Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 06, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » कथा कादंबरी » अंतर » Archive through January 06, 2007 « Previous Next »

Psg
Wednesday, January 03, 2007 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतर


"प्रिया, आम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळालय.. US चा क्लायंट आहे. मी हेड असेन त्याचा.."
"वा. छान बातमी आहे.."
"हो. काम चांगलं असेल, नवा अनुभव पण मिळेल.. रमणनी मोठ्याच विश्वासानी ही responsibility दिलीये.. पण I am happy and quite excited ! अगं पण एक होणारे.. US चा client असल्यामुळे मला शिफ़्ट ड्युटी असणारे.. "
"ई? खरच? म्हणजे किती ते किती?"
" mostly दुपारी २ ते १०"
"ही कसली वेळ रे? १० म्हणलं की सहज ११ तुला ऑफिसातच होतील.. पुन्हा जायला यायला अर्धा अर्धा तास.. आणि हे किती दिवस?"
"अगं दिवस कसले? ६-८ महिने तरी"
"शी फ़ारच बोर आहे हे.. तू कसं काय accept केलस हे? माझी शाळा सकाळी ७.३० ते १२.००.. मी जेमतेम घरी येते तोवर तू ऑफिसला जाणार.. आणि चिनुला तर कधी भेटणार तू? बोर होईल ती फ़ार.."
"अगं वीकेंड असेल ना आपलाच.. त्यात काय.. हे इतकं मोठ prestigious project मिळालं मला की हे असले विचार सुद्धा आले नाहित मनात माझ्या.. तुला नको त्या शंका येताहेत आणि.. whats the big deal? चल, उद्या मस्तपैकी जेवायला जाऊ Goa express मधे celebrate करायला, ओके?"

--------------


"प्रिया, उठ.. अशी सोफ़्यावर का झोपलीयेस?"
"आलास का? अरे तुझी वाट पाहता पाहता झोपच लागली.. किती वाजले? पावणेबारा.. बापरे किती उशीर रे.."
"हो, एक महत्त्वाचे काम करायचे होते.. मग झाला उशीर.. पण तू अशी का झोपली आहेस?"
"हां! अरे अरविंदरावांना ऍडमिट केलय.. घरात घसरून पडले. प्लास्टर घातलय. उद्या त्यांना भेटून ये सकाळी. मी जाऊन आले आज संध्याकाळी. तुझा सेल का बंद होता रे? "
"बापरे! कसे काय पडले अचानक? या म्हातार्‍या लोकांच काही कळतच नाही.. आता आला ना ताप मावशीच्या डोक्याला?"
"ताप काय? ते काय मुद्दामहून पडले का? काहीतरीच बोलतोस! "
"बरं चल, कंटाळा आलाय फ़ार.."
"ते एक, आणि ईलेक्ट्रिकचं बिल पण भरशील का? त्याच बाजूला आहे ऑफिस.."
"मीच का? आयला, हे बर झालं तुला.. दिवसाची कामं पण मीच करायची, आणि रात्री ऑफिसात आहेच पुन्हा.."
"असं काय बोलतोस रे? इतकी वर्ष बिनभोबाटपणे सगळं पार पडलच ना.. त्या बाजूला आहे, तुला वेळही आहे म्हणून म्हणले.. नाहीतर मी शनिवारी भरते आहेच.. बघ तुला जमलं तर.."

----------------


"बापरे, फ़ारच उशीर झाला नाही?"
"उशीर तर उशीर, एवढ काय? पण मजा आली ना पार्टीला?"
"मजा आली रे, पण मी फ़ारस कोणाला ओळखत नाही ना..मला जरा एकटं पडल्यासारखं झालं.. चिनुनी एंजॉय केलं पण.. २-४ मुलं होती ना, आणि महत्त्वाचं म्हणजे तू होतास ना.. "
"हो हो. आधी तर चिकटूनच होती मला.. म्हणल ही अशी चिकटली तर कसं बोलणार मी कलीग्जशी.. पण ती मुलं होती म्हणून thank God ! आज मनोज आणि हरीशी चांगली ओळख झाली.. हे पण सीनीयर्स आहेत.. यांच्याकडे visibility असली की बरं असतं.. मग चांगली projects मिळतात. म्हणून असल्या पार्ट्या अटेंड करणं मस्ट झालय. एरवी कुठे वेळ असतो नाहीतर त्यांना.."


-----------------


"अरे वा, आज मॅडम चक्क जाग्या.."
"आलास का? तुझी वाट पहात होते रे..'चष्मेबद्दूर' लागलाय तो पहात पहात म्हणल तुझी वाट पहावी.."
"सिनेमे तसे रोजच असतात की, पण तु कधी जागी रहात नाहीस मी येईपर्यंत.."
"तसं नाही रे.. तुला आजकाल फ़ारच उशीर व्हायला लागलाय रे.. ११.३० नंतरच येतोस तू जवळपास रोज.. मला ५ला उठावच लागतं सकाळी माहिते तुला.. या तुझ्या शिफ़्टच्या आधी तरी कधी जागत होते मी? सकाळची शाळा, दुपारच्या शिकवण्या.. संध्याकाळी इतकं बोर होतं की तेव्हाच झोप येत असते खरतर, पण कशीबशी चिनु झोपेपर्यंत तरी थांबते"
"मग आज काय विशेष ते सांग"
"अरे काहीच नाही, अगदी सहज. सिनेमा लागला छान, म्हणल थांबून पाहू..येतोस तरी कधी ते.."
"हं काम फ़ारच आहे या प्रोजेक्ट मधे.. आणि co-ordination करायचे आहे ना तिकडच्या लोकांशी म्हणून असं शिफ़्टमधे काम करणं भाग आहे. मी रमणला जरा मस्का लावतोय की मीच जातो US ला म्हणजे हे सगळे त्रास नकोत!"
" USA ला? अरे बापरे.. म्हणजे तर तू दुर्मिळच होशील आम्हाला.. "
"अगं पण प्रोजेक्टची मागणी असेल तर जायलाच लागेल. लोक जाऊन जुनी झाली.. मस्त ऐश करतात.. मी इतकी वर्ष आहे इथे, पण मला एकदाही chance लागला नाही अजून.. तूही खुश व्हायला हवस खरंतर, पण तुझं काहीतरी तिसरच.."
"अजित, तसं नाही रे.. मी म्हणत होते की इथे एकाच घरात राहून आपण भेटत नाही, तर तू US ला गेल्यावर तर.."
"काही होत नाही गं... मी कायमचा जाणारे का? काही महिने फ़क्त. आणि benefits बघ ना.. increment, bonus, performance incentive, onsite experience, big dollars सगळे प्लसेसच प्लसेस आहेत.. हो की नाही? काम आहे या प्रोजेक्टमधे पण मी खुश आहे ते याचसाठी.."


--------------------

"अरे.. आज १०लाच आलास..! चिनु आत्ताच झोपली बघ.."
"हं, काम लवकर संपल म्हणून.. आता सेटल होतय ना हळूहळू.."
"वा! रोजच येत जा तू असा.. छान वाटतं"
"रोजच मी सांगत नाही हं! आज आलोय तर तू लगेच सुरु झालीस की.."
"बरं बाबा जमेल तसं ये, पण ये.. हे बघ"
"हे काय? ग्रीटींग? कोणी दिलं? तुला? का? आज काय विशेष? आज वाढदिवस तर नाही तुझा.."
"अरे आज शिक्षकदिन नाही का? शाळेतल्या मुलांनी दिलं ते आणि हे अजून एक शिकवणीच्या मुलांनी, आणि काळे सरांनी आज सगळ्यांना हे छोटे बुके दिले.. छोटा पण छान आहे ना?"
"वा, मजा झाली की मग तुमची आज.. आज मॅडम डीमांडमधे होत्या तर.. काळे सरांनी फ़क्त फ़ुलच दिली का अजून काही पण? आमच्या तर लक्षातही नाहीत हे असले दिवस.."
"हो रे, तू फ़ार बिझी आहेस ना.. बरं मी काय म्हणते दिवाळीत जायचं का आपण कुठे फ़िरायला ४ दिवस?"
"काय वेडीबिडी आहेस का प्रिया? इथे मी गळ्यापर्यंत बुडालोय कामात आणि तुला फ़िरणं सुचतय?"
"अरे, आत्ताच म्हणालास ना की होईल सुरळीत म्हनून.. झाले ना ४ महिने आता असं काम करून.. आपण किती दिवसात मनमोकळं बोललो नाही, फ़िरलो नाही कुठे.. वीकेंडला कामच असतात इतकी.. पटकन येतो आणि जातो.."
"कबूल आहे मला सगळ.. पण सॉरी, नाही जमणार मला.. मे महिन्यात पाहू.."


-------------------

"बाबा आपल्याकडे दिवाळीच्या सुट्टीत अनुमावाशी, काका आणि अबोली, आभा येऊदेत?"
"कधी यायचा प्लॅन करत आहेत? आणि तू मला काही बोलली नाहीस प्रिया.."
"अरे काल संध्याकाळीच फोन आला होता.. चिनुला राहवेना.. तिनेच विचारलं तुला मग.."
"सांगा ना बाबा.. दिवाळी झाली की मला सुट्टी आहे आणि आईलाही.."
"तुला सुट्टीतला अभ्यास नाही का चिनु? "
"तो मी करीन की बाबा.. युनिट्स मधले माझे मार्क पाहिलेत ना?"
"अजित, अरे करेल manage ती.. terminals चा पण अभ्यास मन लावून करतिये ती.. आपलं बाहेर जायचं बारगळलं त्यामुळे नाराज आहे, थोडी cheerup होईल.."
"म्हणजे तुम्ही ठरवलच आहे सगळं.. येऊदेत की मग. पण मला दिवाळीत २च दिवस सुट्टी असेल हं. त्यांना मी वेळ नाही देऊ शकणार.. चालेल ना? मागाहून बोलायचे नाही की तू त्यांच्याशी बोललाही नाहीस म्हणून.."
"अरे, असं कसं म्हणीन.. मलाही दिसतय ना तू किती बिझी आहेस ते.. तेही काही म्हणायचे नाहीत. दिवाळीचे दिवस संपले की येतील ४ दिवस. आम्हालाही change ..
"मला कधी change मिळणार काय माहित.."
"अरे मग काढ की तूही २ दिवस.. खूप मजा येईल"
"हो ना बाबा, घ्या की तुम्ही सुट्टी.."
"शक्य नाहिये ते, नाहीतर मलाही मजा करायला आवडली असतीच की.. चिनु, your baba is working on an important project, u know.. so नो सुट्टी, फ़क्त काम!! तुम्ही करा ऐश.."

