Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
MADE IN CHINA

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » कथा कादंबरी » MADE IN CHINA « Previous Next »

Neel_ved
Saturday, August 05, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईत राहिलात आणि ट्रेननी प्रवास केला नाहीत असं होणे शक्य नाही. या प्रवासात आपल्याला हजारो माणसं भेटतात. जागा अडवणारी, दरवाज्यात उभे राहुन इतरांना त्रास देणारी, पत्ते कुटणारी, टाळ वाजवणारी, चौथ्या सीटसाठी भांडणारी... आणि अनेक. त्यातली सर्वच तुमच्या लक्षात राहतील असे नाही. पण काही जणांना मात्र तुम्ही विसरु शकत नाही. मला भेटलेला रघूही त्यापैकी एक.
रघू.... एक फिरता विक्रेता होता. तो मला पहिल्यांदा दिसला तोही ट्रेनमध्ये... मी रोज ठाण्याहुन सकाळी ८.५० ची ठाणा लोकल पकडतो. अशाच एका दिवशी मला तो पहिल्यांदा त्या ट्रेनमध्ये दिसला. त्यावेळी तो ट्रेनमध्ये पास कव्हर, टुथब्रश, पेन अशा वस्तु विकायचा. वय १२ ते १४ च्या आसपास. कपडे चुरगळलेले पण स्वच्छ. आवाज खणखणित. आणि त्याच खणखणित आवाजात तो माल विकायचा. 'मेड इन चायना' १० रुपया, १० रुपया, असे ओरडत त्याचे या डब्यातुन त्या डब्यात फिरणे चालु असायचे. आणि का कुणास ठाउक माझ्या तो चांगलाच लक्षात राहिला. दर आठवड्याला त्याच्याकडे वेगवेगळ्या वस्तु असायच्या, कधी पास कव्हर,पेन तर कधी नॅप्थेलीनच्या गोळ्या, नकाशे, रिमोट कव्हर. पहिले पहिले काही दिवस मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. त्याची वस्तु विकण्याची हातोटी आणि संभाषण चातुर्य जबरदस्त होते. रोज माझ्या डब्यातच त्याच्या ८ ते १० वस्तु विकल्या जात होत्या. इतक्या कमी वयात हा मुलगा हुशार मुलगा इथे काम का करतोय? त्याची घरची परिस्थिती कशी असेल? ही उत्सुकता मला अस्वस्थ करत होती.
शेवटी एक दिवस त्याच्याशी ओळख करुन घ्यायचीच या हेतुने मी त्याच्याकडुन काहितरी विकत घ्यायचे असे ठरवले. त्यादिवशी तो FM Radio विकायला घेउन आला होता.
मी त्याला बोलावले तसा हसत माझ्यासमोर येऊन उभा राहिला. म्हणाला, 'सलाम साब क्या चाहिये आपको?'
मी त्याला radio बद्दल सांगितले. तसा मला म्हणाला, ' बिनदास्त ले डालो साब, सही पिस है, बाहर दुकान मे लेनेको जाएंगे तो ४० से कम मे नही मिलेगा, इधर सिर्फ २० रुपया.'
'कुछ गॅरेंटी है क्या?'
गॅरेंटी क्या साब, २० रुपये का माल है वो भी मेड इन चायना... कोई गॅरेंटी नही. हा बस थोडा संभालके इस्तमाल करनेका, सेल टाइमपे डालनेका, और वो इअर फोन टुटने देनेका नही... बाकी माल चकाचक है....
मी हसलो आणि त्या २० रुपये दिले आणी तो radio विकत घेतला. मला सलाम करुन तो पुन्हा मेड इन चायना, मेड इन चायना ओरडत गर्दीत दिसेनासा झाला.
दोन तीन दिवसांनी त्यानेच मला हाक मारली.
म्हणाला, 'क्या साब, कैसा चल रहा है radio ?
