|
Supermom
| |
| Thursday, December 07, 2006 - 8:40 am: |
| 
|
बाबा या विषयावर लिहायचं कितीतरी दिवसांपासून ठरवत होते. पण इच्छाच होत नव्हती.खरे म्हणजे बाबांना जाऊन आता एक वर्ष होईल. पण मनाच्या कुठल्याच कोपर्याने बाबा नाहीत हे सत्य स्वीकारलेलं नाही. माझे बाबा. दिसायला अतिशय देखणे होते.गोरेपान,भरपूर उंची अन हसरे व्यक्तिमत्व. बाबांच्या देखणेपणाबद्दल घरी दारी सगळीकडे एकमत होतं. इतकंच काय, पण मी कॉलेजमधे असताना एकदा मी अन बाबा खरेदीला गेलो होतो.तेव्हा एक प्रौढ बाई भेटल्या. बाबांनी त्यांची ओळख करून दिली अन सांगितले की ह्या माझ्या कॉलेज मधे होत्या. दिलखुलासपणे हसून त्या बाई म्हणाल्या, अग, तुझ्या बाबांना सारे कॉलेज मधे राजेश खन्ना म्हणत. माहीत आहे की नाही तुला? तर असे माझे बाबा. नुसते देखणे नाही तर मनानेही एकदम दिलदार. बाबांकडून आम्ही बहिणी खूप काही शिकलो. स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता लोकांना सतत मदत करावी हे ते नुसते शब्दाने नव्हे तर कृतीने दाखवून देत असत. माझे बाबा वकील होते. अजूनही आठवतं ते कितीतरी वर्षापूर्वीच आमचं घर. सकाळचे दहा वाजले की आम्ही बहिणी किलबिल करत जेवायच्या टेबलावर जमत असू.पांधराशुभ्र शर्ट अन काळी पँट घातलेले बाबा त्यांच्या ठरलेल्या खुर्चीवर बसलेले असत. आम्हाला शाळेची घाई असे तर त्यांना कोर्टाची. आई घाईघाईने वाढत असायची.कितीही घाई असली तरी शेवटच्या साय भातामधली सारी साय अन थोडासा भात आम्ही जेवत असताना आम्हाला देऊन मगच ते कोर्टात जात. आयुष्यभरात त्यांना एकही दुखणं आलेलं आम्ही पाहिलं नाही. त्यांना तो जीवघेणा आजार यायच्या दोन वर्षे आधी ते अन आई दोघेही अमेरिकेत सुद्धा येऊन गेले होते. मला दिवस असताना ती वाईट बातमी आली. बाबांना पक्षाघाताचा झटका आला होता. माझ्या नवर्याने माझी हाय रिस्क प्रेग्नन्सी असल्याने मला फ़क्त बाबांना थोडे बरे नाही त्यामुले आईबाबा बाळंतपणासाठी येऊ शकणार नाहीत येवढेच सांगितले. डिलिव्हरी होऊन माझी तब्येत थोडी सुधारल्यावर मला खरे काय ते कळले. लगेच मी घरी फ़ोन लावला. सार्या कुटुंबात अतिशय धीराची म्हणून प्रसिद्ध असलेल्या आईला रडताना ऐकलं अन परिस्थितीची थोडी कल्पना तेव्हाच आली.
|
Supermom
| |
| Thursday, December 07, 2006 - 10:04 am: |
| 
|
चार महिन्यांच्या मुलांना घेऊन मी भारतात आले. नेहेमी विमानतळावर उतरल्यावर हजर असणारे आई बाबा दिसले नाहीत,तेव्हा मन भरून आलं. सासरी सामान ठेवून नवर्याने लगेच मुलांना अन मला माहेरी नेलं. आईकडे पोचल्यावर तिनेच दार उघडलं. बाबा तिच्या मागेच उभे होते. एक नजर त्यांच्यावर टाकली अन आम्हां दोघांना जो धक्का बसला त्याचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याकडे येऊन गेलेले बाबा हे नव्हतेच. अतिशय खंगलेले अन डोळ्यातला भकास भाव तर बघवत नव्हता. त्यांचं बोलणं तर कळतच नव्हतं. मी जागच्या जागी हमसाहमशी रडू लागले. बहुतेक लोकांचे पक्षाघातात पाय जातात. माझ्या बाबांची मात्र पायांहूनही मोलाची गोष्ट या दुखण्याने हिरावून घेतली होती.त्यांची स्मृतीच हरवली होती. मधूनच विजेचा लोळ चमकल्यासारखे त्यांना थोडेसे पुसट तुकडे आठवूनही जात. पण ते तेवढ्यापुरतेच. अन वाचेवर सुद्धा परिणाम झाला होता. माझ्या भारदस्त अन देखण्या बाबांची या दुखण्याने पार दशा दशा करून टाकली होती. बरेच दिवस मी भारतात होते. या काळात बाबांचं दुखणं वाढतच गेलं. त्यांची शारिरिक अवस्था वयाच्या मानाने खूप चांगली होती पण मनाचा पार चुराडा झाला होता. त्यांना काही कळतच नसे. आम्ही मुली तीन चार वर्षांच्या होतो त्या कालावधीतच ते वावरत होते. कधी कधी बाल्कनीत उभे राहून आईच्या नावाने जोरात ओरडत. 'अग,तुझं लक्ष कुठे आहे? ती बघ पोरगी रस्त्यावर गेली ना. एखादी गाडीबिडी येईल.' त्या अवस्थेतही त्यांना आमची इतकी काळजी करताना पाहून दुःखाने ऊर फ़ाटून जात असे. बाबांचं दुखणं शेवटी पराकोटीला गेलं. घरातून ते नजर चुकवून निघून जाऊ लागले. सारखे मी माझ्या आईकडे जातो म्हणत. हे प्रकार फ़ारच वाढू लागले. नर्स ठेवली पण तिलाही ते आवरेनात. शेवटी मन घट्ट करून त्यांना अशा लोकांची काळजी घेणार्या संस्थेत हलवायचा निर्णय झाला. बाबांना अँब्युलन्स घेऊन गेली त्यादिवशी घरात कोणी बोलायच्या सुद्धा मनस्थितीत नव्हतं.
|
Ldhule
| |
| Thursday, December 07, 2006 - 10:28 am: |
| 
|
Supermom याला जिवन ऐसे नाव. 'मैने गांधी को नही मारा' बघताना मन हेलावून गेल होत. पण तुझ्या बाबतीत हे खरच घडलय हे वाचुन खुप खुप वाईट वाटल. तुझ्या दुःखात सहभागी आहे. त्याच सिनेमातली ही निरालांची कविता... लहरों से डर कर नौका पार नही होती हिम्मत करने वालों की हार नहीं होती॥ नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवरों पर सौ बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस बनता है, चढ़ कर गिरना, गिर कर चढ़ना ना अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती॥ डुबकियाँ सिँधु में गोता-खोर लगता है, जा-जा कर खाली हाथ लौट आता है। मिलते ना सहज ही मोती पानी में, बहता दूना उत्साह इसी हैरानी में। मुठ्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, हिम्मत करने वालों की हार नहीं होती॥ असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गयी, देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो, नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किये बिना ही जय-जयकार नहीं होती, हिम्मत करने वालों की हार नहीं होती॥ - 'निराला'
|
Megha16
| |
| Thursday, December 07, 2006 - 12:03 pm: |
| 
|
सुपरमॉम, तु सांगीतल्या प्रमाने तुझे बाबा त्यांना कसला ही आजार नसताना एकदम हे सगळ अचानक घडल... यावर एकच वाक्य सांगावस वाटत आपल्या हातत काही नसत....... आलेल्या प्रसंगाला धेर्याने तोंड देण बस्स एवढच.....
|
Supermom
| |
| Thursday, December 07, 2006 - 1:05 pm: |
| 
|
बाबांना त्या संस्थेत जाऊन काही दिवस झाले.या काळात आम्ही लोकांकडून अनेक प्रकारच्या टिकेला तोंड दिलं. कोणी म्हणत, असं कसं करू शकतात हे लोक? तर कोणी म्हणे,घरात न ठेवायला काय झालं?' हे सारं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे ऐकून खूप वाईट वाटत असे. आम्ही हा निर्णय घेताना आमच्या जिवाची काय घालमेल झाली हे फ़क्त तो परमेश्वरच समजू शकेल. मला माझ्या ऑस्ट्रेलियात असलेल्या बहिणीचा यावेळी मनाला खूप आधार होता.ती मला सारखी सांगत असे, 'ताई, आपण सार्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय. स्वतःला दोषी समजू नकोस. मी बाबांची तब्येत बघितलीय. आपल्याला याशिवाय काहीच उपाय नाही.' आईच्या बाबतीत तर काय लिहू? त्या माऊलीला बाबांच्या पेपर्स वर सह्या करताना,काय वाटलं असेल? आमच्या आयुष्यात कितीही वादळाचे प्रसंग येऊन गेले असले, तरी कुटुंबाची घट्ट वीण ही आमची सर्वात मोठी जमेची बाजू. ह्या धीराचं बाळकडू आम्हाला बाबांनीच दिलं होतं, अन त्याचा उपयोग त्यांच्यासाठी इतका खडतर निर्णय घेताना आम्हाला करावा लागावा हा केवढा दैवदुर्विलास. त्या संस्थेतही बाबांची तब्येत सुधारली नाहीच. एकदा असह्य होऊन आम्ही पुन्हा दवाखान्यातून रात्रपाळीची अन दिवसपाळीची अशा दोन नर्सेस पुन्हा लावल्या अन संस्थेतल्या लोकांच्या, त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध त्यांना घरी आणून ठेवलं.मनात कुठेतरी वेडी आशा होती की त्यांना इतकी औषधं चालू आहेत, त्याचा काहीतरी फ़ायदा झाला असेल,थोडेतरी सुधारले असतील. पण त्यांच्या मनाची तडकलेली कांच कधीच सांधल्या गेली नाही. दोन्ही नर्सेस ने हात टेकले. आम्हीही खूप प्रयत्न केला पण शेवटी पुन्हा त्यांची रवानगी संस्थेत करावीच लागली. मी अमेरिकेत परत आले. आई धाकट्या बहिणीजवळ राहिली.तिला एकटे सोडायचे नाही हे आम्ही बहिणींनी ठरवलेच होते.तिला माझ्याकडे येण्याबद्दल खूप म्हटले पण बाबांना ती भारतात तसे ठेवून येणे शक्यच नव्हते. अशी एक दोन नाही तब्बल साडेचार वर्षे गेली.भारतात गेले की मी बाबांच्या भेटीस जात असे अन त्यांची अवस्था बघून दिवस दिवस अस्वस्थ होत असे. शहरातल्या नामांकित मानसोपचारतज्ञांना कितीदातरी दाखवून झाले. त्यांचे एकच म्हणणे, 'हे वेड नाही. यांना आलेल्या पक्षाघाताच्या झटक्याने यांच्या मेंदूचा काही भागच निकामी झालाय.याला इलाज नाही.' अन मागच्या वर्षी, ऐन माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बाबा गेल्याचा धाकट्या मेहुण्यांचा फ़ोन आला. त्यावेळी मला काय वाटले ते कसे सांगू? आईचा तशाही अवस्थेत फ़ोन आला, 'बाळ, दुःख करायचे नाही. देवाने त्यांची सुटका केली.' मुळात देवाने त्यांची अशी अवस्थाच का केली हा प्रश्न मी कितीतरी वेळा देवाला विचारला आहे. या वर्षीही नेहेमीसारखाच वाढदिवस आला.बहिणींचे साता समुद्रापलिकडून फ़ोन आले,' ताई, आता सारे विसरायचे.तू कशा मनस्थितीत आहेस हे आम्ही जाणतो. पण वाढदिवस साजरा करायचा. नाहीतर बाबांनाच ते आवडणार नाही.' त्यांना काय ठाऊक, यावर्षीच काय, कुठल्याच वर्षी वाढदिवस करावासा मला वाटणार नाही. मातापित्यांचं ऋण फ़ेडायचं असतं म्हणतात. पितृऋण फ़ेडायची संधी मला मिळालीच नाही हे डोंगराएवढं दुःख दर वाढदिवसाला आठवल्यावाचून राहील का?
|
Nalini
| |
| Thursday, December 07, 2006 - 1:57 pm: |
| 
|
सुपरमॉम, हे दु:ख विसरायचे. आता त्यांच्या सगळ्या चांगल्या आठवणी आठवायच्या. ह्या दु:खाची छाया ईतरांवर पडू द्यायची नाही. देवाने असे का केले? ह्याला उत्तर मिळणे कठीण आहे. एकच म्हणायचे की बाबांची ह्यातुन सुटका झाली. तुम्ही मोठ्या बहिणीच अशा हताश झाल्या तर माझ्या सारख्या लहान बहिणींनी कुणाच्या तोंडाकडे पहायचे?
|
Supermom
| |
| Thursday, December 07, 2006 - 2:06 pm: |
| 
|
नलिनी, तू म्हणतेस ते सारं खरं ग. प्रयत्न करतेय. खरंतर बाबा मनानं आमच्यातून उठले तेव्हा असं वाटलं होतं की आपण मन घट्ट केलंय. आता काहीही झालं तरी आपण prepared आहोत. पण ते गेले अन जाणवलं, 'you are never really prepared for your loved ones death' असं म्हणतात ते किती खरंय. असो, तुला मेल करतेय.
|
Deemdu
| |
| Friday, December 08, 2006 - 1:29 am: |
| 
|
SM मी समजु शकते, दुःख विसरायचे हे सांगणं खुप सोपं आहे पण ते करण जवळ जवळ म्हणजे ९९% अशक्य आहे पण एक टक्का आपण प्रयत्न तर करु शकतो ना ग?
|
Maku
| |
| Friday, December 08, 2006 - 3:15 am: |
| 
|
मला कोनी मदत करू शकेल का... मला पन कथा लिहय्ची आहे... पन ति कुथे जाउन लिहायची ते मला कोनी तरी सानगता का .... plzzzz mi star new thread madhe jaun type kele tari pan yeth nahi aahe ....
|
Dineshvs
| |
| Friday, December 08, 2006 - 10:37 pm: |
| 
|
सुपरमॉम, बाबांचीच एक मुलगी आपले सगळे दुःख विसरुन, बाकि सगळ्यांच्या जखमांवर फुंकर घालत असते. पितृॠणातुन मुक्त व्हायचा मार्ग तिला सापडलाय.
|
Bhagya
| |
| Sunday, December 10, 2006 - 7:17 pm: |
| 
|
दिनेशदा...... काय म्हणू आता या दोघींना? बघ ना, मी new zealand ला गेल्याची संधी साधून या नलूने आणि ताईने किती हृदयस्पर्शी लिहून ठेवलय ते. पण सध्या फ़ार दमलेय, थोडा जोर आला की मी पण लिहितेच इथे.
|
Bhagya
| |
| Monday, December 11, 2006 - 7:43 pm: |
| 
|
बाबा गेल्यानंतरच्या माझ्या दिनक्रमात त्यांच्या आठवणी अनेक ठिकाणी अगदी साहजिक गुंफ़ल्या गेल्यात. तश्या त्या पहिले पण होत्याच, पण आता प्रत्येक आठवणीनंतर 'बाबा नाहीत' हे सत्य बोचून जातं. संध्याकाळच्या निवांत वेळेला तर मी आठवणींची वेळ हे नावच बहाल केलंय. डेक वर बसून चहा पिताना कधी समोरच्या हिरव्या टेकडीवर पावसाळी ढग ओथंबून येतात. समोरच्या चर्च मधून येणारे पियानोचे धीरगंभीर, उदात्त स्वर आसमंत भारून टाकतात. आंगणाच्या अगदी टोकाला असलेल्या नीलगिरिच्या उंच फ़ांदीवर एक पांढरा काकाकुवा मान वाकडी करुन स्तब्ध बसून राहतो. आणि मनात सारखा हाच विचार येतो- बाबा, माझे बाबा. त्यांना पण इथे बसून असाच निसर्ग बघत चहा प्यायला किती आवडलं असतं. झाडाफ़ुलांची, पशुपक्ष्यांची, वेगवेगळ्या संस्कृती, चालिरितींची त्यांना खूप माहिती होती आणि नवीन माहिती करुन घ्यायला त्यांना फ़ारच आवडायचं. रुपानं आणि जन्मानं ब्राम्हण असलेले बाबा वाग़णूक आणि हृदयातून ओतप्रोत "माणूस" होते, आणि पेशा वकिलीचा असला तरी हाडाचे, मनाचे शेतकरी होते. ब्राम्हण्य हे जानव्यात नाही, माणसाच्या वागणुकीत असतं हे त्यांच ठाम मत होतं. धर्म्-जात, सोवळं ओवळं यांच अवास्तव थोतांड त्यांना मुळीच मान्य नव्हतं. "सगळ्यांना एक नाक, दोन डोळे आणि दोन कान असताना कसले आलेय जात्-धर्म? माणुसकी हाच धर्म हवा. आणि शिवाशीव कसली? देवानेच दिलेल्या गोष्टीची देवाला कसली शिवाशीव?" अशी त्यांची ठाम मतं होती. त्यांच्या गोदरेजच्या आलमारीत, लॉकरमध्ये भगवद्गीतेबरोबरच त्यांच्या मुसलमान मित्राने दिलेलं कुराण आणि ख़्रिश्चन मित्राने दिलेलं बायबल एकत्र नांदत होतं. इदच्या दिवशी खीर खायला प्रेमाने त्यांना काझी अंकल बोलवायचे. तसेच नाताळात लिओ अंकल कडून केक आणि तळलेला फ़िश त्यांच्या साठी नेहमी यायचा. संघ परिवार आणि बीजेपी च्या काही लोकांचे पण ते लाडके होते. हेवा वाटेल असा त्यांचा मनुष्यसंग्रह होता. ते आजारी पडले, तेव्हा त्यांना संस्थेत हलवायच्या दिवसापर्यंत माझ्या मित्राला बरं वाटेल या आशेने बोहरी समाजाचे एक गृहस्थ नियमीतपणे होमिओपथीची औषधे घेऊन येत आणि बाबांना काहीही समजत नसताना त्यांच्या उशाशी काही वेळ प्रेमाने बसून जात. नातेवाईक तर होतेच. त्यांच माणुसकी हाच धर्म हे मी पण चांगलं लक्षात ठेवलय आणि मुलांना पण तेच शिकवायचा प्रयत्न करतेय. चहा हा पण त्यांनी दिलेला वारसा. चहा त्यांना अतीप्रिय. बरे असताना, वकिली करत असताना सकाळपासून लोकांची रीघ लागली असायची ती ते कोर्टात जाईपर्यंत. कधी कधी पक्षकार कमी आणि मित्र जास्त असंपण व्हायचं. जे असेल ते असो, पण चहा प्यायल्याशिवाय कोणी जायचं नाही. सारखा चहा उकळून चहाचं भांड आणि आई नक्किच वैतागत असणार. पण दोघांनीही कधी तसं दर्शवलं नाही.
|
Bhagya
| |
| Monday, December 11, 2006 - 8:27 pm: |
| 
|
अकोल्याची शेती सोडून बाबा नागपूरला वकिली करायला आले खरे. पण त्यांनी शेताला सोडलं तरी शेताने त्यांना कधीच सोडलं नाही. त्यांच्या मनात बसून ते पण नागपूरला आलं. लहानपणी शेतावर वाढल्याच्या "सुंदरपैकी" (हा त्यांचा आवडता शब्द) गोष्टी ते आम्हा बहिणींना सांगत. त्यात शेतावर भाजून खाल्लेला हुरडा, मिरच्या-कांदे आणि वांगी एकत्र भाज़ून केलेलं भरीत, ज्वारी-बाजरीच्या भाकरी यांचं रसभरीत वर्णन असायचं. सापाला शेपटी धरून, गरगर फ़िरवून दगडावर आपटून मारणारा गडी असायचा. इतकंच नव्हे, तर चिंचेच्या भल्या थोरल्या झाडावर बैलगाडीच्या चाकाइतकं मोठं पागोटं घालून बसलेला, आणि कुणा पूर्वजाला दिसलेला घराण्याचा मुळपुरुष पण असायचा. शाळेत बाबांना फ़ारसा रस नसावा. कारण मास्तरांनी एका दारानी बाहेर काढल्यावर गुपचुप दुसर्या दाराने आत येऊन बसणे, मास्तरांच्या बग्गीचा घोडा सोडून त्यावर बसून गावभर फ़िरणे असे अनेक उद्योग त्यांनी केले होते. एका राजपूत मित्राबरोबर जाऊन एका सावकाराला, त्याने कुणा गरिबाचे जुल्माने घेतलेले जमिनीचे कागद परत करावे म्हणून चांगलं बदडून काढलं होतं. खरे तर बाबांचे बाबा आणि आजोबा काही शेतकरी नव्हते. हे सगळे लोक पिढीजाद वकीलच. पण बाबांचे आजोबा, म्हणजे माझे पणजोबा व्यंकटेशराव देसाई यांच्याइतकं कोणीच कर्तबगार निघालं नाही. त्यांनी आपल्या ह्यातीत खुप केसेस चालवल्या आणि भरपूर धन कमावलं. शेती विकत घेतली. इंग्लन्डला जाऊन आले. त्यांनी गजानन महाराजांची पण केस चालवली- हे गजानन महाराजांवरच्या पुस्तकात नमूद केलेलं आहे. गजानन महाराज, अकोल्याच्या शेतावरच्या घरी आले असताना त्यांनी "इथे खणा- पाणी लागेल" असे सांगितल्यावर खणलेली विहीर अजूनही तिथे आहे. काकांनी घर विकलंय, तरी विहीर तशीच आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या विहिरिचं पाणी काढताना किति तरी आयाबाया थकायच्यापण विहिरीचं पाणी कधी आटलं नाही. पणजोबांचा आणि लोकमान्य टिळकांचा एका जुन्या, भक्कम लाकडी सेटीवर बसलेला फ़ोटो अजुनही आमच्याकडे आहे. पुढे दिवस फ़िरले. चुलत्यांनी साबणाचा कारखाना काढला आणी त्यात सगळं धन गमावलं. पणजोबा वारले. काही शेती विकावी लागली. बाबा चौदा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. उरलेली शेती विकून आजीने सगळ्या भावंडाना वाढवलं. या सगळ्या भावंडात शेतावर कायम रमणारे एकटे बाबाच होते. मझी खात्री आहे, अकोल्याची शेती सोडून येताना त्यांना अगदी वनवासी झाल्यासारखं वाटत असणार. म्हणून तर नागपूरच्या घरी त्यांनी आणि आईने मिळून तर्हेतर्हेची झाडे लावली होती. आईला पण बाबांसारखीच झाडांची आवड. घराचा उर्जास्रोत जरी आई असली, तरी बाबा आधारवड होते. आता आईच दोन्ही झालीय. घराची पुढची बाज़ू सोडून बाकी तीन्ही बाज़ुला, कुंपणालगत त्यांनी हौसेनी सिताफ़ळाची झाडे लावली होती. मागच्या अंगणात अंजीर, पेरूची दोन झाडे, कागदी लिंब, तुती यांच्याबरोबरच लाल चाफ़ा, तगर, बटमोगरा आणि जुईचा एक वेल बहरत होता. शिवाय केळी, पपई पण होत्या. भाजी म्हणून टोमाटो लावल्याचं पण आठवतं. एकदा तर देवकापूस पण लावलेली. देशी गुलाब आणि मोगरा पण होतेच. मागच्या घरातलं जांभळीचं झाड तुतीच्या झाडावर प्रेमळपणे झुकलेलं होतं. त्याचा फ़ायदा घेऊन, तुतीवर चढून मी कितिदा तरी जांभळं तोडून खाल्ली, बालचमुला वाटली आणि ज्यांचं झाड होतं त्या अरुणकाकाचा भरपूर ओरडा खाल्लाय. हो, आणि डाव्या कुंपणाला लागून असलेला शेवगा मी कसा विसरीन? या शेवग्याखाली उभे राहुन शेजारचे एक वयोवृद्ध आजोबा बाबांजवळ आपलं मन हलकं करायचे. त्यांच्या मनात काहीतरी दु:ख होतं. शेवटी त्या आजोबांनी शेवग्याच्या सावलीत असलेल्या त्यांच्या अंगणातल्या विहिरीत जीव दिला. आणि चिठ्ठीत "माझ्या मृत्देहाला फ़क्त देसाई वकिलांनीच हात लावावा, दुसर्या कोणीही शिवू नये अशा अर्थाचं काहीसं लिहिल्याची कुजबूज आम्हा लहान मुलांच्या कानी आल्याचं आठवतय. हा शेवगा पुढे तोडण्यात आला, का ते आठवत नाही.
|
Princess
| |
| Tuesday, December 12, 2006 - 6:58 am: |
| 
|
भाग्या, ओघवते लिहिलय. तुझे बाबा डोळ्यासमोर उभे राहिलेत... त्यांचे विचार खरच खुप उच्च होते. अजुन येउ देत.
|
Bhagya
| |
| Tuesday, December 12, 2006 - 8:30 pm: |
| 
|
धन्यवाद प्रिंसेस. प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांची प्रिंसेस असतेच ना?
|
Princess
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:48 am: |
| 
|
खरय भाग्या... प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांची (निदान त्यांच्या हयातीत तरी) राजकुमारी असते. त्यंच्या प्रत्येक कृतीत एक वेगळेच प्रेम असते. पपा जवळ असले की वाटते जणु काही आपण खरोखर राजकुमारी आहोत. अजुन लिहि ना.
|
Princess
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:54 am: |
| 
|
सुपरमॉम, तुझे दोन्ही लेख वाचलेत... आणि खरच काय बोलावे, लिहावे काहीच कळेना... एवढे मोठे दु:ख निभावुन नेणे सोपे नाही. आणि हे तुझे दु:ख कोणीच वाटुन घेउ शकत नाही. पण इथे लिहुन तुझे मन नक्कीच हलके झाले असेल ना? तुझ्या आणि छकुल्यांच्या आयुष्यात आता फक्त आनंद नांदो हीच सदिच्छा
|
Jayavi
| |
| Wednesday, December 13, 2006 - 6:56 am: |
| 
|
supermom , भाग्या, फ़ारच सुरेख लिहिलं आहे गं तुम्ही लोकांनी. मला सुद्धा माझे बाबा आठवले. देखणे ह्याच वर्गात मोडणारे....... अतिशय शांत, प्रेमळ! तुमच्या लेखातली काही वाक्य वाचून त्यांची खूप आठवण आली. ते पण असेच अचानक गेलेत गं. प्रत्येकाला हे दु:ख झेलायची शक्ती देव देतोच. पण ते विसरणं फ़ारच कठीण असतं. आपल्याला मिळणार्या सगळ्या सुखांमधे त्यांचेच आशीर्वाद आहेत असंच समजायचं आपण.
|
Raina
| |
| Wednesday, December 13, 2006 - 9:30 pm: |
| 
|
सुपरमाॅम, भाग्या, - तुमच्या यातना आणि प्रेम शब्दाशब्दातून जाणवते. सांत्वनाचे शब्द मात्र थिटे पडतात.बहूत काय लिहीणे. तुम्ही समजून घ्यालच!
|
Bhagya
| |
| Wednesday, December 13, 2006 - 9:42 pm: |
| 
|
प्रिंसेस, अज़ून खूप लिहावेसे वाटतेय.. जमेल तसे लिहिणारच आहे ग. आई- बाबांच्या छायेत काढलेल्या बालपणाची सर पुढे आयुष्यात कशाला ही येत नाही. जयवी, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. कोणास ठाउक, या लिखाणातून कितितरींना आपले वडिल भेटतील. कारण प्रत्येकाच्या आई-वडिलांमध्ये खूप चांगले ग़ुण असतात. रैना, तुझ्या भावना खरच पोचल्या.
|
Bhagya
| |
| Wednesday, December 13, 2006 - 10:29 pm: |
| 
|
समोरच्या अंगणात एक छोटासा, गुलाबी फ़ुले येणारा cassia तेव्हढा होता. कारण समोरच्या अंगणाला मुळी सावलीची गरजच नव्हती, एक मोठा पार्क घरासमोर होता आणि त्यात तर्हेतर्हेची झाडे होती. मेंदी आणि घाणेरीचं कुंपण असलेल्या या अंगणात आम्ही आणि आजूबाज़ूची मुलेमुली जमा होऊन धूम खेळायचो. माझा स्वभाव अतिशय खोडसाळ. एकदा बाज़ूच्या मुलांचं बघून मी जोरात गलोलीने नेम धरून झाडावरच्या पक्ष्याला मारण्याचा प्रयत्न केला. माझाच नेम तो, जिथे मारला तिथे लागेलच कसा? रस्त्यावरुन जाणार्या एका मुलाच्या पाठीत तो दगड सणकन लागला. त्याला बिचार्याला दगड कुठून आला ते कळलंसुद्धा नाही. रडत, कळवळत तो आपल्या घराकडे धावत गेला. आम्ही सगळे चिडिचूप बसलो. दुसर्या एका प्रसंगी, आम्ही मुलं मिळून, झुडुपामागे लपून रस्त्यावरून जाणार्या एका म्हातार्या बाईला वेडिवाकडी नावे ठेवत ओरडत होतो. आपल्या या कृत्यांचा परिणाम कळण्याइतकी मी मोठी नव्हते, चार जणं करतायत म्हणून त्यांना सामील झाले होते. मला फ़ार गंमत येत होती. पण बाबा त्यांच्या ऑफ़िसमधून, जे घरात, समोरच्या खोलीतच होतं तिथे बसून बघत होते. घराचा पायवा उंच होता आणि त्यांना तिथून सगळं दिसायचं. बाबा उठले आणि सरळ माझ्याकडे आले. आणि नंतर असे काही रागावले, असं काही समजवलंय की दुसयाला त्रास होईल असं वागायची वृत्तीच उरली नाही. तसे बाबा रागीट होते, पण त्यांचा राग पटकन शांत व्हायचा (हा वारसा पण मी त्यांच्याकडून घेतला, पण आता वयानुसार माझा राग कमी झालाय). आम्हा मुलींवर तर त्यांनी कधी बोट पण उगारलं नाही. माझ्यासारख्या आग्यावेताळाला कसं त्यांनी आणि आईने संभाळलं असेल ते तेच जाणे. जसे रागवायचे तसेच लाड पण करायचे. खाण्यापिण्याचे लाड तर अगदी लिहिण्यासारखेच आहेत. बाबा रसिक खवय्या होते. आंब्यातल्या अनेक जाती त्यांना उत्तम माहिती होत्या. हापूस, नीलम, दशहरी, लंगडा आणि इतर अनेक जातीचे आंबे ते मोसमात घेउन येत. सकाळ संध्याकाळ जेवणात आंब्याचा रस असायलाच हवा. आंब्याचा रस हनुवटीवरुन ओघळतोय, फ़्रॉकवर सांडलाय आणि कोपरावर पण वाहतोय असे आमचे बहिणींचे फ़ोटो आहेत. कधी कधी त्यांना भल्या सकाळीच लहर येई समोसे-कचोरी खाण्याची. धंतोलीला जाताना, पंचशील टॉकिजच्या खाली एक मद्राश्याचं हॉटेल होतं. तिथल्यासारखा आकाराला आणि चवीला 'किंगसाईझ' असणारा समोसा मी अजून खाल्ला नाही. तर बाबांच्या स्कूटरवर समोर एकजण उभी रहायची, पिलिअन वर दोघी जणी आणि कधी कधी carrier वर चुलत भाऊ अशी आमची फ़लटण समोसे आणायला निघायची. बर्डीवरच्या पंडीतांकडच्या पुडाच्या वड्या, करंज्या, अपना बाजारच्या शेजारच्या दुकानातले बटाटेवडे, डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या आवारातल्या टपरीत मिळणारी मिसळ, सावजींकडचं तेल वाहणारं, खाताक्षणी कानातून धूर येईल असं तिखटजाळ चिकन हे त्यांचे आवडते पदार्थ. आई घरात सगळं अगदी चवदार करत असूनही लहर आली, कि लगेच स्कूटरवर बसून हे पदार्थ आणायला ते निघत. गम्मत म्हणजे, स्वत्: सगळं खाण्यात त्यांना फ़ारसा रस नसायचा तर खिलवण्याचा आनंद मोठा असायचा. आमच्या घरात प्रचंड राबता होता. आम्ही बहिणी, मधून मधून येणारे चुलते, चुलतभावंडं, आत्या, आजी, बाबांचे मित्र, गावाकडून येणारे पाहुणे- यात अगदी कोणाच्या काकाचा मामा पण आला आणि बाबांचे बाहेर गावाहून येणारे पक्षकार. सगळ्यांचं करता करता आई नक्कीच थकत असणार आणि या सगळ्याचा खर्च पण भरपूर होत असणार. कारण बाबांचा पाहुणचार वर्हाडी थाटाचा होता. कुठेही, काहीही कमी पडलेले चालत नसे. अगदी पक्षकार सुद्धा बाबांना "काई तंबाखू गिंबाखू हाय का जी?" असे बिनधास्त विचारत. पण आईचं नियोजन जबरदस्त. तिच्यामुळे आम्हाला कशाचीही झळ लागली नाही, कशाचीही उणिव कधी जाणवली नाही. बाबांसारख्या दानशुर वर्हाडी कर्णाचा संसार तिच्याचमुळे व्यवस्थीत झाला.
|
|
|