|
Raina
| |
| Tuesday, October 31, 2006 - 5:21 am: |
| 
|
हादाशी नो गेन- The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद. गेन नाकाओका- आपल्या गोष्टीचा नायक, हिरोशिमात जन्मला आणि वाढला. तो प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्या सुमारास, जपानची ब्रिटन आणि अमेरिकेविरुद्ध लढाई चालू होती. जपानच्या युद्धातील पराभवाच्या जरा आधीच्या काळात ह्या कहाणीची सुरवात होते. गेन हा ७ वर्षाचा खट्याळ,आनंदी मुलगा. नवनवीन खोड्या शोधून काढण्यात वाकबगार. त्यासाठी,धाकट्या भावाला-शिन्जीला त्याच्याबद्दल खूप आदर होता. रोज शाळेतून गेन घरी आल्यावर, दोघजणं एकमेकांशी अंधार पडेस्तोवर खेळायचे. त्यांचे वडील लाखेच्या कामातील कुशल कारागीर होते. स्वत:च्या घरातील छोट्याशा workshop मध्ये लाकडावर लाखेची चित्र काढून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. आई घरकामात, कुटुंबाची काळजी घेण्यात आणि वडिलांना मदत करण्यात व्यग्र असे. मोठा भाऊ -कोजी माध्यमिक शाळेत शिकत असे. शाळेत जाण्याऐवजी तो आणि त्याचे मित्र आताशा, घरापसून लांबच्या, हिरोशिमाच्या जवळच्या दुस-या गावात, एका दारुगोळा बनवायच्या फॅक्ट्रीत काम करत असत. सरकारी धोरणानुसार, जपानला युद्ध जिंकायला मदत म्हणुन, विद्यार्थ्यांना अशा कारखान्यात काम करावं लागत असे- त्यांची ईच्छा असो वा नसो! शाळेच्या ईतर विद्यार्थ्यांसोबत अकिराला (२ नंबरच्या भावाला), जिथे बॉम्बहल्ल्याची कमी शक्यता होती अशा दूरच्या गावात जाऊन रहावं लागलं. निघताना, भरलेल्या डोळ्यांनी, अकिरा आईला "मला जायचे नाही" म्हणत होता.तिस-या ईयत्तेतल्या मुलांपासून evacuation ची सुरवात झाली होती आणि अकिरा तिस-या ईयत्तेत होता. एकुलती एक बहिण 'ऐको', ५व्या ईयत्तेत असली, तरी तब्येतीने अशक्त असल्यामुळे घरी आईवडिलांकडे थांबू शकली होती. गेनचं कुटुंब ह्या सात जणांच होतं. युद्धाच्या सगळ्या समस्यांना, होता होईल तो एकमेकांना सांभाळुन हे कुंटुंब तोंड देत होतं- पण युद्ध संपेपर्यंत कुटुंबातले सगळेच काही जिवंत राहिले नाहीत... एक दिवस, आईने गेनला तिच्या पोटाला कान लावून ऐकायला सांगितलं. आईच्या पोटात काहीतरी जोरदार हालचाल होत होती. "आपल्या घरी लवकरच नवीन बाळ येणार आहे आता "- आई हसत हसत म्हणाली. “माझं छोटा भाऊ किंवा छोटी बहीण- “ गेन किंचाळत म्हणाला. "आणि बाळ लाथ मारतय.." दोन मोठ्या मुलांच्या वियोगामुळे तसं सगळं घर उदास असायच. पण आता गेनच्या आनंदातिशयानी आख्ख्या घरात धीर आणला, आशा आणली. गेन आणि शिन साठी अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे- कुटुंबाच्या गव्हाच्या शेतात जाऊन बाबांना मदत करणे.गव्हाच्या कापणीची ते दोघं अगदी आतुरतेने वाट बघायचे कारण त्यांना खात्री होती की आपण ह्यापासून नुडल्स किंवा ब्रेड बनवू शकू. त्यांची एकच ईच्छा होती , एका दिवसासाठी का होईना, पण पोट तुडुंब भरलेलं असावं! रोजच्या जेवणात, अक्षरश: भाताची शित मोजता येतील एवढी पाणीदार कांजी असायची. त्या काळ्या दिवसात जपानातील ईतर लोकांप्रमाणेच, ते नेहमीच भुकेले असायचे. क्रमश:
|
Sayonara
| |
| Tuesday, October 31, 2006 - 8:04 am: |
| 
|
वा, सुरुवात छान झालीय. पूर्ण कर लवकर.
