|
Dineshvs
| |
| Monday, April 10, 2006 - 12:27 pm: |
| 
|
नापणे, ग. बावडा आणि उन्हाळे गिर्या पुण्याला शिफ़्ट झाल्यापासुन, मी बहुतेक दर महिन्याला त्याला जाऊन भेटलोय. अर्थात ती मी माझी गरज म्हणुन जायचो, पण त्याला मात्र प्रत्येकवेळी मी तुझ्यासाठीच आलोय, असे सुनवायचो. ईतकेच नाही तर, प्रत्येक भेटीची त्याच्यावर पेनल्टी चढवायचो. तो बिचारा खाली मान घालुन माझे निमुट ऐकून घ्यायचा. शेवटी हे माझे ईमोशनल ब्लॅकमेलींग फळाला आले, आणि त्याचा परवा अचानक फोन आला, कि मी येतोय तिकडे म्हणुन. त्याबरोबर माझे भटकंतीचे प्लॅन्स सुरु झाले. तो सकाळी आल्यावर त्याच्या आवडीचा ब्रेकफ़ास्ट त्याला दिला आणि सांगितले आता आराम कर आपण संध्याकाळी बाहेर जाणार आहोत. तो मला कुठे, असेसुद्धा विचारत नाही कधी. दुपरी परत एकत्र जेवलो आणि त्याला म्हणालो, तीन वाजता ऑफ़िसमधे सॅकच घेऊन ये. तो ईकडे असताना, त्याची बाईक होती, तिने आम्ही भटकायचो, आता एखादी बाईक भाड्याने घ्यायचे ठरवले. त्या बाईकवाल्याकडे आम्ही गेलो, आणि गिर्याला म्हणालो हवी ती सिलेक्ट कर. तिथली बजाज अव्हेंजर तर कुणालाहि भुरळ पाडेल अशीच होती. ( गिर्याच्या भाषेत झिनचॅक बाईक. ) तिच ठरवली. भाडे अगदीच माफक होते. त्या बाईकवाल्याला पण असे वाटले की आम्ही कलंगुट बीचला वैगरे जाणार आहोत, त्याला आम्ही त्या गोड गैरसमजातच ठेवले. साधारण सन्ध्याकाळी पाच वाजता पणजीहुन निघालो. ( या नावाचे पणजी ( मराठी ) , पोणजी ( कोकणी ) पंजिम ( पोर्तुगीज ) आणि पानाजी ( कानडी ) असे चार उच्चार प्रचलित आहेत. ) आमच्या बाईकमुळी चार्चौघींच्या नजरा आमच्याकडे वळत होत्या. सात वाजता सावंतवाडीला पोहोचलो, तिथे मोती तलावाच्या काठी जरा कॉफी प्यायला थांबलो. पुर्वी तिथे आमचे एक हक्काचे घर होते. योगेश ( मायबोलीकर मैतर ) आणि ऋचाताई यांचे. आता ते पुण्याला गेलेत. त्याची आठवण काढली, आणि त्याना फोन करुन तसे कळवलेहि. रात्र व्हायच्या आत जितका पल्ला गाठता येईल, तितका गाठावा म्हणुन पुढे निघालो. रात्री आठ वाजता, कणकवलीच्या जवळपास पोहोचलो. तिथे कनक नावाचे हॉटेल दिसले, तिथे रात्रभर थांबायचे ठरवले. हॉटेल बर्यापैकी स्वच्छ आणि रिझनेबल होते. जेवुअन नेहमीप्रमाणे एक फेरी मारली आणि झोपुन गेलो. सकाळी पाच वाजताचा गजर लावला होता. हॉटेलचा परिसरहि रम्य होता, मागुन एक नदी वहात होती. मालक अगत्यशील होते. जरा चकशी केली तर ते कोल्हापुरचे भोसलेच निघाले. अरेच्च्या मग आमच्यापैकीच कि, असे ऊद्गार मी काढले. ( हा बादरायण संबंध नाहि बरं का, माझ्या आईचे माहेरचे आडनाव भोसलेच. ) सात वाजताच आम्ही निघालो. गिर्याची तयारी होईपर्यंत मी नदीवर जाऊन आलो. कार्वंदाच्या जाळ्या ओरबाडल्या. कच्छी तर कच्ची, मला चालतात. या वर्षी अगदी आश्चर्यकारकरित्या, गोव्यातली हवा ( अजुनतरी ) थंड आहे. ( नाहितर या दिवसात ईतके ऊकडते, कि. अंगावर कपडे ठेवावेसे वाटत नाहीत. आता याचे हे आणि फक्त हेच कारण आहे, लोक काय, काहिहि बोलतात. ) त्यामुळे सकाळी हवेत सुखद गारवा होता. आमचा प्रवास मुंबई पणजी हायवे वरुन होता, त्यामुळे रस्ता तर सुरेख होताच. शिवाय या भागाची खासियत म्हणजे, डोंगर, दर्या आणि वळणे. आणि सोबतीला जंगल. जंगलाचा म्हणुन एक गंध असतो. त्याची अखंड सोबत होती. रातकिडे पण अजुन कुरकुरत होती. या दिवसात तशी फारशी फ़ुले नसतात. पळस, पांगारा कधीचाच साज ऊतरवुन बसले आहेत. कौशी मात्र वेड्यासारखी फुलली आहे. तिचे नाजुक केशरी गुच्छ हिरवाईत ऊठुन दिसत होते. कुंभी ची पांढरी फुले पण होती, पण या फुलांच्या गंधाला सुगंध म्हणता येणार नाही. ( साधारण नासलेल्या दुधाचा वास असतो हा, पावसाच्या सुरवातील तर ईतका असह्य होतो, कि झाडाजवळुन नाक मुठीत घेऊनच जावे लागते. ) कुंदा आणि कुडा ची पांढरी फुले मात्र सर्वत्र होती. या महामार्गावर्च्या तळेरे गावी आम्ही पोटपुजा केली. कारण तिथुन आमचा मार्ग बदलणार होता. आम्ही लहानपणी कोल्हापुरहुन मालवणला जात असु, तेंव्हा फोंडा घाटातुन, राधानगरी मार्गे बस जात असे. आता तो मार्ग तितकासा वापरात नाही. पुणा, कोल्हापुरहुन गोव्याकडे येणार्या बहुतेक गाड्या, गगनबावडा, करुळ, वैभववाडी मार्गे तळेरे ला येऊन, गोवा हायवेला येतात. दोनच आठवड्यापुर्वी, ईथे एक बारमाहि धबधबा आहे, असे मी साप्ताहिक सकाळ मधे वाचले होते. आमचे पहिले धेय ते होते. त्या साप्ताहिकात, तो धबधबा, करुळचा घाट जिथे सुरु होतो, तिथे तो आहे असा उल्लेख होता, प्रत्यक्षात मात्र तो जरा आधी लाअग्तो. तळेरे एस टी स्टॅंड समोरुन, गोव्याकडुन मुंबईकडे जाताना एक ऊजवा फाटा, वैभववाडीकडे जातो, त्या रस्त्यावर तळेरे पासुन ७ किलोमीटरवर एक डावे वळन लाअग्ते, त्या मार्गावर तो आहे. त्यापुढे नापणे रेल्वे स्टेशनचा फाटा आहे व त्यापुढे रेल्वे क्रॉसिंग आहे. ( पुणे वा कोल्हापुरकडुन येताना, हा क्रम ऊलटा होईल. ) तिथे ऊभ्या असलेल्या रिक्षावाल्यांकडे वा गावात चौकशी करता येईल. त्या वळणावरुन आत शिरल्यावर, आणखी काहि वळणे घ्यावी लागतात, त्यामुळे अशी चौकशी करुनच पुढे जावे. रस्ता तितकासा चांगला नसला तरी पक्का आहे. त्यामुळे चारचाकी गाड्या जाऊ शकतात. तो परिसर थोडा ओसाड व थोडा हिरवा असा आहे, पण या भागात असा एखादा धबधबा असेल, असे मात्र वाटत नाही. या रस्त्यावर अगदी शेवटी एक घर लागते. तिथुन ऊजव्या बाजुला बांधीव पायर्या ऊतरुन थेट नदीच्या पात्रात ऊतरता येते, तिथे एक छोटा धबधबा आहे. साधारन ५ फुटावरुन पाणी कोसळते तिथे. पण मुख्य आकर्षण जरा पुढे आहे. तिथुन शांभर पावले पुढे गेलो कि, वरुन तो सुंदर धबधबा दिसतो. आपण अगदी वरुन तो धबधबा बघतो. आणि त्याचे आवतण टाळताच येत नाही. आपण ऊभे असतो तिथुन साधारण ५० फुट खाली तो डोह आहे, व तिथे ऊतरायला एक सोपी वाट आहे. ती ऊतरुन गेल्यावर तो समोरच आहे. साधारण १५ फुटांवरुन पाणी कोसळते. एकंदर तीन भाग आहेत. याची खासियत म्हणजे तो बारमाहि आहे. ( ऐन एप्रिलमधे तो आहे, म्हणजे बघा. ) या धबधब्याच्या जवळहि जाता येते. पाणी बघुन मला राहवलेच नाही, मी पाण्यात ऊतरलोच. गिर्याला मात्र फोटो काढण्यात जास्त रस होता. त्याने काहि क्लिप्स पण घेतल्या. अर्धा पाऊण तास आम्ही तिथे रेंगाळत होतो. तो सगळा परिसर आम्हाला आंदण दिल्यासारखा होता. आमच्याशिवाय तिथे तिसरे कुणीच नव्हते. तिथे रहायची व जेवणाची वैगरे सोय आहे. वरती काहि मंडळी आनंद करत होती. आता असतात प्रत्येकाचे आनंग वेगळे. गोव्यातल्यापेक्षा तिथे हवा जरा गरम होती. मग आम्ही निघालो, परत मुख्य रस्त्याला लागुन गगनबावड्याच्या दिशेने निघालो. पुणे वा काल्हापुर ते गावा या मार्गावर माझा नियमित प्रवास होत असतो. प्रत्येकवेळी या शिखरावर असणारे छोटे मंदिर खुणावत असते. पण माझी त्या घाटातुन जायची वेळ ऐन मध्यरात्रीची असल्याने, तिथे जायचा योग आला नव्हता. कोल्हापुरच्या लोकांकडुन गगनबावड्याबद्दल खुपच ऐकले होते. कोल्हापुरात फिरताना ग. बावडा ( गगनबावडा ) आणि क. बावडा ( कसबा बावडा ) अश्या पाट्या असलेल्या बस कायम दिसत राहतात. पण आज फक्त तिथे जायचे म्हणुन निघालो होत. हा घाट साधारण १० किलोमीटरचा आहे. तिलारिच्या मानाने चढ तसा सोपा आहे, शेवटचे वळण सोडले, तर फारशी अवघड वळणेहि नाहीत. पण ऊन आणि पाऊस यांच्या मार्याने ईथे खुपवेळा दरडी कोसळत असतात. दोन वर्षांपुर्वी ईथला रस्ताच खचला होता. तो भाग दुरुस्त करणे पण कठीण गेले. पण खाजगी बसगाड्या त्याहि परिस्थितीत तिथुन जात येत होत्या. आता तो भाग दुरुस्त झालाय. या घाटाचे काहि छान फोटो आम्हाला मिळाले. ईथे एस टी स्टॅंडवर या दिवसात, छोटी जांभळे, करवंदे, काजु, पेरु, तोरणं असा छान रानमेवा मिळतो. आणि तो अगदी स्वस्तहि असतो. गोव्यात दहा रुपयाला मोजुन पंचवीस जांभळे मिळतात तर ईथे बारा रुपयाला भांडेभरुन मिळतात. ईथले पेरुहि पिवळे धमक व आतुन गुलाबी असतात. तिथुन दोन तीन किलोमीटरवर गगनगड आहे. थेटपर्यंत गाडीरस्ता आहे. अगदी शेवटी थोड्या पायर्या चढाव्या लागतात. त्या पायर्या चढता चढता माझ्या लक्षात आले, कि धबधब्यात माझा पाय मुरगळला आहे. पण तसाच वर गेलो. गेल्याच वर्षी ईथे काहि बांधकाम झालेय. घाटातुन चढताना अजिबात कल्पना येत नाही, कि ईथे एवढे बांधकाम असेल. गगनगिरी महाराजांची हि तपोभुमी. सध्या त्या गुहेत देखणे देऊळ आहे. रहाण्या जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. आणखी वर चढुन गेल्यार एक मोठे सभागृह आहे, आणि तिथुन आजुबाजेचे अत्यंत रमणीय दृष्य दिसते. हे स्थान तसे खुप ऊंचावर असल्याने, आजुबाजुचा बराच परिसर दिसतो. घाटरस्ते तर फारच छान दिसतात. दत्तगुरुंची आणि महाराजांची एक सुंदर मुर्ती आहे तिथे. तिथे आम्हाला एक घोरपडीचे पिल्लु दिसले. पुर्ण वाढलेली घोरपड बरिच मोठी असते, त्या मानाने अगदीच छोटी होती हि. आम्हाला तिचेहि फोटो काढता आले. तिथुन आणखी वर एक मस्जिद आहे. पण माझ्या दुखर्या पायामुळे, आम्हाला तिथे जाता आले नाही. गिर्याने माझा पाय चोळुन दिला, औषध लावले. मला ऊतरताना आधार दिला, कुठुनतरी काठी शोधुन आणुन दिली. आपले दुखणे विसरुन, ईतरांची काळजी करावी, हा त्याचा स्वभावच आहे, आणि त्याच्या या स्वभावाचा अनेक मायबोलिकरानी अनुभव घेतलाच असेल. पण पार्त ईथे यायचे मनसुबे आम्ही त्याचवेळी केले. एखाद्या पोर्णिमेच्या रात्री वा पावसाळ्यात ईथे रात्र काढलीच पाहिजे, असे आमचे मत झालेय. ( तुम्हीपण येणार ना ? ) तिथल्या आरतीला जरा अवकाश होता, म्हणुन आम्ही जेवणासाठी न थांबता खाली ऊतरायचे ठरवले. गगनबावडा, राधानगरी, मलकापुर अशी जी कोकण आणि पठार या सीमेवरची गावे आहेत, तिथले जेवण चांगलेच झणझणीत असते, ते आम्हाला दोघानाहि रुचण्यासारखे नसल्याने, आम्ही कोकणात ऊतरायचे ठरवले. परत येताना मात्र दुसरा मार्ग निवडला. करुळचा घाट जेंव्हा वाहतुकीसाठी बंद होतो, तेंव्हा त्याला पर्याय म्हणुन भूईबावड्याच्या घाट वापरतात. हा घाट मुंबई गोवा महामार्गावरच्या खारेपाटण गावात ऊतरतो. या घाटातुन मी पुर्वी गेलो होतो, त्यामुळे परत जायची ईच्छा होती. तसा हा घाट जरा कमी वाहतुकिच आहे. राजापुर कोल्हापुर मार्गावरच्या बसेस याच मार्गाने जात असल्या तरी रस्ता, जरा अरुंद आहे. ईथेहि दाट जंगल आहेच. या घाटातुन गगनगड कायम दिसत राहतो, आणि आपण किती भराभर खाली ऊतरतोय ते जाणवत रहते. गोवा हायवे ईतका रस्ता चांगला नसला तरी, वाईटहि नही. वाटेवर भूईबावडा, उंबरडे अशी गावे लागतात. उंबरडे गावातुन वैभववाडीला जाता येते, पण तिथे न जाता आम्ही खारेपाटणच्या दिशेने निघालो. खारेपाटणला ऊंचावरुन एका नदीच्या चंद्राकृति वळणाचे सुंदर दर्शन घडते. पुर्वी कोकणातल्या बहुतेक नद्या ऊन्हाळ्यात कोरड्या पडायच्या, आता त्यात थोडेफार पाणी दिसते. खारेपाटणला एका हॉटेल मधे आम्ही जेवलो. गिरु खुप थकला होता. त्याला विश्रांतीची खुप गरज होती हे मला जाणवत होते. आपण परत गोव्याच्या दिशेने जाऊ, व कुठल्यातरी नदीकाठी आराम करु असे, मी सुचवुन बघितले. त्याने नेहमीप्रमाणे मान डोलावली, पण बाईकवर बसल्यावर मात्र ती राजापुरच्या दिशेने वळवली. राजापुरला जाणे हि माझी मानसिक गरज होती, आणि शेवटी तो माझा गिर्या असल्याने, त्याने ती न सांगताच ओळखली होती. खरे तर राजापुर आमचे मुळगाव. माझे आजोबा, नोकरीनिमित्त मालवणला स्थाईक झाले, व माझे वडील मुंबईत. मे महिन्याच्या सुट्टीत गावाला जायचे तर, आजोळच्या गावाकडे ( कोल्हापुर जिल्ह्यातले मलकापुर ) माझी जास्त ओढ असायची. मे महिन्यातहि तिथली हवा छान असायची. कोकणात तर असह्य ऊकाडा असायचा. आणि त्या दिवसातला एस्टीचा प्रवास, मला नकोसा व्हायचा. जुल्माच्या करारावर मी मालवणला जायला तयार व्हायचो. माझ्या वडीलाना मात्र राजापुरची खुप ओढ होती. तिथले गरम पाण्याचे झरे. गंगा, बाजारपेठ, धुतपापेश्वरच्या ते खुप आठवणी काढत. पण माझे कधीच जाणे घडत नसे. अगदी लहान असताना, म्हणजी मी ३ वर्षांचा वैगरे असताना, आम्ही तिथे गेलो होतो, त्यावेळच्या अंधुक आठवणी अजुनहि आहेत, त्या नंतरमात्र चाळीस वर्षे तिथे जाणेच झाले नव्हते. मुंबई गोवा मार्गावरच राजापुर आहे. माझे ईथे कायम येणेजाणे असल्याने, तो भाग बसमधुन खुप वेळा बघितला आहे. खरे तर माझी बस ईथुन भल्यापहाटे पास होते, पण तो अर्जुना नदीचा पुल आला कि मला आपसुक जाग येते. ईथे एकदा यायचे, असा ध्यास मला लागला होता. खारेपाटणहुन राजापुर जेमेतेम २० किलोमीटरवर आहे. या मार्गावर राजापुरच्या गंगेकडे जायचा फाटा लागतो. राजापुरची गंगा म्हणजे एक कौतुकाचा आणि अप्रुपाचा विषय आहे. तिथे १२ / १४ कुंडे आहेत. एरवी ती कोरडी असतात. पण साधारण तीन वर्षानी एकदा ( त्यातहि नियमितपणा नाही ) हि कुंडे पाण्याने भरुन जातात. एरवी तिथे कुणीच जात नाही, पण गावात हवामानात काहि खास बदल होतात, आणि लोक तिथे जाऊन बघतात, तर कुंडात पाणी आलेले असते. मग साधारण दोन तीन आठवडे ती टिकते, आणि एके दिवशी ती अचानक लुप्त होते. या दिवसात तिथे जत्रा भरते, दुर दुरवरुन लोक येतात. ( हि माझी ऐकीव माहिती आहे, प्रत्यक्ष मी बघितली नाही. ) अलिकडेच एका लेखात वाचले कि हा एखाद्या नैसर्गिक वक्र नलिकेचा प्रताप असावा. असेलहि. पण म्हणुन तिचे कौतुक कमी होत नाही. गंगातीर्थ अशी पाटी असलेला फाटा गेला, कि राजापुर गाव लागायच्या आधीच, अगदी त्या अर्जुना नदीवरच्या पुलाच्या आधीहि, एक रस्ता राजापुर रेल्वे स्टेशनकडे जातो. त्या रस्त्यावर साधारण दोन किलोमीटरवर, उन्हाळे हे गाव लागते. एक महालक्ष्मीचे देऊळ लागते, चाफ्याची प्रचंड मोठी झाडे लागतात, आणि त्या तिथेच एक बांधीव वाट नदिच्या दिशेने जाते. तिथे एक बांधकाम दिसते, दोन बाजुला दरवाजे असुन, खाली ऊतरायला पायर्याअ आहेत. वीसेक पायर्या ऊतरुन गेल्यावर एक न्हाणीघरासारखे बांधकाम आहे, आणि तिथे एका पाईपमधुन सतत गरम पाण्याचा प्रवाह वहात असतो. स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळी सोय आहे. जागा बर्यापैकी स्वच्छ आहे. टाईल्स वैगरे बसवलेल्या आहेत. पाणी चांगलेच कढत आहे. पाण्यात हात धुतल्यानंतर अंघोळ करायचा मोह आम्हा दोघानाही आवरला नाही. तो प्रवाह डोक्यावर, पाठीवरुन घेताना, सगळा थकवा निघुन गेला. त्या पाण्यात ईतके प्रसन्न वाटत होते, मला तिथुन बाहेरच पडावेसे वाटत नव्हते. आता बास म्हणुन बाजुला झाल्यावर परत परत पावले तिथे वळत होती. मला माझ्या दिवंगत वडीलांची खुप आठवण आली. पाऊणशे वर्षांपुर्वी त्यानीहि ईथेच अंघोळ केली असेल. त्यावेळी कदाचित हे बांधकाम नसेल, पण हा प्रवाह नक्कीच असेल. तो त्यापुर्वीही असेल आणि यापुढेहि असेल. कपडे करुन वर आलो तर ती नदी, त्याकाठचा परिसर, चाफ्याची झाडे, देऊळ सगळे खुप परिचीत वाटु लागले. माझ्या वडिलांचे बालपण ईथेच गेले असेल. याच मैदानात त्यांचे आणि सवंगड्यांचे खेळ रंगले असतील. याच नदिच्या पात्रात मित्रांशी पोहण्याच्या स्पर्धा लागल्या असतील. पाण्यातुन बाहेर ये असे करवादत, आजीहि ईथे आली असेल. आजहि तिथला परिसर तसाच आहे. हि नाळ जोडुन दिल्याबद्दल गिर्याला पोटभर आशिर्वाद दिले. तृप्त मनाने मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत जरुरीपुरतेच थांबत पणजी गाठले. एकंदर साडेचारशे किलोमीटरचा प्रवास झाला. आजवर माझी गिर्याबरोबरची प्रत्येक सहल, संस्मरणीय झालीय. त्यातला क्षण न क्षण मी मनात साठवुन ठेवलाय. माझा कॅमेरा ते नोंदवण्यास अर्थातच असमर्थ आहे. पण त्याने टिपलेली काहि दृष्ये माझ्या बीबी वर टाकतो. ता. क. : परतीच्या वाटेवर, एका ठिकाणी गिरुसाठी एक " कांदेपोहे आणि चहा " असा कार्यक्रम ऊरकुन घेतला. गिर्या सॉरी रे, सांगुन टाकलं. आता सगळ्यांच्या ( चा. ) चौकश्याना तुच तोंड दे रे बाबा !
|
Champak
| |
| Monday, April 10, 2006 - 12:42 pm: |
| 
|
छान मी आल्या बगैर बुन्दी चा कार्यक्रम करु नका
|
mast.. photo kuthey.. ... .. ....!!
|
Anilbhai
| |
| Monday, April 10, 2006 - 12:44 pm: |
| 
|
वा सुंदर रे. मग काय गिर्या कधी उडवतोय बार?. 
|
Chinnu
| |
| Monday, April 10, 2006 - 12:47 pm: |
| 
|
दिनेश छान चलली आहे तुमची भटकन्ती! फ़ोटो येवु द्या. आणि काय हो गिरी? कसा झाला कार्यक्रम!
|
Moodi
| |
| Monday, April 10, 2006 - 1:01 pm: |
| 
|
दिनेश बाकी निसर्ग सौंदर्याचे वर्णन फक्त तुमच्याकडुनच ऐकावे. परीसर जिवंत केलात शब्दातुन. 
|
Giriraj
| |
| Monday, April 10, 2006 - 1:09 pm: |
| 
|
कृपया अफ़वांवर विश्वास ठेवू नये! आपल्या प्रतिक्रिया लिखाणबद्दलच द्याव्यात! माझे TRP कमी क्रण्याच्या कटाला साथ देऊ नये!
|
Junnu
| |
| Monday, April 10, 2006 - 3:37 pm: |
| 
|
दिनेश, मस्त लिहिलय सगळ. हे TRP काय असत जे लग्नानंतर कमी होत?
|
Seema_
| |
| Monday, April 10, 2006 - 4:05 pm: |
| 
|
मस्त वर्णन दिनेश,आवडल एकदम. गगनबावड्याच वाचुन तर आम्ही केलेल्या ,college मधल्या, माझ्या पहिल्या नोकरीच्या ठिकाणच्या असंख्य सहली आठवल्या. आम्ही तारकर्ली ला जाताना नेहमी तीथुन जायचो. आणि ते देवळाचे फ़ोटॊ आणि पांढर्या चाफ़्याच झाड पाहुन माझे लहानपणचे देवगड आणि लांज्याचे दिवस आठवले. भर उन्हाळ्यातल्या त्या चिऱ्याच्या मंदिरात आत गेल्यावर इतक गार वाटत. अगदी लगेच तीथ जावुन यावस वाटायला लागलय मला.
|
Yog
| |
| Monday, April 10, 2006 - 5:16 pm: |
| 
|
वाह! नेहेमीप्रमाणेच सुन्दर! गिर्या आता यन्दा गड जिन्कून घे रे भाऊ.(नुसत्या चढाया पुरे झाल्या) 
|
Divya
| |
| Monday, April 10, 2006 - 7:27 pm: |
| 
|
दिनेश तुमचे वर्णन इतके छान असते कि तिथे आयुष्यात एकदा तरी जायला मिळावे असे वाटते, त्या कुंडाबद्दल तर फ़ारच कुतुहल आहे अस म्हणतात कि तिथे राजापुर म्हणुन राजा होता त्याला त्यच्या तपश्चर्येवर प्रसन्न होउन दर्शन दिले कुठेतरी वाचल्या सारखे वाटते तरी चु. भु. द्या. घ्या.
|
दिनेशदा, गाववाल्यांनू! केवळ अप्रतिम! गावच्या आठवणी जाग्या केल्यात!
|
दिनेश... मस्तच... मला पण आम्ही ग. बावड्याची बाईक वरून केलेली ट्रीप आठवली... त्या करूळ घाटाची मनात खुप धास्ती भरली आहे.. बर्याच वर्षांपूर्वी त्या घाटात एक अतिशय भीषण अपघात झाला होता... ग. बावड्या जवळच.. कोल्हापूरच्या road वर रामलिंग नावाचे मस्त ठिकाण आहे... एकदम जंगल..
|
Zelam
| |
| Tuesday, April 11, 2006 - 12:41 pm: |
| 
|
मस्तच लिहिलय हं दिनेश, नेहमीप्रमाणेच. आम्ही तरी वेगळं काय बोलणार?
|
Ninavi
| |
| Wednesday, April 12, 2006 - 11:27 am: |
| 
|
छान लेख आहे दिनेशदा. असे नैसर्गिक उष्ण प्रवाह असतात त्यांत गंधकाचं प्रमाण जास्त असतं तसेच औषधी गुणधर्मही असतात ( विशेषतः त्वचेच्या विकारांवर) असं पूर्वी ऐकल्याचं आठवतं. त्यात काही तथ्य आहे का? बाकी करवंदा-जांभळांबद्दल लिहून जळवल्याबद्दल स्पेशल धन्यवाद! हा ही इमोशनल ब्लॅकमेलिंगचाच एक प्रकार आहे. 
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 12, 2006 - 1:37 pm: |
| 
|
निनावि, गगनबावडा, तिलारी, आदी घाटांची ऊंची जेंव्हा आपण कोकणातुन बघतो, तेंव्हा छाती दडपते. संपुर्ण कोकणभुमी, हि प्रचंड दाबाने खाली गेल्यासारखी वाटते, किंवा कदाचित परशुरामाच्या कथेप्रमाणे ती समुद्रातुन वरहि आली असेल. तर हि जी रेघ आहे तिथे अनेक ठिकाणी असे गरम पाण्याचे झरे आहे. याहि पाण्याला गंधकाचा वास येत होता, अनेक सल्फा ड्रग्ज हे त्वचाविकारावरच असतात. वसईजवळच्या वज्रेश्वरीजवळ मात्र ते कुंड अतिषय गलिच्छ आहे, तिथे पायहि ठेवावासा वाटत नाही, तिथे मागे नदीतहि अशी कुंडे आहेत. केनयात असताना मला जांभळे मिळाली, स्वाहिली भाषेतहि जांभुळ हाच शब्द आहे. म्हणजे कितीतरी पिढ्यांपुर्वी तिथे गेलेल्या कुणा भारतीयानेच ते रोप रुजवले असेल. तिथे करवंबेहि होती. सांगण्याचे तात्पर्य, पुढच्या भेटीत तु हि रोपे ईथुन घेऊन जा, आणि पुढच्या अनेक पिढ्यांवर ऊपकार कर. कशी वाटली आयडिया ?
|
Dineshvs
| |
| Thursday, April 13, 2006 - 10:45 am: |
| 
|
लोकाग्रहास्तव आणखी फोटो पोस्ट केले आहेत. यापेक्षा आणखी टाकता येणार नाहीत. कारण ...... .... ... TRP आणखीनच कमी व्हायची शक्यता आहे.
|
Megha16
| |
| Thursday, April 13, 2006 - 3:19 pm: |
| 
|
दिनेश दा, छान वर्णन केल आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या प्रवासाच वर्णन करता ते वाचल्या नंतर आपण ही तिथे जाउन याव अस वाटत. निनावी शी मी पण सहमत आहे जांभुळ,करवंद, लाल पेरु हे ते आम्हा सगळ्यांना जळवण्या साठी टाकलय ना.
|
दिनेश ... खरंतर विशेष कळत नाही ललित प्रकारातलं पण ह्यातूनच गिरयाचं लग्न जमणार आहे म्हणजे लै खास ...
|
Ruchita
| |
| Tuesday, April 18, 2006 - 12:21 am: |
| 
|
Dinesh.. Atishay surekh varnan kele aahe tumhi pravasache. Me swataha Kokanatali aahe, pan kayam mumbailach rahilyamule sahasa jane hotach nahi. Pan aaj ha tumacha lekh vachun kharaech velat vel kadhun jaylach have ase vatayla lagle aahe. Once again Dinesh..Atishay Surekh Varnan.
|
Jo_s
| |
| Sunday, April 23, 2006 - 7:12 am: |
| 
|
दिनेश छानच वर्णन. फोटो मी सकाळीच बघीतले रंगेबी...त गिर्या शुभेच्छा रे
|
Smi_dod
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:19 am: |
| 
|
नमस्कार दिनेश, अगदी सगळा परिसर फ़िरवुन आणला.शैली छान आहे तुमची...स्मिता
|
|
|