|
दृश्य १) पात्रे : दोन नागरिक: उंबरकर आणि झुंबरकर उं: जाम ट्राफिक आहे ना हो रस्त्यात ? झुं: ट्राफिक जाम आहे अस म्हणा ना सरळ ! उं: हॅ हॅ फारच विनोदी बुवा तुम्ही. पण काय हो चहाचं आमंत्रण दिलतं पण कुठे राहता ते सांगितलच नाहीत ! झुं: सांगतो ना ! तुम्हाला प्रभात रोड क्रॉस खड्डा नं २ माहीत्ये का ? उं: चांगलाच ! गेल्याच आठवड्यात आमची बायको पडली ना ! झुं: आमची ? उं: हॅ हॅ फारच विनोदी बुवा तुम्ही. आमची म्हणजे म्हणायची पद्धत आहे आपली. झुं: आपली ? उं: फारच वि. बु. तु. ! झुं: पण कशी काय पडली त्या खड्ड्यात ? उं: अहो मोटारचं दार उघडल आणि उतरायला गेली ती पाच सहा फूट आतच ! झुं: सांगताय काय ! उं: मग सांगतोय काय. तेव्हापासून बायको बरोबर असली की शिडीही घेतो बरोबर. फोल्डींग आहे म्हणून बरं झुं: बायको का शिडी ? उं: हॅ हॅ फा. वि. बु. तु. ! अहो शिडी. म्हणजे शिडी घडीची आहे, आमची बायको नाही. बायको साडीची घडी मोडते, स्वत: फोल्ड होऊन साडीत शिरत नाही ! बर मग त्या खड्डयांनतर ? झुं: त्यानंतर की एक भुयार लागेल. उं: भुयार ? झुं: हो ! खालून खड्डे जोडले गेलेत ना त्याचं बनलय रुंद असं .. वरुन कधीतरी कोणीतरी खडी, विटांचे तुकडे वगैरे टाकून जुजबी बुजवतात खड्डॆ.. पण खालून छान भुयार झालय. आत घुसलात की थेट नळ स्टॊप ! उं: सांगताय काय ? झुं: पत्ता ! हॅ हॅ उं: हॅ हॅ फा. वि. बु. तु. ! मग पुढे ? झुं: पुढे एक अमिबाच्या आकाराचा खड्डा येईल. किंवा भूक लागली असेल तर आम्लेटच्या आकारासारखाही वाटेल. तर त्याच्या डाव्या अंगाने चालायला लागा उं: लागलो ! मग ? झुं: मग एक महाकाय आकाराचा खड्डा येईल. तिथे उल्कापात वगैरे झाल्यासारखा. उं: बापरे. तो पार करायचा ? झुं: हो अगदी सोपं आहे हो. त्या महाकाय खड्ड्यात एक पीमटी बरेच दिवस बंद पडून आहे. तिच्या टपावरून सरळ चालत या. उं: आलो ! झुं: त्याच्यापुढे एक लहानसा, चिमुकला, रिक्षा पडू शकेल इतपतच खड्डा आहे समोरची बिल्डींग माझी. तो खड्डा मात्र तुम्हाला उतरून चढावा लागेल. उं: हरकत नाही हो. तुमच्या चहासाठी वाटेल तितके खड्डे चढू ! झुं: ते ठीक आहे. पण ह्या उतारवयात तुम्हाला तरी किती चढवायच आम्ही ! हॅ हॅ उं: हॅ हॅ फा. वि. बु. तु. !!! दृश्य २) पात्रे : खासदार श्री. क.