|
Shriramb
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:15 am: |
| 
|
सर्वे जनाः सुखिनो भवन्तु त्याचं झालं काय, की सुम्या कुठलं तरी एक 'कार्पोरेट' ट्रेनिन्ग करून आला. आणि तेंव्हापासुन त्यानं एक भलतंच सुरू केलंय. तो सारखा लोकाना त्यांची मतं विचारत असतो. अगदी कशावरही. आता आम्ही काय पुणेकर आहोत? जगातल्या प्रत्येक स्थावरजंगम गोष्टीबद्दल अगदी ठाम मत असायला? पण हा ऐकतंच नाही! काय म्हणे तर, त्याला लोकांच्याकडून 'फीडबॅक' घ्यायचा असतो. म्हणजे अगदी कश्शाबद्दलही. परवा मला म्हणाला, "काय रे, तू परवा त्या सलून मध्ये गेला होतास ना? कसं आहे ते?" "ठीक आहे!" मी. "ठीक म्हणजे काय? एक ते दहा च्या स्केलवर तू त्याला कसा रेट करशील?" मी थोडा विचारात पडलो. तो न्हावी, साॅरी, सलूनवाला अगदीच काही वाईट नव्हता. एवढा काही ग्रेटपण नव्हता. म्हणून मी म्हणालो, "पाच!" "छे! इथेच तर तुम्ही चूक करता! कुठल्याही गोष्टीला रेट करताना आपण एक्सट्रीम रेटिंग दिलं पाहिजे. म्हणजे त्या फीडबॅकची व्हॅल्यू वाढते!" "म्हणजे?" "म्हणजे असं की जर तू पाचचं रेटिंग दिलंस तर त्या सलूनवाल्याला काही फीडबॅक मिळणारच नाही. त्याऐवजी जर तू दोन किंवा नऊ वगैरे म्हणालास तर त्याला कळेल, तो आता जे करतोय त्यातलं काय त्यानं अधिक केलं पाहिजे आणि काय कमी केलं पाहिजे. तुझ्या फीडबॅकचा त्याला काहीतरी उपयोग होईल!" "हो का? पण मी काही इथे 'केशकर्तन सल्ला केंद्र' उघडलेलं नाहिये!" मी जरासा चिडूनच म्हणालो. "अरे, असा चिडू नकोस! प्रत्येकाला जर योग्य तो फीडबॅक मिळाला ना, तर त्याचा त्याला खूप उपयोग होतो डेवलपमेण्टसाठी" मी गप्प राहिलो. "अरे, तीच तर खरी मजा आहे सर्वेची!" "सर्वेची म्हणजे?" त्याला survey म्हणायचं होतं हे पटकन माझ्या ध्यानात आलं नाही. "सर्वे म्हणजे सर्वे. पाहणी, जनमत चाचणी, ओपीनियन पोल वगैरे वगैरे!" "हं. पण त्यात मजा कसली आहे?" "मजा ही, की त्याला काॅन्ट्रिब्युट करणारा माणुस स्वतःचा अगदी थोडा वेळ देतो. पण त्याचा एकूण फायदा असा ह्यूज असतो!" त्या 'ह्यूज'ल एक झकास हेल देऊन सुम्या म्हणाला. "असा म्हणजे?" "म्हणजे जर त्या सलूनवल्याला तुझ्यासारख्या दहा लोकानी फीडबॅक दिला तर त्याला कळेल की आपण आपली डेवलपमेण्ट कशी करावी!" "हो, पण त्याचा मला काय फायदा?" "तुझा फायदा हा की पुढच्या वेळी तुला चांगली सर्विस मिळेल!" "बरं, बरं. आता उगाच माझं डोकं खाऊ नकोस. मला जायचंय!" मी कशीबशी माझी सुटका करून घेतली आणि तिथून पळ काढला. पण प्रकरण तेवढ्यावर थांबलं नाही. सुम्याला हळूहळू हा 'सर्वे'चा रोग 'चढायला' लागला. तो प्रत्येकाला फीडबॅक आणि सर्वे हे किती महत्वाचे आहेत ते पटवून द्यायला लागला. अर्थातच स्वतःच्या प्रत्येक गोष्टीबद्दल फीडबॅक मागणंही त्यानं चालूच ठेवलं. त्याच्या प्रश्नांची मजल, "माझ्या मिशीचा थिकनेस तुला कितपत आॅप्टिमम वाटतोय?" "शर्टाचं वरचं बटन लावलं नाही तर मी अधिक स्मार्ट दिसेन का?" "आमच्या मोलकरणीच्या इफिशियन्सीबद्दल तुझं काय मत आहे?" "आमच्या घरातला टीव्ही कुठे ठेवला की चांगला दिसेल?" इथंपासून ते अगदी, "माझ्या पायजम्याच्या रंगच्या चाॅईसबद्दल तुला काय वाटतं?" किंवा "मोज्याना साधारण किती दिवसांतून एकदा डीओ मारावा असं तुला वाटतं?" इथंपर्यंत पोचली. शिवाय त्याच्या ह्या 'फीडबॅक' मोहीमेमध्ये कसला भेदभाव नव्हता. त्यामुळे, एखादं पुस्तक विकत घेण्यापूर्वी, "तुमने 'सेव्हन हॅबिट्स आॅफ हायली इफेक्टिव पीपल' पढा है क्या?" हा प्रश्न तो एखाद्या रिक्षावाल्याला ज्या सहजतेनं विचारायचा, त्याच सहजतेनं उडपी हाॅटेल्यातल्या वेटरला, "गुलाम अली और जगजीत सिंग इन दोनोंको तुम पाचमेसे कितने मार्क्स दोगे?" असाही एखादा प्रश्न टाकायचा. (त्या वेटरनं त्याला, "गुलाम अली बोलेतो वो कुश्ती खेलता है वयीच ना?" अस प्रश्न विचारून एकदम 'एक्स्ट्रीम फीडबॅक' दिला होता!) एकदा तर त्यानं जिलेटच्या एका नव्या ब्लेडबद्दलचा फीडबॅक आमच्या आॅफीसातल्या 'हेच् सौभाग्यालक्ष्मी' नावाच्या एका तामिळ काकूना विचारला होता. (काकूंची नजर तेंव्हापासुन अगदी धारदार झालीय!) पण असे एखाददुसरे प्रश्न विचारून फारसा 'फीडबॅक' मिळत नाही, हे लवकरच त्याच्या लक्षात आलं. हल्ली तो परीपूर्ण असे 'सर्वे' डिजाईन करतो. त्यासाठी त्याला बरीच मेहनत (किंवा मगजमारी म्हणा हवं तर) करावी लागते. पण आता डेवलपमेण्ट हवी असेल तर काही तरी कष्ट घ्यायलाच हवेत ना? स्वतःच्या डेवलपमेण्टसाठी त्याने असे अनेक सर्वे बनवून ते लोकांच्याकडून भरून घेतले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय, सुम्याची हे सर्वे तयार करण्याच्या बाबतीत खूपच डेवपलपमेण्ट झालीय. गेल्याच आठवड्यात त्यानं आपल्या दूधवाल्याला आणि धोब्याला असे 'कस्टमर सर्वे'चे फाॅर्म तयार करून दिले. आणि त्यातून जो डेटा जमा होईल त्याचं ऍनालिसिस सुद्धा करून द्यायचं कबूल केलं. सुम्याच्या मते ह्या त्याच्या 'केस स्टडीज' आहेत. दूधवाला आणि धोबी इथंपर्यंत ठीक होतं, पण ह्या पठ्ठ्यानं आमच्या भाजीवाल्या मावशीलादेखिल सोडलं नाही. एक दिवस, मी नेहमीप्रमाणं थोडीफार भाजी घेतली, आणि मावशीला पैसे देऊन निघालो होतो, तेवढ्यात तिनं एक कागद माझ्यासमोर धरला आणि म्हणाली, "हे भरून द्या जरा." तो कागद म्हणजे सुम्यानं तिला बनवून दिलेला 'सर्वे फ़ाॅर्म' होता. त्यात खालील प्रश्न होते. ************************************************************************************ १. तुम्ही कोणती भाजी सर्वात जास्त खाता? अ. पालक ब. भेंडी क. दोडकी ड. श्रावणघेवडा ई. इतर (कृपया लिहा) २. खालीलपैकी कोणते विकार तुम्हाला वरचेवर होत असतात? अ. अपचन ब. बद्धकोष्ठ क. हगवण ड. इतर (कृपया लिहा) ३. भाजी आणणे आणि ती खाणे यात साधारण किती दिवसांचा अवधी जातो? अ. १ ते ४ ब. ५ ते ८ क. ८ ते १६ ड. भाजी वाया जाईपर्यंत ४. भाजी चिरण्यासाठी तुम्ही काय वापरता? अ. सुरी ब. चाकू क. कोयता ड. विळी ई. इतर (कृपया लिहा) ५. तुम्ही शिजवण्यापूर्वी भाजी धूता का? अ. हो ब. नाही क. इतर (कृपया लिहा) ६. जर प्रश्न क्रमांक ५ चे उत्तर 'हो' असेल तर तुम्ही भाजी धूता त्या पाण्याचे सरासरी तपमान किती असते? अ. १५ ते २० अंश सेल्सियस ब. २० ते २५ अंश सेल्सियस क. २५ ते ३० अंश सेल्सियस ड. मोजत नाही. ७. भाजी धुण्याच्या पाण्याचे तपमान मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर तुमच्या मते योग्य ठरेल? अ. तपमानमापक ब. थर्मामीटर क. सायकोमीटर ड. इतर (कृपया लिहा) ८. हरित्क्रांतीबद्दल तुमचे काय मत आहे? (कृपया चारपाच ओळीत संक्षिप्तपणे लिहा. आमचा मुख्य उद्योग भाजी विकणे हा आहे. तुमच्या कादंबर्या वाचणे नाही.) ९. वनस्पती ज्या क्रियेमधून हरितद्रव्य तयार करतात तिचे नाव काय? अ. हरितद्रव्य बनवण्याची क्रिया ब. पार्थिनोजेनेसीस क. फोटोजेनिक क्रिया ड. कुठं तरी वाचलं होतं हं! १०. आमच्या भाजीबद्दल तुमचे काय मत आहे? अ. चांगली ब. उत्तम क. अती उत्तम ड. महान ११. कृपया खालील माहिती भरा. अ. नाव: ब. वय: क. जन्मतारीख: ड. जन्मवेळ: ई. चष्म्याचा नंबर: फ. पॅन नंबर: ग. शिक्षण (झालेलं असल्यास): ह. व्यवसाय (असल्यास): सहकार्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा सेवेची संधी द्याल अशी आशा करतो! ***************************************************************************** मी तो फाॅर्म पाहिला मात्र आणि मावशीची भाजी तिथेच टाकून तिथून धावत सुटलो. सुम्याचा दूधवाला, धोबी, पेपरवाला या सर्व लोकांपासुन मी शक्य तितक्या दूर असतो. इतकंच काय, कित्येक महिन्यांत मी त्या 'सलून' ची पायरीदेखिल चढलेलो नाही! सुम्या हल्ली आपल्या नव्या, 'काॅर्पोरेट सर्वेज' डिजाईन आणि इंप्लिमेंट करणार्या कंपनीचे नाव काय असावे याविषयी लोकांचे 'फीडबॅक' घेतोय!
|
Psg
| |
| Thursday, April 27, 2006 - 3:06 am: |
| 
|
छान लिहिलय! निखळ करमणूक आणि नवा विषय. आवडल..
|
.. .. .. ... ... .
|
Milindaa
| |
| Thursday, April 27, 2006 - 5:23 am: |
| 
|
'स्टॅटिस्टिक्स मराठे' ची आठवण झाली
|
झकास लिहिलस रे! तुझी पेशन्स महान! मला पण यस्जीरोडच्या मेम्बरान्चा सर्वे करायचाय! DDD
|
Maitreyee
| |
| Thursday, April 27, 2006 - 6:36 am: |
| 
|
मस्त विषय आहे, छान लिहिलय 
|
Mi_anu
| |
| Thursday, April 27, 2006 - 6:47 am: |
| 
|
सुंदर!! खूपच आवडले. कार्पोरेट ट्रेनिंग चा परिणाम होतो खरा. कालच आमच्या घरात 'कार्ल्याची भाजी इतकी का उरली' यावर ५ व्हाय सर्वेक्षण्करायचे घाटत होते ते आठवले..
|
भाजी धुण्याच्या पाण्याचे तपमान मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर तुमच्या मते योग्य ठरेल? अ. तपमानमापक ब. थर्मामीटर क. सायकोमीटर ड. इतर (कृपया लिहा) सायकोमिटर. छान सर्व्हे केला आहेस.
|
Chinnu
| |
| Thursday, April 27, 2006 - 9:52 am: |
| 
|
राम एकदम सही लिहीलस..
|
Anilbhai
| |
| Thursday, April 27, 2006 - 10:32 am: |
| 
|
काकूंची नजर तेंव्हापासुन अगदी धारदार झालीय>> सही है भिडु
|
Ldhule
| |
| Thursday, April 27, 2006 - 10:38 am: |
| 
|
छान लिहिलय. कुठच्याश्या ई-वर्तमानपत्रात बातमी खाली फिडबॅक मागवलेला असतो. वर दु:खद बातमी आणि खाली.. तुम्हाला ही बातमी कशी वाटली. उत्तम, साधारण....
|
Asami
| |
| Thursday, April 27, 2006 - 11:35 am: |
| 
|
जबरदस्त रे. मजा आली
|
Seema_
| |
| Thursday, April 27, 2006 - 11:46 am: |
| 
|
मस्त . आवडल एकदम . वेगळ काहीतरी .
|
तुम्हाला हे लिखाण किती आवडलं... १. मनापासून. २. ३. खी. खी. खी. खी... ४. इतर (कृपया 3/4 शब्दात नीट लिहा... तुमचे सर्वे वाचणे हा आमचा धंदा नाही )
|
Ninavi
| |
| Thursday, April 27, 2006 - 3:07 pm: |
| 
|
' ४. कुठेतरी वाचलं होतं हं..'

|
Polis
| |
| Thursday, April 27, 2006 - 6:15 pm: |
| 
|
च्यामारी, काय बेष्ट लिहीलय.. बरं ते admin team मधले लोक उगा काय त्यान्चा survey and research आम्च्या कपाळी मारतात त्यो बी यातलाच प्रकार काय..? 
|
Kandapohe
| |
| Thursday, April 27, 2006 - 10:24 pm: |
| 
|
'एक्स्ट्रीम फीडबॅक'>>> हेच् >>> (कृपया लिहा)>>> नुसते ऑप्शनला गोल करून चालणार नाही. आता आम्ही काय पुणेकर आहोत? >>> मजा आला. पुणेकरांवर टीका केली की विनोदी साहित्याला वजन येते का? यावर एक सर्व्हे केला पाहीजे.
|
Shriramb
| |
| Thursday, April 27, 2006 - 11:10 pm: |
| 
|
धन्यवाद मंडळी! ... ...
|
खि खि खि... झकास लिहिलंय! त्या वेटरनं त्याला, "गुलाम अली बोलेतो वो कुश्ती खेलता है वयीच ना?" अस प्रश्न विचारून एकदम 'एक्स्ट्रीम फीडबॅक' दिला होता!>>>>>>> 
|
Suniti_in
| |
| Thursday, April 27, 2006 - 11:44 pm: |
| 
|
मस्तच लिहिले आहे. भाजीवालीचे सर्वे प्रश्न सहीच आहेत.
|
|
|