Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » मराठी गझल » Archive through December 01, 2006 « Previous Next »

Sarang23
Tuesday, November 28, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओहो हो! सुभान अल्लाह!! वा वैभवा!!!
सगळे कातिल आहेत रे...!!!


Prasad_shir
Tuesday, November 28, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा.. वैभवा... मस्तच रे!

हृदय, दूरदेश, पाचवी भिंत आणि जाणीवा हे शेर विशेष आवडले!

प्रसाद...


Swaatee_ambole
Tuesday, November 28, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम, वैभव!! सगळेच शेर!!

Paragkan
Tuesday, November 28, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah .. !!! !!

Ashwini
Tuesday, November 28, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, वैभव.... सुरेख, अप्रतिम.

Devdattag
Tuesday, November 28, 2006 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये बात!!!.. .. ..

Sarang23
Wednesday, November 29, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

        केवडा

कंदिलाच्या काचेवर पाहताना तडा
मनामधे दाटु नये प्राजक्ताचा सडा

चित्त सैरभैर होता, श्वास खोल जातो
पाण्यामधे अशावेळी मारु नये खडा

निरोपाची वेळ तशी जीवघेणी खरी
तरीसुद्धा कोणी ओल्या ठेवु नये कडा

संध्याकाळी घरामधे विझलेला दिवा
अशावेळी पाणोठ्याला भरु नये घडा

ज्याच्या ठायी दाटे भय विरह सर्पाचे
त्याने म्हणे जपू नये मनात केवडा


सारंग



Mrudgandha6
Wednesday, November 29, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रसाद,
रोज रोज मी भिकार, सावकार रोज तू
डाव जाणतो तुझा, तरी मजेत खेळतो!
.बहोत खुब!!!

वैभव,
....

सारंग,
वा!!!!!
एकेक शेर अप्रतिम!!!
मस्तच,शब्दच नाहीत कौतुक करण्यासाठी.


Krishnag
Wednesday, November 29, 2006 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग!! सुरेखच!!!

ज्याच्या ठायी दाटे भय विरह सर्पाचे
त्याने म्हणे जपू नये मनात केवडा

Psg
Wednesday, November 29, 2006 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, उच्च आहे ही गझल..

सारंग वा! मस्तच!


Vaibhav_joshi
Wednesday, November 29, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो ..

सारंगा

निरोपाची वेळ तशी जीवघेणी खरी
तरीसुद्धा कोणी ओल्या ठेवु नये कडा

वाह !!! वाह !!! क्या बात है

काही शेर मात्र " मला " कळले नाहीत .
उदा .
मतला ...
म्हणजे काय म्हणायचय ते कळतंय पण दोन्ही मिसर्‍यांमधल कनेक्शन मला सापडत नाहीये.

तसंच

संध्याकाळी घरामधे विझलेला दिवा
अशावेळी पाणोठ्याला भरु नये घडा

इथे कनेक्शन आणि अर्थ दोन्ही लागला नाही

मक्त्यात दोन्ही मिसर्‍यांत एक एक मात्रा कमी आहे का ? मी मोजतोय तर २२ होतायत .. पण मक्ता सही आहे ...
मला माझा एक शेर आठवला ..

सर्प स्पर्शांचे जरी निद्रिस्त होते
केवड्याचा गंध का इतका डसावा


आठवलं ? वाईत डिस्कस केली होती ही गझल .. वोह भी क्या दो दिन थे दोस्त .. ही चर्चा झाली की टाकतो ती गझल


Sarang23
Wednesday, November 29, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्प स्पर्शांचे जरी निद्रिस्त होते
केवड्याचा गंध का इतका डसावा

वा!!!


आठवलं ? ...

अरे कसं विसरेल मित्रा... प्रसाद तू आणि मी... अहाहा... अगदी दुग्ध शर्करा! तरी प्रसाद रात्री पाहिजे होता... आणखी मजा आली असती... असो.

मतला...

इथे प्राजक्ताचा सडा हा संकेत आहे... सकाळ होण्याचा... किंवा यशाचा..
आणि कंदील हा... अंधाराचा... किंवा अपयशाचा...
मग समोर उतरती कळा असताना किंवा दुःख असताना उगीच सुखाचे दिवस आठवू नयेत...
कारण त्याने फक्त त्रासच वाढतो...
जसं अंधारात दिवा लावला आणि तो विझवला की अंधार वाढतो... तसं...!

संध्याकाळी घरामधे विझलेला दिवा
अशावेळी पाणोठ्याला भरु नये घडा


दिवा विझलाय म्हणजे काही शक्यता आहेत... आपल्या शास्त्राप्रमाणे घरात विझलेला दिवा फार क्वचित असतो... कायम दुःखाच्या प्रसंगी...
त्यामूळे घरात कसलातरी विटाळ आहे... इथे मी फक्त हीच कल्पना मांडली आहे..
जर असा विटाळ आहे तर सार्वजनिक पाणोठ्यावर घडा भरू नये...
म्हणजे प्रॊब्लेम बाहेर घेऊन जाऊ नयेत, त्याने स्वतःचीच पत कमी होण्याची शक्यताच अधिक असंही सुचवायचय... आणि अशाप्रकारे आणखी बरेच अर्थ निघू शकतील...

काय पटतय का?

आणि मक्ता...

ज्याच्या ठायी दाटे भय विरह सर्पाचे
त्याने म्हणे जपू नये मनात केवडा


तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे... कारण मोजून मात्रा कमी भरतायत... पण लयीत म्हणून बघ काहीच चुकत नाहीये... तिथे भय मधला य दिर्घ उच्चारला जातोय... आणि मनात मधला त दिर्घ उच्चारला जातोय...

उच्चाराप्रमाणे मात्रा धरल्या तर ते बरोबर वाटतय...
जसं मागे एका गझलेवरून असच झालं होतं.

उरते न हाति काही, येई तसाच जाई
तरिही उगाच माज चढलाय माणसाला


इथे ज दिर्घ होतो आणि ते वृत्तात बसतं...
हे चालतं की नाही यासाठी भुजंगप्रयात हे सुंदर उदाहरण आहे... (स्वाती... हे तुलाही...)
पृथ्वीचे प्रेमगीत मधे कुसुमाग्रजांनी पण बर्‍याच ठिकाणी शेवटचा शब्द लघू लिहिला आहे आणि तो म्हणताना दिर्घ उच्चारला जातो... (पृथ्वीचे प्रेमगीत हे उपजाती मध्ये आहे... पहिली ओळ भुजंगप्रयात आणि दुसरी ओळ सौदामीनी वृत्तात. भुजंगप्रयातातला शेवटचा गुरु काढला की सौदामीनी वृत्त तयार होते)
जसे:
विराटापरी हे तुझे रूप आहे
मला ज्ञात मी एक धुलिःकण
....
...धुळीचे मला भूषण(हे कवितेचे शेवटचे कडवे आहे...)
इथे दोन्ही ठिकाणी ण हा लघू असूनही दिर्घ होतो... मी त्यावेळीही हा मुद्दा उपस्थीत केला होता...
म्हणजे... हे उच्चाराप्रमाणे मात्रा मोजणे नक्की चालत असले पाहिजे...!
म्हणूनच मी यापुर्वीही ही सुट वापरलीय... मिलन या कवितेमध्ये...

जसा मत्त लोपून जातो सुवास
पुन्हा तापतो मृत्तिकेचा प्रवास


इथे उच्चारताना दोन्ही स दिर्घ होतात म्हणून ते चालते...
अशा काही रचना सुरेश भटांच्या झंजावातमधेही आहेत... आणि त्यांनी प्रस्तावनेत तसे नमुदही केले आहे की उच्चाराप्रमाणे मात्रा मोजाव्यात म्हणून!

तरी इतरांना काही सुचत असल्यास कृपया सांगावे...





Prasad_shir
Wednesday, November 29, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा

गझल छान आहे... मात्र वैभवला जे कळले नव्हते तेच शेर मलाही कळले नव्हते! तुझ्या explanations नंतर अर्थ लागत आहे...

उच्चारांवरून मात्रांविषयी एक असं सुचवावंसं वाटतं की एखाद्या शब्दाच्या सर्वमान्य साधारण स्वीकृत अशा उच्चारानुसार त्याच्या मात्रा धरायला हरकत नाही... पण एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखादा शब्द (केवळ मात्रा पूर्ण करण्यासाठी) वाचकांनी दीर्घ किंवा र्‍हस्व उच्चारला पाहिजे असा हट्ट कवीने धरणं योग्य नाही असं मला वाटतं.... आणि अर्थातच कवीने असा हट्ट धरून आपलं काव्य मात्रांना धरूनच आहे असं सिध्द जरी केलं तरी रसिक वाचकाचा ती ओळ वाचताना जो रसभंग व्हायचा तो होतोच!


Vaibhav_joshi
Wednesday, November 29, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

well said .. मला असं नेहेमीच वाटत आलंय " मनाचे श्लोक ' म्हणतानाही की आपल्याला त्याची एक चाल माहीत आहे म्हणून आपण सांभाळून घेत घेत म्हणतो ... ह्याचा अर्थ ते लिहीणं चूक आहे असं नाही .. पण का ? ... हा प्रश्न छळत राहतोच. जोपर्यंत तुम्ही गाभ्याशी compromise करत नाही तोपर्यंत हा तोल सांभाळायला काय हरकत आहे ? प्रतिभा असताना ? मला हे पटतच नाही की समर्थांन " मना सज्जना भक्ति " मध्ये भक्ति र्‍हस्व करण्याशिवाय पर्यायच नसेल . त्या काळी कदाचित ते सर्वमान्य असावं किंवा अजूनही कवितांमध्ये ही सूट ग्राह्य धरली जात असावी . पण जिथे गझलसारखा बंदिस्त आकृतीबंध आहे ... ती गझल आहे का हीच तिची कसोटी आहे तिथे अशी सूट का घेतली जावी ? की फक्त मात्रांचे काफ़िया रदीफ़ चे बंधन पाळायचे पण बाकी व्याकरणात सूट घेत पुढे जायचं ? ( एकूणच म्हणतोय हां सारंग , आत्ताची तुझी गझलच असं नाही ) उदाहरणं आहेत हे मान्यच आहे पण आपण कवितेतली उदाहरणं बघतोय . सुरेश भटांनी असेही नमूद केले आहे की उगाच र्‍हस्व लिहून दीर्घ सारखा ओढू नये . मी चित्तरंजनला एकदा हे म्हणालोही की र्‍हस्व अक्षरांनी संपणार्‍या किती गझल आहेत अशा ? .. खूप कमी . कारण तिथे अनावश्यक ओढाताण करावी लागते एक उदाहरण सांगतो .. माझ्या एका गझलचा मतला असा होता

भरभरून भेटले कधी मला न चार क्षण
ओतप्रोत हे मनात रोजचे रिकामपण


आता इथे जरी र्‍हस्व ने शेर संपत असले तरीही तो दोन लघूंचाच एक दीर्घ होतोय , नाहीतर प्रचंड ओढाताण झाली असती .
उदा .. संदीप खरेचं

मन तळ्यात SSS मळ्यात SSS जाईच्या कळ्यात S


आपण बोलताना तळ्यात SSS असं बोलतो का कधी ? पण ती कविता आहे . तिथे कुठलेच नियम लागू होत नाहीत

प्रसाद म्हणतो तसं " मी असा उच्चार मनात धरून लिहीतोय हे समोरच्याला कसं कळावं ? गझलच्या सर्व ओळींमध्ये समान मात्रा हव्यात हा सर्वांत पहिला नियम नाही का ? आणि ते मनात नाही actual शब्दांत यायला नको का ?

आता शेरांबद्दल ... मी आधी म्हट्ल्याप्रमाणे .. कळतंय काय म्हणायचंय .. ते पण त्याला स्पष्टीकरणाची जोड द्यावी लागतीय ... म्हणजे साधं सोप्पंच लिहायचं का ? दाखिली गझल लिहायचीच नाही का ? असं नाही पण किमान एक ... किमान एक अर्थ त्या शेराने वाचताक्षणी द्यायला हवा की नको ? जो रसिक आहे तो आणखी अर्थ शोधेल आणि त्याला लागतीलही पण हा माझा basic thought , ह्या प्रतिमा आणि हे कनेक्शन असं किमान एक आवर्तन पूर्ण व्हायला नको ?
उदा .. इलाहीजींचा ( ?) ) एक शेर आठवतोय

हे असे बागेवरी उपकार केले
कत्तली करुनी फुलांचे हार केले


इथे at least एक थेट अर्थ लागतोय आणि तो ही तितकाच ताकदीचा आहे . मग वाचक / श्रोता तो शेर सोबत न्यायला तयार होतो आणि मनात घोळत असताना त्याला दुसरे अर्थ लागू लागतात .. मला ह्याच्या लागलेला दुसरा अर्थ म्हणजे ..................... " बाजार " ... जास्त बोलत नाही ..

आता


कंदिलाच्या काचेवर पाहताना तडा
मनामधे दाटु नये प्राजक्ताचा सडा


इथे पूर्ण emphasis कंदिलावर आहे आणि सामान्य वाचक गझल म्हटली की दुसर्‍या ओळीत विरोधाभास अपेक्षित धरतोच धरतो ( ९०% ) ह्या शेराच खरं वजन प्राजक्ताच्या सड्यात आहे म्हणजे पहाट . मग तो build होताना काळोखापासून व्हायला हवा . कंदिलाच्या काचेला फक्त तडा गेल्याने कंदिल विझत नाही किंवा काळोख underline होत नाही असं मला तरी वाटतं ... म्हणजे माफ कर .. थोडा उद्दामपणा करतोय पण

काळोखाच्या मनसुब्यांना केव्हा जावा तडा
मनामध्ये दाटू आला प्राजक्ताचा सडा


हा एक बदल ... हा जास्त user freindly नाही काय ? किंवा तू स्वतः ह्यापेक्षाही चांगल लिहितोसच .. आणि हा बदल फक्त ह्या चर्चेपुरता मर्यादित आहे म्हणजे मला कळतंय की तुझी पूर्ण गझल उपदेशात्मक किंवा facts state करणारी आहे

ह्यावरही जाणकारांचं असं मत आहे की शक्यतो ... शक्यतो उपदेशात्मक लिहीणे टाळावे ... आपल्याला आलेले अनुभव ... जाणवलेलं सारं जरूर मांडावं

संध्याकाळी घरामधे विझलेला दिवा
अशावेळी पाणोठ्याला भरु नये घडा


इथे आपण फक्त पूर्वापार आलेली परंपरा state करतोय उद्या कुणी असं म्हणायला नको की जुनी उखाणी , म्हणी ह्या anyways यमक सांभाळूनच असतात मग ते गझलचे शेर का नाहीत ?
एखादी ओळ जरूर घ्यावी .. पण आपल्या अनुभवाला आधार देण्यासाठी .. म्हणजे पहिल्या ओळीत तुमचा अनुभव आहे आणि दुसर्‍यात

" असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला "
आलं तरी ठीक आहे ....

अर्थात हे सगळं " माझं " understanding आहे ... प्रचंड चुका असू शकतील पण हे एक प्रामाणिक मत आहे ..

सुटसुटीत , साधी समोर बसून बोलल्यासारखी आणि नियम पाळून लिहीलेली गझल हा एकच निकष मी मानत आलोय ..

डॉ नरेंद्र जाधवांनी भाषणात सांगितल्याप्रमाणे शेर कसा हवा

इधर से निकला ( सादरकर्त्याकडून )
उधर से उछला ( श्रोत्यांमधून / वाचकामधून)

हेच खरं



Sarang23
Wednesday, November 29, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र प्रसाद, तुझा काहीतरी गैरसमज होतोय... मी काहीही हट्ट करून गळी मारत नाहीये... तू तो शेवटचा शेर वाच जर तो शेर या गझलेतला नसेल तर तो वेगळा पडेल!
तसं होत नाहीये...
आणि मला एवढच सांगायचय... जे वरील उदाहरणांमध्ये होतय तेच माझ्या गझलेतल्या शेवटच्या शेरात होतय... हाच फरक आहे...

मी फार वीर आहे हे सांग उत्तरास
बोलास भाव आहे त्या प्रांगणापर्यंत


हा माझ्याच एका गझलेतला शेर... इथे बर्‍याच वाचकांना हा शेर समजणार नाही हे मी जाणतो... पण मग उत्तर म्हणजे विराट राजाचा मुलगा आणि द्रौपदीचा भाऊ... आणि मग बालिश बहू बायकांत बडबडला हे वामन पंडीतांच काव्य असं सगळं वाचलेल असेल तर अर्थ लागायला वेळ लागत नाही... म्हणजे संकेत आपल्या भाषेत किती रुजतात याला महत्व आहे...

यावर एक छान गोष्ट सांगावीशी आटली...
अमिर खुस्रोवने शमा आणि परवाना असे संदर्भ त्याच्या शायरीत वापरले पण बर्‍याच लोकांना ते कळाले नाहीत... त्याकाळच्या इतर दिग्गज कवींनाही... यात नवल काहीच नाही... फक्त सुक्ष्म निरिक्षणाने त्याने पहिल्यांदा तो काव्यसंकेत गझलेत आणला आणि आज मितीला किमान २००० शेर शमा आणि परवाना या विषयावर आहेत!!! (मला ज्ञात असलेले)

शेवटी सर्वात महत्वाचं ही गझल खारीजी नाही दाखिली आहे... (एकही शेर विरोधाभासावर आधारित नाहीये)

प्रिय वैभव... तुझ्या अभ्यासपुर्ण प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...
इधरसे निकला
उधरसे उछला

हे फक्त विस्मयचकीत करणार्‍या कवितांबाबत शक्य आहे... कुठलं तरी धक्कातंत्र वापरून केलेल्या गझलच किंवा कवितच असा निकला / उछला भाव आणू शकतात... पण माझ्या वाचनात आलेल्या बर्‍याच कविता मला अंतर्मुखच करून गेल्या... तिथे कुठलाही उछला प्रकार झाला नाही... आणि जितका उछला कडे कल वाढवत जावा तितका साहित्याचा दर्जा घसरत जातो... असं माझ्यासारख्या अडाण्याचं मत आहे... (म्हणजे कुणी हा मुद्दा चर्चेत घ्यायला नको) पण यासाठी हाली या शायराचे उदाहरण सांगणे उचित ठरेल...
बादशहाच्या दरबारात अधिकाधिक वाहवा मिळवण्याच्या हव्यासात याने उर्दु गझलेचे खूप अधःपतन केले होते अनेक अश्लिल शेर लिहून... तिथे असा उछला प्रकार त्याला खूप मिळाला... :-(
शेवटी त्या शेरांमधून अर्थ प्राप्त होतात की नाही हा वेगळ मुद्दा... ते कसे घ्यायचे यासाठी वाचक समर्थ आसतातच...!
ग्रेस हा मराठीतला दुर्बोध कवी, पण त्याचेही असंख्य वाचक चहाते आहेतच...(मी ही त्यातलाच एक)

पण... पण सर्वात महत्वाचा मुद्दा... ते पृथ्वीचे प्रेमगीत चे उदाहरण दिले आहे त्याचे काय? कुसुमाग्रज तर आत्ताच्या काळातले आहेत... आणि आजच जाणकारांकडून ऐकलं... कवितेत उच्चाराप्रमाणे लघू गुरू घेणं चालतं... त्यामुळे मला अधिक उदाहरणे देण्याची गरज भासत नाही...

मी आधीच म्हटल्याप्रमाणे गुरु लघू लिहिलेलं काव्यात चालतं तसच लघू अक्षराचा उच्चार दिर्घ होत असेल तर तो दिर्घ धरण्यास हरकत नाही... पण त्याबद्दल काहीच बोलला नाहीस तू...

असो... शेवटचे...
ते संदीपचं उदाहरण एकदम चुकीच्या ठिकाणी टाकलस बघ...
ती त लांबवण्याची सुट कवीने नाही तर गायकाने घेतली आहे... :-)

लघू अक्षराने संपणार्‍या सगळ्याच कविता किंवा गझलांमधे ओढाताण होते अस काही नाहीये वैभव...
उदा...

माणुसघाणी झाली अक्कल!
टाळाटाळीसाठी शक्कल!

जाळु नका मज मेलो नाही;
ही मुडद्याची होती नक्कल!


इथे मला कुठेच शेवटच लघू ल म्हणताना ओढाताण झाली नाही... ती झाली की समजावं लघू असूनही उच्चार गुरू प्रमाणे करायचा आहे...
जस की मला ज्ञात मी एक धुलिःकण...!!!!!!!!!!
आता फक्त या धुलिःकण बद्दल बोल... अर्थावर परत कधी...



Vaibhav_joshi
Wednesday, November 29, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रवर्य सारंग,

' निकला / उछला' उक्तीचा तू लावलेला अर्थ वाचून खरंच खेद वाटला. तुझ्या डोळ्यांसमोर तमाशा पहाताना फेटे उडवणारे प्रेक्षक आले असावेत असं वाटलं. मी वर दिलेलं उदाहरण
हे असे बागेवरी उपकार केले
कत्तली करुनी फुलांचे हार केले..

किंवा
' इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..'

यासारखे शेर जे तत्क्षणी कळतात / भिडतात (मी आधी म्हटल्याप्रमाणे किमान एक सकृतदर्शनी अर्थ देतात) आणि दीर्घकाळ स्मरणात राहून दरवेळी नवनवे अर्थ आणि अनुभूतीही देतात, त्यांना तू याच ' विस्मयकारक' / धक्कादायक / क्षणिक स्वस्त आनंद देणार्‍या category मधे टाकशील का?

ग्रेस, कुसुमाग्रज यांची उदाहरणं देताना तू कविता आणि गज़ल यांची गल्लत करतो आहेस. मी माझ्या वरच्याच पोस्टमधला मुद्दा पुन्हा उधृत करू इच्छितो : सहजपणा आणि संवादात्मकता (' सुटसुटीत, साधी समोर बसून बोलल्यासारखी..' असं वर म्हटलं होतं) हा गज़लचा आत्मा आहे.
त्याच कारणासाठी मी तुझ्या
चारचौघांसारखा साधाच होतो..
चं कौतूक केलं होतं.

दुर्बोध कवितांचाही एक वाचकवर्ग, नव्हे, चाहतेही असतात हे खरं, पण म्हणून सुबोध आणि तरीही आशयगर्भ लिहीता येतच नाही असं नव्हे ना?

' धुलिःकण' बद्दल बोललो नाही कारण माझ्या मते माझा मुद्दा मी पुरेसा स्पष्ट मांडला होता. तो तुझ्या लक्षात आलेला दिसत नाही. शिवाय तुझ्या शेवटच्या पोस्टमध्ये तू स्वतःच्याच मुद्द्याचं खंडन केलं आहेस असं नाही वाटत तुला?

>>> लघू अक्षराने संपणार्‍या सगळ्याच कविता किंवा गझलांमधे ओढाताण होते अस काही नाहीये वैभव...
म्हणजे तशी ओढाताण इथे होत आहे हे तुला मान्य आहे असं दिसतंय.

कुसुमाग्रज, बोरकर यांनी ही सूट घेतली आहे, पण कविता लिहीताना. इथे आपण गज़लबद्दल चर्चा करत आहोत असा माझा समज होता. असो.

यापुढे ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने लिहावं हे खरं.


Swaatee_ambole
Wednesday, November 29, 2006 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा, मलाही गडबड वाटत्ये मात्रांमध्ये. काहीतरी एकच rule follow करायला हवा ना?
जर उच्चारामुळे ' भय' मधल्या य च्या २ मात्रा मोजणार असलास तर त्याच न्यायाने मतल्यातल्या ' काचेवर' मधल्या र च्याही दोन मोजायला हव्यात. त्याचाही उच्चार दीर्घ होतोय तिथे.
मुळात गज़लमधे असं मोजणं मला वैयक्तिकरित्या पटत नाही, पण एक मिनिट ते चालेल असं गृहित धरलं तरी मग ते consistant हवं.

दुसरं, तू जी उदाहरणं दिली आहेस ती सगळी कवितांची आहेत. कवितेला गज़ल इतकं rigid गणमात्रांचं बंधन नसतं. कुसुमाग्रजांनी ' पृथ्वीचं प्रेमगीत' वृत्त ठरवून लिहीलं असेल असं मला वाटत नाही. तिथे ' लय' पुरते. गज़लमधे एकदा ' ज़मीन' ठरली की अश्या पळवाटा शोधून कसं चालेल?

हे झालं तंत्राबद्दल. मंत्राबद्दल बोलायचं तर मलाही ' कंदिल हे अंधाराचं प्रतीक आहे' हे जन्मात कळलं नसतं आणि पटलेलं नाही. तसंच ' सार्वजनिक पाणोठा' प्रकरणही.

गज़ल उपदेशपर नसावी हे मला माहीत नव्हतं, पण गज़ल या काव्यप्रकाराचा ' स्वभाव' लक्षात घेता ते तंतोतंत पटलं मला. तशी दुसरी वाचल्याचंही आठवत नाही.

आणि जाता जाता, विषय निघालाच आहे म्हणून..

१. ' पृथ्वीच्या प्रेमगीता'तल्या त्या ओळी
अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परी पाय तूझे धुळीचेच आहे मला भूषण

अश्या आहेत. इथे तर बघ तूझे मध्ये दीर्घ तू वापरलाय. आणि मला ते आवडत नाही.. ही गज़ल नाहीये आणि माझी खूप आवडती कविता आहे, तरीही.

२. उत्तर हा विराटाचा मुलगा हे बरोबर. पण तो द्रौपदीचा भाऊ कसा झाला? पांडव अज्ञातवासात असताना गोग्रहणाच्या वेळी हा लढायला घाबरला ( तू दिलेला संदर्भ) तेव्हा बृहन्नडेच्या वेषातच अर्जुनाने त्याचं सारथ्य केलं होतं. त्याची बहीण उत्तरा हिला अर्जुनाने ( बृहन्नडेने) नृत्य शिकवलं होतं. पुढे अभिमन्यूशी तिचे लग्न करून तिला सून करून घेतली. द्रौपदी ही द्रुपदाची मुलगी. तिचा भाऊ धृष्टद्युम्न. हा महाभारत युद्धात पांडवांचा सेनापती होता. (' संकेत' भाषेत आणि संदर्भ स्मरणात नीट रुजावा म्हणून सांगत्ये.)

३. त्या ' निकला / उछला' चा तू केलेला विपर्यास मला अजिबातच आवडला नाही. दर्जेदार ते सगळंच लोकप्रिय होत नाही हे खरं, पण लोकप्रिय ते सगळंच दर्जाहीनच असतं हा निष्कर्ष चुकीचा आहे. मुळात दुर्बोध म्हणजे दर्जेदार हे गृहितक माझ्यातरी समजुतीच्या पलिकडचं आहे. आणि हे असं तू वैभवला ऐकवलंस याचं तर मला खरंच खूप वाईट वाटलं.

चर्चा अश्या वळणांनी जाणार असेल तर न झालेली बरी, हो ना?


Prasad_shir
Wednesday, November 29, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा

कुसुमाग्रजांच्या काही शे प्रकाशित कवितांपैकी एखाद्या कवितेतल्या एखाद्या ओळीतल्या एखाद्या शब्दामधे झालेली र्‍हस्व दीर्घाची चूक (किंवा त्यांनी तिथे घेतलेली सूट) ही सर्वसाधारण नियम होऊ शकते का?

तसंच भटांनी सूट घेतली आहे, कुसुमाग्रजांनी सूट घेतली आहे... इतर अनेक मान्यवर कवींनी घेतलेली आहे म्हणून मीही घेत आहे असं एका बाजूने म्हणणं आणि (तरीही) मी हट्ट करून काहीच गळी उतरवत नाहीये असं दुसरीकडून म्हणणं ही दोन्ही विरोधाभासी विधानं आहेत असं तुला वाटत नाही का?

असो... मी फक्त र्‍हस्व दीर्घाच्या बाबतीत माझं मत सांगितलं होतं आणि कवीनं काय भूमिका घ्यावी हे सुचवलं होतं... पटत असलं तर घे... नाहीतर सोडून दे!


Prasad_shir
Friday, December 01, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेदनांची मांडतो आरास मी

भासतो त्यांना सुखाचा दास मी
वेदनांची मांडतो आरास मी!

पाहतो ते ते खरे मी मानतो
केवढे जपतो उराशी भास मी...

वेळ जो लागायचा तो लागतो
मोजतो आहे उगाचच श्वास मी

लोपले सरकारही...पाऊसही
घेतला हाती अता गळफास मी

जायचे होते तिला, गेलीच ती
थांबवू शकलो कधी मधुमास मी?

नेत नाही ती मला कोणाकडे
जे नको ते बोलतो हमखास मी!

का अचंबा वाटतो गुण पाहुनी
आजवर केला कुठे अभ्यास मी!

ओळखू आली सख्या गणिते तुझी
ऐकला जेंव्हा तुझा इतिहास मी!


Sarang23
Friday, December 01, 2006 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! प्रसाद... सुरेख!! सगळेच शेर आवडले...!!!

स्वाती, तुझा काहीतरी भलताच गैरसमज झाला असावा... तुझी प्रतिक्रिया वाचून अपार खिन्नता आली... असो...

१. माझी एकही प्रतिक्रिया वैभवला उद्देशून नव्हती ही गोष्ट अगदी मनापासून सांगावीशी वाटते...
तो केवळ एक चांगला कवी नाही, तर माझा अतिशय चांगला मित्रही आहे...

२. आता द्रुपद राजाची मुलगी म्हणून द्रोपदी हे नाव पांचालीला पडलं तर ती विराट राजाची मुलगी कशी झाली? (मी असंही म्हटलं नाहीये की द्रोपदी विराट राजाची मुलगी आहे, मी म्हटलय की ती उत्तराची बहिण आहे indirectly ) पण माझ्या वाचनात ही गोष्ट आली आहे की उत्तराला द्रोपदीने आपला भाऊ मानले होते... असो...

३. उछला... हा शब्दच मुळात उथळ आहे... म्हणून मी त्याचा शब्दशः अर्थ लावून माझे मत व्यक्त केले... उछला म्हणजे हृदयात उतरला या अर्थी वापरलय याच गोष्टीवर मी मत प्रदर्शीत केले.
ईधरसे निकला उधरसे उछला हे मंचीय वळणाचच वाक्य आहे अस मला सांगावस वाटतं...
त्याही पेक्षा सुंदर वाक्ये गझल काय आहे हे सांगण्यासाठी वापरता येतील...
जसे
गझल वो जो दिल कहे और दिल सुने... किंवा
गझल वो जो कानोसे उतरे और रुह को छु जाये... किंवा
जिस्मानी बाते छोडो दोस्तो.. रुह का रिश्ता है रुहसे रहने दो...

असो... पण वैभवच्या ते वाक्य लिहिण्यामागच्या भावना अतिशय साफ होत्या हे मी नक्कीच जाणतो... (त्याला किमान तेवढं तरी ओळखतो:-))

आपण सगळेच अशा जागेवर पोहोचलो आहोत की एकमेकांत गैरसमज निर्माण होवूच नये असे वाटते... त्यामुळे प्रसाद, स्वाती आणि वैभव, कृपया गैरसमज टाळावेत.

आता राहाता राहिलं त्या शेराचं तर त्यासाठी...

ज्याच्या ठायी दाटे भय विरह सर्पाचे
त्याने म्हणे जपू नये श्वासात केवडा


इथे मनात ऐवजी श्वासात टाकल्याने मात्रांचा प्रश्न सुटला...

मित्र वैभव आणि मित्र प्रसाद... पहिल्या ओळीत मात्रा बरोबर आहेत असे वाटते
ज्याच्या (४) ठायी (४) दाटे (४) भय (२) विरह (३) सर्पाचे (६)
४ + ४ + ४ + २ + ३ + ६ = २३

अर्धी माझी चूक
अर्धी चूक तुझी
दिवसामागे आली
जशी अंधाराची ओझी






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators