Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
गार्गी

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » कथा कादंबरी » गार्गी « Previous Next »

Dineshvs
Friday, March 10, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" माते, आजतरी गुरुजी आम्हाला व्याकरण शिकवणार आहेत का. आपल्याला काहि बोलले का ते. " प्रद्युन्म विचारता झाला.

" नाहि रे बाळा. अजुन ज्वराची ग्लानी आहे. काहि बोलले नाहीत, स्वामी. आज तुमच्याशी व्याकरणाची चर्चा करण्याचे योजिले होते का ? पण धीर धर रे बाळा, मी आणि देवि त्यांची सेवा करतोच आहोत. स्वामीना बरं वाटलं कि करतीलच चर्चा. " गार्गीने समजुत काढली.

" माते, मी काहि सेवा करु शकतो का ? तेवढेच गुरुजींच्या सनिद्ध राहता येईल. " प्रद्युन्माने नम्र पृच्छा केली.

" बाळा, ईथे आम्ही आहोतच. पण तमलिंदापुरीच्या वैद्यराजाना निरोप पाठवायचा होता. त्यानी सुचवलेल्या वनौषधींची आसवे करुन देत आहोत, पण स्वामीना अजुन बरं वाटत नाहि. कदाचित आम्हाला त्या वनौषधी ज्ञात नसाव्यात. वैद्यराजानी दोन चार दिवसात ज्वर ओसरेल असे सांगितले होते. बाळा तेवढा निरोप देता आला असता तर. " गार्गीने सुचवले.

" माते, संकोच का ? गुरुजींसाठी स्वर्गात जाऊन यायला सांगितले असते, तरी जाऊन आलो असतो. " प्रद्युन्माने ऊत्साहाने सांगितले.

" बाळा शीघ्र प्रयाण केलेस तर प्रहरभरात पावशील. पण संध्यासमयीच्या आत परत ये. वन्य श्वापदांचे भय आहे. वैद्यराज तुला त्वरित भेटतील. त्यांच्या संग्रही असतील तर त्या वनौषधी घेऊनच ये. पळभर थांब कसा. तुला दशम्या बांधुन देते. " गार्गी लगबगीने शिदोरी बांधायला गेली.
प्रद्युन्माने गार्गीस प्रणाम केला व तो तमलिंदापुरी निघाला. गार्गीचे डोळे भरुन आले. निदान आता तरी वनौषधी मिळाव्यात, व स्वामीना ऊतार पडावा, अशी आशा होती तिला.

प्रद्युन्म गेला त्या दिशेने ती बघत बसली.

" तिलोत्तमे, सारिके, कुठे आहात. कधीची सांगतेय, तेवढे सत्तु कांडुन द्या, तर ऐकत नाहीत. एवढ्या आश्रमात एक कुणी कामाचे असेल तर आश्चर्यच वाटेल मला. गार्गे बघितलस का या दोघीना " देविने विचारले.

" नाहि देवि, आता घटिकेपुर्वी प्रद्युन्मास वैद्यराजांकडे पाठवले. काहि करायचे होते का " गार्गीने नम्रपणे विचारले.

" कामे आहेत खंडीभर. पण बघते मी या चांडाळणी कुठे गेल्यात त्या. तु भोजन केलेस का ? तुलाहि ज्वर भरायचा अश्याने. " देविने पृच्छा केली.

" नाहि देवि. स्वामीनी कालपासुन अन्नग्रहण केलेले नाही. काल गुंजभर मध ऊष्टावला असेल नसेल. तोहि केवळ अभ्रकभस्म ग्रहण करण्यासाठीच. आणि मग परत निद्रेच्या अधीन झाले. रात्रभर बसुन होते, पण स्वामीना जागच नाही आली. " गार्गीने नम्रपणे सांगितले.

" अगं तु नाही भोजन केलेस तर शीण येईल कि तुला. ते काहि नाही. निदान फलाहार तरी कर. आणि घटिकाभर पड जरा. या ग्रीष्मात अशी बाहेर बसलीस तर, ऊष्माघात नाही का व्हायचा. " देविने आदेश दिला.
गार्गीला ऊठणे भाग होते. केवळ जलप्राशन करुनच ती दोन दिवस राहिली होती. तिला तिच्या विवाहापासुनचे दिवस आठवले.
स्वामी आश्रमात जिथे असतील तिथे ती भोजन घेऊन स्वत : जात असे. रोज ठरवत असे, कि घटिकाभर आधीच निघावे, शिष्यगणांशी चाललेली चर्चा कानावर पडावी. पण देवि भोजन बांधुन देईपर्यंत दुसरा प्रहर झालेलाच असायचा. देवि तिलाहि काहि करु देत नसे.
पण ती चर्चा ऐकण्याचा योग, गार्गीला क्वचितच येत असे. गार्गीला येताना बघुनच, शिष्यगण चर्चा थांबवत असत आणि भोजनशाळेकडे प्रयाण करत असत.
मग स्वामींच्या मुखातुन काहि ऐकता येईल का, याची प्रतिक्षा करत ती बसत असे. तिला स्वत : हुन एखादा सिद्धांत पडताळुन बघावासा वाटे. अर्धवट चर्चा तिने ऐकलेली असायची, त्यातले न ऊमगलेले मुद्दे तिला समजावुन घ्यायचे असत.

पण तिचे स्वामी शांतपणे भोजन करत असत. तिलाहि आग्रहाने खाऊ घालत असत. तिच्या सौंदर्याला अनुलक्षुन काहि श्लोक म्हणत असत. कधी शावकं दाखवत असत तर कधी क्रौंच युगुल. हे सगळे तिला तुष्ट करण्यासाठी आहे, हे तिला ऊमगत असे. तिच्या तारुणसुलभ भावनांचा आदर त्याना करावासा वाटे. पण तिला एखाद्या श्लोकाविषयी सखोल चर्चा करावीशी वाटे. ती काहि बोलणार, ईतक्यात तिचे स्वामी, मृगजीनावर वामकुक्षीसाठी आडवे होत. अमंळभराने शिष्यगण परत येत असे, मग तिला ऊठावेच लागे.

हे असे सगळे अगदी गतसप्ताहापर्यंत अव्याहत सुरुच होते. मग एके दिनी तिच्या स्वामीना किंचीत ज्वर चढला. अन्नावरची वासनाच गेली, शिष्यगणांच्या सहाय्याने तिने त्याना पर्णकुटीत आणुन ठेवले.

वैद्यराजाना आमंत्रित केले. स्वामींवरच्या स्नेहामुळे ते तातडीने आलेदेखील. पण त्यांची काय चर्चा झाली ते गार्गी वा देविला कधी कळलेच नाही. वैद्यराजानी काहि वनौषधी सांगितल्या, श्रम करु नयेत असे सुचवले. आणि ते लगबगीने प्रयाण करते झाले.

देवि खंबीर, तिने भविष्य ओळखले होते. आज चार तपांपेक्षा जास्त काळ ती स्वामींची पत्नी होती. तिलाहि तिच्या विवाहापासुन सगळे आठवले.
स्वामींची ज्ञानलालसा तिला माहित होती. तिने आपणहुन त्याना प्रापंचिक जबाबदारीतुन मुक्त केले.
स्वामींची ख्याती दुरदेशी पसरली. द्य्नानार्जनासाठी दुर दुर वरुन, राजकुमार त्यांच्या आश्रमात दाखल होत असत. देविने त्या सगळ्या शिष्यगणांची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्यावर मातेव्रत प्रेम केले. त्यांच्या आहाराची आरोग्याची तरतुद केली.
ती ज्ञानाचे मोल जाणुन होती. स्वामी कधीहि गुरुदक्षिणेचा आग्रह धरत नसत. पण देवि मात्र त्याबाबत आग्रहि होती. विद्येचे मोल राखले गेलेच पाहिजे याबाबत ती ठाम होती.

जे वास्तवातच निर्धन असत त्यांच्याकडे ती काहि मागत नसे पण राजपुत्रांकडुन मात्र ती यथायोग्य दक्षिणा मागुन घेत असे. ईतकेच नव्हे, तर निर्धन सहाध्यायींसाठी पण त्यानी दक्षिणा द्यावी, याचा आग्रह ती धरत असे.

कालांतराने आश्रमाची व्याप्ती वाढु लागली. स्वामींचे शिष्य त्यांची किर्ती वृद्धिंगत करु लागले. स्वामींकडचा शिष्यगणांचा ओघ प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढु लागला.

देवि सुखावली. तिने आश्रमासाठी नदीकाठची सुपीक जमिन संपादित केली. शिष्यगणाना लागणार्‍या धनधान्याची ऊपज तिथेच होवु लागली. अधिकाधिक जमिन संपादित करुन तिने, फ़लोद्याने, पुष्पवाटिकांची योजना केली. गोपुच्छांची गणनाहि करता येऊ नये, ईतके गोधन तिने जोपासले. वेधशाळा, प्रयोगशाळांची रचना केली. शिष्यांच्या निवासस्थानाची ऊत्तम सोय केली. एक सभागृह बांधले. तसेच ईतक्या सगळ्या व्यापाची निगा राखण्यासाठी सेवक सेविकांची नियुक्ती केली.

दरवर्षी ती आश्रमात वसंतोत्सव साजरा करायची. देशोदेशींच्या कलाकाराना बोलावुन नाटकं, संगीतसभा यांचे आयोजन करायची. चर्चा, वादविवाद घडायचे. स्वामींची किर्ती आणखी वाढायची.

अश्याच एका ऊत्सवात, गार्गी तिथे आली होती. तो आश्रम, स्वामी आणि ऊत्सव या सर्वांबद्दल तिचा बंधु, सुधन्वा, यांजकडुन तिने खुप ऐकले होते. तो आश्रम बघण्याची तिला खुप ईच्छा होती.
सुधन्वाने तिला स्वामींसमोर आणले. तिने त्याना लवुन प्रणाम केला. स्वामी तिच्या लावण्याकडे मंत्रमुग्ध होवुन बघतच राहिले. कालिदासाच्या एखाद्या श्लोकातले वर्णन त्याना स्मरु लागले. देविच्या नजरेतुन ते सुटले नाही. स्वामींची अनुज्ञा घेऊन, ती गार्गीला घेऊन पर्णकुटीत आली. पर्णकुटी अत्यंत साधी होती. गार्गीने देविची अनुज्ञाअ घेऊन, ती पुष्परचनानी सजवली. सगळीकडे तोरणे लावली आणि सुंदर भित्तीचित्रे रेखाटली. तिचे कौशल्य, देवि बघतच राहिली.
" मुली तुझे सौंदर्य अधिक मोहक कि तुझ्या बोटातली कला, याचा मला संभ्रम पडला आहे. कुणाकडे शिकलीस हे सगळे. ? " देविने विचारले.

" देवि, आपण मला लज्जित करत आहात. हे तर सगळे आमच्याकडे मुलीना, जन्मजातच येते. मला काव्य आणि शास्त्रातहि रुची आहे. अनेक ग्रंथ मला मुखोद्गत आहेत. " गार्गीने विनयाने सांगितले.

" मग मुली, विवाहयोग्य झालीस कि तु आता. तुला अनुरुप वर शोधणे तुझ्या पित्याला जरा प्रयासाचेच ठरणार आहे. रुप, संपत्ति, बुद्धीमत्ता यात सगळ्यात श्रेष्ठ असायला हवा ना तो. " देविने आस्था दाखवली.

" देवि, विवाह हे माझे ध्येय नाही. मला अजुन ज्ञान प्राप्त करुन घ्यायचे आहे. मला माझ्या पित्याने पुर्ण मोकळिक दिलीय या बाबतीत. आणि देवि तुम्ही म्हणता तसा सर्वगुणसंपन्न वर कदाचित अस्तित्वातच नसला तर. मी अशी आशा वा अपेक्षा नाहि ठेवत. द्य्नानापुढे सर्व तुच्छ मानते मी. " गार्गीने निर्धार व्यक्त केला.

" मग कुणी शोधला आहे का तुझ्या पित्याने वर. ? " देविने पुसले.

" देवि, तुमच्या स्वामीशिवाय ज्ञानी आणखी कोण असणार ? " गार्गी बोलती झाली.

देविने फ़क्त क्षणभरच विचार केला. प्रस्तावात तिला काहिच वावगे वाटले नाही. ती काहि बोलणार एवढ्यात गार्गीच पुढे वदली, " देवि फ़क्त तुमच्या अनुज्ञेची प्रतिक्षा आहे. माझे बंधु स्वामींशी बोलतीलच. मी आपल्या अधिकारात हिस्सा मागणार नाही. त्यांची शिष्या म्हणुनच मला या आश्रमात यायचे होते. किंतु सद्यस्थितीत ते अशक्य आहे. केवळ मी स्त्री आहे, म्हणुन मला त्यांचे शिष्यत्व नाकारले जाईल. देवि आपण अनुज्ञा द्याल ना. " गार्गीने अनुनय केला.

" मुली या ऋषितुल्य व्यक्तीच्या सानिध्यात राहुन मी कोरडीच राहिले. आजुबाजुला ज्ञानाचा सागर असुनदेखील, माझ्या अंगावर चार तुषारहि ऊडले नाहीत कधी. पण आज तुझ्यात मला जी ज्ञानलालसा दिसतेय, तिला माझ्याहातुन काहि मदत झाली तर, मला धन्यच वाटेल. " देविने आपले मत मोकळेपणी मांडले.

पुढे लवकरच गार्गीचा गांधर्व विवाह झाला.

%&%&%&%

आज गार्गीला हा सगळा भुतकाळ आठवला होता. विवाह करुनहि तिचे ईप्सित साध्य झालेच नव्हते. तिने स्वामीना आडुन आडुन स्त्रीयाना शिष्यत्व देण्याबद्दल सुचवले होते. पण स्वामीनी रुकार प्रदर्शित केला नव्हता. आश्रमात वेगळी व्यवस्था करावी लागेल, तशी परंपरा नाही असे अनेक मुद्दे त्यानी मांडले होते. शिवाय वृद्धापकाळी आपल्याला हे जमणार नाही, असेहि कथिले होते.

आज स्वामींच्या पायाशी बसुन गार्गीला हे सगळे आठवले. देवि पण तिच्या सनिद्ध येऊन बसली होती. ती पण खुप श्रमली होती.

" देवि " अगदी क्षीण आवाजात स्वामीनी हाक मारली.
" काहि हवय का स्वामी ? देवि ईथेच आहेत. अमंळ डोळा लागला असेल. ऊठवते " गार्गीने सांगितले. हळुन देविला स्पर्ष करुन ऊठवले.

" आज्ञा करावी स्वामी " देविने सांगितले.

" देवि, गार्गी तुम्ही दोघीनी माझी अविरत सेवा केली आहे. मला सर्व प्रापंचिक ताणातुन तुमच्यामुळे मुक्तता मिळाली. पति म्हणुन मी माझे कर्तव्य करु शकलो नाही. याची खंत आहे. " स्वामीना खोकल्याची ऊबळ आली.
" श्रम घेऊ नका स्वामी. आपण अन्नग्रहण केले नाही म्हणुन ग्लानी आली असेल. सर्व क्षेमकुशल होईल. दुग्धपान करावं स्वामी. " देविने विनयाने सुचवले.
" देवि, गार्गी माझा अंतकाल मला दिसतो आहे. त्यापुर्वी काहि कथन करायचे आहे. आता आश्रमाचा विस्तार खुप वाढलाय. सुपीक जमिन, गोधन आहे. माझ्या पश्चात तुम्हाला, ऊदरनिर्वाहाची चिंता करायचे काहि कारणच नाही. देविने हे सगळे जमवले आहे, पण आता मला तुम्हा दोघीत त्याची विभागणी करायची आहे. तसे ईच्छापत्र मला लिहायचे आहे. शिवाय या सगळ्याचा मला आता काहि ऊपयोग नाही. देवि भुजपत्रे आणशील का ? " स्वामीनी ईच्छा प्रगट केली.

त्यांची आज्ञा प्रमाण मानुन देवि भुजपत्रे आणावयास गेली. जाताना तिने नजरेनेच गार्गीला, स्वामींकडे लक्ष ठेवण्यास सुचवले.

" स्वामी, एक विचारु ? " गार्गीने त्यांच्या चेहर्‍यावरुन हळुवार हात फ़िरवत विचारले.

" अवश्य " स्वामी उत्तरले.

" स्वामी, आपल्याला नेमका काय विकार झालाय ? यावर कुठलेच औषध नाही का ? " गार्गीने विचारले.

" विकाराचे नाव सांगुन काहि ऊपयोग नाही आता. औषध ऊपचार आहे, पण त्या वनौषधी अत्यंत दुर्मिळ आहेत. त्या मिळात्या तर माझ्यावर ऊपचार होवु शकला असता. वैद्यराजानी काहि पर्याय सुचवले होते. पण त्याने काहि ऊतार पडलाय असे वाटत नाही. माझा शक्तिपात मला जाणवतोय. " स्वामीनी खुलासा केला.
गार्गीला अजुन आशा होती. ती म्हणाली, " स्वामी, देवि वयाने ज्येष्ठ. या सर्व जमीनीचे, गोधनाचे अधिकार त्यानाच द्यावे. मला यातले काहि नको. " गार्गीने नम्रपणे सांगितले.

" पण तु अजुन लहान आहेस, तुझे आयुष्य पडलेय. तुझा ऊदरनिर्वाह कसा व्हायचा ? " स्वामीनी चिंता व्यक्त केली.

" देवि मला कधीच अंतर देणार नाहीत. शिवाय तुम्ही म्हणालात ना कि या सगळ्यांचा तुम्हाला आता काहि ऊपयोग नाही. मग ज्यांचा तुम्हाला ऊपयोग नाही, त्याचा मला तरि काय ऊपयोग ? " गार्गीनी पुसले.

" माझा अंतकाल जवळ आलाय म्हणुन म्हणालो मी तसे, पण ऊदरनिर्वाहासाठी ऊत्पन्न हवेच, आणि त्यासाठी जमीन, गोधन हवे. " स्वामीनी समजुत काढायचा प्रयत्न केला.

" नाहि स्वामी. जे तुम्हाला ऊपयोगी नाही ते तुम्ही दिलेत. या दानाला तसा काहि अर्थ नाही. पण जे तुम्हाला अजुनहि ऊपयोगी आहे, ते मात्र स्वत : कडेच ठेवलेत. त्यावर पत्नी म्हणुन माझा हक्क नाही का ? " गार्गीने युक्तिवाद केला.

" गार्गी, आता या जीर्ण शरिराशिवाय माझ्याकडे काहि नाही. तुला काय हवय ? " स्वामीनी विचारले.

" स्वामी, तुमचे ज्ञान. मला तुमच्याकडुन ज्ञान हवेय. तुमचे शिष्यत्व हवेय. जो अधिकार केवळ स्त्री म्हणुन मला नाकारण्यात आला, तो आज पत्नी म्हणुन मला हवाय. कितीहि कष्ट करायची माझी तयारी आहे. माझा हा हट्ट पुरवणार ना ? " गार्गीने त्यांचे पाय धरले.

" तथास्तु " स्वामीना तसे म्हणण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता.
बाहेर प्रद्युन्माची चाहुल लागली.
आणि आश्रमात उष : स्तवन सुरु झाले.

समाप्त.

वेदकालिन विदुषी, गार्गीच्या बाबतीत, प्रचलित असलेल्या एका दंतकथेवर मी रचलेली हि कथा. तपशील माझे आणि त्यातल्या ऊणीवांची जबाबदारी पण माझीच.



Seema_
Friday, March 10, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समजायला जरा कठीन वाटली मला . पण दिनेश त्यात तुमचा दोष नाही . माझी अल्पबुद्धी .

Moodi
Friday, March 10, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान रंगवलीत दिनेश. पुण्यातील अनिकेत प्रकाशनचे मालक क्षीरसागर नुकतेच गेले, माझा मामा नेहेमी त्यांच्याकडुन ह्या पौराणीक कथांची छोटी छान पुस्तके वाचायला आणायचा. अगदी तीच आठवण ताजी केलीत. अतिशय मोहक चित्रे अन सुटसुटीत कथा. भाषा पौराणीक वापरलीत तुम्ही, मस्त!!


Sashal
Friday, March 10, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्ण वचायचीय अजून पण प्रद्युम्न की प्रद्युन्म ?

Arnika
Friday, March 10, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती छान आणि वेगळाच विषय निवडलात तुम्ही दिनेश! खूपच मजा आली वाचायला...पहिले कथा कुठल्या दिशेने जात्ये कळेना, पण मस्त उलगडला आहे स्वामी आणि गार्गी मधला संवाद. खूप दिवसांनी अगदी 'पीवर' मराठी वाचायला मिळालं....:-)

Moodi
Friday, March 10, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल आता लक्षात आले, ते प्रद्युम्नच आहे, कदाचीत घाईत लिहीले गेले असेल दिनेश यांच्या कडुन.

Bhagya
Sunday, March 12, 2006 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमी प्रमाणेच सुंदर आणि वाचनीय.

Dineshvs
Sunday, March 12, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला थोडेसे निवेदन करावेसे वाटतेय.
हि दंतकथा मी एका वेगळ्याच संदर्भात वाचली. तशी ती फ़क्त चार ओळींचीच होती. पण मला यातला गार्गीचा युक्तिवाद मह्त्वाचा वाटला. खरे तर मला तो द्रौपदीच्या, सा सभा ... या युक्तिवादापेक्षाहि श्रेष्ठ वाटला.
वेद हे अपौरुषेय मानले जातात. त्यामुळे ते कोणी रचले हे कुठेच नमुद केलेले नाही. पण ईतक्या सगळ्या ॠषिंमधे विदुषी म्हणुन गार्गी व मैत्रेयी हि दोनच नावे मला आढळतात.
माझ्या आधीच्या समजाप्रमाणे या दोघीनी सहज ज्ञाप्राप्ती झाली असावी. पण हा संदर्भ वाचल्यावर सत्य समजले. स्त्रीशिक्षणाची सुरवात ईथुन झाली म्हणायची का ? पण मग यापुढे सावित्रीबाई फुल्यांपर्यंत सगळा अंधारच दिसतोय.
रामायणातली कैकयी रणांगणात शौर्य गाजवलेली होती, तसेच मंदोदरी पण रामाशी लढायला तयार होती. पण तरिही त्यांचे शिक्षण झाल्याचे वाचले नाही.
सीता आणि द्रौपदी तर बड्या घरच्या लेकी असुनहि शिक्षणापासुन वंचित राहिल्या.
हि कथा लिहायला मला वेळ लागला नाही, दंतकथेतल्या रिकाम्या जागी तपशील सहज भरता आले. पण एडिट करायला खुपच वेळ लागला. काहि अक्षम्य चुका राहुन गेल्यात. त्या नजरे आड कराव्यात


Chinnu
Monday, March 13, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार फार सुंदर लिहिलत दिनेश. आभार!

Rachana_barve
Tuesday, March 14, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश सुरेख रंगवली आहे कथा. लिलावती पण होती ना अशीच?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators