|
Supermom
| |
| Friday, February 03, 2006 - 7:01 pm: |
| 
|
सकाळची घाईची वेळ. दोघा मुलांना शाळेसाठी तयार करायच. तेही त्यांचे मूड्स सांभाळून. नवर्याचा डबा. इतर काम, या सगळ्यात घड्याळाचे काटे धरून ठेवायची माझी धडपड चाललेली असते.कसंबसं सगळ आवरून मी नवर्याला नि दोघा मुलांना निरोप द्यायला दाराशी येते.दोघांना गोड गोड पापी देऊन टाटा करते.दार बंद करणार तोवर नवर्याबरोबर गाडीजवळ गेलेली माझी चिमुरडी लेक धावत परत येते. 'का ग?' जा नं लवकर.' माझ्या कडे बघून ती गोडस हसते. 'आई, मी शाळेतून येईन नं तेव्हा माझ्यासाठी आंबट पोहे करून ठेव हं.' मला तिच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध झाला नाही. पण हो हो करत मी तिला पुन्हा गाडीशी पिटाळल नंतर बाकी कामांची आवरासावर,स्वैपाक,मैत्रिणीचा फ़ोन,भारतात आईला फोन या सार्यांमधे मी लेकीची फ़र्माईश पार विसरले.दुपारी दोघ शाळेतून आली मात्र,बूट काढताकाढताच तिचा प्रश्न--'आई,आंबट पोहे केलेस नं?' 'राणी आज मी शिरा केलाय तुझ्यासाठी,नि शेव पण आणलीय.' 'नक्को मला.'तिचा चेहरा एवढासा होतो. 'मला आंबट पोहे हवेत.' आता मात्र मी बुचकळ्यात पडले. हा कोणता नवीन पदार्थ? एव्हाना तिचा भाऊ टेबलाशी जाऊन खायलाही बसला असतो. ही मात्र रूसून जागेवरच उभी. 'कांदेपोहे का?बटाटेपोहे का?' या सर्व प्रश्नांना तिच एकच उत्तर--'नाही. आंबट पोहे.' मी संभ्रमात. आता मोठ्या मोठ्या डोळ्यात मळभ यायलाही सुरुवात झालेली.शेवटी तिला जवळ घेऊन हलकेच विचारल कधी नि कुठे खाल्लेस तू हे आंबट पोहे?' 'त्यादिवशी नाही का तू का.ंम्प्युटरवर बसल्या बसल्या काम करताना खात होतीस,मला एक घास दिलास चिमणीचा? ते पोहे.' आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. भाजके पोहे,त्यात बारीक कांदा,दाणे आनि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर नि सर्वात महत्वाच म्हणजे सठीसामासी इंडियन स्टोर्स मधे मिळणारी हिरवीकंच कैरी.बारीक चिरलेली. पटकन उठून तिला कालवून दिल. नशिबाने मागच्या आठवड्यातली एक कैरी होती फ़्रीजमधे........... नवर्यासाठी आवर्जून लोणच करायला ठेवलेली.
|
Supermom
| |
| Saturday, February 04, 2006 - 10:09 am: |
| 
|
मनापासून खूश होऊन, इवलेसे पाय हलवत,छोट्याशा जिभलीने मिटक्या मारत ती खात होती. नि मी खिळल्यासारखी तिच्याकडे बघत होते. माझी आंबट पदार्थाची आवड पोरीत तंतोतंत उतरलेली दिसत होती. तिच्याकडे बघता बघताच मी भूतकाळात पार हरवले.सार लहानपण फ़ेर धरून भोवती नाचायला लागल. मैत्रिणींचा सहवास,त्यांच्याबरोबर आवडीने खाल्लेले चिंचा, आवळे, कैर्या याच्या आठवणी नसतील अशी स्त्रीच सापडणार नाही. एका छोट्या ताटलीत मीठ, जिरेपूड, तिखट घ्यायच,नि सगळ्यांनी मिळून त्याच्याबरोबर आंबट चिंबट खायच. अहाहा, अजूनही ती चव जिभेवर आहे नि त्या आठवणी मनात. नागपूरच्या माझ्या माहेरच्या बैठ्या घराच्या शेजारी एक दुमजली घर होत. त्यांच्याकडे आवळ्याच केवढतरी झाड होत. सीझनमधे रोज आम्ही मैत्रिणी जमायचो त्यांच्या बाल्कनीत. त्यांची मुलगी माझी बालमैत्रिण. आवळ्याच्या झाडाच्या फ़ळांनी लहडलेल्या फ़ांद्या उड्या मारमारून ओढायच्या, नि तुरट, कच्चे,पिकलेले,जे मिळतील ते आवळे खायचे. त्या काकूंनी मीठ,आले लावून सुपारीही ठेवलेली असे वाळत.ती पुरती न वाळलेली सुपारी पण हळूच थोडी पोटात जायची. अन त्यावर थंड पाणी प्यायल की कशी गोडसर चव यायची जिभेवर. नंतरची आठवण आहे कैर्यांची.पहिल्या बहराच्या छोट्या छोट्या बाळकैर्या कशा सुन्दर दिसायच्या झाडावर. एखाद्या लेकुरवाळ्या सात्विक युवतीची आठवण यायची त्या झाडाकडे बघताना. त्या बाळकैर्या तोडण फ़ार कष्टाच काम. त्यातून घरातल्या मोठ्या माणसांची नजर चुकवून म्हणजे जोखमीच सुद्धा. कधी कधी बाजारात यायच्या या कैर्या. अन मग आई मोहरी फ़ेसून, या अख्ख्या कैर्यांच लोणच घालत असे.त्याला नागपूर कडे राविणी' म्हणतात. हे नाव का पडल कोण जाणे, पण हे लोणच मात्र भलतच रुचकर.....
|
Athak
| |
| Saturday, February 04, 2006 - 10:43 am: |
| 
|
आमच्या शाळेतल्या मुली अश्याच कैरी चिंचा बोर आवळे आणुन आमच्या समोर खायच्या अन आमचे तोंड न खाताच कसे तुरट झाले हे बघुन आनंदी व्हायच्या
|
Moodi
| |
| Saturday, February 04, 2006 - 12:00 pm: |
| 
|
sm झक्कास आठवणी लिहितियस ग. अजुनही येऊ दे भरपूर. भरभरुन येऊ दे. भेळेतील कच्ची कैरी कशी बरे विसरता येईल? अन गोड आंबट आठवणीं. आगे बढो..
|
Supermom
| |
| Saturday, February 04, 2006 - 1:12 pm: |
| 
|
कैर्या अन आवळ्यांबरोबर चिंचा कशा बरे विसरता येतील? हिरव्यागार चिंचांचे झाडाला लटकणारे आकडे अन ते मिळवण्यासाठी कोण धडपड. बहुतेक वेळा एखाद्या मित्राला आळवणी करायची गुलेलीने तोडून दे म्हणून. तो ही बिचारा भाव न खाता प्रयत्न करायचा...... अन कधीकधी दगड मारल्याबद्दल त्याच्या घरच्यांचे धपाटेही खायचा. या चिंचांचा ठेचा....लाल किंवा हिरव्या ओल्या मिरच्या घालून अन आईच्या हातच्या गरम गरम भाकरी नि भरल्या वांग्यांचा रस्सा.......स्वर्ग शोधायला दुसरीकडे जायची गरजच नाही मुळी. या चिंचांमधले चिंचोके भाजून ते चघळण्याची मजा काही औरच. करवन्दे नि बोरे....यांच्या उल्लेखाशिवाय हा अध्याय पूर्ण होणे अशक्यच. नागपूरकडे मिळणारी लालसर गुलाबी अथवा हिरवी करवन्दे नि मुम्बईकडे जाताना मिळणारी काळसर करवन्दे यात फ़ार फ़रक आहे बरे का.... नागपूरची ही करवन्दे खूपच आंबट. मी नि माझा मावसभाऊ ही हिरवीगार करवन्दे अर्धी करून त्यातली बी काढून टाकत असू, नि त्यात बीच्या जागी थोडे मीठ भरून हे करवन्द खात असू. आता दादाही गेला नि त्याच्या बरोबरच्या या आठवणी देखील. यातल्या गुलाबी करवन्दांची माळ करून आई ती लांबसडक वेणीवर खोचून देत असे. शाळेच्या मधल्या सुट्टीत उकडलेली बोरे खाण्यासाठी कोण झुंबड उडालेली असायची तेव्हा. एका द्रोणात ही बोरे नि त्यावर मीठ. आणि मैत्रिणींच्या गप्पा...... सुट्टी संपल्याची घंटा कधी व्हायची कळायचे पण नाही. ह्या सगळ्याच्या आठवणी ऐकताना नवरा खूप हसतो. लग्न झाल्यावर एकदा तो ऑफ़िसमधून आला अन मी पुस्तक वाचता वाचता आवळा खात होते. तुला देऊ का विचारले तर मोठ्याने हसून म्हणाला 'छे,आंबट चिंबट पोरी खातात.' अन आताही माझ्या मुलाला मुळीच आंबट आवडत नाही. मला नि माझ्या लेकीला खाताना पाहून आजकाल दोघेही तालावर चिडवतात........... 'आंबट्ट चिंबट्ट पोरीच खातात.' मी हसून लेकीला कुरवाळते नि मनात म्हणते, 'अन त्या सार्या आठवणी जन्मभर मनाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवतात.'
|
Shyamli
| |
| Saturday, February 04, 2006 - 1:41 pm: |
| 
|
सगळ्यांनाच बालपणात फिरवुन आणलस ग आज........
|
Bhagya
| |
| Sunday, February 05, 2006 - 8:35 pm: |
| 
|
sm मला पण आठवणी येताहेत... उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, की भर दुपारी घरातून आई-बाबांच्या सावलीतून हळूच सटकायच.. ते सरळ घरासमोरच्या उद्यानात. तिथल्या डेरेदार चिंचेच्या झाडाच्या सावलीत बसून चिंचेचा फ़ुलोरा, पाने, चिंचा जे मिळेल ते चिमण्या दातांनी खायचं. शेजारीच खूप मोठी विहीर होती, आणि त्यात वाकून बघितल की थंडगार आणि काळभोर पाणी दिसायचं. आणि मागच्या अंगणातले अंजीर, पेरू आणि तुती कधी पिकेपर्यंत टिकलेच नाहित... आमची बालचमू साक्षात टोळधाड होती. शेजार्यांचे पेरू गुलाबी म्हणुन त्यावर खास डोळा. इतका, की टोळधाडीचा म्होरक्या बनून कितिदा तरी त्यांचे पेरू लांबवलेत. आणि त्यांचा राग ओढवून वांड कार्टी' हे विषेशण लावून घेतलं. आणि नन्तर काहि वर्षांनी नवर्याबरोबर त्याच्या पुण्यात shift झालेल्या खास नातेवाइकांना पहिली भेट देताना गेल्या गेल्या दारातच अरे ही? ही आमच्या झाडाचे पेरू चोरून तोडायची ह्या उस्फ़ूर्त वाक्याने स्वागत झालं. काकूंना एवढी लाज काढायची गरज होती?
|
सगळ्या शाळेच्या आठवणिंनी मन अगदी भरुन आले.
|
Zelam
| |
| Thursday, February 09, 2006 - 9:12 am: |
| 
|
sm खूपच गोड लिहिलस. मस्त वाटलं वाचताना
|
Boli
| |
| Thursday, February 09, 2006 - 9:53 am: |
| 
|
मस्त मजा आली वाचुन. छानच लिहिले आहेस ग. राजमाची चढताना करवन्दांचे झाड आहेत. आम्ही नेहमी तिथे ताव मारतो.
|
|
|