिहिले होते, ते वाचुन त्यानी भेटीला बोलावले होते आणि भरभरुन आशिर्वादहि दिला होता. खरे तर मी त्यांच्याकडे त्यानी लेखन कमी केल्याची तक्रार करायला गेलो होतो, तर त्यानी मलाच लिहायला सांगितले. मी उत्साहाने एक लेख लिहुन लोकसत्ताकडे पाठवला होता, पण तो छापलेला बघायला, डॉ. हयात नव्हत्या. त्या लेखावर काहि प्रतिक्रियाहि आल्या आणि त्याच मालिकेतले आणखी लेख लिहुन परत लोकसत्ता कडे पाठवले, तर नवोदीत लेखकाचा फक्त एकच लेख छापायचा, अश्या नियमामुळे ते छापले गेले नाहीत. त्यावेळी मन दुखावले खरे, पण फार काहि वाटुन घेतले नाही मी. जेव्हा जेव्हा सवड होत असे तेव्हा मायबोलीला भेट देऊ लागलो. माझा त्यावेळचा सहभाग फक्त अनंताक्षरीपुरताच मर्यादित असे. आपण काहितरी लिहितोय, ते कुणीतरी वाचतय, त्याला कुठुनतरी प्रतिसाद येतोय, हे बघुन खुप नवल वाटायचे. हळु हळु मी ईतर विभागांकडे वळु लागलो. पाककलेची आवड होती, त्या क्षेत्रात काहि प्रयोग केले होते, अनुभवातुन काहि शिकलो होतो, ते लिहु लागलो, त्यालाहि उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि त्याच दरम्यान माझ्या आयुष्यात एक मोठे वादळ आले. कुणाकडेतरी मन मोकळे करावेसे वाटत होते, आणि भीतभीत मायबोलीकडे मन मोकळे केले. आणि त्यावेळी मला मायबोलीची ताकद खर्या अर्थाने उमगली. धीर देणारे अनेक हात, पाठीवरुन फ़िरल्यासारखे वाटले, जखमांवर मारलेल्या फ़ुंकरीनी जखमांची खुणहि उरली नाही. आपले काहि चुकले नाही, असा आत्मविश्वास तर आलाच, पण कोलमडुन पडण्याईतके काहि झालेले नाही, असा दिलासादेखील मिळाला. स्वतः माझ्यापेक्षा दारुण अनुभवातुन गेलेल्या, अनेक मायबोलीकरांची ओळख झाली. त्यांची ऊभारी बघुन, माझ्या नैराश्याची क्षुद्रता मला फारच जाणवायला लागली. आणि त्यांच्यापासुन प्रेरणा घेऊन, माझा हात ईतराना धीर देण्यासाठी कधी सरसावला ते कळलेच नाही. आज जीवनाचा लढा केवळ स्वकर्तृत्वावर लढणारी एखादी मायबोलीकरीण, मला घरातलाच एक मानते, " तु आहेस ना " असे मला म्हणते, त्यावेळी माझ्या असण्यालाहि, ईतका अर्थ असु शकतो, हे मला आयुष्यात पहिल्यांदाच जाणवले, आणि असा अर्थ मिळवुन देणारी, माझी मायबोली मला आणखीनच जवळची वाटु लागली. आज मायबोलीमुळे माझा गोतावळा ईतका विस्तारला आहे कि, मला रक्ताच्या नात्यांचा विसर पडावा. आवर्जुन केलेले फोन, पाठवलेल्या ईमेल्स, मोकळी केलेली मने, मुद्दाम घेतलेल्या भेटी, या सगळ्यानी मला परत माणुसपण मिळवुन दिलेय. प्रत्यक्ष आयुष्यात मी शेंडेफळ. मला कुणीच दादा वैगरे म्हणत नाही. पण आज माझ्या सगळ्या मायबोलीकरानी, मला न पेलवणारे थोरलेपण देऊन ठेवलेय. ईथे जुळलेली नाती ईतकी दृढ आहेत, कि अगदी पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत, लहानपणचे