मी फक्त हसुन प्रतिसाद दिला.
त्यानंतर तो रोज भेटत रहिला, मी ही त्याच्याकडुन वेगवेगळ्या वस्तु घेत राहिलो त्यानिमित्तानी त्याची विचारपुस करत राहिलो. त्त्यातुनच मला कळले की गेल्या वर्षीच त्याने शाळा सोडलीय. घरची परिस्थिति वाईट, बापाचा काडीचा उपयोग नाही. नेहमी दारु पिउन तर्र असतो. आई दादरला फुलगल्लीत गजरे करुन विकते आणि हा घरखर्चाला मदत म्हणुन इथे हा धंदा चालवतोय. म्हणजे धंदा कोणा दुसर्‍याचाच याला फक्त कमिशन मिळतं. रोजचे ८० ते १०० रुपये सुटतात. म्हणजे सर्व यथातथाच होतं.
आणि अचानक एक दिवस त्याचं गाडीत येणं बंद झालं. दोन तीन दिवस मी वाट पहिली, म्हटलं आजारी पडला असेल. पण एक आठवडा उलटुन गेला तरी त्याचा पत्ता नव्हता. मग एक दिवस दादरला ब्रिजवरुन जात असताना तोच त्याचा ओळखीचा आवाज ऐकु आला. पाहिले तर त्याने आता दादरच्या ब्रिजवर दुकान लावले होते. मी जवळ गेलो तर मला पाहुन म्हणाला, 'साब, अपुनका प्रमोशन हो गया है... ये खुदका दुकान लगाया है. उस धंदे में जादा कमाई नही थी. जो कुछ मिलता था वो बाप की दारु और घरखर्च में खतम हो जाता था. इसलिये पिछले चार महिनेसे सुबह पेपरलाईन डालने जाता था, शाम को एक गराजमें काम करता था. थोडा पैसा जमा हो गया तो मेरा पुराना सेठ जहांसे माल उठाता था वहीसे खुद माल उठा लिया. अभी अपुन खुद मालिक है. आया करो. कुछ चाहिये हो तो बोल के रखो अगर मेरे पास नही होगा तो मार्केटसे लाके आपको दे देगा. अभी पब्लिक बहोत जादा है. कभी फुरसत में मिलाना.' त्याचे 'मेड इन चायना' 'मेड इन चायना' पुन्हा सुरु झाले आणि मी तिथुन काढता पाय घेतला.
टॅक्सीमध्ये बसल्यावरही मी विचार करत होतो कि एवढासा जीव, ज्या वयात त्याने खेळायचे, अभ्यास करायचा, हट्ट करायचा, त्या वयात इतकी जबाबदारी त्याच्यावर पडली होती. मला त्याची मदत कराविशी वाटली म्हणुन दुसर्‍या दिवशी मी त्याला त्याबद्दल विचारले तर मला म्हणाला, 'नही साब, आप ने पुछा यही मेरे लिए बहोत है, आज मैने आपसे पैसा लिया और कल लौटा नही पाया तो मै खुदसे नजर नही मिला पाउंगा. मा कहती है, बेटा, दो निवाला कम खा लेकिन खुद कि कमाई का खा,'. मी निरुत्तर झालो. पण त्यानंतर त्याच्याकडुन वस्तु घेणं वाढवलं. ऑफिसमधल्या कोणाला, शेजार्‍यांना काही हवं असेल तर त्याच्याकडुन घेउन देऊ लागलो. हळु हळु त्याचा जम बसु लागला. अंगावर जरा बरे कपडे दिसु लागले. तसा तो नेहमीच आनंदी दिसायचा पण आता जास्त खुश दिसु लागला. एक दिवस मी त्याला शाळेविषयी विचारले तर म्हणाला, 'साब, इधर पढने लिखने के लिए टाईम किसके पास है? पढना तो मै भी चाहता हुं, पर टाईम नही है.' मग मी त्याला रात्र शाळेबद्दल सांगितलं. तो खुश झाला, म्हणाला, अगले साल जरुर जाएगा स्कुल में.'
