Meghdhara
| |
| Thursday, February 02, 2006 - 11:51 am: |
| 
|
ठरवुनही टाळता न येण्यासारखे आयुष्यातले काही संदर्भ.. अनुभव म्हणू? निखालस घटीत म्हणू? जीवन म्हणू? की.. काही शोधुच नको? जगलेले काही क्षण म्हणून सोडून देऊ? आयुष्याचा अर्थ लावणं, तत्वज्ञान शोधणं हे खरं? की.. आला क्षण जगायचा गेला क्षण आपला नव्हताच म्हणायचा हे खरं? पण... जगलेल्या क्षणांची अपत्य, जाब विचारतात तेव्हा त्यांना काय सांगायचं? त्यांना कोणी जन्माला घातलं? आणि का? की ते ही असेच समोर आलेले.. आलेले म्हणून जगलेले? आलेला प्रत्येक क्षण त्यांच्या पुर्वजाशी असलेल्या नात्याचं बासन समोर घेऊन बसतो.. असेना का तो मग.. एखाद्या वैभवी घरंदाज क्षणाचा भग्नावशेष.. किंवा, राजस गर्भश्रिमंत वारस. स्वतःचं अस्तित्व, जातकुळीचा हिशोब, पुर्वजांशी ओळख नी मात्यापित्यांची नावं लावुनच येतो तो. तेव्हा उत्तर द्यावं लागतं त्याला माझं कोणत्या क्षणाचं जगणं त्याच्या येण्याला कारणीभुत आहे, सांगावं लागतं स्वःताला. त्याचं अपरिहार्य येणं गेलेल्या, जगलेल्या, न जगलेल्या क्षणांशी घट्ट ओळख सांगतं. नी मग म्हणावं लागतं, गेलेला क्षणही आपलाच होता. मेघा
|