|
Dineshvs
| |
| Wednesday, January 17, 2007 - 12:26 pm: |
| 
|
" सुधा, तुझ्या शब्दावर विश्वास ठेवुन हा निर्णय घेतोय बघ मी. पुढे कदाचित पश्चाताप नाही ना होणार तुला. " मी सुधाला परत विचारुन खात्री करुन घेतली. " खरच नाही रे. आपल्या गरजा किती कमी आहेत. माझ्या एकटीच्या पगारात मजेत राहु. तुझा एकदा जम बसला कि, मग काय प्रॉब्लेम असणार आपल्याला ? चिन्नु पण अजुन लहान आहे. त्याचा तसा काहि खर्च नसतो. आणि त्याचेहि सगळे करु शकेनच मी. तुझ्या बोटातल्या कलेकडे बघुनच लग्न केले तुझ्याशी. मला तर पट्टी घेतल्याशिवय धड सरळ रेघहि मारता येत नाही. कागदपेन्सिलीशी देखील फार कमी संबंध येतो माझा. दिवसभर नुसती टर्मिनल समोर बसलेली असते. " सुधा उत्तरली. " कॉम्प्युटर आमच्याहि बोकांडी बसलाच आहे ना. अंगठा आणि तर्जनी मधे धरुन ब्रशने काढलेली हळुवार रेषा, त्या रंगाचा, कागदाच्या पोताचा कसा मस्त फील देते. आधी खुप विचार करावा लागतो. कागदावर उमटलेली रेघ परत मागे घेता येत नाही. कॉम्प्युटरचे तसे नाही, कंट्रोल झेड दाबले कि परत कोरा कॅनव्हास समोर. खुपच यांत्रिकपणा यायला लागलाय कामात हल्ली " मी मन मोकळे केले. " अरे तुझी घुसमट मला कळत का नाही. खरे तर तुला कमर्शियल आर्ट या नावाचाच तिटकारा होता. पण पहिली काहि वर्षे तुला ती एजन्सी मधली नोकरी करणे भाग पडले. आता ठिक आहे. आता तु त्यातुन बाहेर पड. तशी तुला कामे मिळतीलच. तुझा स्वाभिमान सांभाळता येईल, ईतका पैसा सहज मिळेल तुला. मग उरलेला वेळ तु तुला हवे तसे एक्स्पेरीमेंट करत जा. तुला ते लेटरिंगमधे काम करायचे आहे ना ते कर. एकदा मोकळा वेळ मिळाला, कि बघ तुला कश्या नव्यानव्या कल्पना सुचत जातील. " सुधाचा माझ्यावर पुर्ण विश्वास होता. " अगं हो गं एजन्सीमधे लेटरिंग मधे काम करणे म्हणजे, उपलब्ध असलेल्या लाखो फ़ॉन्ट्समधला एक निवडणे. किती सहज उपलब्ध आहेत ते सगळे. खुपदा क्लायंटच फ़ॉन्ट्स निवडुन आलेला असतो. तसा एखादा कागदच घेऊन येतो तो. मग आम्ही फक्त आमच्या अल्बममधुन त्याचे नाव शोधायचे. आणि टायपुन काढायचा. " माझा वैताग मी बोलुन दाखवला. " निव्वळ अक्षरावर किती प्रेम आहे रे तुझे. तुझी सगळी पत्रे अजुनहि जपुन ठेवलीत मी. आपण महाकाली केव्हज ला जायचो तेंचा त्या शिलालेखावरुन बोटे फ़िरवत रहायचास तु, किती तरी वेळ, मला विसरुन. " सुधाने त्या दिवसातली आठवण काढली. " तुला विसरुन नव्हे गं. पण अश्या न कळणार्या लिपीतली अक्षरे पण माझ्याशी काहितरी बोलु पाहतात असे वाटते मला " मी म्हणुन गेलो. " अरे तु पोर्ट्रेट्स पण किती छान काढतोस. स्केचेसहि छान काढतोस. आपण शिवाजी पार्कवर फिरायला जायचो, तेंव्हा त्या माणसांच्या सगळ्या लकबी तुझ्या मोजक्या रेघात, उमटायच्या. एकदातर एका आजोबानी, त्यांच्या नातीचे स्केच शंभर रुपयाना विकत घ्याची तयारी दाखवली होती. खुप गोड छोकरी होती ती. पण तु नाहि तयार झालास पैसे घ्यायला. स्केच तसेच देऊ केलेस. फक्त आशिर्वाद द्या म्हणालास. त्यानीहि आशिर्वादाचा म्हणुन रुपया दिला तुला. " सुधाने बरी आठवण करुन दिली. " अजुन जपुन ठेवलाय तो रुपया मी, पण गम्मत तर ऐक. परवा ते आजोबा, म्हणजे श्री खरे, आमच्या ऑफ़िसात आले होते. त्यांची भाची आमच्याकडे कॉपीरायटर आहे ना. माझे लक्षच नव्हते, त्यानी तर मला पाठमोरा असताहि ओळखले. त्यानीहि अजुन ते स्केच जपुन ठेवलेय. तेच म्हणत होते. मी आता या रुटीनमधुन लवकर मोकळे व्हावे म्हणुन. लागेल ती मदत द्यायची तयारीपण दाखवली. कार्ड देऊन ठेवलेय. " मी खरेकाकांबद्दल सांगुन ठेवले. " अश्या ओळखी कामाला येतात रे. आता तु जास्त वेळ विचार करु नकोस. उद्याच देऊन टाक राजीनामा. " सुधाने सांगितले. " हो मी कल्पना दिलीय बॉसला तशी. उद्या गेल्या गेल्या, देऊनच टाकतो. " मी तयारी दर्शवली. &%&%&%&% बॉस तसे मनातुन नाखुष होते. कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे एका महिन्याची नोटिस द्यायला हवी होती, पण दोन आठवड्यात रिलीज करतो म्हणाले. माझ्यासाठी एखादा क्लायंट अडुन राहिला, तर कॉन्टॅक्ट करीन म्हणाले. स्वताहुन म्हणाले, कि काहि असाईनमेंट्स पाठवत जाईन म्हणुन. दिलेला शब्द ते पाळणार याबद्दल मला खात्री होती. हातातल्या असईनमेंट्स पटापट पुर्ण करुन टाकल्या. क्लायंट्सशी वेव्हलेंथ चांगलीच जुळत असल्याने, त्या फटाफट पासहि झाल्या. हल्ली डिजिटल फोटोग्राफीमूळे, आम्हाला फारसे काहि करायचेच नसते. एखाददुसरे पॅचप असले तर. किंवा चक्क कट आणि पेस्ट. त्याला काय डोके लागते का ? पण असे तरी कसे म्हणु, परवा एका क्लायंटला दत्तगुरुंचा फोटो हवा होता, तर एका ज्युनियरने त्यात चक्क, बुलडॉग पेस्ट करुन ठेवला होता. नशीब तिथे कुत्रा हवा होता एवढे तरी कळले. माझा राजीनामा अगदी वेळेवर दिला, असे झाले. माझा लास्ट डे आणि सुधाची जनरल शिफ़्टमधे ट्रान्सफ़र एकाच महिन्यात झाले. सकाळची शिफ़्ट अटेंड करताना तिची फार धावपळ व्हायची. पण चिन्नु शाळेतुन यायच्या वेळेला ती घरी असायची. आता मात्र ती जबाबदारी मलाच घ्यायला हवी होती. एजन्सीच्या कामात मला कधी त्याच्याकडे पुरेसे लक्षच देता आले नाही. मी येईपर्यंत तो खुपदा झोपलेला असायचा, आणि जागरणामुळे मला सकाळी लवकर उठायला जमायचे नाही. मी घरी आहे, हे बघितल्यावर त्याला खुपच आनंद झाला. ते दोन दिवस आम्ही भरपुर भटकलो, खेळलो. एजन्सीच्या रुटीनचा पार विसर पडला. मग आमचे रुटिन सुरु झाले. मी घरातच पसारा मांडला. चिन्नु खुपदा माझ्या मागे येऊन बघत बसे. त्याच्या डोळ्यात प्रचंड कुतुहल असे. दोन हाताच्या ओंजळीत हनुवटी टेकवुन, तो बघत बसला, कि त्याचेच चित्र काढावे असे वाटायचे. पण त्याचा तसा काहि त्रास नसायचा. तो उगाचच कश्याला आधी हात लावायचा नाही. सुधासारखाच अनडीमांडिंग आहे तो. पण त्याला मनातुन नक्कीच रंगाशी खेळावेसे वाटत असणार. माझी त्याची नजरानजर झाली कि तो गोडसा हसायचा. पण चेहर्यावर भाव मात्र, तुमचं चालु द्या, मला काहि नको, असेच असायचे. थोड्या थोड्या वेळाने, मीच माझे काम थांबवुन, त्याला जवळ घ्यायचो. तेवढ्याने तो खुष व्हायचा. मीच त्याला एक नवी कोरी स्केचबुक आणुन दिली. अजुन त्याला तीनहि वर्षं पुर्ण झाली नव्हती. पण कागद आणि क्रेयॉन्स बघुन, त्याचा हात आपसुक फ़िरायला लागला. तो जे काहि काढत होता, त्याचा अर्थ लावणे कठिणच होते म्हणा. पण तो माझी नक्कल वैगरे करत नव्हता. त्याच्या रेघोट्या कधी कागदाच्या बाहेरहि जायच्या. आपल्याला जरी कळत नसले तरी त्याच्या दुनियेत त्या सगळ्याला नक्कीच काहितरी अर्थ असणार. एकदा निळी रेघ कागदाच्या बाहेर गेलेली बघुन, त्याला विचारले तर तो म्हणाला, कि ते नदी आहे आणि भिंतीवरचा काळा गोळा बघुन त्याला विचारले तर म्हणाला, तो कावळा आहे, आणि तिकडे बसुन माझ्या चित्राकडे बघतोय. खुप मजेदार होत्या त्याच्या कल्पना. सुधाला आल्यावर ते सगळे सांगितल्यावर तर ती खुपच हसायला लागली. मग म्हणाली, " अरे तुला त्रास नाही ना होत त्याचा. नाहितर शेजारच्या काकुंकडे नेऊन ठेव त्याला. मी बोललेय त्यांच्याशी. " सुधा माझी खुपच काळजी करत होती. मी म्हणालो, " त्रास कसला गं त्याचा. त्याचा प्रेझेन्सच वातावरण आनंदी करुन टाकतो. " " ए तु पण त्याला शिकव ना रे. निदान अक्षर तरी तुझ्यासारखे व्हायला पाहिजे त्याचे. नाहितर माझ्यासारखे व्हायचे त्याचे अक्षर. हा कॉम्प्युटर आहे म्हणुन रे, नाहीतर माझे अक्षर मलाच नंतर वाचता येत नाही. " सुधाची माफक अपेक्षा. " छे गं ईतक्यात नाही त्याच्या बोटाना मी वळण वैगरे लावणार. त्याला खेळु दे जरा. कधीकधी तर मला असे वाटते, कि मीच त्याच्याकडुन काहितरी शिकणार. " मला असे वाटायचे एवढे खरे. तेवढ्यात चिन्नुचा हसण्याचा आणि टाळ्यांचा आवाज आला. स्वारी छानसे कार्टुन बघत होती. तिथे कुणाचीतरी सरशी झालेली बघुन, तो टाळ्या वाजवत होता. अलिकडेच शिकला होता टाळ्या वाजवायला. &%&%&%& बाजारात कुठल्या टाईपच्या चित्राना मागणी आहे, ते माहित असल्याने, माझी काहि चित्रे विकलिही जात होती. पण ती लोकांसाठी काढली होती, त्यामुळे पैसे मिळाले तरी, समाधान मिळत नव्हते. तरिही नेटाने मनासारखे लेटरिंग करु लागलो. एखादी सिरीज करावीशी वाटली. एका रविवारी चिन्नुला घेऊन जरा लांबवर फिरायला गेलो होतो तर अचानक अलगद मोर समोर उतरला. चिन्नु स्टन होवुन बघतच राहिला. त्या मोराचे आमच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. त्याच्या डौलदार हालचाली बघत बसाव्या अश्या होत्या. मग केकावली, पिसारा, असे अनेक शब्द सुचत गेले. डोळ्यासमोर ते शब्द आणि तो मोर यांचा नाच सुरु झाला. घरी आलो, आणि भराभर आठ चित्रे काढली. सुधाला दाख्वली तर तिला आवडली, पण म्हणाली कि तिला संदर्भ माहित आहे, म्हणुन कळताहेत, प्रथमच बघणार्या माणसाला कदाचित कळणार नाहीत. थोडे जास्त काम करावे लागेल, त्या चित्रावर. तिचे मत अर्थातच प्रामाणिक होते, पण मला ती फ़्रेम भरुन टाकणे प्रशस्त वाटत नव्हते. आम्ही मोर बघितला होता, एका मोकळ्या रानात. तिथले ते मोकळे अवकाश, मला चित्रात आणायचे होते. कदाचित जाणकाराना ती चित्रे भावली असती. दुसर्या दिवशी अचानक खरेकाकांचा फोन आला. त्यांच्या सोसायटीच्या गणेशोत्सवात, त्याना मी काहितरी सादर करावे, असे वाटत होते. त्यांची नात आता शास्त्रीय नृत्य शिकली होती, आणि तिची नाचता नाचता काहि स्केचेस काढावी, असे त्यांचे म्हणणे. शिवाय माझी काहि चित्रे तिथे एक्झिबीटहि करण्याची संधी मिळणार होती. मी हे आमंत्रण अवश्य स्वीकारावे, असे सुधाचेहि मत पडले. मी होकार कळवुन टाकला. तसे नाचतानाचे वैगरे स्केच करणे, मला फारसे कठिण जाणार नव्हते, पण तिथे काहि जाणकार लोक आले तर माझी लेटरिंगमधले काहि तिथे एक्झिबीट करावे असे वाटले. त्यादृष्टीने मी मग काहि करायचे ठरवले. गणपतिच्या चित्राना हटकुन मागणी येणार याची कल्पना असल्याने, मी तीचे सिरीज करायचे ठरवले. फारसे काहि वेगळे न करता, पारंपारिक कल्पनाच स्वीकारत, म्हणजे ओम, श्री वैगरे अक्षरे वापरत मी काहि काम केले. सुधाच्या मताला मान देऊन, जरा जास्तच डीटेलिंग केले. त्या सगळ्या वेळात, चिन्नु माझ्या आजुबाजुलाच होता. माझा ब्रश उचलुन दे, डस्टर दे, वैगरे कामे तो न सांगता करत असे. त्याचवेळी आमच्या सोसायटीच्या गणपतीची भलीमोठी मुर्ती बनवायचे काम तिथेच चालु होते. तिथेहि तो जाऊन बसत असे. घरी आल्यावर माझ्या समोर बसुन, कागदावर रेघोट्या मारणे सुरुच असायचे. एकदा सहजच त्याने काढलेल्या आकाराकडे लक्ष गेले. जाणवेल न जाणवेल असा ओम होता तो. पण त्याच्या मनात काहितरी वेगळेच असणार, म्हणुन त्याला विचारले, तर म्हणाला, तो गंपति आहे. कदाचित त्याच्या उंचीला गणपतीच्या मुर्तीचा आकार तसा दिसत असावा. काहि केल्या तो आकार माझ्या मनातुन जात नव्हता. %&%&%&% ठरलेल्या दिवशी आम्ही खरेकाकांच्या घरी पोहोचलो. फ़्रेम्स आणण्यासाठी, त्यानी स्वतःची गाडी पाठवली होती. त्या नीट डिसप्ले करण्यासाठी त्यानी मोलाचे मार्गदर्शन केले. मी काहि वर्षांपुर्वी जिचे स्केच काढले होते, ती प्रज्ञा बरिच मोठी झाली होती. त्या ड्रेसमधे ती खुपच गोड दिसत होती. तो ड्रेस घातल्यावर तिची पावलेहि लयीत पडत होती. तिला बघताबघताच मनात अनेक पोझेस आकार घेऊ लागल्या. आरती वैगरे झाल्यावर लगेचच कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रज्ञाचे नृत्य खरेच छान चालले होते. आणि मी भरभर तिची स्केचेस काढत होतो, ते सगळे प्रेक्षकांसमोरच चाललेले असल्याने, माझे स्केच पुर्ण झाले कि लोक टाळ्या वाजवत होते. त्या टाळ्या तिच्या नाचालाच होत्या, कि थोडे कौतुक माझ्याहि वाटचे आहे, ते कळत नव्हते. माझी सर्व स्केचेस काका तिथल्या तिथे विकत घेत होते. त्यांच्याच आग्रहावरुन, कोल, क्रेयॉन्स वैगरे वापरुनहि भराभर स्केचेस काढली. तिच्या चेहर्यावरचे भाव ईतके सुरेख होते, कि मला काहि क्लोसप्स काढायची खुप ईच्छा झाली, आणि मी ती लगेच अमलात आणली. चिन्नु समोरच स्टुलावर बसुन माझ्याकडे एकटक बघत होता. त्या सगळ्या कार्यक्रमाचे शुटिंग देखील होत होते. पण त्याचा मला त्रास नव्हता, कदाचित काकानी फोटोग्राफरला तश्या सुचना दिल्या असाव्यात. मध्यंतरात त्याच्याशी ओळख झाल्यावर कळले, कि तो माझा क्लासमेट अतुल होता. बर्याच वर्षानी भेटत होतो. काम कसे मिळवायचे याच्या टिप्स मला देत होता तो. तेवढ्यात एका काकुनी, विचारुन घेतले, कि दुसर्या दिवशी कुकिंग कॉम्पीटिशन आहे, आणि मी त्यांच्या आयसींगचे चित्र काढुन देऊ शकेन का ? मी हसु दाबत त्याना म्हणालो, माझ्यापेक्षा अतुल, ती कामगिरी चांगली करेल, त्यालाच बोलवा. मध्यंतरानंतर आणखी कुणाचा तरी गाण्याचा कार्यक्रम होता. ते आर्टिश्ट अजुन यायचे होते. खरेकाका म्हणाले, कि मी काहितरी सादर करावे. मला तसा स्टेजचा वैगरे काहि अनुभव नव्हता. तरीपण वेळ निभाऊन नेणे भाग होते. सहज म्हणुन त्या काकुंचे कॅरिकेचर काढले. बाई तिथे फ़ेमस असाव्यात. त्याला जोरदार टाळी पडली. खरेकाकांचेहि कॅरिकेचर काढले. मग पुर्वी काढायचो तशी दोन्ही हातानी झुंझणारे कोंबडे काढले. एकंदर कार्यक्रम मजेत चालला होता. अजुन लेटरिंगमधे काहि केले नव्हते. परत एक कॅनव्हास घेतला, आणि डोळ्यासमोर चिन्नुचा आकार तरळु लागला. जरा डोळे मिटले आणि क्षणार्धात समोरच्या कॅनव्हासवर ती जोरकस एकच रेषा साकार झाली. अगदी मनासारखा जमला होता तो आकार. मीच अवाक होवुन बघत बसलो. प्रेक्षकहि जरा गोंधळले होते. काहि प्रतिक्रिया येत नव्हती, तेवढ्यात चिन्नु, जोरात ओरडला, " माजा गंपति " आणि जोरजोरात टाळ्या वाजवु लागला. त्या बरोबर सगळ्यानी टाळ्या वाजवायला सुरवात झाली. त्याच मगासच्या काकु पुढे आल्या, आणि त्यानी ती फ़्रेम तिथल्या तिथे विकत घेतली. मी चिन्नुला उचलुन घेतले. त्याच्या डोळ्यात त्याचा आनंद मावत नव्हता. सगळी आवराआवर करत असताना, अतुल समोर आला, म्हणाला, " काय भन्नाट मार्केटिंग टेकनिक आहे रे तुझे, या छोकर्याच्या टाळ्यांचे टाईमिंग जबरदस्त रे. " समाप्त. एका कलाकाराच्या अनुभवावर आधारित.
|
Adm
| |
| Wednesday, January 17, 2007 - 1:15 pm: |
| 
|
Very nice.. Chinnu dolyasamor ala kharach.. !
|
Lajo
| |
| Wednesday, January 17, 2007 - 10:19 pm: |
| 
|
दिनेशदा, मानलं बुवा तुम्हाला... सगळ्याच BB वर तुम्ही सगळंच कसं छान छान लिहीता... तुम्ही म्हणजे multi talented कसे असावे याचे उत्तम उदाहरण आहात. तुम्हाला माझा सलाम.
|
Sakhi_d
| |
| Thursday, January 18, 2007 - 1:15 am: |
| 
|
दिनेश्दा खुपच सुरेख.... मस्तच हाताच्या ओंजळीतला चीनूचा चेहरा समोर आला..........
|
Manogat
| |
| Thursday, January 18, 2007 - 2:11 am: |
| 
|
अप्रतिम दोळ्यापुढे पुर्ण कथेच चल चित्रच फित्रित झाल. कथा वचतां प्रत्येक व्यक्तिमत्व इत्क सुदंर रंगवल कि चिनु, प्रज्ञा, स्वाति, खरेकाका सगळेच डोळ्यपुढे साकर होत होते.
|
Meenu
| |
| Thursday, January 18, 2007 - 2:32 am: |
| 
|
दिनेशदा कथा मस्तच साकारलीत. मस्त वाटलं वाचताना अगदी
|
Jhuluuk
| |
| Thursday, January 18, 2007 - 5:20 am: |
| 
|
कित्ती सुंदर !! हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांदेखत चालले आहे, असे वाटले.. एक वेगळीच उत्सफुर्तता आणली या लेखाने..
|
Arvee
| |
| Thursday, January 18, 2007 - 11:01 am: |
| 
|
अप्रतिम........ जीवंत..... हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांदेखत चालले आहे, असे वाटले.. >> सलाम........ तुमच्या लेखनशैलीला.........
|
अतिशय सुन्दर. कथा मला फारच आवडली.
|
दिनेश्दा नेहमी सारखी सुंदर..!!! शेवट तर.. ...
|
दिनेश,सही रे.. मस्त वाटलं कथा वाचुन
|
Swa_26
| |
| Friday, January 19, 2007 - 1:12 am: |
| 
|
दिनेशदा... मानले बुवा तुम्हाला.... कथा खुपच छान झाली आहे... वेगळा विषय, ओघवती शैली, आणि सुबक मांडणी.... खरंच, तुम्ही पण चित्रे काढता का हो?? त्या चित्रकाराच्या मनातील भाव तुम्ही एवढे अचूक टिपलेत म्हणून विचारले.. सुंदर कथा...
|
Jayavi
| |
| Friday, January 19, 2007 - 2:03 am: |
| 
|
दिनेश..... कथालेखनातलं पदार्पण एकदम जबरी हं.......! सगळं डोळ्यासमोर घडतंय असं वाटतं.... ते ओम चं चित्र बघता आलं असतं तर अजून मज्जा आली असती
|
Runi
| |
| Friday, January 19, 2007 - 2:12 am: |
| 
|
\तेक्ष्तदिनेश एकदम छान लिहिलय...... }
|
Runi
| |
| Friday, January 19, 2007 - 2:17 am: |
| 
|
मी इथे नविन आहे म्हणुन मघाचे पोस्ट असे दिसतय, preview केले नव्हते मी ते, सवयीने लिहिन छान
|
Sherpa
| |
| Friday, January 19, 2007 - 2:45 am: |
| 
|
एकदा निळी रेघ कागदाच्या बाहेर गेलेली बघुन, त्याला विचारले तर तो म्हणाला, कि ते नदी आहे आणि भिंतीवरचा काळा गोळा बघुन त्याला विचारले तर म्हणाला, तो कावळा आहे, आणि तिकडे बसुन माझ्या चित्राकडे बघतोय. माझा मुलगा ४ वर्षाचा आहे तो पण अगदी असेच करतो. .. कथा छानच आहे
|
Shyamli
| |
| Friday, January 19, 2007 - 3:05 am: |
| 
|
दिनेशदा कथा मस्तच, आवडली.. .. ..
|
>>>>> अतुल समोर आला, म्हणाला, " काय भन्नाट मार्केटिंग टेकनिक आहे रे तुझे, या छोकर्याच्या टाळ्यांचे टाईमिंग जबरदस्त रे. " टोट्टल ट्वीस्ट.........! कुणाला काय तर कुणाच काय!
|
Dineshvs
| |
| Friday, January 19, 2007 - 4:25 am: |
| 
|
ईतकी साधी कथा, सगळ्याना खुप आवडली, खुप आनंद झाला. अश्या प्रतिक्रिया बघुन, लिहिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मला चित्रकलेत तेवढी गति नाही. लिंबु ला चित्रासाठी विनंति करायचे मनात आले होते. पण मग वाटले प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी प्रतिमा, तयार झाली असेल, ती अभंग रहायला हवी. जयु, पदार्पण नाही गं, डझनावारी कथा लिहिल्यात ईथे. लिंबु, तो शेवट हेच वास्तव आहे, बाकी माझा कल्पनाविलास.
|
Deemdu
| |
| Friday, January 19, 2007 - 4:39 am: |
| 
|
मस्त दिनेश दा ..
|
|
|