|
थांबु नकोस रैना, चालु ठेव, छान लिहीत आहेस
|
Raina
| |
| Tuesday, October 31, 2006 - 11:06 pm: |
| 
|
बाबा कधी कधी निराश व्हायचे, कारण त्यांना कळत होतं की जपान एक दुस्तर युद्ध लढत आहे. सुदूर दक्षिणेकडिल बेटांवर तैनात केले गेलेले शिपाई तण, उंदीर, साप आणि जे मिळेल ते खात होते. तरिही उपासमारीने मरत होते. काही आजारी पडले, तर काहींच्या बॉम्बहल्ल्यात ठिक-या ऊडाल्या. आपल्या कुटुंबाला सुखसमाधानात रहायला मिळावं म्हणुन बाबा आतुरतेने युद्ध संपायची वाट बघत होते. त्यांच्या तीव्र ईच्छेला न जुमानता, युद्धाची धुमश्चक्रि दिवसेंदिवस वाढतच होती. १९४५ मधील एप्रिलच्या पहिल्या दिवशी, अमेरिकेची फौज ओकिनावात(जपानच्या सर्वात दूरच्या तटबंदीवर) डेरेदखल झाली. घनघोर लढाईने ओकिनावाच्या रहिवास्यांना घेरलं आणि जवजवळ विध्वंसाच्या टोकांपर्यंत नेउन ठेवलं.ओकिनावाची हिरवीगार धरती आणि निळ्याशार समुद्र ,रक्ताच्या लाल रंगाने माखले. दुष्मनांचे हवाई दलं जवळजवळ रोज mainland जपानकडे जाऊ लागले. शहरांवर बॉम्ब टाकून, आगीचे डोंब उसळ्वू लागले आणि रातोरात शहरं बेचिराख करु लागले. आगीच्या लोळात अगणित लोकं जळुन मेले. रेडिओ आणि वर्तमानपत्र मात्र, जपान सगळ्या लढाया जिंकत असल्याचे खोटे वृत्तांत देत हो्ते. ज्या नेत्यांनी युद्धात लढ्ण्याचा निर्णय घेतला होता ते ठासून सांगत होते " जपान हा पवित्र देश आहे. आपण युद्ध जिंकणारच ". नेतेमंडळी धादांत खोटं बोलत होती आणि युद्ध थांबवायला नकार देत होती. वृत्तांत ऐकणा-यांचा मात्र, शेवटी जपान युद्ध जिंकणारच, असा समज होत होता. लोकं रोज तकलादू बांबूच्या काठ्याकामट्यांनी शत्रूला कसं मारायच- हे शिकायसाठी कवायती करत होते. शेवट्च्या माणसापर्यंत लढण्याचे संकल्प सोडत होते. एक दिवस, बाबा जरा जास्तच साके पिऊन या भाला कवायतीत गेले. त्याचा, त्या कवायतीच्या प्रमुखाला खूप राग आला. तो स्थानिक समितीचा अध्यक्ष होता. " तुम्हाला आपल्या अतिमहत्वाच्या युद्धाबाबत गांभिर्य नाही. दारु पिऊन कवायतीला यायची तुमची हिम्मतच कशी झाली ? अशा पवित्राने तुम्ही अमेरीकेच्या शिपायांचा पराभव कसा करणार? तुमच्यात योग्य ती भावना नाही. " "अध्यक्षसाहेब, अशा माणसाला काढूनच टाकलं पाहिजे.. असा माणुस म्हणजे गद्दारासारखाच- "असे भाला हाताळायला शिकवणारा एक निवृत्त म्हातारा शिपाईगडि म्हणाला. "अगदी बरोबर"- अध्यक्षाने मान डोलवली.. आता बाबांनाही राग आला.. ते म्हणाले "गप्प बसा. मी निव्व्ळ दारु पिऊन आलो म्हणुन मी गद्दार ठरत नाही. शिवाय ह्या बांबूच्या भाल्यांनी अमेरिकनांचा पराभव करायची आशा बाळगणे हे मुर्खपणाचे आहे. सुरवातीपासून अंतापर्यंत हे युद्ध ही एक चुक आहे." मग बाबांनी भाला फेकून दिला आणि ते घरी गेले. अध्यक्ष आणि त्याचे गडि, सगळे त्यांच्यामागून "गद्दार, गद्दार "च्या आरोळ्या देत होते. युद्धाला विरोध करणा-यांना सरसकट गद्दार म्हणलं जायच. त्यांची अट्टल गुन्हेगारांहून जरा कमी अवहेलना केली जायची. क्रमश:
|
Raina
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:08 am: |
| 
|
गेन्- ऐक मी काय सांगतोय ते"- बाबा म्हणाले. "यूद्धानी माणसं, प्राणी, झाडं आणि घरं सगळच उद्ध्वस्त होतं. दु:ख आणि यातना या शिवाय युद्ध आपल्यासाठी काहीही मागे ठेवत नाही.जपाननी युद्ध थांबवून शांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे." ते काय म्हणत होते ते गेनला समजणे अवघड होतं. तरीपण बाबांच बरोबर आहे याची गेनला खात्री होती. पण शेजारपाजारचे मात्र रस्त्यावरुन जाता येता गेन आणि त्याच्या भावाकडे तुछ्चतेने बघत आपल्या मुलांना कुजबुजत सांगत:" त्यांचे वडिल गद्दार आहेत. मुलं ही बापाच्याच वळणावर जाणार. त्यांच्यापासून दूर रहा." एक दिवस गेन, ऐको आणि शिनजी वडिलांनी लाखेच्या गिलावा दिलेल्या लाकडी वस्तू ठेल्यावर टाकून, ठेला खेचत घाऊकविक्रेत्याकडे नेत होते. मिळालेल्या पैशातून, काळ्याबाजारातून तांदूळ विकत घ्यायचा होता. नदीकाठच्या रस्त्याला लागले, तसे त्यांच्यावर दगडफेक होऊ लागली. दगडफेक करणारी मुलं म्हणजे अध्यक्षांचे चिरंजीव ( ryukichI ) रयुकिची आणि त्याचे टारगट मित्र. त्यांनी ह्या तिन मुलांचा रस्ता अडवला आणि म्हणाले "गद्दार कुठले! तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही आता". मग त्यांनी ठेला हिसकावून घेतला आणि नदीत ढकलून दिला. तो माल नदीत भिजला आणि वाया गेला. गेनच्या तळपायाची आग मस्तकात गेली . "बाबा गद्दार नाही. तू खोटारडा आहेस" क्षणार्धात, तो रयुकिचीच्या अंगावर धाऊन गेला आणि त्याच्या बोटाला कडकडुन चावला- डोक्यात धोंडा बसूनही तो बोट सोडेचना. रयुकिचीने भोकाड पसरलं आणि रक्त ठिबकणारे आपले बोट घेऊन तो पळून गेला. गेन ती मारामारी जिंकला खरा, पण त्याला त्या यशाचा आनंद घेता आला नाही. ऐको आणि शिन्जी अपमानाचे अश्रू ढाळत होते. अचानक, गेनला बाबांचा नेहमीचा उपदेश आठवला- "ग़ेन- धिर धर बाळा. तू गव्हाच्या ओंब्यांसारखं सशक्त असलं पाहीजेस. गहू किती वेळा पायदळी तुडवला जातो म्हणून पुन्हा पुन्हा ऊठुन उभा राहू शकतो." मुलांनी, भिजून तरंगत असलेला सगळा माल नदीतून गोळा केला आणि घरी घेऊन आले. पण आईबाबांना त्यांनी घडलेली घटना पूर्ण सांगीतली नाही. फक्त माल नदीत पडल्याचं सांगीतलं. क्रमश:
|
Raina
| |
| Saturday, November 04, 2006 - 5:28 am: |
| 
|
एक दिवस एक पोलिस बाबांकडे आला आणि म्हणाला " तुमची चौकशी करायची आहे. ताबडतोब पोलीसचौकीवर हजर व्हा". बाबांना हातकड्या अडकवून, त्यांना तो पोलिसचौकीवर घेऊन गेला. बाबांना गार फरशीवर ओणवं केल्या गेलं आणि सोट्यानी मारहाण केली गेली. ते बेशुद्ध पडले तसे, त्यांच्या तोंडावर बादलीभर पाणि मारून, कातड्याच्या मजबूत बुटांनी पेकाटात लाथ घालून, पुन्हा बेशुद्ध पडेस्तोवर मारल्या गेलं. पण कितीही छळ झाला तरी त्यांचे युद्धविषयक विचार बदलू शकले नाहीत. गेन आणि उर्वरित कुटूंब घरी हताश होऊन बसले. कोणाची कमाई नाही म्हणून त्यांच्याकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. शिन्जी रडू लागला-"मला भूक लागली. मी आता उपाशीपोटी मरणार". "बाबा घरी परत येईपर्यंत धीर धर बाळा" आई म्हणाली. त्या काळात तांदूळ विकत घेता येणे हे खूप अवघड होते. हि-यांईतकाच महाग आणि दुर्मिळ असायचा तांदूळ तेव्हा!लोकांना भाता ऐवजी धान्याचा कोंडा किंवा भोपळ्याच्या वेली किंवा जे काही खाण्यासारख असेल ते खावं लागायचं. तांदूळ विकणा-यांना नाकाओका कुटुंबासारख्या "गद्दारां"बरोबर व्यवहार करायला मनाई होती. म्हणून आता घरात कुठलंही अन्न शिल्लक नव्हतं मग गेनच्या सुपीक डोक्यात एक नवी कल्पना आली." आई आपण नाकतोडे पकडून रात्रीच्या जेवणात ते खाऊ." गेन आणि शिन्जी शस्त्रात्रांच्या टप्प्याकडे धावले, आणि आई आणि ऐको पिशवी घेऊन त्यांच्या मागे धावल्या. काही नाकतोडे पकडुन ते भाजण्यासाठी घरी घेऊन जाताना वाटेतच त्यांना बाबा भेटले. अटकेनंतर २ आठवड्यांनी त्यांची अखेर सुटका केली गेली होती. आनंदानी गेन आणि शिन्जी त्यांना बिलगले.बाबांनी त्यांना घट्ट मिठी मारली आणि ते म्हणाले" सगळं ठीक होईल आता. मी आता तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही"..... जखमांनी आणि व्रणांनी त्यांचे सगळं शरीर भरलं होतं आणि होते त्यापेक्षा खूप बारिक होऊन ते परत आले होते. भाजलेल्या नाकतोड्यांच्या जेवणानी त्यांनी बाबांचे सुखरुप पुनरागमन साजरं केलं. क्रमश:
|
Asmaani
| |
| Monday, November 06, 2006 - 1:48 pm: |
| 
|
रैना, where r u? पुढचं टाक ना लवकर!
|
Bee
| |
| Monday, November 06, 2006 - 9:11 pm: |
| 
|
रैना, छान जमला आहे अनुवाद.
|
Raina
| |
| Tuesday, November 07, 2006 - 12:06 am: |
| 
|
राजाधिराज हा जपानचा ईश्वर आहे आणि सर्व मुलं त्या राजाची मुलं आहेत असे त्या काळी शाळेत शिकवले जायचे. गेनचे शिक्षक म्हणाले" मुलांनो, चांगले मोठे व्हा, राजाधिराजांच्या आज्ञेनुसार कुठेही जाणारी आणि प्रसंगी त्याच्यासाठी स्वप्राणाची आहूती द्यायला तयार असणारी जपानची शक्तिशाली मुलं व्हा"! एक दिवस गेनच्या वर्गातील मुलांना, दुरदुरच्या समरभुमीत लढत असलेल्या सैनिकांना उद्देशून पत्र लिहायला सांगीतलं गेलं. सैनिकांना पाठवण्याआधी मुलांना आपले पत्र सगळ्या वर्गासमोर जोरात वाचून दाखवायला सांगितले. एका मुलानी लिहीलं " Dear Soldiers , आशा आहे की तुम्ही बरे आहात. मोठा झाल्यावर मी सुद्धा तुमच्यासारखा सैनिक होईन आणि खूप अमेरिकन सैनिकांना मारेन. Please keep up the good work. दुस-या एका मुलीनी लिहीलं " आम्हीही जपान युद्ध जिंकेपर्यंत कसलेही हाल सहन करु. राजासाठी आणि देशासाठी आम्ही कधीही प्राण द्यायला तयार आहोत." मास्तरांनी या मुलांच कौतूक केलं आणि त्यांची पाठ थोपटली. आता गेनला त्याचे पत्र वाचून दाखवण्यास सांगितले गेले. गेन वाचू लागला" Dear Soldiers . माझे बाबा म्हणतात की जपानने ह्या युद्धात भाग घेऊ नये. युद्धात अगणित जीव जातात आणि युद्ध विनाश करते. मलाही तसेच वाटते. Please don't die, soldiers . तुमच्या आईवडिलांना दु:ख होईल." "मुर्खा हे लिहून तु स्वत:ला खरा जपानी मुलगा म्हणवतोस? पुन्हा लिही ते नीट" मास्तर ओरडले. गेननी पुन्हा पत्र लिहायला नकार दिला, तेव्हा मास्तरांनी त्याच्या कानफटात मारुन, त्याला दोन्ही हातात बादलीभर पाणी घेऊन बाहेर उभं रहायला सांगीतलं. तास संपल्यानंतर त्याला शिक्षकांच्या खोलीत नेण्यात आलं. आत शिरताच ऐको ला (बहिणीला) अर्ध्या कपड्यात पाहून गेनला धक्काच बसला. गेनला पाहताच ती मुसमुसत सांगू लागली " वर्गातले काही पैसे चोरिला गेले आहेत आणि माझे मास्तर म्हणतात की ते मी घेतले आहेत. मी खरच पैसे घेतले नाहीत, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही." मास्तरांनी तिचे कपडे काढून, तिची झडती घेतली, पण त्यांना पैसे कुठेच सापडले नाही. त्यांना वाटलं तिने पैसे दुसरीकडे कुठेतरी लपवले, आणि त्यांनी तिला कबूल करेपर्यंत तसच उभं राहण्याची शिक्षा केली. "माझी बहीण खोटं बोलत नाही तिच्यावर अरेरावी करु नका" गेन म्हणाला. आपली बहिण निष्पाप असल्याचे गेन वारंवार मास्तरांना पटवायचा प्रयत्न करत होता, पण मास्तर विश्वास ठेवायला तयार नव्हते. जपानच्या दुर्दैवाने, युद्धाच्या काळात शिक्षकांना युध्दकार्याला मदत करणे अनिवार्य होते- त्यांना आवडो किंवा न आवडो.शाळेच्या अधिका-यांची आणि इतर महत्वाच्या व्यक्तिंची त्यांच्यावर सतत देखरेख असायची. विरोध करणा-या विद्यार्थ्यांना शाळेत ठेवायची मनाई होती. खरं बोलतं असले तरी गद्दार आणि त्याच्या मुलांवर विश्वास ठेवला जात नसे. "खी खी खी"''रयुकीची (अध्यक्षांचा मुलगा) खिडकीतून बाहेर पाहून दात विचकू लागला. "त्या नाकाओका मुलीला चांगली अद्दल घडली. मीच तिची कागाळी केली होती." दुस-या दिवशी सकाळी शाळेची वेळ होऊनसुद्धा ऐको ऊठली नाही. आई तिच्या गादीपाशी जाऊन म्हणाली- "ऐको, काय झालय तुला?" ऐको काही उत्तर देईना, नुसतं हमसून हमसून रडत होती. मग गेन म्हणाला" तिला शाळेत जायचे नाही कारण मास्तरांनी तिच्यावर चोरीचा आळ घेतला आणि तिचे कपडे काढून झडती घेतली." हे ऐकून बाबांनी कंबर कसली. ते शाळेत गेले आणि शिक्षकांच्या खोलीत शिरले. गेन सांगतोय ते खरं आहे का याची त्यांनी मास्तरांकडे शहानिशा केली आणि त्यांना ऐकोला पैसे चोरताना पाहणा-या मुलाला आणायला सांगीतलं. रयुकिचीला बोलवण्यात आलं आणि लवकरच त्यानी आपण खरतर तिला पाहिलं नसल्याचं कबूल केलं. "मी खोटं बोललो, कारण मला तिला त्रास द्यायचा होता" तो म्हणाला. हे ऐकून बाबांनी रयुकिची आणि मास्तरांना चांगलच फैलावर घेतलं. क्रमश:
|
Raina
| |
| Thursday, November 09, 2006 - 8:44 am: |
| 
|
बाब घरी आले तोच त्यांनी कोज़ी समोर(गेनचा सर्वात मोठाभावासमोर) आईला रडताना पाहिलं. तो खरंतर दूर दारुगोळ्याच्या कारखान्यात असायचा, पण आता तो आपण नौदलात जातोय हे आईवडिलांना सांगायला आला होता. आईनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो काहीच ऐकत नव्हता. बाबांनी कोजीला त्याच्या नौदलातून हात-पाय गमावून आलेल्या चुलतभावाचा विचार करायला सांगीतलं. "कोज़ी, माझ ऐक!" बाबा म्हणाले " युद्धात सहभागी व्हायला शौर्य लागतं हे फक्त मुर्खाला वाटत, पण खरं शौर्य लागतं ते स्वत:च्या आणि दुस-याच्या आयुष्याची पर्वा करायला. ह्या निरर्थक युद्धात मी तुझा बळी जाऊ देणार नाही". "नाही. मी नौदलात भरती होणारच. मला आता "पळपुटा", "गद्दार" हे ऐकून घेणं सहन होत नाहीये." मग त्यानी आईवडिलांना सांगीतलं की त्याने नौदलात जायचं का ठरवलं. त्याच्या कारखान्यात एक स्फोट झाला होता आणि त्याच्यावर संशयित असल्याचा आरोप करण्यात आला. एका पोलिसाने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून कबूलीजवाब मिळवायला त्याला बेदम मारहाण केली. "तुझा बाप देशद्रोही आहे आणि तुझ्यात तेच गद्दाराचं रक्त आहे. तूच हा दारुगोळ्याचा कारखाना बंद पाडायचा प्रयत्न केलास."- पोलीस कोजीला म्हणाला. नंतर त्यांना कळलं की short circuit मुळे तो स्फोट झाला होता.पण आपल्या निर्दोष असण्याचा हा पुरावाही, कोजीचा नौदलात जाण्याचा निर्णय बदलू शकला नाही. त्यानी लोकांना आपण देशद्रोही नसल्याचे शाबीत करुन दाखवायचे ठरवलं होतं. युद्धाच्या खाईतून मेडलांनी विभुषित होऊन परत येण्याचा त्याचा मानस होता. मग त्याच्या भावांना गावात ताठ मानेनं चालता आलं असतं. कोजीचा नौदलात जायचा दिवस आला. आई, ऐको आणि दोन्ही भाऊ त्याला निरोप द्यायला स्टेशनवर गेले, पण शेजारपाजारुन कोणीही गेले नाही. बाबा घरी थांबले होते तरी आपलं काळीज फाटतयसं दु:ख त्यांना झालं होतं. "हुर्रे! Three cheers for Koji "" त्याचे भाऊ ओरडले. आई आणि ऐको हुंदके देत होत्या. हळुहळु त्यांचे आवाज मागे ठेऊन गाडी पुढे निघून गेली. आगगाडी स्टेशनपासून जरा दूर गेली, तसे कोजीने बाहेर पाहिले. Track च्या बाजूला बाबांना उभे पाहून कोजीला आश्चर्य वाटलं. आगगाडी पुढे जाऊ लागली तसं बाबांनी हात वर करुन आरोळी ठोकली. " Three Cheers. Hurrah for Koji Nakaoka . जिवंत परत ये बाळा". "धन्यवाद बाबा"- कोजी म्हणाला. गाडी दिसेनाशी होईपर्यंत बाबा पहात राहिले. त्यांचे डोळे पाण्यानी भरले होते. क्रमश्:
|
Srk
| |
| Wednesday, November 15, 2006 - 7:23 am: |
| 
|
रैना छान चाललय. लवकर येउ देत पुढचा भाग.
|
|
|