Dineshvs
| |
| Monday, January 30, 2006 - 11:22 am: |
| 
|
आमच्या क्षेत्राबाहेरिल व्यक्तीनादेखील ऐकुन का होईना, पण बॅलन्स शीट माहित असते. एखादा ऊद्योगधंदा जेंव्हा सुरु केला जातो, तेंव्हा तो काहि काळ चालु रहावा, त्याने मालकाला नफा मिळवुन द्यावा. गुंतवणुकदाराना परतावा द्यावा. समाजासाठी काहितरी करावे, असे बरेच हेतु असतात. या अश्या दुरदृष्टीमुळे बरिचशी गुंतवणुक केलेली असते, काहि मालमत्ता विकत घेतलेल्या असतात. दिर्घ मुदतीची कर्जे घेतलेली असतात, गुंतवणुकदारांच्या ठेवी स्वीकारलेल्या असतात. आणि हे काहि एका दिवसात सेटल करायचे नसते. ( एखादा ऊद्यओगधंदा मोडीत निघाला, त्याचे दिवाळे निघाले, किंवा मुळातच तो एका मर्यादित हेतुने सुरु केलेला असेल, तरच असे केले जाते. ) तर एखाद्या दिवशी बिझिनेसची नेमकि मालमत्ता किती आहे, किंवा बिझिनेसची देणी नेमकि किती आहेत, हे दाखवणारे स्टेटमेंट म्हणजेच बॅलन्स शीट. लक्षात घ्या हे अकाऊंट नाही, तर हे आहे फ़क्त एक स्टेटमेन्ट. पारंपारिक फ़ॉर्ममधे या बॅलन्स शीटमधे, डाव्या बाजुला दायित्वे म्हणजेच लायबिलिटीज आणि ऊजव्या बाजुला मालमत्ता म्हणजेच असेट्स दाखवली जात. तो फ़ॉर्महि तसा सामान्यजनाना कळायला कठीण होता, म्हणुन आता व्हर्टिकल फ़ॉर्म जास्त प्रचारात आहे. कुठल्याहि क्षणी बिझिनेसच्या मालमत्ता आणि दायित्वे हि समान असतात, हे आपण सुत्र रुपाने मागच्या भागात बघितलेच. आता या संदर्भात काहि खास टर्म्स वापरल्या जातात त्याबद्दल बोलु. बॅलन्सशीट म्हणजे नुसती जंत्री नव्हे. हि माहिती योग्य प्रकारे संकलित करावी लागते. एका ऊदाहरणातुन हे जरा जास्त स्पष्ट होईल. समजा एखादा निरिक्षक शाळेची तपासणी करायला आलाय, तर त्याला फ़क्त मुलामुलींच्या नावाची यादी दाखवुन चालेल का ? त्यापेक्षा एकुण विद्यार्थी अमुक, त्यात मुले अमुक, मुली तमुक. पहिलीत अमुक, दुसरीत तमुक वैगरे वैगरे. गेल्या वर्षी अमुक, शालांत परिक्षेला बसलेले अमुक, पास झालेल्यांची टक्केवारी अमुक अशी माहिती दिली, तर या शाळेला अनुदान द्यायचे कि नाही, याचा निर्णय घेणे जास्त सुकर होईल नाहि का ? त्याप्रमाणेच बॅलन्स शीटमधे हि माहिती काहि गृपखाली संकलित केलेली असते. आणि याला ग्रुपिंग असेच नाव आहे. तुमच्यापुढे येणारि माहिती हि जास्तीत जास्त अचुक आणि नीटनेटकि सादर करण्याची जबाबदारी अकाऊंटंटची. तर या कॅटेगरीज एकेक करुन बघु फ़िक्स्ड असेट्स या ज्या मालमत्ता असतात त्यांची ऊपयोगी आयुष्य हे एका वर्षांपेक्षा जास्त असते. म्हणजेच त्यांच्या खरेदीसाठी जो खर्च झालेला असतो, त्यापासुन मिळणारा फ़ायदा हा एका वर्षापेक्षा जास्त काळ मिळणार असतो. आता आपण जेंव्हा एखादे असेट खरेदी करतो, तेंव्हा पैसे खर्च होतातच, त्यामुळे तसा तो खर्चच आहे, तरिही त्याचा ऊपयोग जास्त काळ होणार असल्याने, त्यावर झालेला खर्च आपण अनेक वर्षांच्या मिळकतीसमोर विभागुन घेणार आहोत. कारण कधी ना कधी ती मालमत्ता जुनी होणार, निकालात काढावी लागणार, नविन प्रकारची, अधिक कार्यक्षम मालमत्ता ऊपलब्ध होणार, हे अटळच असते. आता या कॅटेगरिमधे जमीन, ईमारती, मशीनरी, फ़र्निचर, वाहने, गुडविल, पेटंटसारखे हक्क हे सगळेच आले. यापैकी जमीन सोडली तर बाकि सगळ्या वस्तु, दिर्घ कालात नाशिवंत आहेत. त्यांचे निष्चित आयुष्य आडाख्याने आणि कायद्यानुसार ठरलेले असते. ईन्व्हेस्टमेंट्स ईन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणुक. तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणुस ज्यासाठी गुंतवणुक करेल, साधारण तश्याच कारणासाठी बिझिनेस पण गुंतवणुक करेल. लिमिटेड कंपनी किंवा एखादा सरकारि ऊपक्रम हा कायद्यानुसार स्वतंत्र व्यक्ती असते. ( याबाबतीत आपण स्वतंत्र चर्चा करु. ) हि गुंतवणुक एखाद्या पार्टनरशिप फ़र्ममधे भागीदारी म्हणुन असेल, शेअर्स मधे गुंतवणुक म्हणुन असेल, सरकारी बॉंडमधे असेल. हि गुंतवणुक करण्यामागील हेतुहि वेगवेगळे असु शकतात. अतिरिक्त फ़ायदा गुंतवण्यासाठी, सध्या अतिरिक्त थरत असलेल्या पैश्यातुन काहि ऊत्पन्न मिळवण्यासाठी, एखाद्या दुसर्या ऊद्योगात मालकि हक्क मिळवण्यासाठी, एखाद्या कर्जाची पुर्व अट म्हणुन. या गुंतवणुक क्षेत्राची थोडीफ़ार माहिती सगळ्याना असतेच हल्ली, त्यामुळे बॅलन्स शीट मधे या गुंतवणुकीची सध्याची मार्केट व्हॅल्यु काय आहे, हि माहीतीपण पुरवलेली असते. करंट असेट्स या सुद्धा मालमत्ताच, फ़क्त या मालमत्तेचे आयुष्य एका वर्षापेक्षा कमी असते. आयुष कमी असते म्हणजे या मालमत्ता नष्ट होणार नसतात तर त्यांची फ़क्त रुपांतर होणार असते. आता समजा तुमच्याकडे रोख कॅश आहे, तर रोख कॅश म्हणजे तुमची मालमत्ता, या पैश्यातुन तुम्ही काहि माल खरेदी करता, तर आता हा माल म्हणजे तुमची मालमत्ता, हा माल तुम्ही ऊधारीवर विकता, तर या व्यक्तींकडुन तुम्हाला जे येणे आहे ते तुमची मालमत्ता, आणि आणि त्या व्यक्तीने तुमचे पैसे दिले, कि परत पैसे हि तुमची मालमत्ता. हे चक्र बिझिनेसमधे सतत फ़िरते राहिले पाहिजे. म्हणजेच, कॅश आणि बॅंक बॅलन्सेस, स्टॉक, संड्रि डेटर्स. ( ज्यांच्याकडुन तुमचे पैसे येणे बाकि आहेत, असे ग्राहक ) लोन्स आणि आॅडव्हान्सेस, प्रीपेड एक्स्पेन्सेस हि झाली करंट असेट्सची ऊदाहरणे. यपैकी बहुतेक आपल्याला माहित आहेतच, फ़क्त लोन्स आणि आॅडव्हान्सेस तुम्हाला नविन वाटेल. त्याची थोडक्यात ओळख करुन घेऊ. बिझिनेसमधे अनेक कारणांसाठी आगाऊ पैसे द्यावे लागतात. तुम्हाला एखादी ऑर्डर द्यायची असेल तर आगाऊ पैसे द्यावे लागतात. एखादे काम करुन घ्यायचे असेल तरिही आगाऊ पैसे द्यावे लागतात. तुमच्या कर्मचार्याना पगाराची ऊचल द्यावी लागते, हे सगळे आॅडव्हान्सेस हे तात्पुरते असावेत, अशी अपेक्षा असते. वरील ऊदाहरणात अनुक्रमे तो माल मिळाला, ती सेवा मिळाली किंवा कर्मचार्याने काम केले, कि त्यासाठी जे पैसे तुम्ही देणार असाल, त्यातुन हि आगाऊ रक्कम कापुन घेतली जाती. ( आणि अर्थातच खर्चाची नोंद होते. ) या करंट असेट्सबद्दल आणखी एक मुद्दा म्हणजे जर काहि कारणास्तव, हे पैसे रिकव्हर झाले नाहीत तर ते खर्च म्हणुन दाखवावे लागतात, त्याला बॅड डेब्ट्स म्हंटले जाती. असे पैसे बुडवण्याचा अनुभव, आपल्याला वैयक्तिक आयुष्यात पण आलेला असतोच. करंट लायाबिलिटिज करंट असेटच्या खालीच या लायाबिलिटिज दाखवलेल्या असतात. याचे स्वरुप करंट असेट्सच्या अगदी विरुद्ध असते. यामधे संड्रि क्रेडिटर्स, लोन्स आणि अडव्हान्सेस वैगरे या कॅटेगरिमधे दाखवले जाते. जसा तुम्ही माल ऊधारीवर विकता, तशेच तुम्हालाहि बाजारातुन ऊधारीवर माल मिळतो. तर असे तुमचे पुरवठादार, ज्यांचे तुम्ही देणे लागता, ते तुमचे संड्रि क्रेडिटर्स. जसे तुम्ही ईतराना आॅडव्हान्स दिलेला असतो, तसा तुम्हालाहि कुणीतरी दिलेला असु शकतो. आणि ते सगळे या कॅटेगरिमधे दाखवायचे. मी आधीच लिहिल्याप्रमाणे बाजारत बहुतांशी व्यवहार, ऊधारीवरच होतात. पण प्रत्येक बिझिनेसमनचा हा प्रयत्न असतो कि त्याला मिळणारी ऊधारी, हि त्याला द्यावी लागणार्या ऊधारीपेक्षा कमी असावी. म्हणजेच त्याचे देणे हे त्याच्या येण्यापेक्षा जास्त असावे. पटायला थोडे कठिण आहे. पण याचा अर्थ असा होतो कि प्रत्यक्ष आपले पैसे न, गुंतवता लोकांच्या पैश्यातुन बिझिनेस करावा. आणखी एका ऊदाहरणाने हे नीट लक्षात येईल. आता परत पहिल्या ऊदाहरणातल्या साड्या बघु. तुम्ही तिथे काय केलेत, तर स्वताचे कहि पैसे गुंतवुन साड्या आणल्यात. आणि मग एकेक करुन विकत राहिलात. जरी या व्यवसायात तुम्हाला नफा झाला असला तरी, काहि काळ तुमचे पैसे साड्यात अडकुन राहिले. हे पैसे तुमचेच होते म्हणुन, ठिक पण जर का हे पैसे बॅंकेकडुन कर्जाऊ घेतले असते, तर त्यावर व्याज, तेहि अगदी पहिल्या दिवसापासुन द्यावे लागले असते. म्हणजेच तुमचा खर्च वाढला असता. आता जर का तुम्हाला ऊधारीवर साड्या मिळाल्या असत्या. ( आणि अश्या ऊधारीवर, बिझिनेस तत्वानुसार व्याज आकारले जात नाही. ) तर तुमच्या डोक्यावरचे खर्चाचे ओझे कमी झाले असते, आणि तुम्ही मोठ्या जोमाने विक्री केली असती. पण कितिही डिझायरेबल असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात, याच्या नेमक्या ऊलट स्थिति असते, म्हणजेच तुमचे पैसे स्टॉक, ग्राहकांची ऊधारी यात जास्त गुंतलेले असतात, आणि तुमच्या सप्लायर्सना, तुम्हाला वेळेवर पैसे द्यावे लागतात. म्हणजे पुर्णपणे दुसर्याच्या पैश्यावर अवलंबुन तुम्हाला तुमचा धंदा करता येत नाही, तुम्हाला तुमचे भांडवल ऊभे करावेच लागते. आता हे भांडवल जे असते त्याला आम्ही खेळते भांडवल किंवा फ़िरते भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल म्हणतो. म्हणजेच तुमचे करंट असेट्स वजा तुमच्या करंट लायबिलिटिज यातला फ़रक म्हणजेच वर्किंग कॅपिटल. यावर थोडा विचार करा, शंका असतील तर विचारा, मग आपण आणखी पुढे जाऊ.
|