------------

"हे काय, तू या ड्रेसमधे?"
"अरे जस्ट येतीये बाहेरून"
"अत्ता कुठे गेली होतीस? आणि कोणाबरोबर? मला सांगीतलं नव्हतस काही.. आणि चिनु? तिला घेऊन गेली होतीस का एकटीच होती?"
"४ला फोन आला रे.."
"कोणाचा?"
"अरे सांगू तर देशील.. सुजाताचा फोन आला ४ ला.. ६.३०ला 'आयुष्यावर बोलू काही'चा प्रयोग होता आणि तिच्याकडे extra ticket होते, तर येतेस का अस विचारलं तिनी.."
"कसला प्रयोग हा म्हणे?"
"अरे मराठी कविता आणि गीतांचा संदीप खरे आणि सलील कुलकर्णींचा खूप फ़ेमस प्रोग्रॅम आहे. मीही ऐकूनच होते फ़क्त. जायची खूप इच्छा होती.."
"हो ना.. मला ते तसलं काही आवडत नाही.. माझ्यामुळे तुला जाता येत नाही असच ना?"
"असं म्हणलं का मी? "
"आणि चिनुला काय घरात कोंडून गेलीस की काय मग?"
"असं बोलवतं कसं तुला अजित? अशी जाईन मी? खाली आजी आजोबा राहतात. त्यांना सांगीतलं एक दिवस.. त्यांनाही काही वाटलं नाही आणि चिनुलाही.. तुलाच का राग येतोय?"
"त्यांना वाटलं तरी काही बोलायचे नाहित ते.. आणि चिनु काय बोलणार तुझ्यापुढे?"
"त्यात बोलण्यासारख काहीच नाही म्हणून बोलले नाहीत ते. चुकुन कधीतरी मी एकटी बाहेर जाते, ते समजून घेतात. आणि चिनुकडे बघावं लागत नाही.. फ़क्त सोबत लागते तिला.. खालीच झोपलीये ती आज"
"पण इतकं काय अडलं होतं तुझं?"
"प्रश्न अडण्याचा नाहिये अजित.. हा कार्यक्रम छान असतो, तो अचानक बघायची संधी मिळाली, घरचं सगळं करून गेले मी, that's it . issue तू बनवतोयेस.. आज लवकर आलास म्हणून कळलं तुला, नाहीतर अजून तासानी आला असतास तर तुला मी सांगेपर्यंत काही कळलही नसतं"
"अच्छा, म्हणजे असं काय काय लपवलं आहेस तू माझ्यापासून? कुठे कुठे आणि कोणाबरोबर भटकत असतेस कळूदे तरी.."
"भटकत? काय बोलतोयेस, समजतय तुला? माझी शाळा, शिकवण्या आणि थोड्या मैत्रिणी या व्यतिरिक्त कुठे जाते मी? आणि जाईन असं वाटतय तुला? तुला काय suggest करायचय? तू तुझ्या कामात कायम बिझी.. त्याबद्दलही काही म्हणणं नाही माझं, कारण शेवटी कामच आहे तुझं ते.. पण म्हणून मला काही आयुष्यच नाही का? फ़क्त तुझंच ऐकायचं का? तू का नाही असा विचार करत की कवितांमधे आपल्याला interest नाही तर हिला पाहुदे.. तू तुझ्या मित्रांसोबत जाऊन सिनेमे पाहतोस तेव्हा कधीतरी त्रागा केलाय मी? हे तुझं project सुरू झाल्यापासून तुझी चिडचिड वाढलीये.. आत्तापर्यंत काहीच बोलले नाही.. पण म्हणून तू काहीही बोलायला लागला आहेस. प्रत्यक्ष बायकोवर संशय? शी अजित! मी किती ग्रेट आहे, मी किती पैसे मिळवतो, ऑफिस मधे मला कसे विचारतात या पलिकडे तू जातच नाहियेस सध्या.. कधी माझी, चिनुची, तुझ्या आईबाबांची चौकशी तरी केलीस? माझ्या शाळेची वेळ तुझ्या सेकंड शिफ़्टशी clash होते म्हणून माझी नोकरी फ़डतूस असं म्हणाला होतास आठवतय? पण तो माझा विरंगुळा आहे, मीही काही करू शकते हा आत्मविश्वास मला मिळतो असा विचार नाही करत तू.. इतका त्रास होतो तर तू का नाही बाहेर पडत या प्रोजेक्ट मधून? दूसरं प्रोजेक्ट सहज मिळेल तुला.. पण तुझा ईगो तुला परवानगी देत नाही ना.. त्याची सगळी चिडचिड माझ्यावर.. एक रविवार मिळतो आपल्याला.. पण तोही तू कधी एकदा ही सुट्टी संपतिये असं वागतोस.. ताणतणाव मलाही आहेत, पण विचारलेस कधी तू मला? कारण माझी नोकरी फ़डतूस ना.. त्यात कसले आलेत ताण असा विचार तुझा.. तुझ्या रूटीनमधे काही आलेल चालत नाही तुला म्हणून तुझे मूड सांभाळून सगळं manage करते मी... सगळच तुझ्या नजरे आड जातय अजित?"

"ओके ओके i am sorry abt that comment . पण म्हणून इतकं lecture कशाला देतेस? सवयच झालीये तुला बडबड करायची.. माझे frustrations कसे समजणार तुला? मी घरी यावं तर तू झोपलेली, सकाळी कोणी घरी नाही.. दुपारी जेवताना कितिसं आणि काय बोलणार.. promotion मिळवायचं असेल तर हे प्रोजेक्ट किती प्रतिष्ठेचं आहे हे तुला काय समजणार.. आणि the fat paycheck I bring in every month? तो बरा नजरेआड होतोय तुझ्या? आणि या पुढे असच होणार.. मला तुमच्यासाठी वेळ नसणारे.. आणि आता इच्छाही होत नाही.. चिनु मोठी होतीये.. तुला तुझी शाळा, घरकाम आहे.. I feel lost out .. तुम्ही दोघी आणि मी एकटा अस विश्व झालं आहे.. मला ऑफिसचं कामच बरं वाटतं त्यापुढे.. lets accept these facts and live, ok? "


एकाच घराच्या एकाच खोलीत असूनही किती अंतर पडलं होतं दोघांमधे.. न भरून येणारं अंतर...




समाप्त



Himscool
Wednesday, January 03, 2007 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Software मधले एक धडधडीत सत्य...
पूनम अतिशय साधी पण मूद्देसूद कथा...
हे असे कित्येक घरात घडत असेल ना सध्याच्या काळात


Shraddhak
Wednesday, January 03, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, लघुकथा लिहिण्यात हात बसलाय तुझा अगदी. आधीच्या इतर कथांसारखीच हीदेखील कथा आवडली.

आता एखादी मोठी कथा लिही की.
:-)

Lopamudraa
Wednesday, January 03, 2007 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान मांडलय
स्री पुरुष स्वभावातले अंतर अस म्हटलं तरी चालेल!!!


R_joshi
Wednesday, January 03, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम फारच छान. मुद्देसुद मांडणि आणि प्रासंगिक वर्णन यातुन जीवनाची विस्कळित झालेली घडी चांगल्याप्रकारे रेखाटलि आहेस. तुझी कथा म्हणजे अनेक घरांमधले सत्य असच मला वाटत. नवि कथाहि लवकर येऊ देत.:-)

Sakhi_d
Wednesday, January 03, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम कथा सुरेखच आहे. खरच स्त्री - पुरुषातल्या विचारांचे अंतर फ़ार छान दाखवले आहेस. हे असच होत असत...........

कथा म्हणुन छान आहेच पण हा तिढयासाठी एक बीबी चालू करायला हरकत नाही.


Kmayuresh2002
Wednesday, January 03, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम,छान आहे कथा... तुझ्या कथा छोट्या असल्यामुळे पुढचे कधी येणार म्हणुन ताटकळत बसावे लागत नाही आणि जे काही तुला सांगायचे आहे तेही तेवढ्या कथेत अगदी मुद्देसुद येते.. आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांशी या जुळत असल्याने आजुबाजुला घडत असल्यासारख्या वाटतात.
अजुन येऊ देत:-)


Manuswini
Wednesday, January 03, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम,
Best thing of this writing is थोडक्यात पण समर्पक

Men always have different way of thinking and women have different ..

थोडेसे विचार करायल अलावणारे आहे की शेवटी माणुस हा मनाने एकटाच राहतो का?? हा दोष परिस्थीतिचा आहे की स्वःताहुन निर्माण केलेल्या स्थिती मुळे आहे?



Dineshvs
Wednesday, January 03, 2007 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, छान आहे कथा. पण अशी मानसिक अवस्था, अश्या वेळात काम करणार्‍या मुली आणि स्त्रीयांच्या वाट्यालाहि येते. मन सैरभैर होत जातं. घरी जाताना अपघातहि होतात.


Kedarjoshi
Wednesday, January 03, 2007 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम खरच मस्त विषय निवडलास. family life च्या मागे उसगावकर नी त्यांच्या प्रोजेक्ट डेडलाईन च्या मागे आपण नी आपली प्रतिष्ठा.

Badbadi
Wednesday, January 03, 2007 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सुंदर मांडणी... सगळं संवादातच छान साधलं आहेस :-)

Meenu
Thursday, January 04, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम झकास गं .. ..

Srk
Thursday, January 04, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचल्यावर पटकन वाटुन गेलं, त्याच्या जागी प्रिया असती तर? स्त्री आणि पुरुषांच्या विचारातच फरक असतो हेच खरं. पुनम, सुंदर मांडणी.

Vaibhav_joshi
Thursday, January 04, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडी म्हणते तसं संवादातच सगळं आलंय ... मस्त ..

Jhuluuk
Thursday, January 04, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खुप आवडली कथा...

Adm
Thursday, January 04, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg , खूप छान आहे कथा.. :-)
आवडली...


Jayavi
Saturday, January 06, 2007 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम........ सुरेख! फ़ारच सुरेख मांडली आहेस गं आजकालची पैशाच्या हव्यासापायी चाललेली परवड..... एकमेकांमधलं वाढलेलं अंतर....... मस्तच! एकीकडे हे वाचून मन सुन्न पण होतं गं.

अशीच लिहित रहा :-)


Rupali_rahul
Saturday, January 06, 2007 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, आजच्या युगातल कटु सत्य आहे हे... सुरेख मांडल आहेस सगळ्या संवादातुन...

Bhramar_vihar
Saturday, January 06, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, उगाच फापटपसारा ना मांडता संवादाच्या माध्यमातुन सुरेख उलगडलीस कथा! एक विचार आला की प्रिया आणि अजित यांची अदलाबदल झाली तर??

Indradhanushya
Saturday, January 06, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम... सही...
एकांकिकेसाठी प्रयत्न करुन बघ...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators