Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 21, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 21, 2006 « Previous Next »

Ninavi
Thursday, July 20, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशासाठी..?

खुळी स्मरतात स्वप्ने तुजसवे चालायची
परांची ओढ वेडी अंबरा पेलायची

तुझे नसणे असूनी आणि नसता भासणे
कशी समजूत माझी मीच रे घालायची?

कशासाठी करावी अक्षरांची आर्जवे?
इथे अश्रूंसही चोरी असे बोलायची

फुलांची आठवूनी साद गंधित लाघवी
हसूनी कंटकांची दूषणे झेलायची

कशाचे प्रेम? कसले जन्मजन्मींचे दुवे?
जगाची रीत आहे हरघडी बदलायची...


Chinnu
Thursday, July 20, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> तुझे नसणे असूनी आणि नसता भासणे
कशी समजूत रे माझीच मी घालायची?

निनावी, विरहवेदना सही सही चित्तरली आहेस!

Kandapohe
Thursday, July 20, 2006 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, सहीच! अंबरा (मला मराठीत पण अंबर = आकाश हे माहीत नव्हते.) ह्या शब्दाचा अर्थ काय? :-)

Pkarandikar50
Thursday, July 20, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'गुलमोहर' मधे चर्चा असावी का नसावी, असली तर कशी असावी आणि कशी असू नये यांवर खूप भाष्यं, मतं-मतांतरं येऊन गेलीत तरीहि मला वैभवच्या 'अल्लख निरंजन' कवितेवर थोडी चर्चा कराविशी वाटते. एकच कारण पुरे, वैभवला त्याच्या कवितेवर चर्चा झालेली आवडते. तो 'थोर' असल्याचं ते एक लक्षण आहे. तर, 'अल्लख निरंजन' बद्दल थोडेसे.

कवितेच्या शीर्षकापासूनच दारोदार भिक्षा मागत हिंडणार्‍या याचकाची एक प्रतिमा स्पष्ट होते. पहिल्या दोन ओळींच्या प्रस्तावनेतून ती अधिक ठसठशीत होते. वैभवच्या मते, त्याच्या कवितेचा नायक एक 'फ़किर' आहे. माझ्या शंका 'फ़किरी' ह्या संकल्पनेच्या संदर्भातल्या आहेत.

मला वाटते की 'फ़किरी' ही एक वृत्ती आहे, त्या व्यक्तीने पूर्ण विचारांती स्वीकारलेला तो 'फिलॉसॉफिकल स्टान्स' आहे आणि 'लाइफ- स्टाईल' हि आहे. त्या व्यक्तिचा तो स्थायीभाव झालेला असतो. त्याची कारणं कोणती असू शकतात? 'एक सच अल्ला (किंवा भगवान), बाकी सब झूटा' ही 'फ़कीरा'ची श्रद्धा आणि शिकवण असते. 'मिथ्या'वाद किंवा 'माया'वाद त्याने मनापासून स्विकारलेला असतो. त्यासाठी त्याच्यावर खूप मोठे आणि सततचे अपेक्षाभंग किंवा इतर दु:खद प्रसंग कोसळण्याची गरज नसते. 'विरक्ति' किंवा 'वैराग्य' मात्र, बहुतेकदा अतिनैराश्यापोटी अथवा भोगाच्या अतिरेकाने भौतिक सुखांचा वीट आल्याने प्राप्त होते, असे मला वाटते. संत परंपरेतील मीराबाई, कबीर, तुकाराम हे सर्वजण मला 'फ़किर' वाटतात, तर सगळे 'महाभारत' घडून गेल्यानंतर, धृतराष्ट्र, कुंती, विदुर यांचे वानप्रस्थाश्रमात निघून जाणे हे मला 'वैराग्या'चे लक्षण वाटते, 'फ़किरी'चे नव्हे. हम्लेट, देवदास किंवा सिकन्दर ह्यांनाहि 'फ़किर'
म्हणता यायचे नाही.

वैभवच्या कवितेचा नायक कोणत्या वर्गांत मोडतो? तो प्रेमाच्या, वात्सल्याच्या, कदाचित भौतिक सुखांच्याहि अपेक्षा बाळगून अनेक ठिकाणी गेला आहे आणि प्रत्येक वेळी त्याच्या पदरी निराशा पडल्याने तो आयुष्याला विटला आहे. कवितेच्या पहिल्या कडव्यात हेच ठासून (आणि ढोबळपणे) सांगितले गेले आहे. तो वृत्तीने 'फ़किर' नाही, तर अतिनैराश्यापोटी त्याला विरक्ती आली आहे, हे पहिल्या कडव्यात स्पष्ट होते. त्यामुळे त्याच्या 'फ़किरी'ची पुढची वर्णने मलातरी 'लॉजिकली इनकन्सिस्टन्ट' वाटतात.

'अल्लख निरंजन' ह्या घोषामागे एक वेगळा आणि मोठा अर्थ दडलेला आहे. "बाबारे, नीट डोळे उघडून पहा, म्हणजे तुलाहि पटेल की हे जग म्हणजे एक माया आहे" असा काहीसा 'अल्लख निरंजन' चा मतितार्थ आहे. फ़किर म्हणजे काही 'दर दरकी ठोकरे' खात फिरणारा सर्वसामान्य माणूस नसतो. 'छोड दुनियाके झमेले, मज़े सब' हे सांगत फिरणारा तो 'ब्रम्हानंद' असतो. देवदास किंवा सिकन्दरच्या तोंडी 'अल्लख निरंजन' चा 'नारा' शोभून दिसणार नाही, सूफ़ी संतांच्या तोंडी तो चपखल बसेल. वैभवच्या कवितेचा नायक काही 'फ़किर' ह्या वर्गात मोडत नाही असे मला वाटले.

मंडळी, मला काय म्हणायचे आहे ते मला नीटसे मांडता आले नसले तरी माझा रोख तुमच्या लक्षांत आला असेल अशी आशा आहे.

-बापू.


Devdattag
Friday, July 21, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू.. धन्यवाद वैभवच्या कवितेच्या रसग्रहणाबद्दल, यापुढे मी फकीर ही प्रतिमा वरील बाबींचा विचार करूनच वापरेन..
निनावी, चिन्नु तुम्हाला या कवितेचा शेवट कळला नाही का त्याचा पहिल्या कडव्यांशी संदर्भ जाणवला नाही किंवा कसे? प्लीज सांगू शकाल त्याप्रमाणे जर मला अभिप्रेत जे आहे तेच तुम्हालाही कळले असेल तर मी त्यानुसार तुम्हाला सांगू शकेन..:-)


Aaftaab
Friday, July 21, 2006 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी
बर्‍याचशा सुंदर कविता वाचायला मिळत आहेत. पण या चिरफाडी किन्वा रसग्रहणे जरा रसभंगच करत आहेत. मान्य आहे की ते कवी आणि रसिक दोहोंकरताही लाभदायक आहे. पण जर त्याच्यासाठी एक वेगळा बीबी सुरु केला तर अधिक बरे होईल..
मॉडस तसे करता ये ईल का?


Ninavi
Friday, July 21, 2006 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, तुमच्या प्रश्नांना वैभव उत्तरं देईलच, पण मी मला त्या कवितेत काय कळलं ते सांगू का?

'दारात क्षणांच्या थांबुन..'
याला आयुष्यात काहीच याचं 'हक्काचं' म्हणता येईल असं मिळालेलं नाही, कुणी देऊ केलेलं नाही. ना सुख ना दुःख. इतका दुर्लक्षित जन्म की जे काही बरेवाईट अनुभव आले ते ही सभोवती चालणार्‍या घटनांचा परीणाम म्हणून. याच्या 'मालकीचं' असं काहीच नाही. हा ( सक्तीचा खरा, पण) अपरिग्रहच आहे.
( मला स्वतःला ' दारात क्षणांच्या थांबुन' हा शब्दप्रयोग प्रचंड आवडला. एरवी आपण थांबणे / थबकणे हे काळाच्या परिमाणात म्हणतो.. उदा : दोन क्षण थांबलो'. हा क्षणांच्याच दारात थांबला आहे. हा मांडणीचा विशेष.)
माथ्यावर छाया नाही, तलखी इ. वर्णन हेच व्यक्त करतं की त्याला (कदाचित लौकिकार्थाने असेलही, पण) घरदार नाही. हृदयांच्या गावोगावी प्रेमाची भिक्षा मागत फिरतो. एका जागी फार काळ थांबत नाही, कुणी तसा आग्रह तर लांबच, बहुधा तितकी दखलही घेत नाही. ( भौतिक सुखाची भिक्षा असं मलातरी कुठेच दिसलं नाही.) फकीरालाही जग माया म्हटलं तरी उदरनिर्वाहापुरती भिक्षा मागावीच लागते. याला ते ओंजळभर प्रेमसुद्धा अन्नपाण्याइतकंच गरजेचं आहे, पण कधीकधी ते ही मिळत नाही. फकीरांनाही एका गावी फार काळ न रहाण्याचा नियम असतो. अतीनैराश्य कसलं? हे असं जगणं हे त्याचं कठोर वास्तव आहे.

यात ही आयरनी (विरोधाभास) येतो की याचा आचार फकीराचा आहे, पण मनाने फकीर झालेला नाही. तुमचा ' अलख निरंजन' म्हणण्याबद्दल आक्षेप आहे का? लक्षात घ्या ते शेवटी घडतं. माझ्या माहितीनुसार निरंजन म्हणजे जगाच्या उपाधींपासून मुक्त. ज्या क्षणी त्या ओंजळभर प्रेम मागण्यातला फोलपणाही कळून चुकतो, त्या क्षणी ही मुक्ती मिळते. मग ही जाणीव होते की आपण फकीर म्हणूनच आलो ( जन्मतः निर्लेपच असतो ना आपण? नाना नातेसंबंध आणि उपाधी नंतर ' चिकटत' जातात) आणि जाताना तसेच जाणार - कारण ही मुक्ती गवसली.

ही मुक्ती ही ज्या क्षणाने झोळीत घातली ( अजून ती प्रतिमा consistant आहे) तो क्षण म्हणूनच खरा यजमान ठरतो. झोळी हे याचनेचं प्रतीक. तिचं आता ओझं होतं. हे असं दान त्या क्षणाने पदरात घातलं की त्या क्षणापासून घेणारा याचक राहिला नाही. पुन्हा विरोधाभासाचा अतिशय प्रभावी वापर.

मला का कोण जाणे तुमचं

>>> तो 'थोर' असल्याचं ते एक लक्षण आहे.
हे विधान उपरोधिक वाटलं. तरीही academic interest म्हणून चर्चा पुढे चालवत्ये.

मॉड्स, खरंच दुसरा बीबी उघडून तिथे ही चर्चा हलवायला हरकत नाही.


Vaibhav_joshi
Friday, July 21, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


निनावी ... अतिसुंदर ... तुझी गज़ल आणि रसग्रहणही ... धन्यवाद

बापू ... धन्यवाद ... थोर ?
:-)

एक क्षणा प्रेमाचा किंवा मायेचा हे भौतिक सुख होवु शकत नाही ...

ही मनाची फकिरी आहे ... त्यासाठी नायक वरकरणी कबीर मध्ये मोडतो की सिकंदर मध्ये हा प्रश्नच नाही ... इथे नायक " मन " आहे .... सुरूवातीपासून शेवटपर्यंत क्षणांकडे भिक्षा मागून ज्या क्षणी ती मिळते त्या क्षणी मुक्तता इतकीच कन्सेप्ट आहे

" मन " अलख निरंजन व्हावे बापू ...
:-)


Devdattag
Friday, July 21, 2006 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी फक्त अलख निरंजनच्या अर्थाबद्दल लिहितोय..
अलख निरंजन घोषाला हिंदू आणि शिख धर्मात महत्व आहे.. निनावि म्हणाल्याप्रमाणे नाथ पंथाने तो जास्त प्रचलित केला.. अलख निरंजन ह्या शब्दांचा अर्थ होतो-- अलख म्हणजे जे दृष्टीतीत आहे ते आणि निरंजन म्हणजे डाग नसलेले निर्मळ, नितळ, स्वच्छ..
हे दोन शब्द मिळून परमेश्वर किंवा आत्मा सुचित करतात..
वैभवच्या मन अलख निरंजन व्हावेचा मी घेतलेला अर्थ म्हणजे, कवितेच्या नायकास 'सोऽहम' स्थिती प्राप्त व्हावी..
चु.भू. द्या. घ्या.


Vaibhav_joshi
Friday, July 21, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

xxxx xxxx xxxx xxxx
poem

Pkarandikar50
Friday, July 21, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्येकदा कविपेक्षाही सुजाण वाचकाला कवितेतली अनेक सौन्दर्य स्थळं दिसतात. (म्हणूनच चर्चा\ रसग्रहणं हवीत.)जे न देखे कवि ते वाचक पाही. निनावीचे रसग्रहण नि:संशय उच्च दर्जाचे आहे. त्याबद्दल मन:पूर्वक अभिनन्दन. चर्चा खूपच लाम्बल्याने काहींना ती कंटाळवाणी झाल्याचं दिसतय, त्यामुळे थाम्बवलेलीच बरी.
पण निनावी, अपरिग्रह सक्तीचा किंवा स्वेच्छेचा असू शकतो, फ़किराचा अपरिग्रह सक्तीचा नसतो, हेच मलाही म्हणायचे होते.
-बापू


Pkarandikar50
Friday, July 21, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav,
तुझी स्वप्नाळू स्वप्नसुन्दरी आवडली.
-बापू.


Manasi
Friday, July 21, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, 'कशासाठी' छान आहे.

कशासाठी करावी अक्षरांची आर्जवे?
इथे अश्रूंसही चोरी असे बोलायची

हे सर्वात सुन्दर.
एक शन्का
"तुझे असूनी नसणे आणि नसता भासणे"
असे म्हटले तर अर्थ जास्त स्पष्ट होईल का?


Ninavi
Friday, July 21, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स.
कापो, अंबर म्हणजे आकाशच. मराठीतही की रे. ' बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात' ऐकलंयस ना?
मानसी, तसं लिहीलं तर वृत्तात बसत नाही गं.

वैभव, ड्रीमगर्ल छान आहे.
देवा, मला ' उडताना साथ नभाची' ही ओळ कळली नाही आणि शेवटचं कडवं.
प्लीज सविस्तर सांगशील का तुला काय म्हणायचंय?


Giriraj
Friday, July 21, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तशी ही जुनीच कविता पण एका नवीन कडव्यासह ह्या गदारोळात लढायला पाठवतोय.... जा मूली माझं नाव रौशन कर :-)


सावळा मेघ


नभी दाटल्या मेघांसंगे

हिरवे रान बरसत आहे,

दूर बरसत्या रानामध्ये

घर कौलारू ठिबकत आहे.



लाल ठिबकत्या कौलांवरती

धूर चुलीचा तरळत आहे,

धूर तरळत्या कौलांवरती

उदास टिटवी बरळत आहे.



बरळत्या टिटवीच्या नादे

घोर जीवाला लागत आहे,

घोर लागल्या जीवास कोणी

मेघ सावळा वेढत आहे.



वेढलेला मेघ प्रियेचा

पदर हिरवा भिजवत आहे,

भिजलेला पदर डोळ्यांस

अजूनी थोडा भिजवत आहे.

गिरीराज

Meenu
Friday, July 21, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जा मूली माझं नाव रौशन कर >> पण तुझं नाव गीरीराज आहे ना .. sorry या फा. को. चा मोह मला अगदीच टाळता आला नाही. बाकी कवितेबद्दल तज्ञ मंडळी बोलतीलच.

Meenu
Friday, July 21, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाच एक दिवस येतो ..

असाच एक दिवस येतो
चिंब ओली रात्र ठेऊनी
स्पर्शासाठी आतुरलेली
चंदनाची गात्र घेऊन
हळवे क्षण प्रतिक्षेचे
काही केल्या सरतच नाही
विरघळलेल्या स्वप्नांचे अन
थेंब सुद्धा उरत नाहीत
आणी अचानक एक तारा
दुरातुन निखळुन पडतो
असाच एक दिवस येतो !

- मेधा पाठक


Meenu
Friday, July 21, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समुद्रपक्षी आणी सागरलाट

एकदा एक समुद्र पक्षी
सागर लाट चुंबुन गेला
फेनफुलांचा स्पर्श त्याने
उरी पोटी जोपासत केला
हुळहुळणार्‍या ओठांनी
सागरलाट वाट पाही
दुरस्थ त्याच्या अंतर्यामी
तिची साद घुमत राही !

- मेधा पाठक


Ninavi
Friday, July 21, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रौशन , सुंदर आहे कविता.
प्रत्येक दोन कडव्यांत ' लिंक' जोडायची कल्पना आवडली. आणि वातावरणनिर्मिती पण सुंदर होत्ये.

मला बोरकरांच्या
' सावळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा..' ची आठवण झाली वाचताना.

मीनू, तुझ्या मावशीचं लिहीतानाचं वय, मनःस्थिती आणि काळ विचारात घेता खरंच छान आहेत कविता.


>>> पण तुझं नाव गीरीराज आहे ना.. बाकी कवितेबद्दल तज्ञ मंडळी बोलतीलच.


Chinnu
Friday, July 21, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा मला खरच कळालं नाही रे.
गिरी, खुप सुंदर आहे तुझी मुलगी! गोड आहे अगदी. :-) छान वाटले वाचुन.

मीनु, वरील दोनही कविता छान आहेत ग. मला हुळहुळणारे ओठ आणि अंतर्यामी घुमणारी साद विशेष करुन आवडले.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators