Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
माझिया मना, जरा थांब ना!! ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » ललित » माझिया मना, जरा थांब ना!! « Previous Next »

Pama
Friday, February 03, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती अंधार दाटून येतोय.. दोन मिनिटांपूर्वी छान उजेड होता. किती चालत रहायच? रस्ते पण सगळे निमुळते आहेत. दोन्ही बाजूने घर नुसती अंगारवर येतायत. पळतेय का मी? पाय दुखतायत. गोळे आलेत पायात...
कुणीतरी येतय मागून. पळालच पाहिजे. सगळ्या घरांच्या खिडक्या दारही बंद आहेत. कुणी राहत कि नाही इथे? एकाही घरात दिवा नाही. उजेड येतोय त्या घराच्या खिडकीतून कुणीतरी नक्की आहे तिथे.
हे काय! दार उघडच आहे. आत कुणी नाही.
या खोलीत... त्या खोलीत.. अरे, आहे का कुणी??
आवाज कुठेय माझा? घशाला कोरड पडलीय. हृदयाचे ठोके कानापर्यंत ऐकू येतायत.
'खाली जा तळघरात.....' धस्स्स.... हृदयाचा ठोका चुकला. गरकन मागे वळून बघितल. कुठेतरी पाहिलय याला..
हो! काल भाजी बाजारात. त्या दुकाना बाहेर वडे तळत होता.. इथे काय करतोय?
'पळ, पळ.. खाली..' मी का ऐकतेय त्याच?
तो दिसतोय जिना खाली जायचा. पाय उचलता पण येत नाहीत... पण घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय.. ते जवळ येतायत.. जीव तोडून पळतेय मी..
१, २, ३, ४, ५... किती पायर्‍या आहेत? संपत का नाहीत??
आई गं.. घसरला पाय.. कोसळतेय मी खाली.....
टर्र र्र र्र र्र र्र र्र र्र
हे काय? सटकन डोळे उघडले.
अजून धडधडतय.... घाम फुटलाय.. पाय पलंगावरून खाली!!
गजर वाजतोय!! छ्या... स्वप्न होत.. किती घाबरलेय मी.
काय पण स्वप्न होत! जसच्या तस आठवतय. शी! कसल दळभद्री स्वप्न सकाळी सकाळी.. काय ताळतंत्रच नाही. कुठल्या अंधार्‍या गल्ल्या, कोण भाजीवाला, घोडे काय, तळघर काय.....
हसतेय मी आता, मघाशी घामाने डबडबली होती.
चला! चहा करावा.
आज लवकर जायचय म्हणाला नाही का. काल झोपताना बजावल होत, लवकर उठव.
'ऐ, उठतोयस ना? ६ वाजले. उशीर होईल.'
कधी नव्हे ते साहेब भरभर तयार झालेत आज. नक्की महत्त्वाच असणार सकाळी काहीतरी.
काय कराव नाष्ट्याला? पोहे? उप्पीट? .. कंटाळा आला, रोज तेच तेच काय? मेथी पण नाही पराठे करायला. नाही ना? मग नाही त्याचा विचार काय करतेय.. काय आहे ते बघ नां!
चला, आज ऑमलेट ब्रेड. ब्रेडपण आजकाल ताजा मिळत नाही. बेकरी वाल्याला विचारल पाहिजे. मागच्या वेळचा पण शिळा निघाला. अरे हो! त्याचे मागच्या वेळचे पैसे राहिलेत नाही का? आज दिलेच पाहिजे.
'मी निघतो गं.'
'सांभाळून जा.' हातात बॅग, गाडीची चावी आणि गॉगल ठेवला. किती रूटीन झालय नाही..
सकाळ झाली की...
माझ वाक्य.. अरे ऊठ.. त्याच वाक्य.. २ मिनिटांनी उठव..
माझ वाक्य... चहा ठेवलाय.. त्याच वाक्य बिस्किट दे जरा...
त्याच वाक्य.. मी निघतो गं.. माझ वाक्य.. सांभाळून जा...
हसायला येतय आता. लग्नानंतर किती प्रेमानी संवाद चालायचा हा... आता आपोआप.. कधीतरी आपल्याच घरी फोन लावला की ऐकू येणार्‍या रेकॉर्डेड मेसेज सारखा..' हा नंबर अस्तित्वात नाही. कृपया आपला नंबर तपासून पहा..' तस.
अरे, नंबर! गॅससठी नंबर लावायचाय. संपत आलाय, वेळेवर नाही मिळाला तर पंचाईत होईल.
कुठे गेली डायरी फोनची? एक गोष्ट जागेवर सापडेल तर शपथ! काल कुणाकुणाला फोन करत बसला होता. सोफ्यामागे पडली असणार.
अरे देवा! हा हलता हलत नाही सोफा. घेताना मारे घेतला!
हे काय? केव्हढा कचरा साठलाय मागे. अत्ताच साफ करते हाता सरशी. जळमट लागलीत मागे. नेहमी सांगते जरा रविवारी वॅक्यूम फिरवत जा. पण नेहमीच आपल.. काढ आता केरसुणीनं नंतर कर वॅक्यूम. वॅक्यूमनीच काढते आता. माळ्यावर चढाव लागेल. काढू का केरसुणीनच? नको.. चढतेच.. कधीतरी उपयोग केलाच पाहिजे, माळ्यावर काय पुजायला ठेवलाय?
कशी बर लावायची ही attachment ? पत्रक बघितल पाहिजे.
नशीब! लागल एकदाच.
घर र्र र्र.. फट्ट.. आता काय? अडकल वाटत कहीतरी.
सगळी धूळ नाकात जाणार आता. ... हेअर क्लिप!
किती दिवस शोधतेय हिला. माझी आवडती क्लिप. अख्खा तुळशीबाग पालथा घातला होता एका क्लिप साठी. किती, ३ वर्ष झाली असतील ना? अंजू ताईच्या लग्नात अगदी साडीला मॅचिंग म्हणून सगळी दुकान पालथी घालून शोधली होती.
वॅक्यूम क्लीनरची बॅग झटकायला हवी. कसरतच असते ही एक. गच्चीत जाव.
कोण शिरतय फाटकावरून?
'ए, शुक.. शुक.. क्या होना?'
पळून गेला. त्रास झालाय मेला नुसता. ही बाजूच्या झोपडपट्टीतली पोर अशी फाटकावरून उड्या टाकून येतात. परवा देशपांडे काकू सांगतच होत्या ना, अमोलच्या सायकलची रोज हवा जाते. याच पोरांच काम असणार ते.
अशी कशी सोडून देतात आई बाप पोरांना?
दुसर्‍यांना त्रास होतो याचा विचारच नाही. काय करतील बिचारे! दिवसभर मोलमजुरी करतात.. खायला दोन वेळा मिळाल कसबस की दिवस ढकलतात. परवा लक्ष्मीबाई सांगत होत्या नं त्यांच्या शेजारच्या बाईच कहाणी.
खरच वाईट वाटत कधीतरी. आपण अनेकवेळा अन्न चक्क फेकून देतो, आणि हे बिचारे दोन वेळच्या जेवणासाठी दिवस दिवस राबतात उन्हातान्हात.
त्या दिवशी लक्ष्मीबाईंना निरोप द्यायला गेले तेव्हा मात्र कसला झणझणीत वास येत होता बाजूच्या झोपडीतून! मला तर अनावर इच्छा झाली होती काय बनवलय विचारायची. आल्यावर याला सांगितल तर कसला हसला खो खो..
आता ही कचर्‍याची पिशवी सरळ दाराबाहेरच ठेवते. क्लीप नीट ठेवते जपून.
आरश्यावर डाग किती पडलेत! हा आरसा पुसताना असा खस खस आवाज आला कि अंगावर शहारे येतात.
किती विस्कटलेत केस.. कापायला झालेत नाही!
आजकाल सुजाता नीट कापत नाही पण. लक्षच नसत तिच. सोडून जाते म्हणाली. स्वताःच ब्यूटी पार्लर काढतेय म्हणाली. शोभाताईं कडच्या सगळ्या मुलींनी हेच केल. इथे शिकून आप आपली पार्लर काढलीत.
भरपूर कमवत असतील. किती रेट वाढावलेत आज काल! नुसते माझे टिचभर केस कापायला ४० रू. घेतात हल्ली! त्या दिवशी ती बाई कायकाय करत होती. फेशियल, ब्लीच, हेअर डाय, मसाज.. बरा पैसा असतो यांच्याकडे असा उधळायला! साध्या काकडीच्या फोडी ठेवल्या डोळ्यांवर तरी होत.
किती पसारा करून जातो सकाळी सकाळी पेपरचा!
काय ते रोज एव्हढ्या चवीनी राजकारण वाचयच? सगळे मंत्री बिंत्री इकडून तिकडून सारखेच. परवाच्या वोटींगला बघितल, किती कमी लोकांनी मतदान केल. आणि घरात बसून राजकारणावर गप्पा मारायच्या!
राष्ट्रपतींनी फर्मास भाषण केल त्या दिवशी. राजीव गांधींच्या भाषणाची बाबा कसली मस्त नक्कल करायचे. 'हमे देखना है.. हमे करना है...'. बिल्डींगच्या गणपतीत बाबांना अध्यक्ष केल होत एक वर्षी तेव्हा असच भाषण केल होत त्यांनी. धमाल आली होती.
त्याच वर्षी मी आणि मनिषानी कुठल्या बर गाण्यावर डान्स केला होता? छ्या! गाणच आठवत नहीया! दीप डान्स होता. तिच्या हातावर पडली होती मेणबत्ती. बिच्चारी! तशीच नाचली होती.
काय करत असेल अत्ता? किती किती दिवसात तिचा फोन नाही. दिल्लीला जाणार आहे म्हणाली होती मीनूच्या लग्नात भेटली होती तेव्हा. आली असेल एव्हाना. तिचा राजस फारच दंगेखोर आहे पण. मागच्यावेळी आले होते तर जिन्यावरून पडता पडता वाचला. कुठल्या प्लेस्कूल मधे घातलय म्हणाली? little star का little moon असच काहीतरी नाव होत. शास्त्री रोडवर बघितय खर! खूपच रहदारीचा झालाय तो रस्ता. शाळा सुटल्यावर लहान मुल रस्त्यानी पळतात त्याची भितीच वाटते. परवा ऐकल न टिव्ही वर तिथल्याच चौकात धडक बसली एका सायकल वरच्या मुलाला. बरच लागल म्हणे त्याला.
आई गं! हे रोजचच आहे. नेहमी लागतो हा टेबलाचा कोपरा. दुसरीकडे हलवल पाहिजे टेबल. पण ठेवणार कुठे? किचन मधेच बरय. अरे देवा! हे वाल कधीचे आणून ठेवलेत ते टेबलावरच पडलेत अजून.. भिजत घालतेच आज. गुरूवारी उपास सोडताना होतील. साबूदाणे आणले पाहिजेत गुरूवारसाठी, संपलेत वाटत. सगळे डबे साफ केले पाहिजेत एकदा. लक्ष्मीबाईंना २० रु देऊन करून घेते किचन पूर्ण साफ.
सलौनीची रिक्षा आली वाटत. बापरे! म्हणजे वाजलेत तरी किती? ११ वाजले! अजून आंघोळ नाही काही नाही.
काय करत होते मी सकाळ पासून... कुठल काम करत होते आणि काय करत बसले. हे सुरू कुठून झाल.. छ्या! तेच आठवत नाही.. जाऊ दे.. आंघोळ करते आणि स्वयंपाकाला लागते. संध्याकाळी पलीकडच्या काळेंना बोलवलय ना चहाला. कधी सोडून जायचेत म्हणाले? १ तारखेला बहुतेक. एकदा जाऊन विचारल तरी पाहिजे काही मदत हवी का?
टर्र टर्र...
'हॅलो... कोण मनिषा? अग शंभर वर्ष आयुष्य आहे तुला. तुझाच विचार करत होते थोडा वेळा पूर्वी. कशी आहेस? कधी आलीस दिल्लीहून?'
'....'
' कोण कदम काकूंची भावना भेटली? ती आणि काय करते दिल्लीला...........................




समाप्त.


Arch
Friday, February 03, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच हं पमा. कुठून कुठे विचार वहात जातात न? सुरेख मांडले आहेस

Mita
Friday, February 03, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'रोज करतेस काय घरात बसुन?' असा प्रश्न परत विचारला नवर्याने कि आता हे दाखवणार आहे त्याला. :-)
btw खुपच छान ग.. आवडल एकदम..


Ashwini
Friday, February 03, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, छान लिहीलं आहेस ग. तुझ्या कविताही सुरेख असतात. आणि हे ललितपण सुंदर जमलय.

Atul
Friday, February 03, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, छानच लिहिले आहेस. विचारचक्र कसे फिरेल काही सान्गता येत नाही

Hems
Friday, February 03, 2006 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा , कसलं सहज आणि ओघवतं उतरलय हे ललित ! मजा आली ग वाचायला !

Vaishali_hinge
Saturday, February 04, 2006 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा....... मस्तच ग अजुन पुढे येउ दे

Moodi
Saturday, February 04, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!! खूप मस्त ओघवत्या शैलीतले वर्णन ग पमा. अजुन लिही ग.

Zelam
Tuesday, February 07, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा मस्तच लिहिलयस.
कसं आपलं मन ईकडून तिकडे धावत असतं नाही?


Maitreyee
Tuesday, February 07, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त गं पमा, कल्पना आवडली आणि मांडणी पण.

Pama
Tuesday, February 07, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना ठांकू.. लिहायला सुरवात केली आणि मग लिहित गेले.. मुद्दाम ठरवून लिहिल नाही.. पण मग संपवण्यासाठी थांबताच येईना.. विचार चक्र सुरूच! शेवटी ब्रेक लावला..:-)

Charu_ag
Thursday, February 09, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचार विचार विचार.........
ही गाडी कधी थांबतच नाही ना! आणि तिला ब्रेक कधी लागतही नाही. छान ओघवत लिहीलयस.


Meenu
Thursday, February 09, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा खूपच मस्त लिहीलयस गं!! अगदी असच होत असतं किती तरी वेळा

Rupali_rahul
Thursday, February 09, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी मानतल लिहिल आहेस. अस तर दर वेळेला होत विचार कसला करतो आणि संपतो तेव्हा काहि दुसराच झालेल असत.

Manuswini
Saturday, February 11, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा अगदी अगदी ग
हे अगदी same same कधी कधी ती सकाळी मला सुद्धा उगाच नको त्या स्वपनानीं होणरी सुरवात होते एकदा मला पण असेच स्वपन पडले की मझ्या मागे चोर लागले आहेत. जीव घेवून पळत होते.. जाम मजा आली तुझे वाचून.

कुठून कुठे विचार पळतात
अगदी आरश्याचा तो paragraph नेमका मिळता जुळता असाच रोज चकचक करताना हजार विचार गरकन जातात.

आणी सोफ्यामागच्या कचर्यात कायम केसाची favorite clip सपड्तेच.
एका मिनिटात दुनिया फिरुन येते मन. छान capture केलेस आहेस ग. मजा वाटली अरे आपले पण असच होत हे प्रत्येक वाक्याला वाटले :-)


Sashal
Saturday, February 11, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे गं पमा .. कल्पना मस्तच ..

Nilyakulkarni
Saturday, February 11, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा अतिशय सुन्दर पने मांदले आहेस आणि विचारांचि ति चक्र अगदि अशिच फिरत असतात खुप च छान अगदि तुज़्या कवितां सारखे ताजे ताजे मनाला भावनारे
.... निलेश


Puru
Friday, February 24, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर

---
ज़हा न जाय रवी
वह जाय कवी!


--

Empty mind..
Devil's find!

--
Three more or less related thoughts on the mystery called 'MIND'!

By the way, how to put a dot above a letter in devnagari(e.g in the Marathi word I used above 'pikaatala')
--




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators