Raina
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:19 am: |
| 
|
भाग ७ उन्हाळा आला तेव्हा, बरीच मुलं आपले खेळण्यातले आरमार घेऊन नदीवर गेली. आपल्या खेळातल्या युद्धनौकेचा प्रत्येकाला अभिमान होता, आणि आपलीच युद्धनौका सर्वात चांगली असल्याची खात्री होती! या खेळातल्या युद्धनौका फार महाग असत. शिन्जीला आपल्याकडेही एक खेळातली युद्धनौका असावी असे फार वाटे पण आईबाबांना ते परवडणार नाही याची त्याला कल्पना होती. एक दिवस गेनला एका काचेच्या दुकानातल्या शोभेच्या भागात प्रदर्शनासाठी ठेवलेली सुंदर युद्धनौका दिसली. तो तिच्याकडे पहातच राहिला. अशी नौका आपल्या भावाला मिळाली तर त्याला किती आनंद होईल याचा विचार गेन करत होता. तेव्हा त्याला दुकानातील लोकांचे बोलायचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यातला एकाचा आवाज त्या घरमालकाचा होता. त्याचे भाडं गेल्या सहा महिन्यात मिळालेले नव्हतं. दुसरा आवाज एका काचेच्या घाऊक व्यापा-याचा होता. त्याच्याकडेही गेल्या पाच महिन्यांची उधारी साठली होती. काच बनविणारा बिचारा गुडघ्यावर बसून आपल्यासाठी आणखी थोड्या मुदतीची भीक मागत होता. वसूली साठी आलेल्या दोघांना परत जाताना बघत, गेन बाहेरच्या दरवाजाआड लपून होता. आता दुकानात काच बनविणारा आपल्या समस्या बायकोला सांगत होता. एका खाणीतील स्फोटात त्याचा एक पाय निकामी झाला होता, त्यामुळे तो नीट चालू शकत नव्हता. गेनला दाराशी पाहून काच बनविणारा कुबड्यांवर टेकत टेकत त्याच्या जवळ गेला आणि काय काम आहे विचारू लागला. गेननी त्याला त्या युद्धनौकेची किंमत विचारली. ती विकाऊ नाही, आणि कितीही पैसे मिळाले तरी आपण ती विकू शकत नाही-असे काच बनविणा-याने सांगितले. ती युद्धनौकेची प्रतिकृती, युद्धात शहीद झालेल्या, youth training Corp चा स्वयंसेवक असलेल्या त्याच्या मुलाची निशाणी होती. दुस-या दिवशी सकाळी Mr. होरिकावा ( काच बनविणारा) आपला माल हातगाडीवर टाकून नेहमीप्रमाणे काच विकायला बाहेर पडला.कुबड्यांवर चालत, तो हातगाडी ओढत ओरडत होता " काच! काच! काच हवी आहे का कोणाला?". पण काही उपयोग नव्हता. एकही गि-हाईक मिळालं नाही. तो त्याच्या दुकानात परत आला तो काय- दुकानासमोर चक्क लोकांची गर्दी होती. अचानक फुटलेल्या खिडक्यांच्या काचा दुरुस्त करायला त्याला पाचारण करायला आलेली ही गर्दी होती. लगेच तो दुरुस्तीच्या कामात बुडाला. आपले कर्ज फेडण्याची आशा आता त्याच्या मनात डोकावू लागली. शेवटची खिडकी दुरुस्त करुन घरी जाताना अचानक त्याला एकामागोमाग एक अशा अनेक खिडक्या फुटल्याचा आवाज आला आणि कोणीतरी पळून जाताना दिसले. क्षणार्धात लोकांचे आवाज त्याच्या कानावर आले" hey , थांब!त्या कारट्याला पकडा कोणीतरी.. " लवकरच पाठलाग करणा-यानी एका छोट्या मुलाला पकडुन आणलं- काल त्या दुकानाला भेट देणारा तोच तो छोटा मुलगा! आपल्याला मदत करायला हा मुलगा खिडक्या तोडतोय हे त्या काच बनविणा-याच्या लक्षात आलं. जबरदस्त बदडुन काढल्यागेल्यानंतर अपमानित गेनला आईबाबांकडे नेण्यात आलं. बाबांनी जेव्हा सगळं ऐकलं, तेव्हा त्यांनी रागारागाने गेनला छतावर कपडे वाळत घालायच्या ओट्यावर नेलं, आणि वरुन बाधुंन टांगून ठेवलं. जेमतेम एक तास झाला असेल नसेल तोच बाबा त्याला सोडवायला आले. बाबांनी हसत सांगीतलं, की होरिकावा सान आत्ताच त्याचे आभार मानायला येऊन गेले आणि येताना एक बहूमोल भेट घेऊन आले: युद्धनौकेची ती प्रतिकृती, त्यांच्या मुलाची अखेरची आठवण! याआधी कुठल्याही भेटीने गेनला ईतका आनंद झाला नव्हता. अगदी मनापासून त्याला खरं म्हणजे ती युद्धनौका स्वत:साठी ठेवायची होती. पण मग त्याला शिन्जीची आठवण झाली, आणि त्याने शिन्जीला ती देण्याचा निश्चय केला. त्या रात्री झोपेतसुद्धा शिन्जीच्या हातात ती युद्धनौका होती, आणि तो तिला नदीत फिरवायचे स्वप्न पहात होता. क्रमश:
|