मी त्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याची होणारे प्रगती पाहात होतो. त्याची धडपड, त्याची जिद्द सगळंच वाखाणण्यासारखं होतं. तो ही त्याचं मन माझ्याजवळ मोकळं करत असे. घरचे प्रोब्लेम्स, लोकल दादांना द्यावे लागणारे हप्ते, इतर दुकानदारांचं जळणं, पोलिस, BMC ची भुणभुण... सर्व सर्व काही. आता माझा मोबाईल नंबर मी त्याला दिला होता. काही काम असल्यास तो मला फोन करुन विचारायचा. मीही जमेल तेवढी मदत करत होतो. दर महिन्याला थोडे पैसे तो माझ्याकडे जमा करत होता. मलाही त्याला असं मोठं होताना पाहुन आनंद होत होता.
त्या दिवशी रोजच्याप्रमाणे मी सकाळी ठाणा स्टेशनवर पेपर विकत घेतला आणी गाडीत जाऊन बसलो. पेपर वाचायला घेतला आणि माझी नजर एका बातमीवर पडली. पहिल्याच पानावर खालच्या कोपर्‍यात बातमी होती, 'दादरच्या पुलावर झालेल्या भांडणात एकाचा अपघाती मृत्यू'. सहज म्हणुन मी ती बातमी वाचली तेव्हा कळले की दोन दुकान लावणार्‍या मुलांमध्ये काही कारणावरुन भांडण झाले. हमरीतुमरीवरुन प्रकरण हातापाईवर गेले आणि अपघाताने त्यातील एकजण पुलावरुन खाली पडुन मेला. मी इतर राजकारणाविषयीच्या बातम्यांसारखेच त्या बातमी कडे दुर्लक्ष केलं. दादरला उतरलो. पुलावर सहज नजर टाकली तर रघु दिसला नाही. मी घाईत होतो त्यामुळे तसाच ऑफिसला निघुन गेलो. दुसर्‍या दिवशीही तो तिथे दिसला नाही. मग शेवटी त्या शनिवारी संध्याकाळी आजुबाजुला चौकशी केली तर कळलं कि त्या दिवशी त्या अपघातात रघुच मारला गेला होता. माझ्या पायाखालची जमिनच सरकली. मला काय करावे तेच कळेना. मी तसाच सुन्न मनाने घरी परतलो. त्यादिवशी मला जेवण गेले नाही. सारखा डोळ्यासमोर रघु येत होता. त्याचा आवाज, त्याच्या गप्पा, त्याचा हसरा चेहरा, सारं सारं काही डोळ्यासमोर येत होतं. रात्री झोपुही शकलो नाही. रात्रभर विचार करत होतो. त्याचे काही पैसे माझ्याकडे होते. ते त्याच्या आईपर्यंत पोहोचवणे जरुरीचे होते. रविवारी सकाळी लवकरच घरातुन निघालो. दादर स्टेशनमध्ये जाउन रेल्वे पोलिसांकडुन त्याच्या घरचा पत्ता घेतला. पत्ता शोधत शोधत त्याच्या घरी पोहोचलो. घरात त्याची आई होती. रडुन रडुन बिचारिचे डोळे सुजले होते. मी माझं नाव सांगीतलं तशी मला म्हणाली, 'अंदर आईये, रघु आपके बारेमें हमेशा बात करता था.' मी तिला म्हणालो, 'रघुने मेरे पास कुछ पैसे जमा किये थे, वह लौटाने आया हु. वैसे जो हुआ बहोत बुरा हुआ.'
ती रडु लागली म्हणाली, 'साब, अभी ये पैसा लेकर मै करु क्या. जिसके ये पैसा काम आता वो तो नही रहा. अब इनका क्या फायदा. मेरा बेटा हर रोज मेड इन चायना, मेड इन चायना चिल्लाता था, तो मै उसे उसी नाम से चिढाती थी, आज भगवानने दिखा दिया कि इन्सान की ये बॉडी बी मेड इन चायना होती है. जैसे चलने वाला रेडिओ अचनक बंद पड जाता है, वैसेही ईस इन्सान की बॉडी का है, कोई गॅरेंटी नही साब, कोई गॅरेंटी नही.' एवढे बोलुन ती उठुन रडत निघुन गेली.
आणि मी मात्र एका पुतळ्यासारखा तिथेच स्तब्ध बसुन राहिलो.


Paragkan
Saturday, August 05, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

!!!!!!!!!!!

असे कित्येक रघु असतील?

Maitreyee
Sunday, August 06, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील, सुरेख लिहिलयस!

Gajanandesai
Sunday, August 06, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील! .... .... ....

Chinnu
Sunday, August 06, 2006 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील, मन सुन्न झालय अगदी!

Kmayuresh2002
Sunday, August 06, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील,मनाला चटका लावणारी व्यथा मांडली आहेस रे..:-(

Bee
Sunday, August 06, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे.. खूप वाईट वाटलं वाचूनं पोराच शेवटी असं झालं..

Badbadi
Monday, August 07, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म... अस्वस्थ करणारी घटना आहे.. :-(

Limbutimbu
Monday, August 07, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील, गोष्ट लिहिलीहेस चान्गली पण अशा गोष्टी मला सहन होत नाहीत रे! :-(
तुझ्याकडे काय म्हणुन पैसे होते त्याचे? बचत? की कसे?


Yogayog
Monday, August 07, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील तुझ्या सारखाच मी सुध्या हि कथा वाचुन एकदम स्तब्द झालो रे

Meenu
Monday, August 07, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील खरच अवधड आहे रे अश्या प्रसंगातुन जाणं

Giriraj
Monday, August 07, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीऽऽऽल .. .. .. .. .. ..

Chafa
Monday, August 07, 2006 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुर्दैवी शेवट. नील छान लिहीलयस रे.

तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल, मागच्याच आठवड्यात भारताने ५९ वर्षांनंतर का होईना पण १४ वर्षांखालील मुलांकडून मजूरी करुन घेणे कायद्याने गुन्हा ठरवला आहे. यात हॉटेल्स, चहाच्या टपर्‍या वगैरे सारखे उद्योगही आले. उल्लंघन करणार्‍यांना २ वर्ष कारावास व २०,००० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.


Kedarjoshi
Monday, August 07, 2006 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे आता त्यांची हक्काची रोजी रोटी पण काढुन घेतली सरकारने. अशा लोकांची रोजी तर काढली कायदा करुन पण त्या बदल्यात उपाय काय?
काही नाही, हो एक आहे उपाशी लवकर मरा. गरिबी हटाव नाही गरिब हटावो.

(मी साम्यवादी नाही तसेच लहान मुला मुलींकडुन काम करुन घेनारा पण नाही, पण निट विचार केला तर या कायद्यात अर्थ नाही. प्रत्येक शहरात अनेक चोकात अशी मुल आढळतील, त्यांनी काय करावे मग? )

निल खरच तुम्ही जी थोडी मदत त्याला वर यायला केली ति कोतुकास्पदच आहे.


Chafa
Monday, August 07, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार मी तुमच्या मताशी सहमत नाही. कितीही छोटे आणि उशीरा असले तरी हे पाऊल योग्य दिशेनेच उचलले गेले आहे असे मला वाटते. त्याबदल्यात उपाय काय हा नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे पण त्यामुळे केलेला कायदा कुचकामी किंवा निरुपयोगी ठरत नाही. (अर्थात याची अंमलबजावणी किती आणि कागदोपत्री धूळ खाणे किती हा भाग अजून निराळा)

असो, मला माझे मत सांगावेसे वाटले. इथे यावर अजून चर्चा मात्र नको. :-)


Raina
Monday, August 07, 2006 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील!
फार दुर्दैवी अंत!


