|
Yog
| |
| Tuesday, July 11, 2006 - 5:20 pm: |
| 
|
पुष्पक नमस्कार! धिस इज युवर कॅप्टन अप्पा भूगोल. पुष्पकाच्या पहिल्याच उड्डाणावर मि अन माझे सहकारी आपले स्वागत करतो. कॅप्टन चा आवाज ऐकताच सर्व प्रवाशानी टाळ्या वाजवल्या अन पुष्पक विमान कम्पनीच्या या पहिल्या वहिल्या ऐतिहासिक उड्डाणाला प्रारम्भ झाला. तस पाहिल तर गेले महिनाभर याबाबत कुजबूज चालू होती. "जगातील सर्वात पहिली सात समुद्रापलिकडील सफ़र घडविणारी non stop flight आणि तेही फ़ुकट, लवकरच येत आहे" असे ऐकायला येत होते पण एकच आठवड्यापूर्वी तशी अधिकृत घोषणा झाली अन पुष्पक विमान कम्पनीच्या कार्यालयाबाहेर न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. आदल्या रात्रीपासून लोकानी चक्क रसत्यावरच अन्थरूण घातले होते. ती गर्दी पाहून अमेरिकन कौन्स्युलेट लाही जळफ़ळाट झाल्याचे वृत्त एका तेज वाहिनीने दिले होते. शेवटी इतक्या सर्व लोकाना पहिल्याच सफ़रीला नेणे शक्य नसल्याने कम्पनीने भव्यतम सोडत स्टाईल लकी ड्रॉ काढला अन त्यात चक्क गुरणगावातील भेन्डी चाळीतील एका सम्पूर्ण विन्गेचा (बारा कुटुम्बान्चा)नम्बर लागला म्हणता चाळीत एकदम जल्लोशाचे वातावरण होते. मे महिना आला तरी आजवर साचवून ठेवलेले लवन्गी, न फ़ुटलेल्या डाम्बरी माळा, टिकल्या एका छोट्या डबीत कोम्बून बनवलेले घरगुती बॉम्ब वगैरे उडवून पोरा टोरानी जोरदार स्वागत केले. सगळीकडे एकच जल्लोश! खर तर चाळीतील लोकान्चा अजूनही विश्वास बसत नव्हता. विमान काय, उभ्या आयुष्यात कधी "फ़्लाइन्ग" राणीच्या रिझर्व्ड डब्यातून प्रवास करायची वा टॅक्सीतून फ़िरायला जायची देखिल बर्याच जणान्ची ऐपत नव्हती अन त्यात ही अशी फ़ुकटची सन्धी म्हणजे तळमजल्यावरील काही कुटुम्बाना स्वर्ग दोन "मजलेच" उरला होता. त्या लकी ड्रॉ मधे गुरणगावाच्या नामान्कीत भाईचा मोठा हात आहे ही पण एक खात्रीशीर अफ़वा उठली होती. एरवी भाईच्या छोट्या हस्तक्षेपामुळे चाळीतील काही अनधिकृत व धोकादायक बान्धकाम पाडायचे वाचले होते. देता देशी किती करानी म्हणत चाळीतील लोकान्ची अडलेली कामे करवून "देणारा" हा खर्या अर्थाने "जगन्नाथ" लान्डगे उर्फ़ जग्गू भाई. चाळ खर तर छगीनदास नामक मारवाड्याच्या मालकीची. पण गेली अनेक दशके पन्नास रुपये(च) भाडे देवून आपल्या अनेक पिढ्या चाळीत जगवणार्या लोकान्वर अन त्याना उचलून धरणार्या "भाडेखाऊ" कायद्यावर छगीनदासचा भलताच राग. तेव्हा मोडकळीस आलेल्या अन धोकादायक बनत चाललेल्या चाळीला "मरा लेको" म्हणत त्याने वार्यावर सोडले होते. ज्याना पैशाने शक्य होते ते बाहेर पडले पण इतर बरेच भाडेकरू अजूनही कायम होते. बारस, मुन्जी, साखरपुडा, लग्न हे चाळीच्या सभागृहात तर कधी चक्क मधल्या चौथर्यावर साजरे करणार्या भाडेकरूना त्या मोडकळीस आलेल्या, भेगा गेलेल्या भिन्तीन्शी आपले भावबन्ध तोडणे मुश्कीलच होते. तर ऐन मे महिन्यात चाळीत अशी दिवाळी सुरू झाली अन घराघरातून सफ़रीची तयारी सुरू झाली होती. एरवी एका बाजूला खाटीकखाना, दुसरीकडे मोडकळीस आलेली "लक्ष्मी" मिल ( poetic justice! ) तर समोरच अख्खा सूर्यप्रकाश आपल्या बापजाद्यान्ची मालकी असल्यागत अडवणारी टोलेजन्ग उन्च इमारत, या सर्वाच्या सान्द्रीत सापडलेल्या या कुबट चाळीत कुणाचे पाय लागत नसत तिथे आज अनेकान्चे नातेवाईक, नेते मन्डळी, काही कारकीर्द(केस अन वय)उतरन्डीला लागलेले फ़िल्म स्टार, सर्वानी हजेरी लावली अन चाळीतील लोकान्बरोबर आपले फोटो काढून घेतले. एरवी ढेकूणाएव्हडीही किम्मत नसलेले चाळीतील अनेक चेहरे रातोरात टिव्ही वरून घराघरात पोचले अन सर्वत्र या पुष्पक सफ़रीची एकच धूम उडाली. जाहिरात कम्पन्यानी तर कहरच केला, काय काय एक एक जाहिराती. चक्क टीळा गन्ध लावलेले तुकाराम महाराज एका हातात पुष्पक चे तिकीट घेवून पडद्यावर येतात मागून टाळ, विणा, चिपळ्यान्च्या म्युझिक वर "तुका म्हणे आता उरलो पुष्पकापुरता" म्हणत ते पुष्पक विमानात चढतात आणि मग "पुष्पक पुष्पक पुष्पक" असा विठठल गजरागत आवाज ऐकू येतो. त्याला स्पर्धा म्हणून सौन्दर्यप्रसाधनाच्या एका कम्पनीने भलतीच जाहिरात काढली. कू कू कू कू चोली के पीछे क्या है च्या धरतीवर, "पु पु, पु, पु, पु, पु करत मादक तरूणी पाठमोर्या नाचत येतात आणि मग पुष्पक के अन्दर क्या है, पुष्पक के अन्दर (पडद्यावर "फ़क्त रत्नजडीत" पोशाख केलेल्या हवाई सुन्दरी), पुष्पक के बाहर क्या है पुष्पक के बाहर (पडद्यावर निळे शुभ्र आकाश, खाली नीळा समुद्र, बाजूला बेवॉच स्टाईल लख्ख सूर्यप्रकाषात सन्स्क्रीन चोपडून धावणार्या ललना, त्यान्च्याकडून कसलातरी हर्बल मसाज करवून घेणारे सामान्य लोक वगैरे..)अशी भन्नाट जाहिरात बनवून पुष्पक सफ़रीवर न जाणार्या सर्वान्च्या संवेदना चाळवल्या. एकन्दरीत काय, तर लहान थोर, गरीब श्रीमन्त सर्वान्च्या तोन्डावर एकच नाव, पुष्पक. इकडे चाळीत तयारीची कोण घाई. विमानातून जायचे तर चान्गले कपडे हवे म्हणून बन्डू नानानी खास बन्डी, कोट शिवून घेतले, समोरच्या शाह डेन्टिस्ट कडून कवळी पॉलिश करून आणली. चाळीत टेरेस फ़्लॅट म्हणून प्रसिध्ध असणार्या सर्वात वरच्या मजल्यावरील दोन घरान्चे मालक असलेल्या जोश्यान्च्या घरी तर नुसती खरेदिची रेलचेल होती. खर तर दोन मुले असलेल्या जोशीबाईन्चा वर्षानुवर्षे "मेन्टेन केलेला" तेव्हडाच काय तो चाळीचा फ़ॉर्म शिल्लक होता. जोशी काकू गेले चार दिवस जाताना रिकाम्या हाताने अन येताना सामानाने भरलेल्या प्लॅस्टीक, नायलॉन, वेताच्या अशा हर तर्हेच्या पिशव्या घेवून येत होत्या. त्यान्चा तो दम पाहून नन्दू वाण्याच्या दुकानातून सामान ने आणीचे काम करणार्या पोरानी देखिल तोन्डात बोटे घातली अन बाईना दुकानात "ठेवावी" या वाण्याच्या जुन्याच इच्छेने पुन्हा उचल खाल्ली. तिकडे सुकटणकर, वालावलकर, अशा सारस्वतान्च्या विन्गेतून तिसर्या, सुकड इत्यादीन्च्या तळणीन्चे वास अन गप्पान्चा अविरत कलकलाट चालू होता. स्वताला चाळीच्या माधुरी दिक्षीत, सोनाली बेन्द्रे समजणार्या चिटणीसान्च्या नन्दा मन्दा भगिनीन्च्या साज श्रुन्गाराला तर नुसता ऊत आला होता. कधी काळी स्वताचे केस कापायचे पैसे जमवून ठेवणार्या चिटणीसान्वर नन्दा मन्दाच्या मेनिक्युअर, पेडीक्युअर नखर्यामूळे बिनपैशाचेच केस जायची पाळी आली. तर त्यान्च्या पेक्षा एक पाऊल पुढे प्रधानान्च्या निशाने स्पॅगेटी वगैरे तत्सम शेवयान्ची नावे अन आकार असलेले शर्ट घालून चाळीतील पोरान्चे बॉम्बही फ़ुसके ठरवले होते. सिकेप्यान्च्या घरात हा असा "फ़्री फ़ॉर ऑल" दिखावा तर सन्घशाखाप्रमुख भावेन्च्या घरात या सफ़रीवर कुठून कसे विमान जाणार, कुठे किती दिवस उतरायचे, काय काय करायचे याचे सर्व नकाशे, माहिती, अन त्यावर चर्चा घडत होत्या. अगदी अन्टार्क्टीकेवरही ध्वजवन्दनाचा कार्यक्रम त्यानी आखला होता. इकडे तळ मजल्यावरच्या कर्नावट मरवाड्याच्या बाइलीने प्रत्त्येक भूखन्डच्या हवामानानुसार लागणारे कपडे, वेगवेगळ्या तापमानात टिकणारी लोणची, छुन्दे, थेपले इत्यादीन्ची तयारी चालवली होती. चाळीतील एकमेव मुस्लिम कुटुम्ब उस्मानमिया त्यान्च्या दोन बेगम अन आठ पोरान्ची टीम घेवून पुन्हा पुन्हा जवळच्या मशिदीत जावून अल्लाचे आभार मानत होते. चाळीत धन्दा (आणि धन्दे) करण्यात प्रसिध्ध, "सुदामा" खनावळीचे चतूर मालक सास्ते यानी खानावळीच्या दरवाजावर "आज बन्द" चा बोर्ड टान्गून ठेवला होता. सुदाम्याचे दडपे पोहे, कान्दे पोहे, टोमॅटो पोहे, खोबरे पोहे, असे बरेच पोहे गुरणगावात प्रसिध्द होते. सास्त्यान्च्या वाड वडीलान्पासून गेली कित्त्येक वर्षे ही खानावळ चालू होती. खानावळीतील पूर्वीच्या पत्रावळी जावून स्टीलच्या प्लेट्स आल्या पण पोहे मात्र कायम राहिले. सुदाम्याच "द्वारका हॉटेल" वगैरे बनवायच एव्हड एकच सास्त्यान्च स्वप्न होत. तशी चाळीतही काही "प्राईम लोकेशन्स" होती. कपडे छान कडक वाळून निघणारा सर्वात वरचा मजला, चिटणीस अन प्रधानान्च्या खिडकीसमोरील खोली, सार्वजनिक सन्डासाच्या जवळचे शेवटचे घर, अन कुणाकडे कोण आले पासून ते कुणाकडचे कोण गेले अशा आखो देखी बातम्या ठेवणारे तळमजल्यावरील पहिलेच घर. या तीन चार प्राईम लोकेशन्स खेरीज बाकी सर्व लोकेशन्स चा प्राईम टाईम सम्पल्याच्या खुणा भिन्ती अन जिन्यान्वर स्पष्ट दिसत होत्या. पुष्पक ची लॉटरी लागलेले असेच तळमजल्यावरील भन्ते कुटुम्ब. भन्ते टपाल खात्यात कारकून होते. गेली अनेक वर्षे त्या कचेरीच्या चार भिन्तीत राहून त्याना मुम्बई अगदी तोन्डपाठ झाली होती. कुठे बाहेर फ़िरायला जायचे तर भन्ते सौ ला म्हणत चल आज सात नम्बर मधे फ़िरून येवू, उद्या आठ, परवा तेवीस. पिनकोडच्या नम्बरवरून कुटुम्बाला अशी अख्खी मुम्बई फ़िरवून आणणार्या भन्त्यान्चा पुष्पक सफ़रीवर नम्बर लागण हाही एक नम्बर गेमच. कधी साध्या अन्तर्देशीय पत्राचाही घोटाळा करायची हिम्मत नसलेल्या भन्त्यान्नी त्यान्च्या साहेबाकडून मोठ्या हिमतीने मोठी सुट्टी मन्जूर करवून घेतली होती. असे करता करता जणू अख्खी चाळच या लकी कुटुम्बान्बरोबर एका जागतिक सफ़रीला सज्ज झाली अन आदल्या दिवशी सर्वान्ची यात्रा सुकर आणि सफ़ल व्हावी म्हणून एक मोठी पूजा अन महाभिषेक करण्यात आला. दुसरे दिवशी वाजत गाजत चाळकर्यान्ची मिरवणुक विमान्तळावर आली तेव्हा मागील गणेशोत्सवानन्तर प्रथमच चाळीच्या गल्लीसमोर रस्ता जाम झाला होता. बरेच जणाना विमान नक्की कशावर चालते इथपासून माहिती नसल्याने पुढे काय काय गमती होणार होत्या हे देवालाच ठावुक. विमानतळावर आलेल्या आपल्या मित्र बान्धवान्चे भावपूर्ण निरोप घेतले जात होते. कुणी हार घालत होते, कुणी पेढे वाटत होते, कुणी नुसतेच मिठी मारून घेत होते, नन्दा मन्दा ब्रिगेडच्या सर्व मैत्रिणीनी एकच गलका केला होता अन निशाभोवती तरूणान्ची ही गर्दी. "बेबी येते हो, घराकडे लक्ष ठेव", या माईनी (बन्डू नानान्च्या पत्नी) केलेल्या अश्रुपूर्ण विनवणीवर, "अहो आहे काय लक्ष ठेवायला, नानान्ची खाट अन तुम्ही बोवारणीकडून साठवेलेली ऍल्युमिनिअम ची भान्डी", अस म्हणून जाम्भे आजिनी त्यान्ची समजूत काढली. पुष्पक विमान कम्पनीचा MD हा माझा शाखेचा विद्यार्थी आता त्याला सान्गून शाखेतील सिनीअर सिटीझन्स साठी अशी एखादी सफ़र मोफ़त घडविण्याची स्किम बनवायचा विचार आहे, असे भावे काकानी आपली टोपी अन मानेवरील पन्चा सम्भाळत एका व्रुत्तवाहिनीला इन्टरव्यु देखिल दिला. एकदाचा निरोप समारम्भ आटोपून हा जथ्था check in counter वर जावून पोचला अन गड्बड धान्दलीचा पहिलाच नारळ फ़ुटला. डेस्कपलिकडील तरुणीने "आले हे फ़ुकटे" (बाकीचे मरेस्तोवर कष्ट करतात याना मात्र फ़ुकटची सफ़र) असे स्मितहास्य करत स्वागत केले अन सर्वान्च्या हातातील भल्या मोठ्या बॅगा वगैरे पाहून गोड आवाजात किन्चाळली, "पुष्पक सफ़रीवर कुणालाही कुठलेही सामान बरोबर न्यायला परवानगी नाहीये". ते ऐकताच एकच गलका उडाला. आता घ्या का, इतके दिवस रात्र एक करून जमवलेले सामान इथेच सोडायचे म्हणजे ते काही बरोबर नाही असे म्हणून सर्वानी बोम्ब मारायला सुरुवात केली. "आधीच सान्गितले असते तर इतकी जमवाजमव केली नसती" म्हणत जोशी काकूनी तिच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यावर कम्पनीच्या तिकीटावर हा "अलिखीत करार" आहे असे म्हणून त्या बयेने तुम्ही नियम वाचून आला नाहित वाटत म्हणून त्याना उडवून लावले. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून पुष्पक चे दस्तुरखुद्द MD , विश्वनाथ साहेब आले अन सर्वाना दिलासा देत म्हणले,"हे पहा काळजी करू नका, तुमच्या सामानाची यादी करून आमच्या इथे लॉकर मधे ठेवण्यात येईल परत आलात की घेवून जा. तुम्हाला प्रवसात सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही पुरवणार आहोत, टुथ ब्रश पासून ते रात्रीच्या उशा पान्घरूणापर्यन्त हव ते सर्व, पुन्हा जेवण खावण आहेच, रहायला झोपायला जागा आहे, एकाही पैशाचा खर्च नाही मग सामान हव कशाला?" भावे काकानी सर्वाना पुन्हा एकदा समजावून सान्गितले, "विष्णू माझा जुना विद्यार्थी आहे तेव्हा काळजी नको". मग विमानतळावरील मोहोळ इन्स्पेक्टरानी सर्वान्चे नाव,पत्ता,सामान याचा एक रीतसर "पन्चनामा" करून सर्वाना दिलासा देवून प्रवासाकरता शुभेच्छा दिल्या. मग security check मधे लुगडे जवळ जवळ सुटले म्हणून नानान्च्या माईन्नी कुरुकुर केली तर आम्हाला इतरान्पेक्षा उगाच जास्त वेळ तपासत होते असे उस्मान मियानी सुनावले तर त्यान्ची दुसरी बेगम नुकतीच फ़ेशियल च्या कुन्डातून बाहेर आल्यासारखी तुकतुकीत कोवळी लाल गोरी आहे असा शेरा जोशी काकूनी मारला. त्याच काय आहे पहिल्यान्दाच बेगम ला आम्ही इतक्या जवळून निरखून पाहिले एरवी बुरख्या आड काही कळत नाही असा वर पाठपुरावा केला. मन्डळी लगबगीने अशी विमानाकडे जात असताना बन्डू नाना मात्र अजून विमान "लागलं नाहीये" म्हणून खुर्चीतच बसून होते. त्यात त्यान्चा दोश नव्हता, बिचार्यान्च उभ आयुष्य परिवहन मन्डळात काम करताना एका लाल डब्यातून दुसर्यात अस पुढे गेल होत तेव्हा नेहेमीप्रमाणे "फ़लाट क्रमान्क एक, विमान क्रमान्क सत्तावीस सत्तर, नीळा शेपटा नीळा शेपटा," अशी काहितरी खणखणीत अनाऊन्समेन्ट होईल या आशेने ते बसले होते. तशी अनाउन्समेन्ट झाली की हातात लागेल ती पेटी सामान उचलून त्या फ़लाटाकडे धोतर सम्भाळत धूम ठोकायची त्यान्ची सवय. अहो ते बोर्डीन्ग का काय ते चालू झालय उठा आता म्हणत माईनी त्याना हलवले. विमानात "अडचण" होवू नये म्हणून माई बळेच पलिकडे जावून आल्या. माई आणि बन्डू नानान्चा टुमदार संसार हा असा होता. अगदी खाली जीने उतरून जायचे असले तरी थाम्ब जरा "पलिकडे जावून येते" म्हणून नेहेमी सावध असणार्या माई अन एक धोतर दान्डीवर तर एक xx डीवर अशा काटकसरीत राहणारे बन्डू नाना. त्यान्च्यासाठी हा विमान प्रवास म्हणजे एक स्वदेह स्वर्गच होता, अन विमान मधेच कोसळल असत तरी त्यान्च्या मागे अश्रू ढाळणारं कुणी नाही हे माहित असल्याने दोघे मस्त निवान्त होते. करता करता एकदाचे सर्व जण विमानात स्थानापन्न झाले अन प्रथमच त्या महाकाय वाहनाच्या आतील मोठी जागा, सजावट बघून हरखून गेले. तोच एक मन्जूळ आवाज आला. "नमस्कार! पुष्पक विमानाच्या पहिल्याच यात्रेवर आपले स्वागत आहे, मि रम्भा आणि माझ्या सहकारी भगिनी उर्वशी आणि मेनका आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध आहोत,थोड्याच वेळात विमान सुटेल सर्वानी आपापल्या जागेवर बसून घ्यावे." इतका मन्जूळ आवाज चाळीतल्या लोकानी एकतर रेडीओ वा टिव्ही वरील निवेदिकेचा, किव्वा लताबाईन्च्या गाण्याचा ऐकला होता, त्यानन्तर असा कानाला गुदगुल्या करणारा आवाज ऐकून त्या हवाई सुन्दर्यान्चे "पहिले दर्शन" घ्यायला बसल्याच जागेवरच सर्वान्च्या माना कुरडई गत करकुरू लागल्या. गेली अनेक वर्शे स्लिप डीस्क चा त्रास असल्याने कम्बरेचा पट्टा झोपेत देखिल बान्धता येणार्या माईना तो विमानातील सीट बेल्ट काही लावता येईना. त्यातून लुगड्याचा बोन्गा मधे येत असल्याने त्या पट्ट्याची लाम्बी कमी पडत होती. तितक्यात रम्भेने येवून माईना मदत केली. तीला येताना पाहून बन्डू नानानी आठवणीने आपली पॉलिश केलेली कवळी चढवून तिला चक्क इन्ग्रजी मधे Thank you म्हटले. चिटणीसान्च्या नन्दाची सीट बेल्टशी चाललेली धडपड बघून सास्त्यान्च्या वात्रट सुश्या ने तीच्याशी पट्ट्याचा "मान्डी(न)डाव" खेळून घेतला. त्यान्ची ती धडपड पाहून " First Time का?" असे रम्भेने मन्दाला हसत विचारले त्याचा वेगळा अर्थ काढून त्यावर लाजून मन्दाने "इश्श! नो नो हा!" असे उत्तर दिले ते ऐकून चिटणीस काकी खवसल्या. इकडे विन्गेतून उर्वशी ला येताना पाहून भन्ते काकानी विन्डो सीट सोडून आयल सीट पकडली आणि उर्वशीने विन्डो सीट मधे बसलेल्या भन्ते काकीन्च्या टेबलावर पाणी ठेवले तेव्हा भन्त्यान्च्या तोन्डचे "पाणी पळाले". तरीच कुरपे साला "आयल आयल" करत असतो म्हणून साहेबाला शिव्या घातल्या पण दोनदा परदेश सफ़रीवर जावून आलेल्या कुरपे साहेबान्च्या "भन्ते आयल मधे बसा आयल मधे बसा" या सूचनेबद्दल मनोमन आभारही मानले. अर्थात त्यात भन्त्यान्चा काही दोष नव्हता गेली वीस वर्श, आठ ते पाच, पोस्टात एकाच खिडकीत बसून वेगवेगळे व्यवहार करणार्या त्याना, "विन्डो, आयल किव्वा मिडल सीट" हा प्रकार नविनच होता. त्यातही चाळीतील एखाद्या वात्रट कारट्याची जुनी चड्डी अर्धवट घसरावी तसे एक जुनाट गन्जकी जाळी चढवलेल्या त्या पोस्ट ऑफ़िसातील चतकोर खिडकीमागे बसून खिडकीच्या खालून नव्हे तर थेट खिडकीतून पलिकडे बघायच ते विसरूनच गेले होते. सहाजिकच विमानातली ती चकचकीत खिडकी बघून त्यान्च्यातील बालमन जागे झाले होते पण ऐनवेळी उर्वशीला येताना पाहून त्यान्ना साहेबान्ची सूचना आठवली अन त्यान्नी सीट बदलली. विमान उडण्यापूर्वी पुष्पक ने ठेवलेल्या खास मेजवानीच्या भराभर ऑर्डरी दिल्या जात होत्या. सोलकढी, टोमॅटो सूप पासून चिकन बिरयानी पर्यन्त सर्व पदार्थ लोकानी मागवले होते. विमान अजूनही जमिनीवरच होते पण सर्वाना स्वर्ग अगदी दोन बोटे उरला होता. का नाही, ज्यान्च अर्ध तर काहिन्च उभ आयुष्य गुरणगावातील त्या कोन्दट्ट चाळीत गेल त्याना त्या वातानुकुलीत भेळकान्ड्यातील अगदी एक बाय एक फ़ुटाची सीट देखिल त्यान्च्या दहा बाय दहाच्या खोलीपेक्षा प्रशस्त वाटत होती. रम्भा, उर्वशी येवून "हवे ते" खान पानाचे बघत होत्या. कायम लोड शेन्डिन्गमूळे घामाच्या धारा निथळायच्या त्यावेजी मस्त सुगन्धित थन्ड हवेवर मन झुलत होते. कचेरीतील लाकडी बाकापासून ते लाल डब्याच्या मळक्या फ़ाटक्या सीट वरून हाडं मोडून पाठीचे ढेपाळलेले हिरकणीचे बुरूज आज मऊ मऊ गिरद्या कापसाच्या आसनान्वर पहुडले होते. दिवस रात्र फिलीप्स चा ट्रान्झिस्टर कानात घुसवून फ़ाटलेल्या कानान्च्या पडद्यात अखन्ड मन्जुळ सन्गीताचे स्त्रोत झरत होते. कायम शेजारी पाजारीन्च्या भिन्ती अन समोरच्यान्च्या थेट खिडकीतून आपल्या कुटुम्बाचा एकान्त हरवून बसलेली जोडपी आज पुन्हा एकदा हळूच बिलगून अन खेटून बसली होती. नेहेमी जीव मूठीत घेवून प्रवास करणार्या कुटुम्बाना कुठलिही दन्गल झाली तरी आज आकाशत विमानावर कसलिही दगड्फ़ेक वा जाळपोळ होणार नाही याची खात्री होती. त्यान्च्या हक्काच्या रिझर्व्ड सीट वर हल्लाबोल करणारा "निर्बुध्ध" जमाव नव्हता की बाजूने घो घो करत काळा धूर सोडत जाणार्या वाहनातून अन्गावर असभ्यतेच्या पिचकार्या उडणार नव्हत्या. एरवी बस मधून जाताना कन्डक्टर ने अन्गा प्रत्त्यान्गाला दिलेले धक्के नन्दा मन्दाच्या वाट्याला नव्हते, की फ़ॅशनेबल कपडे घालून कॉलेजला जाताना निशावर उन्चावलेल्या भुवया अन नजरा नव्हत्या. पुढचे काही दिवस तरी बायाना घरात गॅस सम्पला आहे का याची चिन्ता नव्हती, गोड धोड करायचे तर नन्दू वाण्याचे सामान उधारीवर आणायचे नव्हते. रोज गिर्हाईकासाठी उभे राहून स्वताची तहान भूक विसरलेल्या सास्तेना आज फ़क्त निवान्त खुर्चीत बसून मेनू ची ऑर्डर सोडायची होती. एकन्दरीत सवान्साठीच सर्व कसे छान, सुट्सुटीत, मनासारखे होते.. अन इतक्यात तो आवाज आला.. नमस्कार! धिस इज़ युवर कॅप्टन अप्पा भूगोल. पुष्पकाच्या पहिल्याच उड्डाणावर मि अन माझे सहकारी आपले स्वागत करतो. साता समुद्राची ही सफ़र उत्तर दक्षिण ध्रुव अन सर्व खन्ड पार करत एक पृथ्वीप्रदक्षिणा करून अन्तराळाची सफ़र करणार आहे. या अजब प्रवासाचा कालावधी मात्र अनादी अनन्त असून आमच्या बरोबर ही यात्रा केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. please fasten your seat belts and enjoy the ride असे म्हणून वैमानिकाचे शब्द त्या अजस्त्र विमानाच्या इन्जीनाच्या प्रचन्ड आवाजात विरून गेले अन इतका वेळ आपल्या विश्वात रममाण झालेल्या सर्वान्मधे एकच खळबळ पिकली, अप्पा भूगोल..? अरे हे तर आपल्या चाळीत रहाणारे अन पालिकेच्या शाळेत भूगोल शिकवणारे कुलकर्णी मास्तर. हे इथे कुठून आले अन तेही वैमानिक? त्यावर इतके वर्ष प्रत्त्येक गोष्टीबद्दल चिन्ता अन प्रश्ण करणारे खुद्द भावे काका उभे राहिले अन म्हणले, मन्डळी आता चिन्ता करायचे काहीच कारण नाही. आज प्रथमच आपल्या सर्वान्च्या प्रवासाची दोर एका योग्य व्यक्तीच्या हातात आहे, अप्पा विमान चालवतो आहे म्हणजे वाट चुकायचा प्रश्णच नाही, फ़िरून पुन्हा आपाल्या घरी जाणारच! तेव्हा चिन्ता नको. तेव्हा, "सुटलो" म्हणत सर्वानी सुटकेचा श्वास सोडला अन शेवटची घर्घर करत विमानाने आकाशात झेप घेतली. या अजब सफ़रीवर गेलेल्या चाळीतील लोकान्ची नावे आदल्याच दिवशी सर्व वृत्तपत्रात ठळक मथळ्याखाली प्रसिध्ध झाली होती. त्यातही योगानन्द नावाच्या अध्यात्मिक वृत्तपत्राने खास मथळा लिहीला होता.. "झोपेतच सदेह स्वर्ग : गुरणगावातील धोकादायक भेन्डी चाळीचा एक अक्खा भाग कोसळून बारा कुटुम्बे ठार!".
|
योग, केवळ अप्रतीम. विनोदाला कारुण्याची झालर की कारुण्याला विनोदी झालर. शेवट पर्यंत शेवट कळत न्हवता.
|
Abhi_
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:45 am: |
| 
|
योग, सुंदर!! वर्णन वाचून 'वर्हाड..' ची आठवण झाली
|
Deemdu
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:47 am: |
| 
|
योग शहारा आला रे शेवट वाचुन
|
Maudee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 2:13 am: |
| 
|
योग ख़ूप छान लिहिले आहेस..... ख़रच शेवटपर्यंत कळलच नाही की नक्की काय लिहितो आहेस
|
Psg
| |
| Wednesday, July 12, 2006 - 2:31 am: |
| 
|
छान वर्णन. शेवटाचा अंदाज आला होता, पण छान लिहिल आहेस
|
Devdattag
| |
| Wednesday, July 12, 2006 - 2:43 am: |
| 
|
योग.. का माहित नाही पण साधारण सहा वर्षापूर्वी फ़र्ग्युसनने पुरषोत्तममध्ये केलेले नाटक आठवले.. एक लेखक महाभारत लिहित असतो.. रोज रात्री त्याच्या पुस्तकातल्या चालू पानावरची पात्र जीवंत होत असतात.. एक दिवस लेखक लिखाण संपवतो तेंव्हा त्या पानाच्या पुढच्या पानात कर्ण आणि अर्जूनाची लढाई होणार असते.. तेंव्हा कर्ण इतिहास बदलायचं ठरवतो आणि अर्जूनाला ठार मारतो.. त्याच वेळेस त्याला रेडिओवरची बातमी ऐकु येते की पुस्तकाचा लेखक मरण पावला आहे..
|
Jayavi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 3:14 am: |
| 
|
योग! Terrific! अरे, काही कळलंच नाही रे शेवटपर्यंत.
|
योग सुपर्ब मलाही शेवट एकदम नवीन होता...
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:33 pm: |
| 
|
योग, मला खुप आवडले. असे विचार करायला लावणारे लेखन करणे, जरा कठीणच असते, पण तु छान जमवलेस. आणि सगळे एकच पोस्टमधे आहे ते फार छान, कारण अश्या लिखाणात एक सातत्य हवे असते. मला खात्री आहे कि तु हे सगळे लिहिल्यानंतर परत परत वाचुन बघितले होतेस.
|
Chinnu
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:15 pm: |
| 
|
योग, लयी झ्याक लिव्हलसा. फ़लाट क्रमान्क एक, विमान क्रमान्क सत्तावीस सत्तर, नीळा शेपटा नीळा शेपटा....
|
Storvi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 6:12 pm: |
| 
|
मस्तं रे योग. twist जबरदस्त आहे
|
Kandapohe
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:42 pm: |
| 
|
सर्वाना स्वर्ग अगदी दोन बोटे उरला होता. >>> योग, सहीच लिहीले आहेस. मस्तच! 
|
Himscool
| |
| Thursday, July 13, 2006 - 1:03 am: |
| 
|
योग अप्रतिम कथा.. बटाट्याची चाळ आणि वर्हाडाची आठवण झाली...आणि शेवट तर क्लासच..
|
योग!अतिशय प्रगल्भ लिखाण! चाळ्- विचारसरणीचे अचुक वर्णन... शेवट फ़ारच वेग़ळा...
|
Chafa
| |
| Thursday, July 13, 2006 - 1:56 pm: |
| 
|
योग, मस्त आहे कथा! आणि "विमान अजूनही जमिनीवरच होते पण सर्वाना स्वर्ग अगदी दोन बोटे उरला होता." पासून सुरु होणार paragraph तर फार सुरेख लिहीलायस!
|
Moodi
| |
| Friday, July 14, 2006 - 4:29 am: |
| 
|
योग मध्यमवर्गीयांच्या मनातील भावनांचे अचूक वर्णन केलेस. शेवटाची थोऽडी कल्पना आली होती, पण वाईट पण वाटले.
|
Aj_onnet
| |
| Tuesday, July 25, 2006 - 9:34 am: |
| 
|
योग, सुन्न करतो शेवट!
|
|
|