वाड्याच्या दारातून पळत येताना बैठकीत पोहोचेपर्यंत तान्याला दम नव्हता. 'बाबासायब बाबासायब बाबासायब' 'आरे हो हो. आहेत, आत टिव्ही बघतायत. काय तो फ़्याशन वीक चालू आहे ना? ' तान्याला परत हसू फुटलं. च्यायला वयनी हितं तुळशीला प्रदक्षिणा घालत्यात आन् बाबासायब निवांत माव्याची गोळी लावून फ़्याशन वीक बगत्यात. जाऊ द्या कहानी घरघर की आणि काय. तो अंगण ओलांडून बैठकीत शिरला. बाबा बबडे मन लावून टिव्ही बघत बसले होते. तान्यानं हाळी दिली तसं मान पण वर न करता त्यांनी त्याला बसायची खूण केली. 'आवो बाबासायब टिव्हीवरचा फ़्याशन वीक राहूदी बाजूला. बातमी तर ऐका. त्या दादा दबड्याचा फ़्याशन वीक झालाय सकाळी सकाळी.' 'म्हन्जी?' रिमोटला हात घालत बाबांनी विचारलं. 'आवो त्यो चालला होता तरातरा पक्षकार्यालयात तर धोतार अडकलं नव्हं का पायात. जी फजिती व्हायची येळ आली. त्यातनं बाजाराचा दिवस. आन् मंग काय संभ्यानं वाचिवलं मागनं येऊन. ' 'आयला या संभ्याच्या. काय गरज हुती मधी तडमडायची. चांगली मज्जा झाली असती का न्हाय इलेक्षनच्या टायमाला. ' 'तरी पन लई लोकांन्ला म्हायती पल्डं. बाया तर समद्या तोंडाला पदर लाऊन लाऊन हसत हुत्या' ' ब्येस झालं. लई उड्या मारत हुता. इलेक्षन जवळ आलं का धोतर नेसतोय आन् इतर येळंला मारं सफारीत हिंडतोय. ही असली नाटकं क्येली की आसंच हुनार. चांगली रंगीत तालीम झाली त्याची. मी आन् तो एकाच कालेजात शिकलो. पन मी हितल्या लोकांची नाडी ओळकली. हितं शुद्ध भाषा आन् इस्त्रीची कापडं यांचा काय उप्योग न्हाई. पन गड्या त्या धोतरानं काम पूर्न कराय पायजे हुतं बग' बाबा विचार करत पुढं म्हणाले. 'चला सकाळी सकाळी चांगली बातमी आनलीस. राणीसरकार चहा धाडा दोन हिकडं' संध्याकाळच्या बैठकीची वेळ. बाबा बबड्यांना पक्षकार्यालयाची गरजच नव्हती. सगळ्या बैठका त्यांच्या घरीच होत. अंगणात. त्याप्रमाणं ते आरामात आरामखुर्चीवर रेलले होते. बाजूला त्यांचे नुकतेच बीएसी ऍग्री करून आलेले चिरंजीव संग्रामसिंह बसले होते. बाकीची मंडळी मिळतील त्या खुर्च्या पटकावून बसली होती. आता नवीन उगवणारी मंडळी सतरंजीवर आसन जमवत होती. तान्या पळत पळत आत आला. आयला बैठकीची येळ साडेपाचाची आन् सव्वापाचला कोरम फुल. ही युक्ती बाबा बबड्यांचीच. आधी त्यांनी खुर्च्या कमी करून टाकल्या आणि मग सतरंजीची साईज पण लहान केली. ह्ये म्हन्जी त्या शिकवणीच्या मास्तराच्या घरी म्होरची जागा मिळवायला लौकर जावं तसं करायल्यात लोकं पन. जाऊ द्या. इति तान्या. तो सरळ जाऊन बाबासायबांच्या पायागती बसला. 'बाबासायेब आवं त्या दादा दबड्यांचं ..' बाबा बबडे खुर्चीत एकदम सरळ झाले. आणि त्यांच्या चेहर्यावर पुन्हा हसू उमटलं. आत्तापर्यंत बैठकीत नवीन आलेल्या प्रत्येकाला त्यांनी ही गोष्ट जमेल तितकी रंगवून सांगितली होतीच. ' त्या फ़्याशन वीक मुळं चांगलं फावलंय.' तान्या धापा आवरत म्हणाला. ' ऑ' बाबा म्हणाले. पण मुरलेले राजकारणी असल्यानं त्यांच्या लक्षात आलंच लगेच. ' व्हय ना. त्याचं चांगलं माऊथ पब्लिकेशन व्हाय लागलंय नव्ह का.' 'माऊथ पब्लिकेशन?हां हां माऊथ पब्लिसिटी' इति संग्रामसिंह. 'त्येच त्येच माऊथ पब्लिशिटी. एकदम टीआरपीच वाडलाय की त्यांचा. जितं बगावं तितं लोक ह्येच बोलायलेत. आदी सुरवात हुती त्या धोतराच्या गोष्टीनं पन श्यावाट मातूर पन काय का असंना मानूस सज्जन हाय. ब्येरकी न्हाई. आन् आपल्या लोकांसाटी लई काम करतोय. असा हुतोय नव्ह का. ' हे मात्र खरं होतं. बाबा बबडे विचारात पडले. दादा दबडे दर वेळी निवडणूक हरत असले तरी मतांची गॅप मात्र दरवेळी कमी होत चालली होती. मागच्या वेळी तर अगदी हातातोंडाशी गाठ बसली होती म्हणा ना. पूर्वजांच्या पुण्याईचं खातं आटत चाललं होतं. आता यावेळी मागच्या वेळचं मतांचं नुकसान भरून कसं काढायचं याचाच बाबा बबडे सतत विचार करत. आता तर डोक्याच्या सिपियू मधे तेवढी एकच प्रोसेस व्हायला लागली. रात्री बराच वेळ ते अस्वस्थपणे जागे होते. सकाळी उठले तरी त्यांचा चेहर्आ नेहमीसारखा प्रसन्न नव्हता. तान्या उंबरा ओलांडून आत आला तेंव्हा ते विचारात गुंग होते. 'बाबासायेब. चिंता सोडा. आपून बी आपला टीआरपी वाडवायचा.' 'त्यो कसा म्हनं?' ' आपन बी फ़्याशन वीक करायचा.'
|
'त्या दादा दबड्यासारखा? पन असं मुद्दामून कसं जमनार म्हनं? आपल्याला न्हाई बा जमायचं. त्यातून परत येळेवर कुनी मागून येऊन निस्तरलं न्हाई तर भलतीच फजिती व्हायची.' 'तसा न्हाई बाबासाहेब. खराखुरा फ़्याशन वीक. ' ' म्हन्जी त्यो टिव्हीत दाकवला तसला?' 'हां तसाच.' 'आन् आपल्या गावात? कोन करनार?' तरी बाबासाहेबांच्या चेहर्यावर हळूहळू समाधान दिसू लागलं होतं. 'पैका लागतोय आन् काय? बाकी काय डोकं असतंय का त्यात? ' 'हं. पैशाची चिंताच सोड' बाबासाहेब म्हणाले. 'पण बग बाबा जमतंय का कसं. नीट बगून, आढावा घिवून सांग मला.' तान्यानं विचार केला. तसं काय अवघड नव्हतं खरं. हल्ली गावातल्या पोरीबी काय काय फ़्याशन करत्यात. ते बंटी बबली सटाईल, आन् जस्सी सटाईल चे ड्रेस शिवून घेत्यात. एवढं कशाला लगीन झालेल्या बायका पन कुछ कुछ होता है श्टाईल साड्या नेसत्यात. कुटल्या कुटल्या शिरियली बगून तसल्या टिकल्या लावत्यात, दागिने घालत्यात. मागच्या आठवड्यात तो संभ्याच्या घरी गेला तर त्याची बायको हे यवढे दगिने अंगावर चढवून सैपाकघरात काम करत होती. 'संभ्या सत्यनारायण हाय का रं घरी? सांगितलं न्हाईस. ' 'कसला सत्यनारायन करतुयास लेका. पन तुला असं का वाटलं.' 'न्हाई. म्हन्जी वयनी... त्ये...' 'हां हां त्ये होय. आरं त्ये सांस भी कभी बहू थी का काय न्हाई का त्यात बायका घालत्यात म्हनं. काय घातले तर झिजत्यात का. आन् ठिवून तर काय वर न्यायचेत? ' संभ्या जणू बायकोचेच ड्वायलाक बोलला. परवा तान्याच्याच बायकोनं कपाळावर भला मोठा नाग काढला होता. आन् खरा नाग बघून पडणार नाही इतका तो गार पडला होता. त्याला एकदम पोपटी रंगाची आठवण झाली. आणि तो तडक पोपटी रंगाकडं गेला. रंगराव पोपटी हा त्याचा जिवाचा मैतर होताच. आणि आज त्याच्याकडं महत्वाचं काम पण होतं. रंगा लेडीज टेलर होता. दुकानात नेहमीसारखीच रंगीबेरंगी गर्दी होती. शिवाय त्या गर्दीचा चिवचिवाट चालू होता. तान्याला बघितल्यावर रंगा गळ्यातली टेप असिस्टंटच्या गळ्यात अडकवून बाहेर आला. 'च्यायला मजा आहे बे रंगा तुझी. सगळीकडं नुसतं रंगीत बर्फाचे गोळे असल्यागत वाटत असंल ना.' 'आयला कसली मजा? कावून गेलोय मी. निस्तं डोस्कं खातात या बायका. त्या रंगीत बर्फाच्या गोळ्यात बसून बसून हुडहुडी भराय लागलिय मला. एका एका ड्रेसाला आणि एकेका ब्लाऊजला तास तास लावत्यात. प्रत्येकीला आपलं आधी ऐकावं वाटत असतंय. जाऊ दे तू बोल. काय काम काडलं का सहजच? ' 'काम हुतं गड्या.' मग तान्यानं सगळी टेप परत वाजवली. 'बघ मर्दा. पैशाची चिंता न्हाई. वर आनि ड्रेस बी त्यानलाच मिळत्याल' 'तू काय बी काळजी करू नको. मी माझ्या कष्टंबरांनाच इचारतो. आरं एक का समद्या तयार हुतील. ' तान्या स्वतःच्या हुषारीवर खूष होत लगेच वाड्यावर पोचला. बाबांसमोर सगळा पाढा वाचला. 'रंगा म्हन्तोय की एक का गावातल्या समद्या बायका तयार हुतील.' 'समद्या बायकास्नी घिवून काय सामुदायीक इवाह सोहळा करायचाय का ज्ञानेश्वरी सप्ताह? आरं थोड्याच बायका पायजेत. त्या बी धीट आन् नीट चालाया येनार्या. जरा दिसायला बी बर्या पाहिजेत. म्हंजी अगदीच सोळा हजारात देकनी नसली तरीबी..' 'आता नीट चालाय येनारी म्हंजी कशी म्हनायची. तसं गावात एकदोन बाया सोडल्या तर बाकीच्या बायांच्या पायात काय दोष न्हाईच' एवढं बोलून रंगानं जीभ चावली. वयनीसायेबच थोडं लंगडत चालत्यात. आता बसतोय टाळक्यात जोडा. पण बाबा बबड्यांचं तिकडं लक्ष नव्हतंच. 'हे बग एक काम कर. त्या पोपटी रंगाच्या दुकानात बसत जा रोज थोडा वेळ. आन् बग जरा कोनती बाई आपल्या उपेगाला येती का ते. ' तान्याला घाम फुटला. हे असं दुकानात बाया बघत बिनकामाचं बसून र्हायला तर घरी जायची तर बंदी हुईलच पन गाव बी सोडावं लागंल. आपली बायको आन् त्या बायांचे नवरे दोन्हीबी कच्चं खातील आपल्याला. आणि पुन्हा एकदा तो पोपटी रंगाची मदत घ्यायला निघाला.
|
दुकानासमोर जाऊन त्यानं रंगाला खूण केली. पण रंगा यावेळी बाहेर आलाच नाही. त्यानं तान्यालाच उलटी खूण केली आत यायची. तान्यानं आत शिरायचा अवकाश सगळे रंगीत बर्फाचे गोळे त्याच्या बाजूला आले. 'ओ तानाजीराव. कशी दिसतिय मी.' ही त्या शिवाची बायको. रविना. तान्याला बोलताच येईना. तेवढ्यात सगरीणबाईची सून पांचाली म्हणाली, 'मी तुमाला चालूनच दाकवते. ह्ये बगा.' 'तानाजीभाऊ, माझा ड्रेस बराय का?' लंब्या जावड्याची पोरगी रेखा. आयला या बायका तानाजीराव म्हनत्यात अन् लगिन न झालेल्या पोरी तानाजीभाऊ. आन् शेरात यवडी स्त्री मुक्ती चालूय. तितं बायका नावं बदलून देत न्हाईत नवर्याला आन् ह्या बायका. हट्ट करकरून नावं बदलून घेत्यात. अंबिकाचं रविना काय. धुरपदाचं पांचाली काय. अवगडच झालंया सगळं. पण हे अवघड झालं असलं तरी त्याचं काम सोपं झालं होतं. बायका स्वतःच टेष्ट द्यायला तयार होत्या. 'ठिक हाय, ठीक हाय. आशी घाई नका करू. नीट ओळीनं चालत या. एकेक, एकेक. मग बगू.' बाबासाहेबांबरोबर राहून तान्या पण चांगला बेरकी झाला होता. स्वतःला सावरत त्यानं परिस्थितीचा ताबा घेतला. दहाबारा बायका बघून झाल्या नसतील तोवर निराळंच लचांड उभं राहीलं. त्याची अर्धांगिनी दुकानाच्या पायर्या चढत होती. आता काय करायचं हे अर्ध्या मिनिटात ठरवायला तो अजून बाबासाहेबांइतका तयार नव्हता झाला. बायको जवळ आली तसे त्याचे डोळे आपोआप मिटले, भितीनं. तर कानाजवळ कित्येक महिन्यांत न ऐकलेला ठेवणीतला आवाज ऐकू आला. 'आमी टेष्ट हितंच द्यायची का घरी दिली तर चालंल?' तान्यानं डोळे उघडले आणि मान वर करून तो म्हणाला 'नो पार्शालिटी. लायनीच्या शेवटी जाऊन हुबं र्हावा.' बायकोनं नाक मुरडलं पण बाकीच्या बायकांच्या चेहर्यावरून कौतुक निथळू लागलं. सगळ्या बायकांचं चालून होईपर्यंत दुपारचा एक वाजून गेला होता. आतापर्यंतचा रिपोर्ट द्यायला तो वाड्यावर पोचला तर बाबासाहेब दोनतीन माणसांबरोबर बोलत बसलेले. 'या तानाजीराव. ह्ये बगा कोन आलंया त्ये.' बाबासाहेब आनंदानं म्हणाले. चेहरे तर ओळखीचे दिसेनात. गावाबाहेरची कोणतरी माणसं असतील तर त्याची ओळख बाबासाहेब माझ्याशी का करून द्यायला लागलेत? 'ह्ये कोन?' 'आवं ह्ये ओढ्यापलिकडल्या गावातले टेलर हायेत. लेडीज टेलर. त्यांना बी आपली डिजाईन्स ठेवायची हायत म्हणं आपल्या फ़्याशन वीकमधे.' तान्यानं मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. ' मग तानाजीराव. कदी येता आमच्या गावी टेष्ट घ्यायला? नुसतं सांगा. कपडे, माडेल सगळं तयार ठिवतो. निस्तं या आन् टेष्ट घ्या. कसं?' त्यातलाच टोपीवाला माणूस म्हणाला. दिवस मावळतीला तो घरी पोचला तर दारातच बायको उभी. आत पाऊल टाकायच्या आधीच कोंबडीच्या रश्याचा वास दरवळला. ' कवापासून वाट बगतोय आमी.' बायको लाडात येऊन म्हणाली. ' आसं का? ' तो खुशीत येऊन म्हणाला. आत पाऊल टाकतो तर पुढच्या खोलीतच सात आठ शेजारच्या बायका बसलेल्या. हळदीकुंकू असेल, सरळ आत जावं अंगावरनं तर बायको म्हणाली ' आवं तुमच्याकडंच आल्यात माझ्या मैतरनी.' आता तान्याला पण बर्फाच्या गोळ्यांनी हुडहुडी भरायला लागली होती. असे दिवस चालले होते. एक दिवस रात्रीचं वाड्यावरून बैठक आटपून परतताना त्याला दादा दबडे भेटले. त्याची वाटच बघत होते जणू. 'तानाजीराव' दादा दबडे अजिजीनं म्हणाले. गेल्या पंधरा दिवसात तान्याला कुणी तान्या म्हणून हाकच मारली नव्हती. 'बोला दादासाहेब.' तान्या पण वाकून हात जोडून नेत्यासारखं म्हणाला. ' कायतरी जमवा बाबा. आपल्याला बी करायचा फ़्याशन वीक. तुमी निस्तं आर्डरी द्यायला या. बाकी लई कारेकर्ते हायेत आपल्याकडं कामं करायला.' 'ऑ. आवो दादासाहेब. एका गावात दोन दोन फ़्याशन वीक?' ' आन् मंग काय झालं? एका इंडियेत दोन फ़्याशन वीक हुत्यात तर आपल्या गावात का नगं?' आणि तान्याला एकदम सात कांबरुनं घेतली तरी जानार न्हाई अशी थंडीच भरून आली. समाप्त
|
Dineshvs
| |
| Sunday, April 02, 2006 - 12:25 pm: |
| 
|
संगाच्या मैतरिनीनु, त्या फ़्याशन वीकचं काय फोटुबिटु काडल्यालं असत्याल का न्हाई. त्ये बी वाईच दाकवा कि समद्यास्नी.
|
Champak
| |
| Sunday, April 02, 2006 - 1:40 pm: |
| 
|
सन्मी!!
|
मित्रा मस्तच लिहीले आहेस. नुकतेच एका मॉडेलची त्रेधा उडली फ़ॅशन वीक मधे. पण त्या बाईचे प्रसंगावधान मानायला हवे. हे विनोदी साहीत्यमधे हलव. 
|
मित्रा .. .. .. .. ..
|
Himscool
| |
| Monday, April 03, 2006 - 6:05 am: |
| 
|
लई ब्येस जमलीय फ्याशन वीकची पूर्व तयारी
|
Meenu
| |
| Monday, April 03, 2006 - 7:35 am: |
| 
|
फ्याशन विक झक्क ग मैतरनी
|
Charu_ag
| |
| Monday, April 03, 2006 - 7:49 am: |
| 
|
सन्मे, सुसाट सुटलीय की तुझी गाडी. लै मजा आली बघा फ़्याशन वीक मधी. रविना, पांचाली .... ... ..
|
Chinnu
| |
| Monday, April 03, 2006 - 9:11 am: |
| 
|
सन्मी वतावरण सही सही उभं केलस. मस्त ग..
|
Dha
| |
| Monday, April 03, 2006 - 9:28 am: |
| 
|
संघमित्रा, लई ब्येस!! कान्दापोहेनी सान्गितले तसे खरच विनोदी सहित्यात हलव
|
सन्मे सुटलीयेस अगदी...!
|
Maanus
| |
| Monday, April 03, 2006 - 1:08 pm: |
| 
|
या बया... काय म्हणाव ह्या संघमित्रेला.
|
Rajkumar
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:43 am: |
| 
|
लय भारी गं सन्मे..
|
Gajanan1
| |
| Tuesday, April 04, 2006 - 1:27 am: |
| 
|
झ्याक हाय. यन्दाच्या दिवाळी अन्कात शन्कर पाटलान्च्या ष्टाईलमध्ये mp3 audio करून टाका.
|
Coldfire
| |
| Tuesday, April 04, 2006 - 4:48 am: |
| 
|
ह्यो फ़्याशन शो खरच गावागावात गेला तर......... लई धमाल होईल हो....सही सन्घमित्रा..
|
लई बेस हाय हा फ़्याशनवीक...
|
Arun
| |
| Tuesday, April 04, 2006 - 6:36 am: |
| 
|
मस्त लिहिलं आहेस सन्मी ........
|
Puru
| |
| Tuesday, April 04, 2006 - 6:37 am: |
| 
|
अतिशय सुरेख शैली आहे! Keep it up!!
|
Charu_ag
| |
| Tuesday, April 04, 2006 - 6:55 am: |
| 
|
सन्मी, आता पर्यंत दोन वेळा तरी तुझी कथा वाचली. लिहीण्याची शैली ओघवती आहे यात शंकाच नाही. पण सगळ्यात जास्त काय आवडले तर वातावरण निर्मीती. कथा संपली तरी पात्रे मनात घोळत राहतात. यावर टी.व्ही. वर एखादा एपिसोड होऊ शकेल. (मागे एक सिरीयल यायची, नाव विसरले. संजय बेलोसे ने काम केले होते त्यात. या तान्याच्या भुमिकेत फ़िट होईल बघ तो. ) पंचलाईन्स तर सुरेखच. बर्याच दिवसानी अश्या ढंगाची कथा वाचायला मिळाली. वाचल्याक्षणी काय वाटले ते आधीच्या प्रतिक्रियेत लिहीले आहेच, पण वाचल्यानंतर काय वाटले ते लिहील्यावाचुन रहावले नाही.
|
मी लिहीलेल्या पहिल्याच गोष्टीला इतक्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार दोस्त्स. गोष्ट लिहायची खूप इच्छा होती पण होतच नव्हते. आणि काहीतरी लिहून टाकण्यात अर्थ नव्हता. ही जमली आणि मायबोलीवर टाकण्याच्या लायकीची आहे असं वाटलं. तुम्हाला आवडली यात सगळं आलं. चारू थॅंक्स गं. तू म्हणतीयस ती सिरियल भोकरवाडीची चावडी तर नव्हे?
|
सन्मी, अफ़लातून लिहिलंयंस. मान गये.
|
Seema_
| |
| Tuesday, April 04, 2006 - 11:26 am: |
| 
|
मस्त लिहिलय हं अगदी , 
|
सन्मी, एकदम मिरासदार स्टईल.
|