ल. माडीकर आणि पत्रकार बंधू भगिनी. पत्रकार: मा. खासदार साहेब.. माडीकर: बोला लवकर. मला एलिफंट गॉड फेस्टीवलची तयारी करायची आहे. पत्रकार: गेल्यावर्षी पेक्षा यंदा खड्डे कमी आहेत अस विधान तुम्ही केल आहे. ह्याला काही तर्कसुसंगत आधार आहे का ? माडीकर: तर्कसुसंगत. नाईस सांउंडींग वर्ड ! सेक्रेटरी नोट करा आणि अर्थ शोधून काढा. हे बघा, त्या विधानाबाबत तुम्ही राईचा मांऊंटन करत आहेत. पत्रकार: आपण सध्या वर पर्वताकडे बघण्याऐवजी खाली खड्ड्यांकडे बघूया ! तुमच्या ह्या विधानामागे काही अभ्यास किंवा काही संख्यात्मक पुरावा आहे का ? माडीकर: अर्थात ! माझ्याच गल्लीत बघा. मागच्या वर्षी दोनशे अडतीस खड्डे होते. ह्यावर्षी फक्त दोनशे पस्तीस आहेत. सर्वात कमी खोल असलेल्या खड्डयात उभं राहून पाहिलत तर बाकीचे सहज मोजता येतात. माझे दोन तासात मोजून झाले. हां, आता तुम्ही त्या खड्डयांमधून मुद्दाम रस्ताच शोधूनच काढलात आणि त्यावर उभं राहून, त्या उंचीवरून मोजलत तर जास्तच खड्डे दिसणार ! पत्रकार: बर एक वेळ तुमचं विधान खरं धरून चालू. पण हे म्हणजे ‘मागच्या वर्षी अत्याचार केला होता, ह्या वर्षी फकत विनयभंग केलाय’ अस म्हटल्यासारख वाटत नाही का ? जनाची तर नाहीच आहे निदान मनाची तरी लाज ? माडीकर: लाज ! शॊर्ट ऍंड स्वीट वर्ड ! सेक्रेटरी शब्द नोट करा आणि अर्थ शोधून काढा. पत्रकार: मी सांगतो ना साधारण अर्थ ! आपण केलेल्या चुकीबद्दल, निष्काळजीपणाबद्दल, दिरंगाईबद्दल, वाईट कृत्याबद्दल मनात अपराधीपणाची, शरमेची भावना निर्माण होणे म्हणजे लाज ! माडीकर: इंटरेस्टींग ! अशाच नवनवीन कल्पना आम्हाला जनतेकडून हव्या आहेत. पत्रकार: अहो खड्ड्यांच काय… माडीकर: बास झाल हो ! इथे गावागावात लोकाना प्यायला पाणी नाही, मैलोनमैल चालत जाऊन पाणी आणतात आणि तुम्ही खड्डा खड्डा काय करताय. पत्रकार: ठीक आहे. आपण पाण्याच्या प्रश्नावर बोलू. स्वातंत्र्य मिळून.. माडीकर: तो आजच्या परिषदेचा विषय नाही. पत्रकार: मग आपल्याला खड्ड्यांवरच बोललं पाहिजे ! माडीकर: तुम्हीच जर असे खड्ड्यात अडकून राहिलात तर पुण्यात बाहेरचे उद्योग कसे येणार ? पत्रकार: आणि आम्ही बोललो नाही, तर तुमचे धंदे तरी बाहेर कसे येणार ? खड्ड्यांना खड्डे म्हणायच नाही का.. माडीकर: अर्थातच म्हणायच ! पण दिसले तरच म्हणाल ना ! पत्रकार: म्हणजे ? माडीकर: त्यासाठीचा उपाय म्हणूनच आता खास गॊगल कम्पल्सरी करणार आहोत लवकरच ! आधी कम्पल्सरी गॊगल घालायचा आणि त्यावर कम्पल्सरी हेल्मेट ! पत्रकार: कसले गॊगल्स ? माडीकर: हे खास गॊगल घातल्यावर खड्डे दिसण तर दूरच, पण वेगवेगळी छान दृश्य दिसतील ! म्हणजे काचेसारखे गुळगुळीत स्वच्छ रस्ते.. मधे दुभाजकावर रंगीबेरंगी फुलझाडं. बाजूला शीतल छाया देणारी सुंदर झाडं.. परदेशी पाहुण्यानाही आम्ही एअरपोर्टपासून गॊगल घालूनच आणणार ! आता बोला ! पत्रकार: काय बोलणार. आता एकच काम करा. तुमच्या गल्लीतल्या त्या दोनशे पस्तिसाव्या खड्ड्यात लोटा आम्हाला आणि वरून माती लोटा ! म्हणजे एक खड्डा आणि तुमची एक तरी जबाबदारी