Limbutimbu
Tuesday, August 08, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केदारशी सहमत! आग रामेश्वरी अन बम्ब सोमेश्वरी अशा प्रकारे हा कायदा केला गेला हे!
तसेच उपजिविकेच्या मूलभुत हक्काचेही उल्लन्घन होत हे! विषय V&C वर घ्या!
:-)

Bee
Tuesday, August 08, 2006 - 12:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केदार ह्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत नाही. मात्र भारतात असे कायदे कसे राबविले जातात हे इतके ठाम माहिती झाले आहे की केदार ह्यांचे मत पटायला लागते की निदान ही मुले जगू तरी शकतात स्वकष्टावर. सरकार काय कायदा करेन आणि मोकळा होईल. पण त्या मुलांचे काय होईल. चाफ़्याचे विधान पटले की पाऊल योग्य त्या दिशेनी वळते आहे हे महत्त्वाचे. हा लहानमुलांचा कायदा अलिकडचा नाही. गेली कित्येक वर्ष मी वाचतो आहे की बालमजदुरी गुन्हा आहे. तरी पण प्रत्येक restaurant मध्ये लहान मुले पाणी वाट, टेबल साफ़ कर, भांडी घास, ओझी आण ही कामे करताना दिसतातच. त्यासाठी कसलीच शोधयात्रा करावी लागत नाही. पण सरकार काही करते का? आता सद्या भारतात जसे बाजारात गेलो की मेणकापडाची पिशवी कुणी देत नाही. अगदीच आपण हट्ट केला आणि माघार घेतली तरच माल विकला जावा म्हणून ही लोक पोत्याखालची चोरून ठेवलेली पिशवी आपल्याला देतात. इथे पिशवी मागणारा गुन्हेगार आहे आणि मुलांचय बाबतीत मुलांना राबविणारे आणि मुलांना कामाला पाठविणारे आईवडील जबाबदार आहेत. ह्या सगळ्यांची शहानिशा कोण करणार? कशी करणार? आपला देश तर मोठा आहे. मग???????

Neel_ved
Tuesday, August 08, 2006 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो....
माझा हा पहिलाच प्रयत्न होता लिहिण्याचा... तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे...

फक्त एक गोष्ट इथे लिहाविशी वाटते ती ही कि ही सत्यघटना नाहीये... या कथेच्या शेवटी रघुच्या आईच्या तोंडी जे वाक्य आहे ते मला असेच एका ट्रेनच्या प्रवासात सुचले आणि त्या एका वाक्यावरुन ही पुर्ण कथा लिहायचा प्रयत्न केलाय मी. कदाचित मी ही कथा चुकीच्या BB वर टाकली म्हणुन हा गोंधळ झालाय. झालेल्या गैरसमजाबद्दल क्षमस्व.


Rupali_rahul
Tuesday, August 08, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील, डोळ्यात पटकन पाणी आले...
तु केलेली मदत जरी मोठी नसली तरी फ़ार मोलाची होती रे...


Bhramar_vihar
Tuesday, August 08, 2006 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील, भले ही सत्यकथा नसेल. पण ज्या हातोटिने तू लिहिलिस आणि सर्वाना खरी वाटली, मला वाटत की त्यातच या कथेच सार यश आहे. अभिनंदन. तुझ्याकडून आता अपेक्षा वाढल्यात.

Indradhanushya
Tuesday, August 08, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील सत्यघटना नसली तरी घटनेतील सत्य फ़ारच तिखट आहे...
बाल मजुरीला कायद्याने बंदी आणली आहे ही गोष्ट सुखावह आहे... परंतु त्यांच्या उपजीविकेचा प्रश्ण अनुत्तरीत ठेवला आहे. :-(


Kandapohe
Tuesday, August 08, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील सहीच लिहीले आहेस.

Proffspider
Thursday, August 10, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Neel, It's really touchy one!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators