|
फेब्रुवारी ६, २००६ रोजी प्रक्षेपित झालेल्या ‘गंगूबाई नॉन-मॅट्रिक’ ह्या मालिकेच्या भागाचे लेखन मी केले होते. वेगवेगळ्या कारणामुळे चित्रिकरण न होऊ शकलेल्या, निसटलेल्या भागासकट पूर्ण एपिसोडचा आस्वाद, तो एपिसोड पाहिलेल्या व न पाहू शकलेल्या मायबोलीकराना घेता यावा यासाठी हा पोस्ट प्रपंच. बाकी तांत्रिक बाबी वगळून मुख्यत्वे संवाद ह्या स्वरुपात (नवीन सुटसुटीत आकर्षक पॅकमधे) हा एपिसोड पोस्ट करत आहे. (हे फक्त पहिला वहिला भाग म्हणूनच बर का. पहिले नाट्यपुष्प अर्पण करणारा नानू संरजामे आठवल्यास तो योगायोग समजावा. ) कळवण्यास आनंद वाटतो की ह्या मालिकेच्या पुढच्या काही भागांचे लेखन करण्याची commercial offer नुकतीच मिळाली आहे ! ********* भुताचा वाडा ! रात्री आकाशात चंद्राचा क्लोज शॉट. कोल्ह्यालांडग्यांचे विव्हळणे ऐकू येत आहे आणि भयप्रद वातावरण तयार करत आहे. जुनं फर्निचर असलेल वाड्यासारखं घरं. त्याच्या दिवाणखान्यात छू उभा आहे. खिडकीबाहेर चंद्राकडे बघत ! चंद्राचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. पुन्हा लांडग्याचे ओरडणे ऐकू येते आणि छू पुन्हा एकदा रडवेला चेहरा करतो. तेव्हढ्यात मागून बाईचा एक हात येतो छूच्या खांन्द्यावर आणि छू किंचाळतो गंगूबाई : अरे मी हाय गंगू! वोरडायला काय झालं (हातात डबा / भांडं आहे ज्यात भात आहे) छू: गंगूताई ! कुणीतरी आहे तिथे ! गंगूबाई : कुणीतरी आहे तिथे ? मेल्या कुणीतरी नाय मीच हायं तीबी हिथेच ! छू: नाही तस नाही पण ह्या घराविषयी काय काय ऐकल होत ते खर वाटत आता ! किती भयाण वातावरण आहे गंगूबाई : वरण नाय नुसताच भात आहे ह्या भांड्यात छू: वरण नाय ग ! वातावरण ! मला खूप भिती वाटते गंगूताई. इथे भुताचा वावर आहे गंगूबाई : (खूश होत) वा ! छू: काय ? गंगूबाई : वा वर हाय का खाली असं म्हणत होतो मी ! छू: सगळीकडे आहे ! अस वाटत ‘भूत हू मै’ असं करत ते फिरतय सगळीकडे. सराउंड साउंड झालाय अगदी ! आता मला बहुतेक एक दिवस थ्री डी दिसणार भूत मला ! गंगूबाई : अस तिरमितीत बोलू नकोस .. आपल ते तिरमिरीत बोलू नकोस ! मला बी पहायच हाय ते भूत फ़ुजी कलर मधे ! छू: काय ? गंगूबाई : मग ! तस म्हणा चांदोबात भूताच चित्र पाह्यलोय मी .. सगळं पांढर पांढर असतं .. त्याच अंगही पांढरं अन कपडेबी पांढरे .. मग कलरचं काय म्हणा .. पण त्याच्या जीवनात काही रंग भरता येतात ते पहायच हाय ! ते मुगले आझम नाय का केला रंगीत तसं .. फुजी, यीश्टमन कलर, घोश्टमनकलर अस काहीतरी ! छू: (भडकतो ) तुझ्या समोर खरंखरं भूत आलं ना तर रंगाचा बेरंग होईल ! मग तू रंगपंचमी खेळ त्याच्याशी आणि मी शिमगा करतो तुझ्या नावाने ! पण ह्या घरात हे भूत आलं कुठून ? बाप रे ! तुलाच ह्या घराची सगळी स्टोरी माहीत आहे ना ? गंगूबाई : मग ! म्हणून तर इथे यायच ठरवल ना मी ! मला जाम मजा वाटते भुतांच्या स्टोरीमधे. आता एकतरी पहायला मिळू देत ह्या वेळी तरी ! ह्या घराचे मालक आहेत आप्पासाहेब सांगत होते मला सगळं… छू: काय सांगत होते ? (घाबरून हळूच खिडकीबाहेर बघतो) गंगूबाई : ते सांगत होते इशामृतविषयी.. छू: गंगूताई ही काय विषामृत खेळायची वेळ आहे का ? ह्या अघोरी घरात माझी आधीच लगोरी झाली आहे ! माझा कधीही भोज्जा करेल ग हे भूत! गंगूबाई : इशामृत म्हणजे तसं नाय रे ! (गंभीर होवून सांगू लागते ) इशा म्हणजे त्यांची सून आणि अमृत म्हणजे त्यांचा मुलगा. ते दोघं गावाला जाणार होते त्याच दिवशी इशाचा मृत्यू झाला अपरि अपरि .. अपरिहार्य कारणामुळे. छू: काय ? अपरिहार्य ? गंगूबाई : म्हन्जे कशामुळे तिचा मृत्यू झाला ते कारण मला माहीत नाय. कारण माहित नसल की ते अपरिहार्य असत अस म्हनायच असत ! छू: अस काय ? असेल त्यांचा तेव्हा काळ आला असेल आणि वेळही आली असेल. मग काय झाल ? गंगूबाई : तेव्हापासून अमृतसाहेबांन्च्या डोकयावर परिणाम झालायं. ते मधेच रात्री बेरात्री बॅग घेउन बाहेर जातात आणि स्टेशनवर जाउन बसतात म्हने. रोज त्यांच्या अंगात यकदम कुणीतरी संचारल्यासारखं वागतात. जणूकाही एखाद भूतचं त्यांच्या मानगुटीवर बसलय अस वाटतं ! रोज नवीन भूत ! छू: आणि इशाताईंच भू भू भू.. भूत झालय ? ? गंगूबाई : हो ! पाहिलयं त्या भूताला कुणी कुणी ह्या घराभोवती फिरताना !ं म्हणून इकडं कुणीबी फिरकत नायं. परवा रिक्षावालाही नाही म्हणाला यायला. रिक्षावाले म्हणा कुठेही यायला आधी नाहीच म्हणतात ! छू: पण मी पण ऐकलय की लोक जाम घाबरतात ह्या घराला.. गंगूबाई : मग काय ! झालच तर मधेच विचित्र आवाज येतातंं घरातून. धडाम धड धड धड. धडाम धड धड धड छू: (रडत) माझ आज काही धड नाही ! तुझं धड.. आपलंं..ं तुझं डोकं ठीक आहे ना ? का तुझाही अमृतराव झालाय ? आणि तो भात कशाला ठेवतेस रोज खिडकीत ? गंगूबाई : अरे ते म्हणतात ना असतील शिते तर जमतील हिथे ! तर जमतील तिथे ! (शेवटी बरोबर म्हण आठवल्यामुळे सुटका झाल्यासारखं म्हणत) तर जमतील भुते !!! तसं इशाचं भूत भात खायला येईलं मग मी तिचा इंन्टरव्ह्यो घेणारंं, प्रश्न इचारणार… परिक्षेत विचारतात तसं !ंं इशाची परीक्षा मला आता घ्यायलाच लागेल ! छू: (भडकतो) भुताचा इंन्टरव्हू ? गंगूताई तुझं डोकं उलटं झालयं ! गंगूबाई : माजं डोकं नाय भुताचे पाय उलटे असतातं ! मी पहिला प्रश्न तिला हाच इचारणार कि उलटे पाय कशी बाई वापरतेस ? पुढे जायच असल तर मागं मागं चालत जातात का तुमच्यात ? छू: जरा मागचा पुढचा विचार करून प्रश्न विचार गंगूताई ! गंगूबाई : मग अजून इचारणार की तुमच्यात फॅशन नाय करत काय.. सारख आपल पांढरी साडी घालून फिरायच ते ! छू: (भडकतो) मग काय भूत स्विमींग ड्रेस घालून फिरणार काय ? गंगूबाई : तस नाय रे ! पण छान नववारी वगैरे घालून फिरायच ना ! छू: का पाचवारी का नाही ? गंगूबाई : मग लोकांची पाचावर धारण बसलं ! अजून हे पण इचारणार की नेहमी सॅड सॉंग गात का फिरता बाई तुम्ही लोक ? छू: (चिडून) गंगूताई ! सॅड सॉंग नाही तर मग आयटम साऍंग गाणार का ? काय पण बोलते ! सॅड सॉंगच चांगल वाटत असेल त्याना . आता बघ का पांढरी साडी घालून इशाताईंच भूत ‘झोपडीमे चारपाई मानूस बिना सुनी पडी’ म्हणणार का ? गंगूबाई : गप ! वरडू नको. ते बघ आप्पासाहेब येताहेत !
|
(आप्पासाहेब सावकाश चालत येता आणि बसतात) आप्पा: अरे अमृतला पाहील का कोणी ? छू: नाय आप्पासाहेबं आप्पा: काय होणार ह्या मुलाचं काही कळत नाही. आधीच उनाड होता. लग्न झाल्यावर जरा सुधारतोय अस वाटतानाच इशा…(सुस्कारा सोडतात).. आता ह्याच्या अंगात कोण कोण येत असतं रोज. लोक काय काय बोलतात ह्या घराबद्दल ! गंगूबाई : हो ना आप्पासाहेब लोक म्हणतात ह्या घराच्या तळघरात भूत आहे इशाताईंच आणि मग ते मधेच बाहेर पडतं आणि ह्या घराभोवती फिरत राहतं ! आप्पा: छे छे ! तळघरात भूत ? काही पिढ्यांपूर्वी आमच्या तळघरात हंडे होते सोन्याचे! छू: हा सोन्या कोण आणि त्याचे हंडे नि कळशा तुमच्या तळघरात कशाला ? गंगूबाई : मेल्या सोन्या म्हणजे सोन्याच्या नाण्यानी भरलेले हंडे ! आप्पा: खरं आहे ! पण नंतर काही वैभव उरल नाही. रिकाम झालं तळघर आणि हे घर. छू: (‘पलभरमे ये क्या हो गया’ च्या चालीवर) तळघरमे ये क्या हो गया. हंडे गये और भूत आ गया ! आप्पा: छू अरे ह्या वावड्या आहेत फक्त .. आता ते तळघरही कुणाला माहीत नाही. दोन तीन पिढ्यापासून त्याचं गुप्त दारही कुणाला सापडलेलं नाहिये ! छू: (पलभरके लिए कोई हमे प्यार कर ले च्या चालीवर) तळघरके लिये कोई हमे दार कर दे, छोटाही सही ! गंगूबाई : हात मेल्या इथे आप्पासाहेब अस्वस्थ आहेत आणि तू .. (तेव्हढयात अमृत प्रवेश करतो. हातातली बॅग खाली ठेवत कवीता म्हणायला लागतो.) अमृत:अस्वस्थ ! अस्वस्थ आत्मे फिरत आहेत ह्या कुडीतून त्या कुडीत .. छू: झालं ! ह्यांच पुन्हा सटकल का ? आज कुठल्यातरी कवीचं भूत दिसतय मानगुटीवर अमृत:अस्वस्थ आत्मे फिरत आहेत ह्या कुडीतून त्या कुडीत इशा माझी कोमेजली का रे माझ्या फुलपुडीत (आपल्याच तारेत) ... कोणाच काय सटकल म्हणतोयस मित्रा ? छू: (घाबरत, थोडं लांब जात) नाय काय नायं, आज काय नवीन अमृतराव ? अमृत:(एकदम मेलोड्रॅमॅटिकली) नवीन काय रे जुनेच सगळे ! जुने ड्रॅक्युले अन जुनेच गळे ! (छूचा गळा पकडत भितीदायक आवाजत) जुनाच वाडा, जुनेच तळघर लागेल तुला शेवटची घरघर ! (गळा सोडतो) छू: (‘धकधक करने लगा’ च्या चालीवर रडत गाणं म्हणतो) घरघर करने लगा मोरा जियरा मरने लगा ! गंन्गूताई ! आप्पासाहेब ! मला वाचवा ! गंगूबाई : घाबरु नकोस . आजकाल बऱ्याच कवींची कवीता ऐकून शेवटची घरघर लागल्यासारखंच वाटतं. छू: पण हे असं का म्हणाले ? शेवटची घरघर म्हणजे ते भूत नक्की भेटणार मला लवकरचंं आणि मग !! बापरे ! इशाताईंच भूत ! अमृत:इशा इशा ! फिरतो तुझ्यासाठी दाहीदिशा ! (बॅग घेउन निघून जातो) गंगूबाई : (त्याच्याकडे पहात विचारपूर्वक ) आता ह्या इशाच्या भुताच्या मागे सरळ पावलानी गेलच पाहिजे आपल्याला ! रात्री घराबाहेरच्या परिसरात (माती असलेलं अंगण, बाजूला झाडं / फूलझाडं वगैरे) छू: गुमनाम है कोई. बदनाम है कोई किसको खबर कौन है वो… गंगूबाई : अरे कौन है वो काय? वो है इशाताई ! देवा, आज तरी इशा देवलं का ? .. आपलं ते .. गावलं का ? छू: हेमाला विचार ! गंगूबाई : काय ? छू: हे माला विचार ! (‘हे तू मला विचार’ ह्या अर्थी ) गंगूताई हे बघ ठसे ! गंगूबाई : कसले ठसे ! आपण काय जंगलात आहोत काय? छू: ह्याच्यापेक्षा जंगल खूपच चांगल. बघ बघ कसे चौकोनी ठसे आहेत. हाय हिल् ! गंगूबाई : हाय हिल काय म्हनतोस, हिल हाय म्हन ! हिल म्हन्जे काय? छू: हिल म्हन्जे डोंगर ! गंगूबाई : मेल्या इथ ठशाचा खड्डा हाय आणि तू डोंगर हाय डोंगर हाय काय म्हणतोयस ? छू: डोंगर नाय ग. हिल हिल. (नाचतो) अग हिल हिल पोरी हिला गंगूबाई : मुड्द्या, हिला नाय तिला शोध आधी.. हिल हिल काय म्हन्तो आहेस ? छू: गंगूताई नुसता हिल नाय, हाय हिल. म्हणजे उंच टाचांचे बूट नसतात का तसेच इशाताईंच भूत घालत असणार ! हे बघ कसे गेलेत ठसे ह्या बाजूने. चल चल चल ! (घाईघाईने उत्साहात चालत जातो ठशांच्या मार्गाने) … गंगूबाई : (तोपर्यंत विचारात) हे ठसे ह्या बाजुने गेलेत. म्हणजे उलट्या पावलाने चालत आल तर भूत गेलं असनार बरोबर इरुद्ध दिशेला! (छू जातो त्याच्या विरुद्ध दिशेला बघते) म्हणजे ह्या साईडला ! तिकडच बघतो मी. ए छू, कुठे गेला तेव्हढ्यात ! (विरुद्ध दिशेला जाते) छू चालतो आहे. आणि त्याच्या मागे हळूच इशाचं भूत येउन चालू लागतं. (आधी हाय हिल्सचे सॅंडल्स दिसतात मग पांढरी साडी. केस मोकळे सोडलेले. डाव्या हातात एक मेणबत्ती आहे ) छूची भूताकडे पाठ आहे आणि तो खाली ठशांकडे पहात आहे. आणि त्याला वाटत की गंगूताईच त्याच्या मागे आहे. तो बड्बडत रहातो छू: गंगूताई हे बघ इथे ठसे थांबलेत. इथून बहुतेक भूत हवेत चालत गेलं असणार. (उसनं अवसान आणून) नक्कीच मला बघून पळून गेल असणार. तुला सांगतो गंगूताई मी घाबरल्याच नाटक करतो .. म्हणजे काय की भुतालाही बरं वाटलं पाहिजे ना कुणितरी आपल्याला घाबरतं म्हणून.. तू माझ्या पाठीशी असल्यावर मी कुठल्याही भुताला घाबरत नाही ! आता तुझा हात माझ्या पाठीवर ठेव .. म्हणजे काय की तुला भिती वाटणार नाही ! इशाच भूत हात छूच्या खांद्यावर ठेवतं. छू मागे न बघता चालायला लागतो. छू: तुझा हात एकदम हलका कसा झाला आज ? आता भूत इथेच जवळपासच असल पाहिजे. पण तू घाबरू नकोस. माझ्या मागे मागे ये. आता हात काढलास तरी चालेल. माझी … आपलं .. तुझी भिती गेली असेल आता ! इशाचं भूत खांद्यावरचा हात काढतं. दोघे चालत रहातात. छू: बर झाल तू टॉर्च आणलास ते. बघू देत मला जरा.. भूत हातातली मेणबत्ती त्याला देतं. ती घेऊन छू शोधू लागतो. एव्ह्ढ्यात त्याला ती मेणबत्ती असल्याच लक्षात येतं… त्याच वेळी वारा येउन भुताची साडी फडफडते आणि छूच्या तोंडासमोर येते… ती पहाताच हळू हळू त्याच्या लक्षात येउन तो मागे बघतो. आणि घाबरत घाबरत हसतो.. त्याबरोबर भूत ही हसते. हळूहळू आवाज मोठा करत दोघेही हसतात छू अर्थातच रडवेल्या चेहऱ्याने ! मग … छू: गंगूताईऽऽऽऽऽ (पळत सुटतो) काही अंतर धावून छू गम्गूताईवर आदळतो. ती धपाटा घालते. छू: गंगूताई ! भूत ! गंगूताई ! भूत ! गंगूबाई : मेल्या ! कुठे होतास इतका येळ ? छू: गंगूताई भूताने मला चांगलाच हात दाखवला गंगूबाई : मी उलटे पाय बघायला गेलो आणि तू हात बघून आलास ? मी भुताला शोधायला गेले आणि सापडला वेताळ ! छू: म्हणजे कोण ? गंगूबाई : अमृतराव ! छू: अमृतराव वेताळ ? का तो मृतराव झाला का ? त्यांचा काय संबंध ? गंगूबाई : अरे वेताळ समंध खवीस काय बी म्हण त्याना.. वैताग नुसता ! ते बघ आज नवीन संचारलय त्यांच्या अंगात ! स्वत:ला शहजादे सलीम समजताहेत ! छू: अरे बापरे ! पण तुला पळायला काय झाल गंगूताई ! गंगूबाई : अरे स्वत:ला सलीम समजून बोलत फिरत होते ! मला बघताच अनारकली अनारकली अस करत मागे आले ! छू: (हसत हसत) तू आणि अनारकली ? कली नाही गुच्छ म्हणायच असेल त्याना ! गंगूबाई : हात मेल्या. मग मी घाबरलो ना. त्या भुताला नाय घाबरत मी पण हा येताळ ! अमृतराव येतोच तेव्ह्ढ्यात तिथे ! अमृत:(दिलीपकुमारच्या स्टाईलमधे) कितनी मुद्दत से तुम्हे तलाश कर रहे थे अनारकली ! ये कौन कबख्त बीच मे दिया लेके खडा है ? छू: वो … चहा पन्हा ! गंगूबाई : अरे मुडद्या , चहा आणि पन्हा दोनी पाजतोय काय त्याना ! जहापन्हा म्हण ! छू: हां ! जहापन्हा ! मै वो भूत देखा तो मै धाव धाव के आया ना. म्हणजे हुआ क्या के उसके साडीका पदर उडा वैसाईच मै समझा के वो गंगूकली … अर्रर्र … आपल ते अनारताई … अर्रर्र .. गंगूताई नही है ! तो मैने उसके सामने अपने जान बचाने के लिये पदर पसरा ! तो वो हसने लगी तो मैने धूम ठोकी ! अमृत:क्या बकवास कर रहा है ये आदमी ? अरे तुम मुश्किल मे थे तो आवाज देनी थी ना ऐसे ः ए भाय , गाडी रोको भाय ! ए भाय ! .. अनारकली तुमने कभी बताया नही इस नामाकूल के बारेमे ! गंगूबाई : वो जहापन्हा क्या बतानेका. ना है हुवा घाबरा ये छू: काय बोलते आहेस गंगूताई गंगूबाई : मला वाटल ह्यांच्यात ते लिहिताना उलट लिहित येतात ना तस वाक्य पण उलट बोलायच की काय ! मी म्हणत होतो ये घाबरा हुवा है ना ! छू: हा हा भिती के कारण मै पांढरा फटक पड गया.. ये सफेद रंग कब मुझे छोडेगा ! गंगूबाई : मुडद्या काय बरळतो आहेस ? (अमृतकडे वळून) वो क्या हय इसका मेंदू जरा अशक्त हय.. उसको छोड दो. तुम अपनी असली अनारकली को शोधो. अमृत:क्या कह रही हो तुम ? गंगूबाई : फिर क्या. कहा होगी वो ? (काय सांगायच ते विचार करते) यहा तो नही है ! अमृत:यहा नही फिर कहा है ? छू: फिर कहा बरं ? फिर फिर .. वो फिर रही है पांढरी साडी मे केस मोकळे सोडके! अमृत:अच्छा ? ए भाय ! मेरी अनारकली गुम गयी है मेरे भाय ! अनारकली ! (निघून जातो)
|
Pendhya
| |
| Tuesday, February 14, 2006 - 1:49 am: |
| 
|
मस्त रे राहुल, एव्हढ्यातच HHPV पुढील भागांसाठी शुभेच्छा.
|
सकाळ. घरात. रात्रीच्या धावपळीमुळे छू झोपेत आहे. गंगूबाई त्याला पकडून पऍसेजमधून अमृतरावांच्या खोलीकडे चालली आहे. छू: (झोपेत बरळतो आहे) अनारकली ! पांढरी साडी, पांढरा चेहरा, पांढरी मेणबत्ती ! भूत होती का इशा धवल ! गंगूबाई : एऽऽ कृष्ण धवल ! जागा हो आता ! छू: काय ग गंगूताई रात्रभर झोप नाही. झोपेत सगळ पांढरं पांढरं दिसत होत सगळ ! तुझी स्वप्न ब्लॅक ऍन्ड व्हाईट असतात की कलर मधे ? गंगूबाई : त्झ्या कानाखाली रंगीत चित्र काडीन आता. आता हळूच अमृतरावांच्या खोलीत जाउन बघ. छू: काय बघू ? गंगूबाई : त्यांच्या अंगात काही आलं नाहीये ना ते बघ. सकाळी जरा ठीक असतात ते ! आणि मग ते ठिक असतील तर त्याना कालच्या भुताबद्दल सांग.. छू: तू पण चल ना… गंगूबाई : मी नाय येणार. त्याच्या अंगात अजून सलीम असेल तर माज्या मागे अनारकली अनारकली म्हणून लागेल येडं ! छू: ठीक आहे मी जातो आणि सांगतोच त्याना भुताबद्दल ! छू खोली प्रवेश करून इकडेतिकडे पहातो पण त्याला अमृतराव दिसत नाही ! तो पुढे जातो हाक मारत तेव्हा खोलीतलं मोठं कपाट दिसतं. छू इकडे तिकडे बघतो. आता तो कपाटाकडे पाठ करुन उभा आहे ! छू: अमृतराव ओ अमृतरावऽऽऽ ! … अरे कुठे गेले सकाळी सकाळी ? शहजादेऽऽऽ ? … सलीम साऽऽऽहेब ? इतक्यात पाठून पुरूषाचा हात येउन छूच्या खांद्यावर पडतो. छू किंचाळून मागे वळून बघतो तर अमृतराव ! अमृत:काय रे छू मला शोधत होतास ? छू: (दचकून) हो पण तुम्ही नव्हतात इथे आणि आत्ता एकदम कसे काय ? कूठून आलात ? अमृत:अरे अस काय करतोस ? मी इथेच तर होतो. दृष्टी अधू झालीये का कुणी पछाडल तुला ? काय करतो आहेस असं डोकं फिरल्यासारख ? छू: नाही नाही. मी ठिक आहे. मला काहितरी सांगायच होत अमृतराव. तुमची तब्येत ठिक आहे ना ? अमृत:का रे ? माझ्या तब्येतीला काय होत ? मस्त मजेत तर असतो मी छू: नाय नाय विचारल आपल ! (उपरोधाने) तुम्हाला कुठे काय होत ? (तरिही अजून खात्री करायला हाक मारतो) अनारकली.. अमृत:कोण अनारकली ? काय गर्लफ्रेंड वगैरे गटवलीस की काय छू ? छू: छू छू ! आपल ते छे छे ! मी असच बोललो चहा पन्हा ! अमृत:काय बोलतो आहेस ? छू: नाय ते हे सांगायच होतं ते विसरलो मी तुम्ही भूताने पकडल्यासारखा हात ठेवलात ना खांद्यावर ! अमृत:मी नुसताच ठेवला हात खांद्यावर. का घाबरतो का आहेस एव्हढा ? छू: नाय काय ना ! कालपासून ‘खांदा’ द्यायचेच प्रसंग चाललेत माझे! आता मलाही द्यावा लागणार बहुतेक. अमृत:कशाला आला होतास ? काय सांगायच होत ? नीट बोल ना ! छू: (घाबरलेलाच आहे अजून) ते मला सांगायच होत काल रात्रीचं ! सांडरी पाढी ... आपल ते पांढरी साडी… मला काही सुधरत नाहिये सांगायला ! अमृत:अरे अस काय करतोस एखाद भूत पाहिल्यासारख छू: हा ! आत्ता बरोबर पॉइंट सांगितलात ! भूत ! भूतराजा बाहर आजा ! अमृत:काय ? छू: नाही सलीम साहेब तुम्हाला काही आठवणार नाही रात्रीच ! पण आत्ता इथे तुम्ही खरच नव्हतात ना इथे मग एकदम आलात … मला अजून धडाडतय ! अमृत:जा जा नीट विश्रांती घे. असं डोक्याला ताण देणं ठिक नाही. छू निघून जातो. अमृतरावाचा चेहरा किंचीत विचारमग्न आणि मग हसतो. छू पळत पळत गंगूबाईपाशी येतो. ती वाटच बघत असते ! गंगूबाई : अरे असा भूत मागे लागल्यासारखा पळत का आलास ? छू: गंगूताई, कालपासून माझ्या मागे भूतं का लागली आहेत ? आत्ता आपले अमृतराव खरेच आहेत का तेही भूतच आहेत ? गंगूबाई : काय बरळतोय ? अजून झोप झालेली नाय वाटत ! छू: मला वाटत ते वेताळ आहेत . भूतराजा ! भूतराजा बाहर आजा ! गंगूबाई : अरे काय झाल नीट सांगशील का नाही ? छू: मी अमृतरावाना त्यांच्या खोलीत शोधत होतो. त्याना हाकाही मारल्या तोपर्यंत ते खोलीत नव्हते. अचानक माझ्या मागून उगवले भुतासारखे ! गंगूबाई : अचानक उगवले ? ते काय लपाछपी खेळत होते का काय ? छू: अग पण मी नीट पाहिल होत खोलीत सगळीकडे कुठेही लपायला जागा नव्हती ! (रडत) तेव्हा त्यानी भॉक केल असत ना तर माझा भोज्जा झाला असता ! ह्या घरात प्रत्येक ठिकाणी भुताटकी आहे ! हा खेळ सावल्यांचा .,. गंगूबाई : हा खेळ आता संपवलाच पाहिजे गेम करुन ! छू: कुणाचा गेम ? गंगूबाई : हंऽऽऽ.. भूताचा गेम ! आता ह्या सगळ्या भुतांची नाकाबंदी करतो मी ! ह्या भुताचा भविष्यकाळ मला काही खरा दिसत नाय आता ! ऐक आता माझा प्लान … आप्पासाहेब सोफ्यावर बसलेले आहेत आणि विचारमग्न आहेत ! गंगूबाई त्यांच्याशी बोलत आहे गंगूबाई : आप्पासाहेब, ह्या घरातल्या भुतांचा लवकर बंदोबस्त केला पाहिजे. ते म्हणतात ना (बैल गेला आणि झोप केला ह्या म्हणीचा विपर्यास करत) बैल गेला आणि झोपायला आला अस काहितरी तसा उशीर व्ह्यायला नको ! आप्पा: खर आहे तुझ म्हणणं. आमच्या चिरंजीवानाही कुणी सुबुद्धी दिली तर बर होईल. रोज काहितरी नवीन डोक्यावर बसत त्याच्या. तेव्हढ्यात अमृत येतो. त्याच्या डोक्यावर आता कुणा स्वामीचं भूत आहे. अमृत:वत्सा , ह्या चिमुकल्या बालिकेबरोबर काय बोलतो आहेस ? कोण कुणाच्या डोक्यावर बसतोय. गंगूबाई : कोन बी नाय. आज हे काहितरी महाराज झालेले दिसताहेत. नमस्कार स्वामिजी ! अमृत:आशिर्वाद ! एक संतवचन नेहमी लक्षात ठेव बालिके ः कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. कुणी ना कुणी कुणाच्या तरी खांद्यावर डोक्यावर ओझे म्हणून आहे ! घंटा किणकिणी नागरा ! गंगूबाई : होय महाराज ! अमृत:होय महाराज काय? घंटा म्हणजे दारावरची बेल वाजली आहे. बघ कोण अतिथी आला आहे. गंगूबाई दार उघडते आणि एक मांत्रिक प्रवेश करतो. (तो मांत्रिक म्हणजेच छू आहे !) मांत्रिक: चामुंडा चामुंडा गंगूबाई : नाय इथे चामुंडा कोण नाय. पलिकडच्या बंगल्यात इचारा मांत्रिक: गप्प बैस बालिके. गंगूबाई : अय्या मला एका दिवसात दोन दोन जन बालिका म्हनताहेत. एव्हढी का मी लहान दिसायला लागली आहे ? (लाजल्यासारखं करते) मांत्रिक: चामुंडा चामुंडा आप्पा: कोण पाहिजे आपल्याला ? कुणी बोलावल होत ह्याना ? मांत्रिक: मी उडीबाबा ! मला ज्यानी बोलावल… मी ज्याच्यासाठी आलो आहे ते मनुष्य योनी तील नाही. भूत योनीतील आहे ! गंगूबाई : अय्या भूत ! अमृत:वत्सा, आम्ही इथे असताना भूत प्रेत समंध कुणीही इथे येउ शकणार नाही ! गंगूबाई : हो हे हिथ असताना वेगळ्या भुताची गरज नाय. आम्हाला रोज नवीन भूत बघायला मिळतं. आप्पा: या मांत्रिक बाबाजी. बघा कुठे भुताची बाधा आहे का ह्या घरात. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागू दे. मांत्रिक: चामुंडा. माझ्यापासून कुठलही भूत वाचत नाही. प्रत्येक माणूस म्हणजे एक झाड आहे.. कुठल झाड झपाटलेल आहे ते पाहिल पाहिजे. हे झाड कुठल ? गंगूबाई : मी झाड नाय काय .. मी कली ! ते अनार अनार, म्हणजे दिवाळीतल झाड म्हणाल तर बरोबर आहे ! मी अनारकली ! मांत्रिक: (गंगूताईच्या साईजकडे पहात म्हणतो) कळी खूपच खुलली आहे ! (आप्पासाहेबाकडे बोट दाखवत) हे झाड कुठल ? गंगूबाई : हे जुन खोड आहे आप्पा: काय ? गंगूबाई : नाय मला म्हणायच होत हे वयोवृद्ध आहेत. शिवाय म्हातारे झालेत आता. मांत्रिक: हं.ऽऽऽ चामुंडा ! पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही ! आप्पा: काय ? मांत्रिक: नाही म्हणजे भुताना नवीन तरूण झाडं लागतात. (अमृतरावाकडे बोट दाखवत) हे कोण ? गंगूबाई : हे अस झाड आहे की त्याला रोज येगयेगळी फुलं येतात. कधी सलीमचा गुलाब येतो, कधी कवीतेचा झेंडू फोफावतो तर कधी अध्यात्माचा मोगरा फुलतो ! मांत्रिक: चामुंडा ! नाही नाही काहितरी गडबड आहे. तरुण बाईच भूत आहे ते ! गंगूबाई : अय्या ! म्हणजे इशाताईंच ? मांत्रिक: बरोबर. इशा ! इथे इशा नावाच्या व्यक्तिच भूत आहे ! अमृत:सभ्य गृहस्था, इथे भूताची बाधा अजिबात नाही बरं. मांत्रिक: चामुंडा. माझा डावा डोळा लवलवतो आहे. उजव्या पायाचा आंगठा ठणकतो आहे.. अमृत:ह्याचा अर्थ काय ? मांत्रिक: मला भूताचा वास येतो आहे गंगूबाई : हे काय भूत आहे का वडापाव ? वास येतोय ? मांत्रिक: ते बघा ! गंगूबाई : काय बघा ! मांत्रिक: ते बघा भुताचे ठसे ! हवेत दिसताहेत मला. तुम्ही इथेच थांबा मी पाहून येतो ! हा गेलो आणि हा आलो ! एक मिनिटात ! मांत्रिक पळतो. सगळे खोलीत थांबतात . घड्याळात वेळ दिसते आहे .. दहा मिनिटानंतर …
|
गंगूबाई : अरे ! तो मांत्रिक आलाच नाही अजून ! चला आपण जाउन बघू अमृतरावांच्या खोलीकडेच गेला आहे तो ! सगळे अमृतरावांच्या खोलीत येतात… गंगूबाई : मांत्रिक बुवा ! ओ मांत्रिक बुवा ! काय बाई बुवा हा ! आप्पा: कुठे गेला तो मनुष्य ? इथे तर बाहेर जायला दुसरी कुठलीच वाट नाही ! गंगूबाई : वाट नाही पण वाट बघा ! आप्पा: आता नाही वाट तर कुठन बघणार ! गंगूबाई : आओ, मांत्रिकाची वाट बघा म्हटलो मी ! अमृत:वाट कशाला बघायची आता ? त्या भुतानेच मांत्रिकाची वाट लावली आहे असं दिसतय बालिके ! (हळूच छद्मी हसतो) गंगूबाईच्या चिंताक्रांत चेहऱ्याचा क्लोज अप ! गंगूबाई झोपली आहे ! चेहरा अजून चिंतेत आहे. असे वाटत आहे की कसलेतरी वाईट स्वप्न बघत आहे ! बॅकग्राऊंडला छूचा आवाज येत आहे हाका मारताना ‘गंगूबाईऽऽऽ गंगूबाईऽऽऽ‘ गंगूबाई : (दचकून उठते) छू ! मै आ रही हू ! देवा आता दहा तास होऊन गेले अजून छू चा पत्ता नाही ! पण मी हार नाय मानणार ! छू कुठेही असेल तरी मी त्याला शोधीनच ! सप्तपाताळातून त्याला खेचून आणीन (खाली बघताना अचानक तिच्या लक्षात येतं) पाताळ ! म्हणजे जमिनीच्या खाली ! त्या दिवशी अमृतराव अचानक आले आणि आज छू अचानक नाहीसा झाला ! तळघर ! नक्कीच त्या तळघराचा आणि अमृतरावांच्या खोलीचा काहितरी संबध आहे ! बघतोच आता मी ! अमृतरावाची खोली. रात्रीची वेळ. खोलीत अंधार आहे. अचानक कपाटाचं दार उघडून अमृत बाहेर येतो. हातात बॅग आहे ! अंदाज घेत तो बाहेर जातो ! काही क्षणांनंतर खोलीत लपलेली गंगूबाई कपाटापाशी येते ! गंगूबाई : अच्छा ! अस आहे तर ! अशी पटापट गंमत आम्हा सागेल काय ? ह्या कपाटामागे लपलय का ? गंगूबाई कपाटाच दार उघडते नि थोडा अंदाज घेऊन कपाटात शिरते. कपाटामधले गुप्त दार उघडून गंगूबाई सावकाश तळघराचे जिने उतरते आहे. मधेच मागे बघते कुणी नाही ना ! गंगूबाई : (दबक्या आवाजात) छू ए छू ! कुठ उलथला हा पोरगा कळत नाय ! तेव्हढ्यात तिला छू खुर्चीवर बसलेला दिसतो.. त्याचे हात मागे बांधलेले आहेत आणि तोंडात खूपशा (खोट्या) नोटा कोंबून तोंडही बंद केलेलं आहे ! त्यामुळे त्याला बोलता येत नाहीये. गंगूबाई : अरे मुडद्या इथे बसला आहेस का आणि माझ्या जीवाला किती घोर लागला होता (छू बोलायचा प्रयत्न करतो पण बोलता येत नाही त्यामुळे रडवेला) अरे बोल ना इथे काय करतोयस ? बोल बोल ! (छू अजूनच रडवेला. डोळे विस्फारतो कारण गंगूबाईच्या मागे कुणीतरी उभ आहे. ) अचानक गंगूबाईच्या डोक्यात मागे उभी असलेली स्त्री प्रहार करते आणि गंगूबाई खाली कोसळते ! तीच स्त्री (प्रेक्षकाना पाठमोरी दिसत असते) छू च्या तोंडातल्या नोटा काढते आणि स्त्री : च च च ! पैशाने एखाद्याच तोंड बंद करता येत हे माहित असेल ना तुला ? आज प्रत्यक्ष पाहिलस पण ना ! आता तू आणि गंगूबाई कायमच्या ह्या तळघरात बंदिस्त व्हाल ! (हसते) छू : सोड मला ! गंगूताईऽऽऽऽऽ ! (छू च्या किंकाळीत फेड आउट) फेड इन : गंगूबाईचे हातही ती स्त्री बांधत आहे ! गंगूबाई शुद्धीत येते आणि प्रसंगावधान राखून मागे उभ्या असलेल्या तिच्या मानेला उजव्या हाताचा विळखा घालून तिला आपल्यासमोर खाली पाडते ! गंगूबाई : काय ग सटवे ! मला बांधत होतीस काय ? छू घाबरु नको हा ! गंगूबाई त्या स्त्रीला अजून दोन चार रट्टे देते. शेवटी डोक्यात एक गुद्दा मारल्यावर ती बेशुद्ध होते मग गंगूबाई छू कडे येते आणि त्याचे हात सोडता सोडता गंगूबाई : बावळट हाय अगदी ! अरे मला हाक मारायची नाही का नेहमीसारखी मग मी आलो असतो सोडवायला ! आणि नोटा काय खातो वेड्यासारखा. मी बोलावत होतो आणि काय बोलत पण नव्हता तू म्हणून हिच्याकड लक्षच गेल नाही माझ ! छू : काय तुझ ! (रडत) माझ्या तोंडात त्या नोटा कोंबल्या होत्या तिने ! माझ तोंडच जर बंद होत तर कसा हाक मारणार मी ? आणि हे मी तुला ओरडून सांगणार होतो का !!! गंगूबाई : ते बी खरच म्हणा ! पैसे चारल्यावर भले भले गप्प बसतात आजकाल ! (थबकून अंदाज घेत) हा आवाज कसला ? बहुतेक अमृतराव परत आलेला दिसतोय ! चल चल ! अमृतराव सावध उतरतोय पायऱ्यांवरून. हातात पिस्तुल आहे. लपलेला छू त्याच्या अंगावर एकदम बनावट नोटा उधळतो.. गांगरलेल्या अमृतरावाच्या हातावर गंगूबाई फटका मारते. त्याचे पिस्तुल खाली पडते . इथे छू गंगूबाईला मदत करण्याऐवजी डांस बारमधे उधळल्यासारख्या स्टाईलमधे खूश होऊन नोटा उधळतो आहे. गंगूबाई अमृतला झोडपते आहे ! तिच्या एखाद्या ड्रामाटिक फटक्यावर फ्रेम फ्रिज ! गंगूबाई : तर अस आहे आप्पासाहेब ! हेच दोघ ह्या समद्या भुताटकीच्या खेळामागे होते ! ही सटवी इथे तळघरात लपून बनावट नोटा छापायला मदत करायची आणि अमृतराव बॅगा भरून त्या दुसऱ्या टोळीला नेउन देत ! इथे भूताखेतांचा वावर आहे अस सांगून हिला पांढरी साडी नेसवून फिरवत असे अधून मधून ! म्हणूनच बिनबोभाट काम चालू शकायच ह्यांच ! आप्पा: अमृत ! अरे काय हे ! इशानंतर तू हिच्या नादाला लागलास !! मला लाज वाटते तुला मुलगा म्हणायची. गंगूबाई, आता ह्याना कायद्याच्या स्वाधीन करा ! आमच्या पूर्वजांचं तळघर सापडल पण ते असं बेकायदेशीर कामासाठी वापरलं जात असेल असं वाटल नव्हत ! गंगूबाई : हो ना ! ह्या ‘अमृत’मंथनातून ही बनावट लक्ष्मी बाहेर पडत होती. छू: चला !!! गंगूताई आता आपल्याला लपाछपी खेळायला जागा झाली ! आता छापा .. गंगूबाई : काय ? छू: नोटा नव्हेत, छापा काटा करुया कुणावर राज्य ते ठरवायला असं म्हणत होतो मी !!! **** समाप्त ****
|
Pendhya
| |
| Tuesday, February 14, 2006 - 2:04 am: |
| 
|
मस्त रे! पोस्टिंग होत असतांनाच वाचुन काढलं.
|
Rajkumar
| |
| Tuesday, February 14, 2006 - 2:55 am: |
| 
|
खल्लास रे राहुल्या... .. ..
|
जबरी RP एकदम HHPV अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या भागांसाठी
|
सही रे राहुल्या... FULL TOO HHPV
|
Psg
| |
| Tuesday, February 14, 2006 - 4:43 am: |
| 
|
राहुल, एकदम मस्त.. शाब्दिक खेळ जबरदस्त! फारच छान लिहिल आहेस! त्यांची offer accept केलीस ना? copyright करायला विसरु नकोस! आगे बढो!
|
Moodi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 4:48 am: |
| 
|
राहूल धम्माल केलीस रे, अगदी अगदी डोळ्यासमोर उभा केलास हा प्रसंग. पाहता नाही आला म्हणुन तु इथे जे वर्णन केले ते अधाश्यासारखे वाचुन काढले, डोळ्यासमोर त्यामुळे प्रत्येक प्रसंग जिवंत झाला. धन्यवाद रे अन तुला जी पुढची ऑफर आलीय त्याबद्दल अनेक शुभेच्छा अन अभिनंदन. 
|
Deemdu
| |
| Tuesday, February 14, 2006 - 5:18 am: |
| 
|
जबरी रे राहुल, no doubt हे इतक छान लिहील्यानंतर त्यांनि तुला पुढची ऑफर दिली नसती तरच नवल पुढच्या कामासाठी तुला शुभेच्छा पण ह्यातले काय काय भाग बदलले actual शुटींग मध्ये ते सांग ना
|
Milindaa
| |
| Tuesday, February 14, 2006 - 5:25 am: |
| 
|
चांगलं लिहीलं आहेस रे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!
|
Champak
| |
| Tuesday, February 14, 2006 - 6:33 am: |
| 
|
Good Luck Rahul .. .. 
|
Jayavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 6:46 am: |
| 
|
राहुल, सही लिहीलं आहेस. मी एपिसोड सुद्धा बघितला होता,पुनःप्रसारणसुद्धा . पण सगळे संवाद इतके detail मधे लिहिले असशील असं वाटलं नव्हतं. म्हणजे कधी कधी कलाकार सुद्धा additions घेतात ना. GREAT !! पुढच्या भागांसाठी खूप खूप शुभेच्छा !!
|
Aj_onnet
| |
| Tuesday, February 14, 2006 - 6:56 am: |
| 
|
राहूल अभिनंदन रे. शनिवारी पाहीला हा भाग. मजा आली.
|
Gajanan1
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:05 am: |
| 
|
मला फ़क्त उभ्या रेघाच दिसत आहेत. हा खास भुताचा फ़ॉन्ट आहे काय?
|
Meenu
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:47 am: |
| 
|
हो मला पण फक्त चौकोन दिसतात... अस का कोण जाणे... त्यामुळे सर्वानी एवढे कौतुक केलेली post मला वाचता येत नाहीये
|
Anilbhai
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:56 am: |
| 
|
राहुल, धमाल आली रे 
|
राहूल सही जमलेय मिश्रण. असाच लिहिता राहो तुझा हात.
|
Solid राहूल, आता एपिसोड बघायला मिळाला तर आजून मजा येईल... kI 
|
Pama
| |
| Tuesday, February 14, 2006 - 10:17 am: |
| 
|
राहूल.. अभिनंदन, जबरी रे!! बघायला मिळाल असत तर मज्जा आली असती.. तुला पुढच्या भागांसाठी शुभेच्छा.
|
Chandya
| |
| Tuesday, February 14, 2006 - 12:23 pm: |
| 
|
राहुल, एकदम झक्कास लिहिलयं रे! छू च्या भुमिकेत मला लक्ष्या आठवत होता, काहिसा वेंधळा, बडबड्या.
|
Storvi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 1:01 pm: |
| 
|
मस्त रे राहुल. good luck
|
Ninavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 1:03 pm: |
| 
|
राहुल, ह. ह. पु. वा. अभिनंदन आणि शुभेच्छा!
|
|
|