|
Shrini
| |
| Saturday, December 30, 2006 - 5:33 am: |
| 
|
निषाद राजाला मुलगा झाला तेव्हा सर्व राज्याने सात दिवस आनंदोत्सव साजरा केला. मुलाचे नाव नचिकेत ठेवण्यात आले, आणि तो शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागला. लवकरच नचिकेत सर्व प्र्कारच्या युद्धकलांमध्ये प्रवीण झाला. सर्व राज्यात, त्याच्या शक्तीला, युद्धनैपुण्याला, चातुर्याला आणि देखणेपणाला आव्हान देणारा युवक सापडेनासा झाला. काही काळ हे अनभिषिक्त प्रथमपद भोगल्यावर नचिकेत कंटाळला, आणि त्याच्या जीवनात अस्वस्थता निर्माण झाली. निषादराजाच्या हे लक्षात आल्यावर त्याने नचिकेताला भेटायला बोलावले. 'तुझ्या जीवनात काहीच आव्हान न उरल्यामुळे तू कंटाळला आहेस असे मला वाटते', राजा त्याला म्हणाला, 'तेव्हा तू आता काय करायचे ठरवले आहेस ?' 'मला आपल्या राज्याबाहेर पडून काही काळ इतर देशांमध्ये घालवायचा आहे. त्यामुळे माझा कंटाळा दूर होईल. तेव्हा उत्तर दिशेने जावे असे मी ठरवले आहे', तो उत्तरला. 'तुझा विचार योग्यच आहेआहे', राजा म्हणाला, 'पण प्रथम तू दक्षिणेकडे जा.' नचिकेताने राजाचे म्हणणे मानले, आणि दक्षिणेकडे प्रस्थान ठेवले. काही महिन्यांनी नचिकेत परत आला तेव्हा त्याचा अवतार बघण्यासारखा झाला होता. तो धावतच निषादराजाकडे गेला. 'महाराज', तो म्हणाला, 'दक्षिणेकडचे लोक फारच विचित्र आहेत. ते त्यांच्या अंगावर काही आवरणे घालतात. त्यांना ते 'कपडे' म्हणतात. एकदा अंगावर घातलेले कपडे ते कधीही काढत नाहीत. जर ते फाटले किंवा लहान झाले तर ते लोक कपडे अंगावर असतानाच दुरुस्त करतात. शिवाय तिथे कपड्यांचे खूप प्रकार आहेत, अगदी भरजरी ते फाटके. पण सर्वात मोठे आशचर्य म्हणजे ते लोक एकमेकांना चेहर्यावरून वा देहावरून न ओळखता या कपड्यांवरूनच ओळखतात, आणि ज्याचे कपडे चांगले तो चांगला असे मानतात. एखाद्याच्या देह कितीही बलिष्ठ असला तरी त्याचे कपडे फाटलेले असल्यास त्याला तुच्छ लेखले जाते, आणि या उलट एखादा जरत्कारू त्याच्या भरजरी वस्त्रांमुळे पूजला जातो! ते लोक चेहर्यांकडे पहातच नाहीत! त्यामुळे एखाद्याने कपडे बदलले की त्याची ओळखही बदलते! आणि सुरुवातीला माझ्या अंगावर कपडे नसल्याने ते लोक मलाही पाहू शकत नव्हते. मी कसेबसे काही फाटके कपडे मिळवून अंगावर घातल्यानंतरच मी त्यांना दिसू शकलो!' 'आणखी गंमत म्हण्जे', नचिकेत पुढे म्हणाला, 'कित्येक लोक देहाच्या जखमांमुळे दुःखी असतात, पण ते त्यांच्या देहाकडे पहातच नाहीत आणि त्यामुळे आपले दुःख काय आहे हे त्यांना कळतच नाही. मी त्यतल्या काहींवर उपचार करून त्यांचे आजार बरे करू शकलो, तेव्हा ते लोक मला देवाचा अवतार मानू लागले आणि माझी पूजाही करू लागले, पण मी देहाबद्दल काय सांगत आहे हे त्यांनी समजूनही घेतले नाही. उलट मी असे काही बोलायला लागलो की ते माझा जयजयकार करून मला गप्प बसवत. शेवटी मी तेथून पळून आलो'. नचिकेताला बोलता बोलता धाप लागली होती. हे सगळे ऐकून निषादराजा हसला आणि म्हणाला, 'तू आता उत्तरेकडे जा.' राजाला प्रणाम करून नचिकेत उत्तरेकडे निघाला. काही दिवसांनंतर त्याला एक मनुष्य भेटला. तो लहानसर चणीचा, दिसयला सामान्य होता. त्याला पाहील्यावर नचिकेताला आपल्या रूपाचा अभिमान वाटल्यावाचून राहीला नाही. पण त्याने तो विचार मनातून काढून टाकला व त्या माणसाला वंदन केले. नचिकेताने वंदन करताच त्या माणसाचे डोळे क्षणभर सूर्यासारखे झळकले. मग तो अतिमधुर वाणीने नचिकेताला म्हणाला, 'बोल मुला, तू येथे कशासाठी आला आहेस ?' 'मी निषादराजाचा मुलगा, नचिकेत', नचिकेत म्हणाला, 'माझ्या पित्याच्या आज्ञेवरून मी दक्षिणेकडे गेलो होतो, आणि आता त्यांनी सांगितल्यावर उत्तरेकडे आलो आहे.' 'निषादराजा...' तो माणूस उद्गारला, 'या नावाचा एक मुलगा मला आठवतो आहे खरा...' आणि मग तो हसू लागला. 'बोल मुला, तू दक्षिणेकडे काय पाहीलेस ?' त्याने नचिकेताला विचारले. आता नचिकेतालाही हसू आवरेना. 'तिथले लोक कपडे घालतात!' तो हसण्याचा आवेग कसाबसा आवरून म्हणाला, आणि मग त्याला पुन्हा हास्याच्या उकळ्या फुटल्या! त्या माणसाचे डोळे परत एकदा सूर्यासारखे झळाळले, आणि त्यांच्याकडे पाहता पाहता नचिकेत स्तब्ध झाला... काही काळाने नचिकेत आपल्या राज्यात परतला आणि राज्यकारभार पाहू लागला. निषादराजा आता वृद्ध झाला होता. त्याने एके दिवशी, आपला राज्य सोडून वनात जाण्याचा निर्णय नचिकेताच्या कानावर घातला. नचिकेताने त्याला अडवले नाही. पण तो म्हणाला, 'महाराज, आपण आधी मला दक्षिणेकडे का पाठवले हे मी समजलो. पण आपण हेच आपल्या राज्यातील प्रत्येकाला का सांगत नाही ?' 'कारण प्रत्येकाला आपले राज्य सोडून बाहेर पडण्यायची ईच्छा असतेच असे नाही!' राजा उत्तरला, आणि वनात निघून गेला.
|
'कारण प्रत्येकाला आपले राज्य सोडून बाहेर पडण्यायची ईच्छा असतेच असे नाही क्या बात है.
|
R_joshi
| |
| Wednesday, January 03, 2007 - 4:22 am: |
| 
|
बोध घेण्यासारखि कथा आहे.खरच सुंदर
|
Sandu
| |
| Wednesday, January 03, 2007 - 11:00 am: |
| 
|
मला काहीच कळाले नाही. कथा अपुर्ण आहे का?
|
Pinaz
| |
| Wednesday, January 03, 2007 - 11:52 am: |
| 
|
मलाही अपुर्ण वाटतेय. पुढचा भाग लिहायचाय का श्रिनि तुला? प्लिज लव्कर लिहि ना. मज्जा येतेय वाचायला.
|
मला पण कथा अपुरी वाटतेय...कदाचित नचिकेतला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल असेल पण उत्तरेकडे भेटलेल्या त्या तेजस्वी पुरुषाचं गुढ काही उकललं नाही.
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 03, 2007 - 9:11 pm: |
| 
|
श्रिनि, छान वेगळी कथा. अपुर्ण नाही वाटत मला.
|
Shrini
| |
| Thursday, January 04, 2007 - 12:23 am: |
| 
|
ही कथा कदाचित अपूर्ण वाटली असेल कारण काही गोष्टी स्पष्ट केलेल्या नाही. तेव्हा त्याबद्दल थोडे स्पष्टीकरण : गीतेमधला 'वासांसि जीर्णानि यथा विहाय' हा श्लोक बहुतेक सगळ्यांना माहीत असेल. या श्लोकात शरीराची व्याख्या 'आत्म्याने परीधान केलेले वस्त्र' अशी केली आहे. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की या श्लोकाच्या उलट, समजा आपण आपल्या अंगावरच्या कपड्यांनाच आपला खरा देह समजू लागलो तर काय होईल... मग आपले आपल्या खर्या देहाकडे दुर्लक्श होईल आणि शेवटी आपण त्याला पूर्ण विसरून जाऊ. जर एखादा, आपल्या देहाची जाणीव असणारा माणूस आपल्याला भेटला तर त्याचे बोलणे आपल्याला काहीही कळणार नाही. पण त्याला आपल्यापेक्षा काहीतरी जास्त माहीत असेल आणि तो आपल्याकरता 'ज्ञानी पुरुष' ठरेल. मग आता हाच विचार पुढे नेला तर आपण थोडी अशीही कल्पना करू शकू की आपल्याला आत्मा आहे, ज्याची आपल्याला जाणीव नाही. आपण फक्त त्याच्या आवरणाकडे, म्हणजे आपल्या देहाकडे, लक्ष पुरवीत आहोत. अशावेळी जर आपल्याला आत्मवान पुरुष भेटला तर त्याचे बोलणे आपल्याला कळणार नाही, पण आपल्या तुलनेत तो 'ज्ञानी पुरुष' ठरेल. गोष्टीतल्या नचिकेताला जेव्हा दक्षिणेकडचे लोक भेटतात, तेव्हा त्यांची 'आपण म्हणजे वस्त्र' ही समजूत चुकीची आहे हे नचिकेत स्वानुभवाने जाणतो. त्याच मार्गावरून पुढे, जेव्हा तो उत्तरेकडे जातो तेव्हा 'आपण म्हणजे देह' ही आपली समजूतही चुकीची आहे हे तो जाणतो. यात त्याला तो ज्ञानी पुरुष मदत करतो. 'सूर्यासारखे झळाळते डोळे' म्हणजे त्या पुरुषाच्या, देहापलीकडील आत्म्याचे दर्शन असते. याप्रकारे नचिकेताला आत्म्याचा साक्षात्कार होतो आणि तो आपल्या राज्यात परत जातो. या गोष्टीत इतरही काही रूपके आहेत, पण मूळ गाभा वर उल्लेख केलेलाच आहे.
|
Sakhi_d
| |
| Thursday, January 04, 2007 - 12:35 am: |
| 
|
Shrini कथा तर छानच आहे पण ही background छान हिलीली आहेस. खरच पण हे बरेचदा होत म्हणजे आपण काही वेळेला माणुस कसा आहे ह्यापेक्षा तो कसा रहातो ह्याकडे जास्त लक्ष्य देतो.
|
Bee
| |
| Thursday, January 04, 2007 - 1:47 am: |
| 
|
कपड्यांचे रुपक छान आहे खरचं. म्हणजे आजच्या काळात तरी तंतोतंत पटणारे. शेवटचे पोष्टही छान लिहिले आहेस श्रिनि!
|
Srk
| |
| Thursday, January 04, 2007 - 5:28 am: |
| 
|
श्रिनि, चांगला विषय आहे.
|
Manmouji
| |
| Thursday, January 04, 2007 - 11:55 pm: |
| 
|
श्रिनी, खर सांगायच तर मला आता कळली ती गोष्ट आणि एखादी गोष्ट कळल्यावर जेंव्हा आवडते तेंव्हा ती खुप काळापर्यंत लक्षात रहते.
|
Meggi
| |
| Sunday, January 07, 2007 - 7:03 am: |
| 
|
दुसर्या पोस्टमध्ये कथा छान उलगडली आहे. खूप सुंदर विचार मांडले आहेत. फ़ारच छान !!!
|
Daad
| |
| Sunday, January 07, 2007 - 8:45 pm: |
| 
|
श्रिनी, अतिशय सुंदर कथा. (जातक कथांसारखी वाटली)
|
श्रिनि,कथा मस्तच रे... वेगळी वाटली एकदम
|
Jo_s
| |
| Monday, January 08, 2007 - 1:58 am: |
| 
|
श्रिनि, छानच आहे कथा आणि थिमही. पण त्याच्या उत्तर भेटीचे वर्णन स्पष्ट नसल्यामूळे ती अपुर्ण वाटली असेल लोकांना... सुधीर
|
Pinaz
| |
| Monday, January 08, 2007 - 6:55 am: |
| 
|
आई ग, गूढ कवितांसारखी आता गूढ कथापण का? पण स्पष्टिकरण दिल्यावर कळली. छान आहे.
|
|
|