खेळगडी असल्यागत गप्पा होतात. प्रत्यक्ष आयुष्यात हरवलेल्या, दुरावलेल्या लहानपणीच्या खेळगड्यांची आठवणहि पुसट होत गेलीय आता. अजुनहि मागे वळुन बघता, माझा ईथला प्रवास मलाच अनोखा वाटतोय. माझ्या पहिल्या लेखाचे उत्तरार्ध साभार परत आले होते, ते आधी मायबोलीवर टाकले. त्याचा प्रतिसाद बघता. हळुच एक कथा लिहिली. ती तर प्रत्यक्ष स्वानुभवावर आधारीत होती. मग हळु हळु मायबोलीच्या घटकांचे, फ़ॉर्मचे अप्रुप वाटु लागले, आणि दुसरी कथा, तर चक्क त्या फ़ॉर्मवरच आधारलेली होती. मिळणारा प्रतिसाद अनपेक्षित होता. मग झपाटल्यासारखे लेखन करु लागलो, आणि माझा मलाच नव्याने शोध लागला. मुळात आपल्यात काहि क्षमता आहेत, याची जाणच नव्हती, स्वतःची नव्याने ओळख मला मायबोलीमुळेच झाली. आणि मग लक्षात आले, कि आपल्यापैकी अनेकाना अशी स्वतःची ईथे नव्याने ओळख झालेली आहे. आपल्यापैकी अनेक जणाना गाण्यांची आवड आहे. प्रत्यक्ष आपली क्षमता दाखवण्याची वा लोकांसमोर सादर करण्याची संधी आपल्याला कुठे मिळते ? हे व्यासपीठ आपल्याला मायबोलीमुळेच मिळालेले आहे. ईथे तर काहिजणानी अडगळीत गेलेल्या, आपल्या कलेला परत उजेडात आणले आहे. या सगळ्या सादरीकरणाला अगदी प्रत्यक्ष म्हणता येईल असा प्रतिसाद ईथे लाभतोय. तोंडभरुन कौतुक होतेय आणि बारिकशी चुक देखील, न दुखावता सांगितली जाते. आणि हे सगळे आपण एकमेकांपासुन अनेक योजने दुर असुन. आज दिवसभराच्या धबडग्यात एखादा तास तरी मायबोलीजवळ यावेच लागते. मानसिक गरजच बनली आहे ती आता. आज मायबोली कशी अनेक अंगानी बहरलीय. रंगीबेरंगी विभाग तसा आधी दुर्लक्षित होता. पण या योजनेमुळे अनेक जणाना लिहिते केलेय. ( बरेच जण काहि लिहित नाहीत, ते सोडा आणि माझ्यासारखा एखादा झपाटल्यासारखा लिहितोय तेहि सोडा. ) माझ्या गावात विभागात मात्र मी फारच कमी डोकावतो. एकतर अनेक स्थानांशी भावनिक जवळीक असल्याने, कुठ्ल्या एका स्थानाशी बांधिलकी नाही. शिवाय मायबोली एक कुटुंब झाल्याने, त्यात आणखी पोटविभाग, नसावेत असे वाटते. पण ईथे मराठीच्या ज्या बोलीभाषा जपल्या आहेत, त्याचे कौतुक वाटते. अश्या बोलीभाषा हे कुठल्याहि भाषेचे वैभव असते. आणि ईथली तरुण मंडली ती जपताहेत, हे बघुन तर त्यांचा खुप अभिमान वाटतो. मला मात्र असा वारसा लाभुनहि, कुठलीच बोलीभाषा अवगत नाही, याची खंत मात्र वाटते. पाककलेचा विभाग खर्या अर्थाने बहरला आहे. बाजारात जी पुस्तके मिळतात किंवा टीव्हीवर वैगरे जे कार्यक्रम सादर होतात, तिथे कधीही मिळणार नाही अशी माहिती ईथे मिळते. आता हे बघा, या सगळ्या थोर मंडळीना, हवे ते घटक पदार्थ, हवी ती उपकरणे आणि सहाय्यदेखील अगदी सहज मिळते, पण तेच मिळवण्याचा जिथे प्रश्ण असतो, तिथे मायबोलीच उपयोगी पडते. शिवाय वरच्या पुस्तकात आणि कार्यक्रमात देखील, गुरुमंत्र देण्याचे टाळले जाते, ते मात्र फक्त ईथेच मिळतात. ईथे कुणी सल्ला विचारल्यास, ईतक्या आपुलकिने सगळे सांगितले जाते, कि त्या सभासदाला, आपले दुरदेशातले एकटेपण कधी जाणवुच नये. आज या विभागातला दस्ता ऐवज, हा लाखमोलाचा आहे. फक्त त्याचे वर्गीकरण आणखी सुलभ आणि सहजप्राप्य असे व्हायला हवेय. अनावश्यक प्रतिक्रिया टाळुन, संपादकिय संस्कार व्हायला हवेत. प्रकृति हा विभागहि असाच आपुलकीचा. सध्या वृत्तपत्रात जी सदरे वाचतो, ती प्रायोजित असल्याने, तिथे एखाद्या उत्पादकाच्या उत्पादनाची जाहिरात हाच हेतु असतो, पण ते ईथे टाळले जाते. शिवाय ईथले सल्ले हे स्वानुभवातुन आलेले असतात. भाषा, व्याकरण, संगीत, कला, अश्या अनेक क्षेत्रातली अनोखी माहिती ईथे उपलब्ध असते, पण वेळेच्या अभावामुळे, मी तिला मुकतो आहे. गुलमोहोर हाहि ईथला एक खर्या अर्थाने विस्तारलेला विभाग. पुर्वी काहि मोजकेच मायबोलीकर ईथे लिहित असायचे. पण आता अनेक जण लिहिते झालेत. यापैकी ललित लेखांचा दर्जा खरेच उंचावला आहे. मायबोलीकरांपैकी अनेक जण कर्तृत्ववान आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या क्षेत्रातले अनोखे अनुभव आता ईथे वाचायला मिळु लागले आहेत. आपलेपणाने केलेले हे लेखन सहज आपलेसे करुन टाकते. पण अजुनहि तिथे बरेच काहि लिहिले जावे अशी माझी ईच्छा आहे. मायबोलीकरांपैकी काहि जण अगदी नवख्या क्षेत्रात संशोधन करत आहेत, आणि त्या तंत्रज्ञानाची निदान तोंडओळख तरी मराठीतुन व्हावी अशी माझी ईच्छा आहे. मला कल्पना आहे, कि हे काम सोपे नाही, पण या गुरु मंडळीनी मनावर घेतले तर अवघड खचितच नाही. तसेच या बाबतीत भाषांतर किंवा देवनागरीकरणासाठी काहि मदत हवी असेल, तर त्यासाठी ईथले स्वयंसेवक तयार असतील, याची मला खात्री आहे. जर हे होवु शकले, तर तो मायबोलीवरचा एक अमोल ठेवा ठरेल. कथांबाबत मात्र मी तितकासा समाधानी नाही. बहुतांशी कथा या ठराविक चाकोरीमधुन जाताना दिसतात. ( पण एकंदर मराठी कथेचीच ती अवस्था आहे. अलिकडेच एका साप्ताहिकाने आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील, पहिल्या तीन पारितोषिकप्राप्त कथानीही माझी निराशा केली. ) याबाबतीत नेमके काहि मुद्दे मांडता येतात का ते बघतो. पहिला म्हणजे, कथाविषय हा एका ठराविक वर्तुळातला असतो. हि चाकोरी गेली अनेक वर्षे मराठी कथाना घेरून बसलीय. दुसरा मुद्दा, आजकालच्या कथात, मला तरुण पिढींच्या विचाराचे, त्यानी पादाक्रांत केलेल्या क्षेत्राचे प्रतिबिंब दिसत नाही. शिवाय एक विचित्र भाबडेपणा, ( खरे तर अतिभाबडेपणा ) जाणवत राहतो. तिसरा मुद्दा, निवेदनातहि एक प्रकारचे दडपण जाणवते. शक्यतो धक्कादायक, रुढ समजुतीना धक्का देणारे असे काहि लिहिले जात नाही. चौथा मुद्दा, निवेदनहि अलिप्तपणे केले जाते, प्रथमपुरुषी निवेदन तर अभावानेच दिसते. मानवी स्वभावाच्या नमुन्याना किंवा मानवी आयुष्यात घडु शकणार्या घटनाना मर्यादा आहेत, त्यापैकी अनेक यापुर्वी कथांमधुन आल्याहि आहेत, हे मला मान्य आहे. पण मग कथाकाराने किमान मांडणीततरी काहि प्रयोग करावे, अशी अपेक्षा मी ठेवतो. कवितांची मात्र मांदियाळी असते. तो माझा प्रांत नाही, तरिही वाचायचा आणि समजुन घ्यायचा प्रयत्न करतो. जो अर्थ जाणवतो, तोहि असाच अतिभाबडा, दडपलेला जाणवतो. अजुनहि हि पिढी प्राक्तन, दैव वैगरे गोष्टीत गुरफटुन गेलीय, आव्हान द्यायची क्षमता असली तरी तयारी दिसत नाही. कविता म्हणजे असेच काहितरी हळुवार असे समीकरण होवुन बसलेय. हा कदाचित माझा वैयक्तिक दृष्टिकोन असु शकेल, नव्हे आहेच. पण " देखिये तो कितनी, ताकत बाजुए कातिलमे है " अश्या ओळींचा मी चाहता आहे. चित्रकला आणि ईतर कला, याबाबतीत मात्र मायबोलीकर सुदैवी आहेत. अगदी व्यावसायिक कलाकारांच्या तोडीचे कलाकार आहेत ईथे. हे माध्यम या सर्व कलाविष्काराना पुर्ण न्याय देते असे नाही, पण जे नमुने ईथे पेश होतात, आणि त्या अनुषंगाने जी चर्चा होते, ती मात्र अपेक्षा वाढवते. वादविवाद विभागावरहि मी फारसा जात नाही. या विभागाचे उपशीर्षक, " प्रश्ण तत्वाचा आहे. " असे होते. पण काहि तत्वे पाळली जात नाहीत असे माझे निरिक्षण आहे. ईथेहि काहि निश्चित मुद्दे मला मांडावेसे वाटतात. सर्वप्रथम म्हणजे ज्या विषयावर वादचर्चा अपेक्षित आहे, तो अगदी नेमका असावा. आस्तिकवादाबद्दल तुम्हाला काय वाटते, असे विषय निवडले तर त्यावर फ़क्त मतमतांतरे वाचायला मिळतील. त्यामुळे वाद विषय निवडताना, आपल्याला संख्याशास्त्रातील, " एकमेकांपासुन पुर्णतः भिन्न आणि एकत्रितपणे सर्वसमावेशक " म्हणजेच ( mutually exclusive and completely exhaustive ) असे विषय निवडायला हवेत. उदा. हा खडु पांढरा आहे का ? असा जर विषय घेतला तर याचा प्रतिवाद, हा खडु काळा आहे असा न होता, हा खडु पांढरा नाही, असाच व्हायला हवा. म्हणजे एकतर खडु पांढरा आहे किंवा नाही. यामधे तिसरे वर्गीकरण नाही. तसेच पांढरा असणे आणि पांढरा नसणे, या दोन परस्पर भिन्न विभागामुळे, खडुच्या रंगाविषयीच्या वादाला सर्वसमावेषक रुप येते. दुसरा मुद्दा असा, कि एकदा विषय ईतक्या काटेकोरपणे निश्चित झाला कि, सहभाग घेणार्या व्यक्तीना, एकाच बाजुची निवड करावी लागते, आणि आपली बाजु समर्थपणे मांडायची जबाबदारीहि घ्यावी लागते. विचारांची सुस्पष्टता नसणे, किंवा तो नीट मांडता न येणे, हेहि फार जाणवते तिसरा मुद्दा म्हणजे, जी बाजु घ्यायची तीच कशी योग्य आहे, हे तर्काच्या कसोटीवर टिकतील अशी विधाने करुन, मांडावे लागेल. म्हणजे समजा जर तुम्हाला, असे सिद्ध करायचे असेल कि धुम्रपान धोकादायक आहे तर त्याच्या समर्थनासाठी तुम्हाला, धुम्रपान केल्यामुळे नेमके काय नुकसान पोहोचते, धुम्रपान करणार्या सर्वानाच ते नुकसान होते का, तसे नसेल तर नुकसानग्रस्त लोकांचे प्रमाण किती आहे. ज्यांचे नुकसान होत नाही, त्यांच्याशी संबंधित घटक कोणते, याची चर्चा करावी लागेल. चौथा मुद्दा म्हणजे विषयाला सोडुन न भरकटणे. आता वरील उदाहरणच घेतले तर कुणीतरी असे म्हणते, कि सगळेच धुम्रपान काहि धोकादयक नसते. आपल्या प्राचीन वैद्यकशास्त्रात, काहि औषधी वनस्पतिंचे धुम्रपान करण्याचा सल्ला दिला आहे. खरे तर हा अगदी योग्य मुद्दा आहे, आणि अश्या एखाद्या मुद्द्यामुळे, मुळ विषयाचे पुनर्परिक्षण करणे गरजेचे ठरते. या अनुषंगाने, " धुम्रपान धोकादायक आहे " अश्या विषयाच्या जागी, " तंबाखुचे धुम्रपान धोकादायक आहे. " असा अधिक नेमका विषय वादासाठी घेतला पाहिजे. असा काहिसा नेमका मुदा मांडण्यापेक्षा, वाद उगाचच एखाद्या शब्दासाठी भरकटवले जातात. अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर, ( हे उदाहरण मायबोली वरचे नाही ) लगे रहो मुन्नाभाई, या सिनेमातील वापरलेला " गांधीगिरी " हा शब्द. खरे तर या सिनेमात तो शब्द कुठेच खटकत नाही. अगदी त्या सिनेमातली महात्मा गांधीच्या तोंडची भाषाहि खटकत नाही. खरे तर ईतक्या सुंदर रितीनी गांधीवादाची ओळख करुन देण्याचा हा एक माध्यमाच्या मर्यादेतला, अगदी स्तुत्य प्रयत्न होता. अश्या वादांमुळे ज्याने, म्हणजे गांधींच्या तथाकथिन वारसदारानी, तो सुरु केला, त्याची कर्तुत्व शून्यताच उघड झाली, असे नाही वाटत तुम्हाला ? पाचवा मुद्दा असा कि, कुठलाहि वाद हा अत्यंत मोकळ्या मनाने घातला पाहिजे. आपल्याविरुद्ध मत मांडायचा हक्क मान्य केलाच पाहिजे.आपले मत हे खुपदा आपल्या वैयक्तिक श्रद्धांवरुन ठरते. त्यामुळे आपल्या श्रद्धा परत तपासुन घेण्याची हि एक संधी असते. विरुद्ध मत मांडणार्या व्यक्तीच्या मतांचा तार्किक मुद्दे मांडुन प्रतिवाद करणे, हे सहसा घडत नाही. खुपदा, असा समुदायाच्या विरोधी मुद्दा मांडण्यालाच आक्षेप घेतला जातो, त्या व्यक्तीच्या निष्ठेची शंका घेतली जाते. आणि नेमकी ईथेच व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होते. सहावा आणि सगळ्यात मह्त्वाचा मुदा आहे तो समारोपाचा. कुठलाहि वाद, एखाद्या निष्कर्शावर संपला पाहिजे. त्याची जबाबदारी वाद सुरु करणार्या व्यक्तीने घेतलीच पाहिजे. ईथे अनेक वाद, भरकटल्यामुळे वा वैयक्तिक टिकाटिपण्णी झाल्यामुळे बंद होतात, हे खचितच भुषणावह नाही. या वादातुन अनेकवेळा सामाजिक विषयाना हात घातला जातो. आणि बर्याचवेळा त्यात काहि उल्लेखनीय मुद्दे मांडले जातात, पण त्यातुन एखादी कृति घडावी, किंवा जबाबदार व्यक्तीपर्यंत निषेध वा आभार पोचावावेत अशी माझी रास्त अपेक्षा आहे. याबाबतीत काहि तुरळक प्रयत्न होतात त्याबद्दल अभिमान जरुर आहे, पण ते प्रयत्न तुरळकच आहेत, याची खंतहि जरुर आहे. आपल्या मर्यादांमुळे आपल्याला रस्त्यावर उतरुन व्यापक चळवळ करता येणार नाही, याची मला कल्पना आहे, पण जबाबदार व्यक्तीचा ईमेल आयडी मिळवुन मायबोली वर झालेल्या चर्चेतुन जे सर्वमान्य मत झालेय, ते पोहोचवणार्या हजारो ईमेल्स आपल्याला नक्कीच पाठवता येतील. अंधश्रद्धा पसरवणार्या ईमेल्स फ़ॉरवर्ड करणापेक्षा, असे विधायक काम आपण नक्कीच करु शकतो. शिक्षणाचा एक किमान दर्जा बाळगुन असलेला, काहि सामाजिक मुल्ये जपणारा, असा आपला समाजघटक आहे, आणि या घटकाच्या मताची दखल घेणे, एकंदर समाजालाच भाग पडावे, असे माझे स्वप्न आहे. आपल्याकडे खास करुन आणीबाणी नंतर कुठलीच सामाजिक, वैचारिक चळवळ उभी राहिली नाही, हा काच आहेच. त्यावेळी जनता पक्षाने केलेल्या सार्वजनिक अपेक्षाभंगाची जखम ईतक्या वर्षात भरुन यायला हवी होती.मेलेल्या समाजमनाला जर परत उभे करायचे असेल, तर असे प्रयत्न व्हायलाच हवे. कुठलिही सामाजिक चळवळ म्हंटली कि निधी उभारावा लागतोच. मायबोली नेहि असा उपक्रम हाती घ्यायला हवा. कुणाला जीवगौरव पुरस्कार द्यावा वा एखादे हॉस्पिटल बांधावे अशी काहि माझी ( तुर्तास तरी ) अपेक्षा नाही. पण आहे त्या स्वरुपात मायबोली कार्यरत रहावी, या क्षेत्रात होणार्या नवनव्या तंत्रिक सुधारणा आपल्याकडेहि याव्यात, असे मला वाटते, आणि त्याचा भार काहि व्यक्तीनीच उचलावा, हे मला अयोग्य वाटते. निधी उभारण्यासाठी मी मायबोलीवरच्या लेखनाच्या सीडींच्या विक्रीची कल्पना मांडली होती. त्याला अगदी अल्प प्रतिसाद मिळाला होता. मायबोली जर तुम्हाला ईतके देत असेल, तर किमान त्याचा मोबदला म्हणुन तरी असा निधी जमायला हवा होता. अजुनहि हि वेळ गेलेली नाही. श्रमाचे यथायोग्य मोल, समजणे आणि ते चुकते करणे, हे सामाजिक उन्नतीचे द्योतक आहे. एखाद्या बालकाने आईने त्याच्यासाठी केलेले सगळे त्याचा हक्क म्हणुन गृहितच धरावे, आणि तरिहि सतत मागण्या करत रहाव्या, असे माझे झालेले आहे. मायबोली आणि मायबोलीकरानी मला काय दिले, हे मी नेमक्या शब्दात मांडु शकलोय, असे आताहि मला वाटत नाही. पण त्याचवेळी आपल्या अपेक्षा धीटपणे मांडण्यात मला कसलाहि संकोच वाटत नाही. एक सल ईतकाच कि, मायबोलीकडुन ईतके मिळवलेस, तर तु मायबोलीला काय दिलेस, असा प्रश्ण जेंव्हा माझ्या मनात येतो, तेंव्हा त्याला, " खास काहि नाही. " असेच उत्तर मिळत राहते. समाप्त.
|
Ajjuka
| |
| Friday, January 19, 2007 - 9:25 am: |
| 
|
मस्त हो.. प्रेरणा मिळाली... 'श्वास' बद्दल लिहायचे नाही हे ठरवलेय काही कारणांमुळे पण दुसर्या एका विषयावर लिहीन नक्की. बाकी इथे टाकत नसले तरी एका नाटकाचे लिखाण चालू आहे.. मनु नावाच्या माझ्या लेखिका मैत्रिणीकडून प्रेरणा घेऊन..
|
Manogat
| |
| Friday, January 19, 2007 - 10:28 am: |
| 
|
छान लिहिलय, अप्रतिम. माझी पण ओळख मायबोलीशी जेव्ह पासुन झाली तेव्हापसुन न चुकता रोज भेट देते. पहीले नुसते वाचन करायची पण आता काही पोस्ट पण करते, पण अजुन काही प्रतिसाद नाही मिळाला, म्हट्ल आता post नाहि करणार. इथे फक्त ओळखीच्य लोकनांच प्रतिसाद मिळतो अशि धरणा करुन बसले होते, पण तुमचा लेख वाचुन धिर मिळाला, मला हि या घरातल सदस्यत्व मिलेले हि अशा मिळाली. Thanks
|
Dineshvs
| |
| Friday, January 19, 2007 - 11:07 am: |
| 
|
मनोगत, प्रतिसाद मिळेलच. रोज येत जा. आवर्जुन लिहित जा.
|
दिनेशदा, बर्याच दिवसांपसुन मी मायबोलिचि वाचक आहे, member आत्ता झाले. तुमच लिखाण नेहमि वाचते. अप्रतिम लिहिता तुम्हि, पण हा लेख म्हणजे तुम्हि प्रत्येकाच स्वगत लिहल आहे अस वाटल. मायबोलिच ऋण फ़ेडण तर शक्य नाहि पण फ़ुलाचि पाकळि म्हणुन काहि तरि contribute करायला नक्कि आवडेल मला. तुमच्याच लिखणाच्या CDs हव्यात खर तर सगळ्यात आधि. जर असा काहि प्रयत्न झालच तर नक्कि कळवा. आतापर्यंत जे वाचल त्यावरुन जे राहुन गेल त्याचि खंत जाणवते.
|
Kashi
| |
| Saturday, January 20, 2007 - 10:05 am: |
| 
|
dineshji farach sundar ani nemke varnan...!!!!
|
Jayavi
| |
| Saturday, January 20, 2007 - 10:50 am: |
| 
|
वा दिनेश.... मस्तच! मनापासून आवडलं निवेदन. सगळ्यांच्या मनात असंच काही तरी असणार..... फ़क्त शब्द मिळत नाहीत व्यक्त करायला.
|
Bhagya
| |
| Sunday, January 21, 2007 - 5:52 pm: |
| 
|
लेख छानच झालाय.... आणि अगदी नेमका. वादविवादा बद्दल लिहिलेले मला पटले. पण ते घडणे कठीण वाटते. श्वास बद्दल लिहिणार नाही????? अज्जुका, श्वास बद्दल लिहू नकोस हवे तर, कारण तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मराठी भाषेला आणि मराठी पणाला जिवंत ठेवणारं एक जबरदस्त माध्यम या दृष्टीने मी मराठी सिनेमा कडे बघते. आणि मराठी सिनेमा पटकथा, वेषभूषा, चित्रिकरण असे प्रवास करत कसा घडतो ते जाणकार व्यक्तिने लिहिलेले वाचायला आवडेल. कारण मला तरी असे वाटते की हिंदी सिनेमा पेक्षा त्यात बर्याच गोष्टी वेगळ्या असाव्या.
|
Dineshvs
| |
| Sunday, January 21, 2007 - 8:52 pm: |
| 
|
भाग्य, अज्जुका च्या एकंदर करियरमधला श्वास, हा महत्वाचा असला तरी एक छोटा भाग आहे. त्यापुर्वीही ती या क्षेत्रात होती. तिच्याकडे लिहिण्यासारखे खुप आहे. पण ती, ( तिच्याच म्हणण्याप्रमाणे ) आळशी आहे. आपण फक्त आग्रह करत रहायचा.
|
Ajjuka
| |
| Monday, January 22, 2007 - 1:48 am: |
| 
|
मी कितीही आळस केला तरी ढोसणे सोडू नका.. चुकून कधीतरी बाहेर येईन मी आळसातून यामुळेच. श्वास हा माझ्या आयुष्यातला, करीयर मधला खूप महत्वाचा टप्पा आहे. एक भाग खरेच पण खूप मोठा आणि महत्वाचा भाग आहे. म्हणूनच काही गोष्टींबद्दल गप्प रहाणे गरजेचे आहे. भाग्य, श्वास बद्दल लिहिताना काही गोष्टी टाळून लिहिता येणार नाही आणि मग ते कितीही खरं असलं तरी त्यातून वळणे वेगळी लागतील हे लक्षात आल्यानेच गेल्या वर्षी दिवाळी अंकासाठी लिहायला घेतलेला लेख थांबवला होता. असो.. निर्मिती प्रक्रीयेविषयी बोलण्यासाठी मी कुणी जाणकार नाही पण माझ्या थोड्याफार अनुभवाच्या बळावर मी काही लिहिण्याचा प्रयत्न करीन. तूर्तास कैक दिवसांपूर्वी चालू केलेली कथा आज पूर्ण करून टाकते. बाय द वे.. तू क्षण चा उल्लेख केला होतास feedback to admin मधे. क्षण मधे माझे काही योगदान नाहीये.
|
Bhagya
| |
| Monday, January 22, 2007 - 6:40 pm: |
| 
|
| ढोसणे सोडू नका...| जरूर. स्वत्: काही न करता ढोसण्याची कला मला चांगलीच जमलीये (इति नवरा). आणि अज्जुका, क्षण बद्दल सॉरी. माझा गैरसमज झाला.
|
Jhuluuk
| |
| Tuesday, January 23, 2007 - 12:14 am: |
| 
|
श्री. दिनेशदा, तुमचा लेख मला खुपच आवडला. मी जवळपास ३ महिन्यांपुर्वी मायबोली जॉइन झाले. अशीच गुगलवर सर्च करता-करता.. तेव्हापासुन न चुकता रोज मायबोलीवर यायचा प्रयत्न करते. तशी सवयच जडली आहे म्हणा.सुरुवात "चाफ़ा", "च्यायला" यांच्या वेंधळेपणाच्या BB ने झाली. तेव्हा असे अनेक BB असतिल याची कल्पनाही नव्हती. मग हळुहळु सारे वाचले, रंगीबेरंगी वरचे लिखाण, जुने archives वाचुन झाले, आणि मला ही सर्व मायबोलीकर आपले वाटु लागले.
|
Dhumketu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 12:31 am: |
| 
|
लेख आवडला. बरीच काही माहीती मिळते तुमच्याकडुन.
|
दिनेशदा लेख आवडला. मलाही वाटते मी मायबोलिसाठी काय केले? तर उत्तर काही खास नाही हेच येइल. मायबोलिने काय दिले? ह्या प्रश्नावर खुप काही हे उत्तर येइल.
|
Storvi
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:11 pm: |
| 
|
दिनेश एकदम पटेश! तुमचे निरिक्षण एकदम तंतोतंत पटले...
|
Seema_
| |
| Friday, January 26, 2007 - 3:16 pm: |
| 
|
मायबोलीकडुन ईतके मिळवलेस, तर तु मायबोलीला काय दिलेस>>> खर आहे अगदी . छान लिहिलय .
|
|
|