|
Nalini
| |
| Wednesday, March 22, 2006 - 10:29 am: |
| 
|
बगळ्या बगळ्या कवडी दे, रांजणखोलची नवरी ने. शेताला पाणी देताना साधारण संध्याकाळच्यावेळी बर्याचदा बगळ्यांचे थवेच्या थवे काळे शेत पांढरे करुन टाकत. लहान होते तेव्हा. हे ही कळायचे नाही कि, खरच बगळा पांढरी कवडी देणार आहे का माझ्या नखांवर. रांजणखोलची, आपल्याच तर मामच्या गावची नवरी देतोय आपण त्याला आणि एवढे बगळे आहेत म्हणजे एखादा तरी देईन की असेच वाटायचे. बराच वेळ नखांवर नखं घासत कवडी मागत रहायचे. एखादी कवडी नखावर दिसली की किती आनंद व्हायचा. रांजणखोलला गेले की विचारायचे सुद्धा एखादा बगळा आल होता का नवरी न्यायला? की सगळे हसायचे. शिक्षणासाठी मळ्यात चांगल्या शाळेची व्यवस्था नव्हती मग शाळेसाठी शेजारच्या साखरकारखान्याच्या गावी काकांकडेच होते. शाळेतुन मिळणार्या तिन्ही सुट्ट्या मामाच्याच गावी. दिवाळिच्या सुट्टित आईसोबत भाऊबिजेच्या दिवशीच जायचो. मग आई परत यायची आणि आम्ही तिकडेच रहायचो. मला सहा मामा आणि दोन मावश्या. मामांची मुलं, मावशीची मुलं त्यात भर आमची, दोघं तिघं आमच्या वयाची तर बाकी लहान. वर्षा दोन वर्षात एकाची भर व्हायची. डझनाच्या वर संख्या होती आमची. आम्ही सुट्टिला जाणार म्हणुन तेही मामाच्या घरी जात नसत. सगळे भेटले की मस्तीला उधान यायचे. आजी आणि मामी मिळुन खुप मोठे फराळाचे बनवुन ठेवायच्या मग काय दिवसभर येता जाता लाडु, चिवडा, शेव, करंजी, सांजोर्याच्या पुर्या ह्यावरच ताव मारायचा. दिवसभर खुप खेळायचे. खेळता खेळता भांडायचे आणि भांडता भांडता खेळायचे. सगळ्या मुलांना दुध प्यायची सवय होती मग जो तो आपला ग्लास घेऊन गॅसच्या बाजुला बसायचा. आम्हा तिघांना मात्र चहाच हवा असायचा, तो ही कप बशीतच. प्रत्येकाला एक पाव मिळायचा, जोपर्यंत मामा बेकरीतुन पाव आणत नाहि तोवर आम्ही कुणिच स्वंपाकघारात जायचो नाही. एक मामी चहाचा गॅस सांभाळायची तोवर दुसरी मामी चुल पेटवायची आणि भाकरी थापायला सुरुवात करायची तर तिसरी मामी मसाले काढायच्या तयारिला लागलेली असायची. मावशी किंवा एखादी मामी बच्चेकंपनीच्या आंघोळिचे काम पार पाडत असत. एकदा का आंघोळ झाली की मग ताटलीभर फराळ फस्त करायचे की सुरुवात हुंदडायला. कधी मामासोबत शेतात जायचे तर कधी आंब्याच्या झाडाखालि खेळयचे नाही तर बुद्धिबळाचे डाव मांडायचे. मामाची वस्ती मोठी आहे मग काय चुलत मामांची, मावश्यांची मुलं आपापल्या वयाच्या मुलांशी मिळुन खेळ सुरु होत. मामींसोबत घास कापायला जायला मला आवडायचे. गोबरगॅसच्या टाकीत शेण कालवायला पण मजा यायची. शेतात मिरच्या तोडायला मदत करायलाही मला आवडायचे. मिरच्या तोडताना एकदा असेच ठरले होते की ज्याने त्याने आपली पाटी भरायची मगच सुट्टी घ्यायची. सगळ्यांचि शीग लावुन पाटी भरली माझी मात्र सपाटच. मी सगळ्यांना म्हटले की जर तुम्ही प्रत्येकी मला एक ओंजळभर मिरच्या तोडायल मदत केली तर माझी पण पाटी भरेन. कोणिच मला मदत कराणार नाही असे वाटले त्याच क्षणी भरलेली पाटी मी शेतात पसरवुन द्यायला सुरुवात केली. म्हटले गरज असेल तर करा गोळा आणि गेले पळुन घरी. केल्या सगळ्यांनी मिळुन गोळा. दिवस असाच निघुन जायचा संध्याकाळ झाली की मग सगळ्यांना आजोबा ज्यांना आम्ही दादा म्हणायचो ते हवे असायचे. संध्याकाळी दादा तुळशीच्या ओट्यावर बसायचे. आम्ही सगळे त्यांच्या आजुबाजुला. दादा फटाके.. दादा फटाके.. द्या ना.. असा पाढा सुरु व्हायचा. दादा मग मामाला सांगायचे की गायांचे दुध घ्या काढुन म्हणजे पोरांना फटाके देतो. फटाक्यांच्या आवाजाने गाय पान्हा चोरते असे दादा सांगायचे. दादा ऊठले की आम्ही त्यांच्या मागेच. सगळ्यांना वयानुसार फटाके मिळायचे. टिकल्या, सुरसुरी, नागगोळी, लवंगी, भुईनळा, भुईचक्र, लक्ष्मी, रॉकेट, सुतळी बॉंब अशी विभागनी वयानुसार व्हायची. बाई म्हणजे आजी, दादा, सगळे मामा आम्ही फटाके वाजवेपर्यंत जवळच थांबायचे. हात पाय धुऊन रवानगी स्वंयपाक घरात. पहिल्या पंगतीला नातवंडांसोबत दादा बसत. बाई पण येऊन बसायची कोणाला काय हवे नको ते पहायची. जेवायला सुरुवात करतानाच दादा न चुकता एक अट घालायचे. जो जास्त दुधभाकर खाईन तो माझ्या उजव्या हाताला, ज्याचा नंबर दुसरा तो डाव्या हाताला बाकिचे शेजारच्या गाद्यांवर झोपायला. मग काय शर्यतच लागयची. बाई किंवा मामी बाजरीची भाकर चुरुन द्यायची, गरम तापलेले दुध, हवी असल्यास साखर आणि मिरचीचा ठेचा तोंडी लावायला. ज्याने त्याने आपली आपली जागा धरलेली असायची. तास दोन तास दादांची गोष्ट रंगायची. प्रत्येकाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर दादा द्यायचे. तेच तारे, तोच राजा, तिच राणी दुसर्या दिवशीच्या गोष्टीत नाव गाव बदलुन यायचे. बर्याच राजांना दोन राण्या असायच्या, एक आवडती तर दुसरी नावडती. दादा गोष्टीतल्या पर्या अंगणात उतरवायचे. तिच परी आता तुम्हाला झोपी लावणार म्हटले की नातवंडं डोळे मिटायचे ते दुसर्या दिवशी सकाळपर्यंत. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी जास्त फटाके मिळायचे. वस्तीवर सगळ्यांच्या घरी लग्न लावत फिरायचो. अशीच मजा करत दिवाळी संपायची. घरी परतायची वेळ यायची. हवे तसे नविन कपडे मिळायचे. परत नाताळाच्या सुट्टीत भेटु म्हणुन निरोप घेतला जायचा. नाताळाच्या सुट्टीत तर १० दिवस आले तसे पटकन संपुन जायचे. पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टिचा वायदा ठरायचा. उन्हाळ्याच्या सुट्टित तर सगळा वेळ सुर पारंब्या खेळण्यात घालवाला मजा यायची. बाई तिन चार मडक्यात लोणचं घालायची. मामी प्रत्येकाला डब्यात लोणच्याच्या फोडी आणि एक चपाती देणार हे ठरलेले. मग डबा घेऊन जायचो आणि आंब्याच्या झाडांखालि खेळायचो. दादा यायचे मागुन. आले की म्हणायचे आता प्रत्येकाने आपले भुईमुगाचे झाडं उपटुन आणा, प्रत्येकाचा ढिग वेगळा ठेवा. ऊन वाढायच्या आत सगळेजण पटापट भुईमुग उपटुन आणायचो. मोठा बारदाणा आंथरुन ठेवलेला असायचा त्यावर शेंगा तोडुन टाकायला सांगायचे. दादा प्रत्येक झाडानुसार पैसे द्यायचे त्यामुळे सगळे मन लावुन शेंगा तोडायचो. दुपारी घरी जाऊन जेवण करुन परत सगळे तासाभरात परत कामाला जुंपायचो. काम केले नाहि केले तरी दादांना प्रत्येकाला खाउ घ्यायला पैसे द्यायलाच लागायचे मग असे काम करवुन घ्यायचे आणि सगळे जण ऊन्हात जाणार नाहीत, सावलीतच आपल्यासमोर रहातील हे पण साधुन घ्यायचे. मी कुल्फीवाल्याचा आवाज ऐकला की दादा पाचच मिनिटात परत आले म्हणू घरी पळायचे. जो मामा घरी असे त्याच्या कडुन एक, बाईकडुन एक अश्या दोन कुल्फ्या हादडुन यायचे. दादा सगळ्यांना कुल्फी घेऊन द्यायचे तिच्यावर पण ताव मारायचे. ऊन कमी झाले की मग आम्ही खेळायला पळायचो. संध्याकाळी नेहमीप्रमाणेच दुधकाला खाऊन राजा राणीच्या गोष्टीत रमायचे. लहानाचे मोठे होत गेलो. वर्षातुन एकदाच मामच्या घरी जाणे होऊ लागले. दादांचा तोच नित्यक्रम, आम्ही मोठे झालो असलो तरी बरिच नातवंडं लहान होती. दादांची गोष्ट मग ओट्याच्या पायरीवर बसुन ऐकु लागले. शाळा संपुन कॉलेज मधे गेल्यावर होस्टेलवर रहावे लागल्याने मामाकडे जाणे आणखीच कमी झाले. नातींमधली मिच मोठी नात. दादा एखाद्या मामाला घेऊन मला भेटायला यायचे. प्रत्येक वेळी न विसरता जिलेबी आणायचे. माझी नात खुप हुशार म्हणुन तोंडभरुन कौतुक करायचे. नेहमीच म्हणायचे कॉलेज मध्ये जर कोणी तुला पहिले तर कोणाला पटेल का माझी नात शेती करते, घरची सगळी कामं करते. आणि गडीमाणसासरखं ऊसाला पाटपाणि देताना पाहिल तर सांगुन सुद्धा पटेल का एवढी शिकली म्हणुन. लग्नानंतर त्यांना एकदा भेटायला गेले तर म्हणे खुष आहेस ना? तर म्हटले की माझ्याकडे पाहुन काय वाटते? तर म्हटले की पहिल्यापेक्षा जास्त खुष वाटते. त्यानंतर कधी असे मुक्कामाला रहाणेच नाही झाले. आता परत कधी एकदा परत जाईन आणि सगळ्यांना पाहिण असे झालेय. मागच्या महिन्यात खुपच अस्वस्थ वाटत होते. जय भारतात गेलाय म्हणुन असे होत असावे असे वाटत होते. घरी फोन केला तर सगळे कुशल मंगल आहे हे कळाले. जयपण परत आला. त्याला विचारले जय रांजणखोलच्या दादांची तब्येत कशी आहे रे? त्यांची खुपच आठवण येतेय. जरा थांबुनच म्हटला गेले! मी तर रडायलाच लागले. तर लागला हसायला, म्हणतो कसा? वेडाबाई जर खरच गेले तर किती रडशील. काय ही थट्टा म्हणुन रागावले पण त्याच्यावर. मन मानत नाही, काहीतरी झालेय? जयला खुपदा विचारलेय तो एकच म्हणतोय तु फोन कर आणि दादांशी प्रत्यक्ष बोल. काय करावे काहिच कळत नाहिहे. किती मुर्ख आपण? दादा गेले हेच ऐकण्याचा अट्टाहास का माझा? जय बोलतोय पण मग त्याचे डोळे त्याच्या बोलण्याला साथ का देत नाहित? शेवटी मामाकडे फोन केला. फोन एका मामीने घेतला, काय, कश्या? त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. मी त्यांना सांगितले की मला दादांशी बोलायचे त्यांना फोनवर बोलवा. तर त्यांनी मामाला आवाज दिला. मामाकडे दादांची चौकशी केली. ठिक आहेत ते, हेच मामाने सांगितले. मामा म्हणे तु लवकर ये बरं आम्हाला भेटायला. सगळेच खोटं बोलतायेत असं वाटलं. मामाला स्पष्टच विचारले तर तो आलेला हुंदका लपऊ पहातोय हे जाणवले. जे कळायचे ते कळुन चुकले. दादा गेले हे नक्की.. पण कधी?? हे सांगायला कोणीच तयार नाही. मामाकडुन दुसर्या मामीने फोन घेतला. मामाला बोलताच येत नसेल ना? म्हणुन मामीने फोन घेतला असेल. मामीला विचारले, मामी तुम्ही तरी सांगणार आहत का की दादा कधी वारले? तर मामी क्षणभर शांत राहुन म्हणाल्या ७ फेब्रुवारी. त्यानंतर एवढेच म्हणु शकले की बाईची काळजी घ्या....... बाई, तुझी लाडकी नलुताई ह्यावेळि तुझ्यापासुन खुप दुर आहे. तु स्वत : ला सांभाळ एवढेच ती ह्या वेळी म्हणु शकते. तुझ्याशी बोलण्याचे धैर्य तिच्यात ह्या क्षणी नाहीहे. तुझी आणि दादांची खुप खुप आठवण येतेय. दादा, तुमच्या आत्म्यास शांती लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना.
|
Champak
| |
| Wednesday, March 22, 2006 - 11:15 am: |
| 
|
.. .. .. ..
|
Savani
| |
| Wednesday, March 22, 2006 - 11:25 am: |
| 
|
नलू ताई, मन भरून आलं ग वाचताना. माझं आजोळ डोळ्यापुढे उभं राहिले. असे वाटतयं, अगदी आत्ता ह्या क्षणाला भारतात जाता आले तर.. माझे पण सादर प्रणाम त्यान्च्या स्म्रृतीला.
|
नलिनी छान लिहिलय तुम्ही. आजोळ आठवल. माझी पण आजी गेली ह्या वेळी आता आजोळी जाववणार नाही. मागच्या वेळी आम्ही सगळे ठरवून गेलो होतो आजोळी. बगळ्या बगळ्या कवडी दे मी मुद्दाम माझ्या भाचे मंडळींना शिकवल. त्यांना शिकवायच्या निमित्ताने मी पण नखावर नख घासून घेतली आणि चक्क दुसर्या दिवशी नखावर कवडी आली आहे की नाही हे देखिल बघितल. असो, ते दिवसच वेगळे होते. I can give anything to live those days again
|
Divya
| |
| Wednesday, March 22, 2006 - 12:38 pm: |
| 
|
नलिनी डोळे भरुन आले वाचताना. अगदी आजोळची सैर पण झाली. आम्ही पण आजोबाना दादा म्हणायचो. ते गेले तेव्हा खरच खुप पोटात तुटल्यासरखे झाले होते, आता आपल्यावर अशी वेडी माया करणारे कोणीच नाही राहीले अस वाटुन गेले. आणि खरच त्या मायेची सर परत कधीच मिळाली नाही. आयुष्यात प्रत्येक turning point वर आज दादा हवे होते अस अजुनही वाटत. 
|
Ashwini
| |
| Wednesday, March 22, 2006 - 1:24 pm: |
| 
|
नलिनी, खरच छान लिहीलं आहे. मला गावाकडच्या वातावरणात कधीच राहायला मिळालं नाही. काका, आत्यापासून ते आजोळ, मावश्या सगळे पुण्यातच. हे असं मोकळ्या हवेत, रानात खेळणं, बागडणं फक्त पुस्तकात वाचूनच माहिती. माझ्या आजोबांचे शिवाजी हाउसिंग सोसायटीमध्ये घर होते. त्यांना बागकामाची खूप आवड होती. मुख्य बंगला आणि आउटहाउस मिळून त्यांनी इतकी झाडे लावली होती. त्यांना बहुतेक सुगंधाचे वेड असावे. हिरवा चाफा (त्याचा किंचीत उग्र, लुभावून टाकणारा गंध मी आजसुद्धा विसरणार नाही), अतिशय घमघमत्या वासाचा लालजर्द गुलाब, कुठल्यातरी अनोख्या वासाची एक हूरहूर लावणारी केशरी रंगाची अपरिचीत वेल आणि इतर असंख्य झाडे होती. रत्नागिरी हापूसच्या तोडीस उतरेल असा आंबा होता, चिक्कू होता, बदाम होता. त्या बदामाच्या झाडाला त्यांनी एक झोका टांगला होता. त्यावर बसून झोके घ्यायला इतकी मजा यायची. कढीपत्त्याचे तर नुसते रान होते. आजीकडे गेलो की येताना आम्ही कढीपत्ता तोडून आणायचो. तसा ताजा वास कढीपत्त्याला परत आलाच नाही. आजोबा सात वर्षापूर्वी गेले. मागच्या वर्षी आजी गेली. मामा नसल्यामुळे आजोळ संपले. घर मात्र अजून उभे आहे.
|
Chinnu
| |
| Wednesday, March 22, 2006 - 2:50 pm: |
| 
|
नलु, डोळे भरुन आले ग!
|
Moodi
| |
| Wednesday, March 22, 2006 - 3:01 pm: |
| 
|
नलिनी अन दिमडु आज तुम्ही दोघीनी खुप मन हेलावुन टाकणारे लिहीलत ग. तुझ्या दादांच्या स्मृतीला माझे अभिवादन!
|
Charu_ag
| |
| Thursday, March 23, 2006 - 3:48 am: |
| 
|
.. .. .. .. ..
|
छे, पण परदेशात रहात असताना अशा बातम्या ऐकण म्हणजे कर्मकठीणच असणार!
|
Dineshvs
| |
| Thursday, March 23, 2006 - 6:25 am: |
| 
|
म्हातारं माणुस, आणखी किती पुरणार ? त्यानी दिलेली माया, आता आपण ईतराना द्यायची. मग आपल्याला बळ द्यायला ते माणुस पाठी ऊभं राहतं, नलिनी.
|
chan aaheg ! malahee majhe aajol athavale...
|
नलिनी, कित्ती सुंदर वर्णन केलंस गं. मी सुद्धा मोठी नात असल्याने असेच लाड अनुभवले आहेत, आजी आजोबा आणि तीन मामांकडून. सगळं एकदम झरर्कन डोळ्यासमोर येऊन गेलं. माझे आजोबा तर आम्ही आत्ते मामे भावंडे ऑफ़िस ऑफ़िस खेळत असताना आमचा चहावाला वगैरे सुद्धा व्हायचे, खूप मजा यायची. मला शाळेत येऊन वड्या, नाहीतर पेढे देऊन जायचे, म्हणून शाळेतल्या मित्र मैत्रिणींच्या ते अजूनही लक्षात आहेत. अजूनही गेले की आजोबा म्हणतात, चहावाल्याचा चहा आहे ना लक्षात.... खूपच सुंदर दिवस होते ते. तू आत्ता भारतात जाऊन यायला हवं होतंस गं, असं मला राहून राहून वाटतंय.
|
Megha16
| |
| Thursday, March 23, 2006 - 11:35 am: |
| 
|
नलु ताई, तुझा लेख वाचताना, मनातल्या भावना,आठवणी, डोळ्यातुन लगेच बाहेर आल्या. आजोबा च प्रेम मला कधी मिळाल नाही, अस नाही म्हणता येणार पण मी लहन असतानाच माझे दोन्ही आजोबा आधी वडिलाचे वडील आणी त्यानंतर लगेच महिन्या भरात आईचे वडील आम्हाला सोडुन गेले. मला तर दोंघाचे चेहरे सुद्धा आठवत नाही. फक्त एकुन आहे की,त्या दोघाची मी खुप लाडकी होती. कारण वडीला कडे मी पहीली मुलगी होते आणी आईकडे सर्वात लहान. आज तुझा लेख वाचुन खुप आठ्वण आली त्यांची. माझी आजी,वडीलांची आई ती गेली त्यावेळेस ही माझी दहावीची परीक्षा चालु होती म्हणुन मला कोणी सांगीतल नाही जेव्हा कळाल तेव्हा मला खुप वाईट वाटल खुप रडले आई जवळ की मला का नाही सांगीतल.आई म्हणाली तुझी परीक्षा चालु होती म्हणुन नाही सागीतल. आई ला म्ह्णाले की, मी पेपर पुन्हा देउ शकले असते ग पण आजी ला मात्र पुन्हा कधी पाहु शकणार नाही ना ग. तुझ्या आजोबांणा माझे पण प्रणाम. आता या क्षणाला मला पण असच वाटत की तुही जय बरोबर गेली असतीस भारतात तर बर झाल असत ना.
|
Kandapohe
| |
| Thursday, March 23, 2006 - 9:55 pm: |
| 
|
नलिनी छान लिहीले आहेस. मी दोन्ही आजोबांना बघितले नाही. पण ती दिवाळी आणि शेताचे वर्णन ऐकुन लहानपणच्या आठवणी जागृत झाल्या.
|
Meenu
| |
| Friday, March 24, 2006 - 5:11 am: |
| 
|
नलिनी किती सुंदर वर्णन आहे गं. तु भाग्यवान आहेस अस छान आजोळ मिळालं. माझे सगळे relatives शहरात त्यामुळे असं काही कधी अनुभवायला मिळाल नाही. बाकी अशा आजोबांचा लळा असणारच तुला.
|
Chafa
| |
| Friday, March 24, 2006 - 9:03 am: |
| 
|
फार सुरेख लिहीलंय नलिनी. 'मामाच्या गावा'च्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
|
|
|