|
Shriramb
| |
| Thursday, March 02, 2006 - 3:17 pm: |
| 
|
' हे असं किती दिवस चालणार? ' माझ्या क्युबीकलवर बाहेरच्या बाजूने आपले दोन्ही हात ठेवत सुम्या म्हणाला. त्याचा चेहरा अगदी हताश की काय म्हणतात तसा होता. त्याच्या हातात एक सिगारेट होती. पण आॅफीसात धूम्रपानाला मनाई असल्यामुळे ती ' तेवत ' नव्हती. सुम्या अर्थातच धूम्रपानासाठी बाहेर निघाला होता आणि त्याला कंपनीसाठी कोणीतरी हवा होता. त्याच्या अविर्भावावरून कोणालाही असं वाटलं असतं की तो कुठल्यातरी संकटात सापडलाय आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला मदत हवीय. पण मी सुम्याला चांगला ओळखून आहे. मी आपली नजर माझ्या माॅनीटरवरून थोडीशीही न हलवता त्याला म्हणालो, ' काय किती दिवस चालणार? ' माझ्या दुर्लक्षामुळे तो आणखीनच अस्वस्थ झाला. निदान त्यानं आपल्या ' शारीरभाषे ' नं ( हा सुम्याचाच शब्द!) तसं दाखवण्याचा प्रयत्न केला. ' हे म्हणजे हे!! ' त्यानं आपलं बोट माझ्या माॅनीटरवर दोनतीनदा आपटलं. ' तू जे करतोयेस ते! मी जे करतो ते! ह्या कंपनीतले सतराशे साठ लोक करतात ते! ' ' सुम्या, आपल्या कंपनीत आठशे एकोणपन्नास लोक आहे. ' मी शांतपणे म्हणालो. ' विषय बदलू नकोस. लोक किती आहेत हा मुद्दा नाहिये. ते करतात काय त्याच्याविषयी बोलतोय आपण! ' सुम्याचा आवाज आता थोडा चढला होता. जवळच बसलेल्या माझ्या टी एलने एक कृष्णकटाक्ष टाकला. (त्याचे नाव कृष्णन आहे.) आणखी शोभा नको म्हणून मी पटकन साॅलीटेरवर फुली मारली आणि स्क्रीन लाॅक करून सुम्याबरोबर निघालो. सुम्या माझा शाळूसोबती. पुढे काॅलेजूसोबती, आणि आता जाॅबूसोबती. सुम्या पहिल्यापासूनच काहीसा वेगळा! चार लोक वागतात तसंच आपण वागावं यात काहीतरी अपमानकारक आहे अशी त्याची समजूत. म्हणून दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क पडूनही तो काॅमर्सला गेला. पुढे बीकाॅमनन्तर सी ए चा मार्ग सोडून संगणकाच्या क्षेत्रात शिरला, आणि माझ्या नशीबातच होतं म्हणून शेवटी आमच्याच कंपनीत लागला! नेहमी काहीतरी विचित्र विषय उकरून काढणे आणि त्याचा कीस पाडणे हा त्याचा आवडता टाईमपास. एकदा त्यानं मला असं विचारलं होतं की बस धावत असताना सगळ्या खिडक्यांमधून आणि दरवाज्यांमधून हवा आतच शिरत असते. मग ती जाते कुठे? आणि कुठेच जात नाही तर मग बसचा स्फोट का होत नाही? असो. आता ही ' कंपनीतले लोक काय करतात? ' ही काय नवी भानगड आहे ते काही माझ्या लक्षात आलं नाही. ' काय वाईट करतात आपल्या कंपनीतले लोक? ' ' वाईट आणि चांगलं हा नंतरचा मुद्दा रे! ते सकाळपासून रात्रीपर्यंत कीबोर्ड बडवण्याशिवाय काही करतात तरी का? ' सुम्यानं सिगारेटच्या पाकीटातून एक सिगारेट काढली आणि ती पेटवून तो झुरके घेऊ लागला. ' आपण सगळेजण म्हणजे नुसती यंत्रं झालो आहोत. निर्बुद्ध, निर्गम, निर्मम, निर्..... ' ' निराधार, निराकार, निर्गुण.. ' मी शब्दांची भर घालायचा माफक प्रयत्न केला. पण सुम्याने त्याची अजिबात दखल घेतली नाही. ' आपली आयुष्यं अगदी शुष्क झाली आहेत. नीरस. शुष्क. कोरडी. आॅफीस एके आॅफीस आणि घर एके घर. रोज तीच बस, तेच रटाळ काम, तेच सॅन्डवीच, तोच बरगर! सगळं तेच. कामही तेच आणि टाईमपासही तोच! छ्या! ' मी गप्प राहिलो. पण त्यामुळे सुम्या काही बोलायचा थांबला नाही. ' काहीतरी? काहीतरी वेगळं? जीवनातल्या किती अनुभवाना आपण मुकतोय त्याची कल्पना आहे का तुला? ' ' हो, आता एक जाॅब म्हणजे एकच अनुभव येणार ना! बट यू कॅन आस्क युवर टी एल फाॅर सम डिफरण्ट काइंड आॅफ वर्क! ' ' मी ह्या जाॅबच्या अनुभवाबद्दल बोलत नाहिये मूर्खा! ' ' मूर्ख ' ही सुम्याची पहिली आवडती शिवी आहे आणि ' हरामखोर ' ही शेवटची. ' मग? ' ' काहीतरी वेगळं, उच्च, उदात्त असं काही करावं असं तुला कधी वाटलंच नाही का? ' ' .... ' ' काहीतरी कलात्मक, चाकोरीपेक्षा वेगळं? ज्यामुळे तुझ्यातल्या प्रतिभेला अभिव्यक्तीचा मार्ग मिळेल? ज्यातून तुला आत्मिक आनंद मिळेल? ' हे जरा जास्तच अवघड होतं. मी काहीसा वैतागून म्हणालो, ' सुम्या, जरा मला कळेल अशा भाषेत बोल. आणि तुला नक्की काय म्हणायचयं? आपण कामाशिवाय काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर केलं पाहिजे एवढंच ना? ते सगळे जण आपापल्या परीनं करतच असतात. कोणी पिक्चर बघतं, कोणी पबला जातं, कोणी नुसतचं भटकायला जातं, कोणी क्रिकेट खेळतं.. ' तु यातलं काय केलंयस आणि कधी? सांग मला! ' ' आम्ही गेल्या वर्षी ट्रेकिंगला गेलो होतो. कुमारपर्वत का कुठे ते! ' ' त्याला दोन वर्षं झाली मूर्खा! गेली दोन वर्षं तू कीबोर्ड बडवण्याशिवाय काहीही केलेलं नाहीयेस! आणि दुर्दैव हे की तुला त्याची जाणीव देखील नाहिये! ह! ' ' हे बघ सुम्या, आम्हाला कामं असतात. आणि कामातून सुद्धा एक प्रकारचं सॅटिसफॅक्शन मिळतच की! ' यावर सुम्या हसला. काहीसं तुच्छतादर्शक. ' सुम्या, तुला जी काही निर्मिती करायचीय ती कर. काय प्रतिभा दाखवायचीय ती दाखव. चित्र काढ, कविता लिही, काय वाट्टेल ते कर. पण मला उगाच असल्या फंदात पाडू नकोस! ' मी धीर करून शेवटी सांगूनच टाकलं. कदाचित सुम्याला ते आवडलं नसावं. पण माझा नाइलाज होता. मी त्याला चांगला ओळखून आहे. सुम्याची सिगारेटसुद्धा आता संपली होती. त्यामुळं मला वाटलं आता विषय संपला. पण सुम्या ते उरलंसुरलं थोटुक ओढत बोलू लागला, ' ते इतकं सोपं नाहीये. नुसती प्रतिभा असून भागत नाही. सृजनशीलतेला आणि निर्मितिक्षमतेला वाव मिळायला तसं वातावरण लागतं! ' सुम्या त्या ' हताश ' स्वरात म्हणाला, ' कलासक्ती नावाची काही गोष्ट शिल्लकच राहिलेली नाहिये! ह! ' खरं तर सुम्या काय बोलला ते मला काही फारसं कळलं नाही. पण काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो, ' सक्ती नाहीये ना? मग ते बरंच नाही का? ' यावर सुम्याने माझ्याकडे एक सहानूभूतीपूर्ण नजर टाकली, आणि तो शांतपणे म्हणाला, ' सक्ती नव्हे. आसक्ती. कलेची आसक्ती. ' सुम्याने गेल्याच आठवड्यात त्याच्या टीममधल्या ' कला मीरचंदानी ' नावाच्या मुलीशी माझी ओळख करून दिली होती. पण त्याच्या ह्या वाक्याचा तिच्याशी काही संबंध असेल असं मला वाटलं नाही. ' निर्मिती तर दूर. पण कलेचा आस्वाद घ्यायची देखील कुवत राहिलेली नाहिये आपल्यात! छे! काय आयुष्य आहे! ' सुम्याचं हे असलं सगळं बोलणं ऐकून मला कसतरीच वाटायला लागलं. आपण खरोखरच त्याला काहीतरी मदत करायला हवीय असं वाटू लागलं. मग मी सगळे जे सांगतात तेच त्याला पुन्हा एकदा सांगितलं, ' सुम्या तू लग्न का नाही करत? म्हणजे तुला असं एकटं वाटणार नाही. आणि तुझ्या ' निर्मितिक्षमते ' लाही वाव मिळेल! ' मी एक पीजे टाकला आणि हसलो. सुम्या मात्र गंभीरच होता. त्यानं आपली सिगारेट विझवून फेकुन दिली आणि माझा खांदा थोपटत, जणू काही तोच माझं सांत्वन करतोय अशा सूरात म्हणाला, ' तुला कळायचं नाही मित्रा... जाऊ दे. पण मी मात्र ठरवलंय. हा जाॅब सोडायचा. ' ' काय? ' मी अवाकच झालो. हे सगळं प्रास्ताविक ही बातमी सांगण्यासाठी असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. ' काय म्हणतोस काय? तू दुसरा जाॅब बघितलास? ' ' नाही! ' ' मग? ' ' पुढचं पुढं! सध्या तरी ही नोकरी सोडणारेय ' ' आणि ह्याचं काय? ' मी हातानं घास घेत विचारलं. ' बघू! ' आॅफीसात परत येताना आम्ही एकही शब्द बोललो नाही. मी विचार करत राहिलो कि ह्याला जर खूप वेळ मिळाला तर हा नक्की काय करणार आहे? एकदम दहाबारा नाटकं वगैरे लिहून काढेल का? कि एखादं महाकाव्यच लिहुन टाकेल? की हुसेनसारखी चित्रं काढेल? आणि आपण खरोखरच काही करत नाही का? त्या रात्री मी बराच वेळ सुम्याबद्दल विचार करत राहिलो. एकिकडे असं वाटत होतं की जर खरोखरच ह्या माणसानं आपल्यातल्या कलागुणाना वाव मिळावा म्हणून जाॅब सोडला तर दड वुड बी सिमप्ली ग्रेट! त्याच्या धैर्याला दाद दिली पाहिजे! पण दुसरीकडे सुम्याची काळजीसुद्धा वाटत होती. पुढे दोनचार दिवस सुम्याचं दर्शन घडलं नाही. मी त्याच्या ह्या निर्णयाविषयी अर्थातच कुणाकडे बोललो नव्हतो. त्यामुळे त्यावर काही चर्चादेखिल झाली नाही! सुम्या दिसला नाही त्याअर्थी तो शेवटच्या फाॅर्म्यालिटीज मध्ये बिजी असावा अशी माझी समजूत. जवळजवळ आठवडाभर फोनसुद्धा नाही. आणि त्या शुक्रवारी दुपारी स्वारी एकदम माझ्या क्युबिकलकडे हजर! ' काय बिजी का? ' हातातल्या सिगारेटशी रजनीकांतसारखे चाळे करत सुम्या म्हणाला. ' नाही. आलोच! ' मी त्याचा बाहेर जायचा इरादा ओळखला. ' हो.. तुम्ही रिकामटेकडेच! एका पायावर तयार! ' आज सुम्या भलताच खुशीत दिसत होता. ' काय विशेष? ' ' चल सांगतो.. ' दरवाजातून बाहेर पडल्यावर त्याने ती सिगारेट शिलगावली आणि म्हणाला, ' गेस् वाॅट? ' ' वाॅट? ' ' आय गाॅट अ हाइक. फिफ्टी पर्सेन्ट! ' ' वा S व! दॅट्स ग्रेट! अभिनन्दन मित्रा! ' मी हसलो. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. ' तुला आश्चर्य वाटलं असेल ना? पण आय नेव्हर रीअलाइज्ड की आपली कंपनी इतकी केअर करते! माझ्या मॅनेजरला समजलं की आय ऍम नाॅट हपी. त्यानं मला नव्या ग्रूपमध्ये टाकलं. प्रोजेक्ट खूप इन्टरेस्टिंग आहे. आणि वर हे! ' ' पण तुला हे असलं कामच नको होतं ना? ' ' ते बोललो रे त्यादिवशी! म्हणजे काय तू खरंच समजलास की काय? ' सुम्या हसत म्हणाला. मी गप्प राहिलो. ' ऍन्ड यू नो वाॅट? मी त्या दंडवतेबरोबर काम करणारेय! ' सुम्याला जणू उकळ्या फुटत होत्या. ' आता हा दंडवते कोण? ' ' हा नव्हे. ही!! ' ' कोण? ' आपण त्या दिवशी कॅफेमध्ये पाहिली नव्हती का? उंच, गोरी? ' ' ओह! पण ती पंजाबी आहे ना? ' ' हो. पण नेहमी स्लीवलेसमध्ये असते म्हणून पोरानी तिचं नाव दंडवते ठेवलंय! ' ' वाह! मजा आहे तुझी! ' मी काहीसा उपरोधानं म्हणालो! ' ह.. जेलस?! एनिवे, मला आता जायचंय. प्रोजेक्ट किकाॅफ मीटिंग आहे! ' सुम्यानं उरलेली सिगारेट विझवून फेकुन दिली आणि तो निघुन गेला. मी विचार करत राहिलो.
|
Bsa
| |
| Thursday, March 02, 2006 - 3:36 pm: |
| 
|
सहि रे.. होते अस बर्याच वेळेला
|
Maanus
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:32 pm: |
| 
|
बर्वे लै भारी हो...
|
Kandapohe
| |
| Thursday, March 02, 2006 - 9:11 pm: |
| 
|
मला एकदम शिरीष कणेकरांचा जाड भिंगवाला ढापणा मित्र आठवला. 
|
मस्त रे.. नानू सरंजामेची आठवण आली अगदी
|
Champak
| |
| Friday, March 03, 2006 - 9:38 am: |
| 
|
सव्या, मला स्लीवलेस सोनाली आठवली...... सरफ़रोश मधली
|
Dineshvs
| |
| Saturday, March 04, 2006 - 2:41 am: |
| 
|
अजुन स्लीवलेसच्या जमान्यात तुम्ही ? आता नूडल्स आणि स्पॅगेटी आल्या रे. कळलं नसेल तर कुठल्याहि तरुण मुलीला विचारा.
|
Meenu
| |
| Monday, March 06, 2006 - 6:20 am: |
| 
|
खूपच छान ओघवतं लिहिल आहेत...संवाद अगदि समर्पक आहेत..
|
बर्वेसाहेब, छानच लिहिलंय ! आणि आपण " दंडवते " पर्यंत येवून थांबलात ते बरे झाले....
|
Shraddhak
| |
| Thursday, March 16, 2006 - 1:35 am: |
| 
|
सक्ती नाहीये ना? मग ते बरंच नाही का? कृष्णकटाक्ष टाकला. (त्याचे नाव कृष्णन आहे.) <<<<<
सहीच लिहिलंयस श्रीराम.
|
Coldfire
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:30 am: |
| 
|
ती पन्जबी 'दन्डवते' स्लीवलेस घलुन पोराना चान्गलच गन्डवते..सही आहे....
|
श्रीराम मस्त जमलंय बर्का. अगदी अगदी अस्संच होत असतं. हे वाचल्यावर लक्षात आलं असले बरेच सुमे आहेत आजूबाजूला. कलासक्ती,निर्मितीक्षमता, दंडवते दिनेश, नूडल्स आणि स्पॅगेटी ऑफिसमधे?? ही कुठली सॉफ्टवेअर कंपनी म्हणे?
|
|
|