कमी होईल. माडीकर: जबाबदारी ? जबाबदारी ! नाईस रिदम. सेक्रेटरी शब्द नोट करा आणि अर्थ शोधून काढा !!! दृश्य ३) महापालिका आयुक्तांची पत्रकार परिषद. पत्रकार: आज तुम्हाला काही परखड प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील ! आयुक्त: विचारा तुम्ही, सांगतो आम्ही. पत्रकार: पुण्यातल्या रस्त्यांविषयी.. आयुक्त: लेट मी बी वेरी क्लिअर. रोड्स आर अवर टॉप प्रायोरिटी. पुण्याच वाढतं महत्व मी तुम्हाला सांगायला नकोच. प्रगतीच्या एका ऐतिहासिक टप्प्यापाशी आपण येऊन थांबलो आहोत. त्यामुळे रस्ते अतिशय महत्वाचे आहेत ! पत्रकार: अगदी खर बोललात पण शहरात किंचीतसे वेगळे चित्र आहे. बरेच रस्ते नांगरणी केल्यासारखे दिसत आहेत. रस्त्यांवर इतके खड्डे का ? आयुक्त: कारण खड्डे ही आमची प्रायोरिटी नाही ! आय थिंक आय वॉज वेरी क्लिअर ! रोड्स आर अवर टॉप प्रायोरिटी ! पत्रकार: म्हणजे खड्ड्यांविषयी तुम्ही काहीच करत नाही आहात ? आयुक्त: अर्थातच करतोय ! रोड्स आर अवर टॉप प्रायोरिटी पण आम्ही खड्ड्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या धडक कृती योजना करत आहोत पत्रकार: उदाहरणार्थ ? आयुक्त: ‘खडडा है सदा के लिए’ योजना. म्हणजे काही काही खड्डे आता एव्हढे जुने आहेत की ते ‘ऐतिहासिक वास्तू’ ह्या गटात पडतात. पुण्यात ऐतिहासिक वास्तू जपण्याकडे आधीच दुर्लक्ष होत आहे. बट नॉट एनी मोअर ! परवाच एक चाळीस वर्ष जुना खड्डा बुजवायला निघाले होते मूर्ख स्थानिक नागरिक. दर वर्षी थोडीथोडी भर घालून त्या खड्याच्या मूळ रुप विद्रूप करुन टाकल होत त्या लोकानी ! पण मी स्वत: लक्ष घालून त्यांच्या प्रयत्नांना स्वत: मूठमाती दिली आणि खड्डा वाचवला. पत्रकार: छान ! आयुक्त: कसच कसच. आय ट्राय माय बेस्ट ! पत्रकार: पण हे म्हणजे ‘खड्डे जगवा, खड्डे वाढवा’ सारखं वाटतय हो ? ‘दाग अच्छे है’ सारखं खड्डे चांगले आहेत असं तुम्हाला म्हणायच आहे का ? आयुक्त: अर्थात. आता जुनी झाड कापणं कस चूक आहे हे आम्ही प्रत्यक्ष रोड वायडनिंग मधे अशी झाडे कापून लोकाना प्रात्यक्षिकानेच दाखवतो.. म्हणजे त्याना काय करायचे नाही ते नीट कळते. मधून मधून खड्डे भरण्यामागेही हाच लोकशिक्षणाचा हेतू असतो. अहो, आपल्यापेक्षाही जास्त पावसाळे बघितलेले खड्डे असतील त्याना अमानुषपणे बुजवायचे ? काय माणस आहात का कोण ? पत्रकार: तुमचा मुळातच रस्ता गुळगुळीत, स्वच्छ नि सुंदर हवा ह्याला तत्वत: विरोध आहे का ? आयुक्त: ऑफकोर्स. सुंदर रस्त्यांकडे पहात पहात लोक कार्यालयांमधे उशीरा पोचतील. आयटी सिटीला हे परवडणार नाही ! सरळसोट गुळगुळीत रस्ता असला की प्रवास किती कंटाळवाणा होईल ? अशा रस्त्यात आपल्याच विचारांची तंद्री लागून अपघात होऊ शकतात. खड्ड्यांचे दणके बसले की माणसं आपोआप वास्तवात येतात. सत्य परिस्थितीची जाणीव लोकाना करुन देणं हे आमच कर्तव्य आहे. पत्रकार: अच्छा ! आयुक्त: शिवाय, पावसाळ्यात एकाच प्रवासात मोटार, होडी आणि बैलगाडी अशा तिन्ही वाहनातून सफर केल्याचा आनंद मिळतो ते वेगळच ! प्रत्येकाला आपल्या शरीरातले हाड न हाड पाठ होते. अर्ध्या तासात जवळजवळ सगळी हाडं मोजून होतात, फक्त पालिकेविषयी बोलताना काही लोकांच्या जिभेला हाड रहात नाही. दॅट्स ओके. चांगल्या कामात शिव्या खाव्याच लागतात कधीकधी ! पत्रकार: अजून् काय योजना आहेत ? आयुक्त: काही वेळा ट्राफिक जॅम फारच लांबतो.. लोक निघाले की पोचेपर्यंत बरेच दिवस आपले गाडीतच ! मग रिटारयमेंट जवळ आलेल्या लोकाना कार्यालयात पोचण्याआधीच रिटायर होऊ की काय अशी भिती वाटते. म्हणून आम्ही नवीन VRS अर्थात Vehicle Retirement Scheme काढली आहे. म्हणजे अशी शंका आल्यास गाडीतूनच फोन करुन रिटायरमेंट घेता येईल आणि तसेच परत घरी जाता येईल. पत्रकार: वा वा. अजून काही ? आयुक्त: ट्राफिकमधे अडकल्यावर वाटेत जर दाढी मिशी फारच वाढली तर बायको कदाचित पटकन ओळखणार नाही किंवा घरच्याना तुम्ही तोतया आहात म्हणून संशय येण्याचाही संभव आहे त्यासाठी फ्री DNA टेस्ट उपलब्ध असेल. सध्या तरी एव्हढच. बट रिमेम्बर. हे सगळ सेकंडरी आहे. रोड्स आर अवर टॉपमोस्ट प्रायोरिटी ! (टाळ्या) दृश्य ४) आमच्या गल्लीतले आद्य सुधारक शेणोलीकर काका ह्यानी एका ट्राफिक हवालदाराची घेतलेली मुलाखत. शेणोलीकर काका हे सव्वीस वर्ष पोस्टात सर्विसला होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व दोन नातवंडे आहेत. (मागे - म्हणजे शेणोलीकर काका अजून 'आहेत'. त्यांच्या घरी फोटोत ते खुर्चीवर बसले आहेत आणि बाकी सगळे मागे उभे आहेत त्या संदर्भात 'मागे' अस म्हटलं. अतिशय पापभिरु आणि तरीही समाजसेवेची आवड असणारे शेणोलीकर काका म्हणजे अकल्पित सोसायटी बिल्डींग. क्र. ३ चे आदर्श आहेत. शेणोलीकर : नमस्कार ! हवालदार : (थेट त्यांच्या डोळ्यात पहात ) हवा काढू का भो़xxx. हवालदाराच्या ह्या अनपेक्षीत नमस्काराच्या पद्धतीने शेणोलीकर हवालदिल. मग काही वेळाने त्याना तो हवालदार डोळ्याने किंचीत तिरळा असल्याचे त्याना जाणवते आणि उजव्या बाजूला सिग्नल तोडणारा एक सायकलवाला दिसतो. हवालदार : xx ची तेच्या. णमस्कार ! (शेणोलीकर फक्त 'णमस्कार' अंगाला लावून घेतात. पहिलं वाक्य न झालेल्या पोर्शन सारखं कम्पल्सरी ऑप्शनला टाकतात. आणि पुन्हा एकदा नमस्कार घालतात) शेणोलीकर : नमस्कार हवालदार : काय पायजेल. क्रॉस करन्यासाठी वातूक थांबनार नाई. ज्याने त्याने आपापल्या जिम्मेदारीवर पलीकडे जायचय. शेणोलीकर : नाही तस नाही ! हवालदार : आयला सकाळधरन दोन आंधळे आनि तीन म्हाता़ऱया ! आता डोक्यावर टोपलीत बसवूनच पोचवायच राहिलय लोकाना हिथून थिते! मी पोलीस हाय का वसुदेव ? शेणोलीकर : अहो नाही तस नाही. पुण्याच्या वाहतूक समस्येने भयंकर रुप धारण केल आहे त्याबद्दल बोलायच होत.. आधीच पावसाळा त्यात खड्डे, ट्राफिक जॅम ह्याने त्रस्त जनता आता वाहतूक आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणं धरायच्या बेतात आहे. ह्याला जबाबदार.. ? हवालदार : धरनांच काय आमच्या खात्या अंडर येतय का ? आपल्या हातानी उघाडली का दारं धरनाची मी ? आयला.. इथ ल्हान पोरग मुतलं तरी भिडे पूल बुडतोय. काय कांगावा लावलाय राव उगाच ! शेणोलीकर : नाही तस नाही. (अचानक इथे शेणॊलीकराना कुठल्यातरी लेखात वाचलेल आठवत. एखादे नकारात्मक विधान स्वत: करण्यापेक्षा प्रश्न विचारून ज्याची मुलाखत घेतोय त्याच्याच तोंडून ते वदवून घ्यावे वगैरे !) शेणोलीकर : बर तुम्हीच मला सांगा. सध्या रहदारीची काय परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतं ? हवालदार : कसली स्थिती ? आपला काय समंध ? काय बोलताय राव. मी ट्राफिक पोलीस हाये ! शेणोलीकर : तेच तेच. स्थिती म्हणजे दशा. म्हणजे सध्याची कंडिशन.. हवालदार : मग ट्राफिकची कंडीशन म्हना की सरळ. शेणोलीकर : तेच तेच. हवालदार : काये कंडिशन म्हनल की आपल्या देशात सर्वेसामान्येपने ती बेकारच आसती ! ‘सध्या पॊलिटीक्सची कंडिशन फार छान आहे’ अस कदी आयक्लय का ? शेणोलीकर : लेनचे महत्व काय आहे असं वाटतं तुम्हाला ? हवालदार : आता तशी लेन देन सगळीकडेच चालू आहे आजकाल साहेब. आमच्यावरच का खार खाता ? शेणोलीकर : नाही नाही तस नाही. लेन म्हणजे ट्राफिक लेन म्हणायच होत मला हवालदार : काय ? कुठ ? काय ट्राफिक लेन ? काय राव नवनवीन शब्द काढताय. पुण्यात आधीच ट्राफिक काय बेकार झालय. शेणोलीकर : अहो (इथे शेणोलीकर कळवळले) ते ट्राफिक सुधारण्यासाठीच तर लेनचा वापर … हवालदार : गेली अटरा वर्ष सर्विस झाली साहेब पुण्यात. ह्ये असलं लेन वगैरे कुनी बोलल्याच आठवत नाही.. उगाच काम वाढवू नका आमचं. चला आता निघायच बघा. माझी वसुलीची येळ झालीये ! ए.. ए xxx ! घे, साईडला घे गाडी जरा !! समाप्त
|
Paragkan
| |
| Sunday, August 13, 2006 - 4:34 pm: |
| 
|
तू महान आहेस रे बुवा. हे इथेच नाही तर पुण्यातल्या वर्तमानपत्रात वगैरे छापुन यायला हवं.
|
Maverik
| |
| Sunday, August 13, 2006 - 8:50 pm: |
| 
|
Masta rey Rahul. Good reading.
|
राहूल्या, जबरीच.... खी खी खी...
|
Raina
| |
| Sunday, August 13, 2006 - 11:30 pm: |
| 
|
खालून छान भुयार झालय. आत घुसलात की थेट नळ स्टॊप !>> राहूल,लिखाण मस्तच फारच वाईट परिस्थिती दिसतेय या वर्षी रस्त्यांची.
|
पेन्ढ्या, सहमत! हे वृत्तपत्रात छापून यायला हव, कोणतरी याची लिन्क सगळीकडे पाठवुन देइल का? राहुल, जबरी रे भो! मस्तच! पण वाचताना जरी हसलो, तरी मनातल्या मनात स्वतःचीच कीव येत होती!
|
Meenu
| |
| Monday, August 14, 2006 - 12:56 am: |
| 
|
हम्म काय करायचं या सगळ्याचं खरच मोठा गंभीर प्रश्न आहे .. आश्चर्य याचं वाटतं की महानगरपालीकेत ज्या लोकांची या कामाची जबाबदारी आहे त्यांना लाज कशी वाटत नाही ...?
|
Psg
| |
| Monday, August 14, 2006 - 1:15 am: |
| 
|
राहुल, उत्तम सटायर! traffic , रस्त्याची स्थिती या सारख्या मोठ्या समस्येकडे इतका काणाडोळा कधीच झाला नसेल कुठे! तू वर्तमानपत्राच्या blog वर पाठव ना हा लेख! try करून बघ काय response येतो ते!
|
Sadda
| |
| Monday, August 14, 2006 - 1:40 am: |
| 
|
राहुल खुपच मस्त लिहिलय तुम्ही 
|
>> आयला सकाळधरन दोन आंधळे आनि तीन म्हाता़ऱया ! आता डोक्यावर टोपलीत बसवूनच पोचवायच राहिलय लोकाना हिथून थिते! मी पोलीस हाय का वसुदेव ? राहुल साष्टांग दंडवत रे बाबा. 
|
वा वा वा राहूल... फारच मस्त...
|
राहुल एकदम जबरी लिहिला आहे........ he he he
|
Nvgole
| |
| Monday, August 14, 2006 - 5:13 am: |
| 
|
राहूल, खूपच आवडली तुमची चार दृष्ये. तुम्ही जग पाहता. आम्ही ते वाचतो आणि त्याचा आस्वाद घेतो, तुमच्या लेखणीतून!
|
Milindaa
| |
| Monday, August 14, 2006 - 5:28 am: |
| 
|
झकास रे
|
अफ़ाट आहेस रे बाबा तु!
|
Anilbhai
| |
| Monday, August 14, 2006 - 10:22 am: |
| 
|
सही रे
|
खि खि खि
|
Upas
| |
| Monday, August 14, 2006 - 10:41 am: |
| 
|
सहीच राहूल.. फिरकी किंवा दोन फुल एक हाफ सारखं वाटलं.. निरीक्षण उच्च आहेच पण चपखल लिहिलयस.. आवडलं..
|
Mrinmayee
| |
| Monday, August 14, 2006 - 10:53 am: |
| 
|
राहुल, अगदी टायटल पासून ते अखेरच्या ओळीपर्यंत... एकदम झकास. आता तिकिटाचे पैसे घेतले खड्ड्यात पडणार्यांकडून तर नवल वाटायला नको.. झू, अक्वेरियम सगळंच तयार झालं असणार तिथे!
|
Chandya
| |
| Monday, August 14, 2006 - 11:27 am: |
| 
|
राहुल, उच्च लिहिलेयस. खरं तर, पुण्यातील खड्डे विषयावर आतापर्यंत इतके विनोदी लेख, विडंबने, कविता इ. वाचलेय कि त्या विषयावर आणखी काही लिहिण्याजोगे (आणि वाचणेबल) असेल असे वाटले नव्हते. तू ह्या समस्येशी निगडीत व्यक्ती आणि प्रसंग वापरुन सहीच लिहिले आहेस. हे लिखाण एखाद्या tv serial साठी आहे का? नसल्यास नक्किच विचार कर.
|
|
|