Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
त्याचा दिवस, तिचा दिवस ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » कथा कादंबरी » त्याचा दिवस, तिचा दिवस « Previous Next »

Dineshvs
Wednesday, January 25, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचा दिवस
काल वाचत राहिलो आणि ऊठायला ऊशीरच झाला. चक्क सातला ऊठलो. राणीच्या कुकरची शिट्टी ऐकुनच जागा झालो.
” ऊठवलस का नाही गं. आणि आज कुकर बरा लागला तुला. ” दात घासता घासता विचारले. ” अरे त्यासाठी हाकच मारणार होते तुला, तर लागलाच कि. आणि तुला शांत झोप लागली होतीना म्हणुन नाही ऊठवले. सगळे तयार आहे. तुझा डबा पण ठेवलाय भरुन. मी निघतेच आता. चहा वैगरे तयार आहे. मी निघाले रे, ” असे म्हणुन ती निघालीच.

छे आता सगळे एकट्यानेच आटपायला पाहिजे. ऊशीरच झालाय खरा. कितीवेळा मनात येते, एकाद्या सकाळी आपण सगळी तयारी करावी. आणि मगच राणीला ऊठवावे. पण जमत म्हणुन नाही. तशी मदत करतो सगळ्यात. पण तरिहि तिचा ऊरक फ़ारच बुवा. ब्रांचला तर माझ्यासारखाच काऊंटर संभाळते ना ती.

पाणी पण काढुन ठेवले होते तिने. भराभर अंघोळ आटपली. आज दारावर थापा नव्हत्या, तिच्या. म्हणुन चुकल्याचुकल्यासारखे वाटले. कधी कधी ऊगाचच त्या लटक्या तक्रारी ऐकण्यासाठी मी आतच राहतो, अरे झालीय ना अंघोळ मग ये ना बाहेर. झोपबिप लागली कि काय ? अशी तक्रार असते तिची.
स्टेशनवर पोहोचलो तर रोजची ८.४२ सुटली होती. आता पुढची ९.०२ ला, पण वाट बघुन चालणार नव्हते. कल्याण लोकल आली. घुसलो तसाच. नेहमीचा ग्रुप नाही. लटकत जावे लागले.
ब्रांचला पोहोचलो तर कळले भिसेबाईना नातु झाला म्हणुन त्या चार दिवस येणार नव्हत्या. आता तोहि काऊंटर मलाच संभाळायला लागणार होता.

त्यांच्याघरी फ़ोन केला. त्या म्हणाल्या, ” अरे आठ वर्षानी नातु झाला रे आम्हाला. तुला आज थोडा ताण पडेल. काहि लागलं तर मला फ़ोन कर. ” मी म्हणालो, ” अभिनंदन. नुसते पेढे नाही, पार्टि पण पाहिजे बरं का. तीसुद्धा ब्रांच स्टाफ़ला सेपरेट. ” त्या म्हणाल्या, ” हो रे अगदी नक्की. ”

काळेसाहेब आले, मी त्याना भिसेबाईंबद्दल सांगितले. ते म्हणाले. ” आज तुम्ही तो काऊंटर संभाळा, तुमच्या काऊंटरवर जुक्करला बसवतो. ” जुक्कर म्हणजे चुळबुळ्या. एका जागेवर कधी बसणार नाही. पण साहेबाना कोण सांगणार. त्यानी अंधेरी ब्रांचवरुन त्याला खास बोलावुन आणला होता ना. म्हणजे शेवटी दोन्ही काऊंटर माझ्याच गळ्यात पडणार तर, आज.



काळेसाहेबानी सेफ़मधुन कॅश काढुन दिली. मी म्हणालो, ” फ़क्त भिसेबाईंच्या काऊंटरची द्या माझ्याकडे. जुक्कर आला कि त्याची सेपरेट काढा. ” साहेब जरा नाराज झाले. म्हणाले ” एवढं मोठं सेफ़ कितीवेळा ऊघडायचे ते. घ्या कि तुम्ही मोजुन. जुक्कर आला कि सहि करेल परत. दोन्ही चाव्या आहेत ना तुमच्याकडे. ” मी नाईलाजाने दोन्ही बॉक्सेस ताब्यात घेतले. त्याची कॅश त्याच्या केबिनमधे ठेवुन लॉक करुन टाकली.

देशपांडे बाई म्हणाल्या, ” काय चहा घेणार का ? ” मी म्हणालो, ” नुसता चहा, आज मंगळवार आहे ना, साबुदाणा वडा मागवा कि. पैसे मी देतो. ” त्या म्हणाल्या, ” ऊपास माझा आणि तु वडे खा. बरं सागते रे. ” त्यानी मागवलेले वडे येईपर्यंत कॅश अवर्स झालेच. आधीच बरेच कष्टमर्स येऊन बसले होते. ओह आज सात तारिख. आज दोन तीन कंपन्यांचा पे डे होता. म्हणजे ते सगळे आजच धाड घालणार. प्रत्येकाला सांगुन थकलो, कि ए टी एम वापरत जा, कोणी ऐकतच नाही.

मीच काऊंटरवर असल्याने सगळ्यानी माझ्याकडेच लाईन लावली. पहिलेच अकाऊंट बघितले तर झीरो बॅलन्स. तसे सांगितल्यावर तो माणुस भांडायलाच ऊठला. तो म्हणाला ” कालच चेक पाठवला होता. काल तुम्हीच सांगितले होते कि आजच्या आज क्रेडिट करतो म्हणुन. तुमच्यावर विश्वास ठेवुन तर आलो ईकडे. ” मी म्हणालो, ” जरा थांबा. ” साहेबाना सांगितले तर ते म्हणाले, ” काल दिला होता चेक मी सहि करुन जुक्करकडे. ” मी म्हणालो, ” पोस्टिंग नाही झालेले. काऊंटरवर आधीच लाईन लागलीय. ” ते बाहेर आले व त्यानी जुक्करच्या टेबलवरुन चेक्स काढुन माझ्या हातात दिले. म्हणाले, ” तुम्ही आणि देशपांडे मिळुन तेवढं पोस्टिंग करुन टाका. जुक्कर जरा लेट येणार आहे आज. ” अर्धा तास त्यातच गेला. देशपंडे बाईंची लिश्टची टोटल आणि चेक अमाऊंट टॅलि होत नव्हती. त्यामुळे तेहि मलाच बघावे लागले सगळे.

काऊंटरवर पन्नास जणांची लाईन. प्रत्येकाला आधी बॅलन्स सांगा मग तो स्लीप भरणार. मग त्याला पैसे द्या. एकेका माणसाला तीन मिनिटे जात होती. साहेबानी झीरो बॅलन्स अकाऊंट ऊघडायला परवानगी काय दिली, कुणी एक पैसा सुद्धा ठेवत नव्हते अकाऊंटमधे. जुक्कर आता ऊगवला. काऊंटर ताब्यात घ्यायचा तर, साहेबांकडे जाऊन बसला. चांगला अर्ध्या तासाने जागेवर आला तो आल्याबरोबर मी पाच मिनिटे ब्रेक घेतला. परत आलो तर त्याने अजिबात लाईन पुढे सरकु दिली नव्हती.

कॅश अवर्स संपल्यावर मी दरवाजा बंद करायला लावला, तरी सोळा जण लाईनमधे होतेच. मी पोस्टिंग लगेच करत होतो, त्यामुळे मी मोकळा झालो. आणि जेवायला गेलो.

डब्यात आवडती भरली वांगी होती. डबाभरुन होती भाजी. सगळ्यानी चाखली. धुवावा लागु नये एवढा साफ़ केला डब्बा आम्ही. देशपांडेबाईनी परत परत रेसिपी लिहुन आण म्हणुन आग्रह धरला.

मग जरा बाहेर पाय मोकळे करायला गेलो. आशाची नविन कॅसेट आलीय म्हणत होती. आशा म्हणजे तिचा जीव कि प्राण. आणखी एक दुकानदाराने दाखवली, म्हणुन तिही घेतली.
परत आलो आणि लगेच कॅश टॅलि करायला बसलो. पोस्टिंग वैगरे नीट करुन ठेवले होते, म्हणुन स्टेटमेंट पटकन झाले. साहेबाना सांगायला गेलो कि कॅश सेफ़मधे ठेवायची आहे तर ते म्हणाले, ” अजुन एक मोठे पेमेंट करायचे आहे. पुजारींचा फ़ोन आला होता, त्यांचा माणुस येतोय चेक घेऊन. ” मी म्हणालो, ” साहेब मी सगळे टॅलि केलेय, आधी तरी सांगायचे, ” तर ते म्हणाले, ” तुम्हालाच शोधत होतो, तुम्ही बाहेर गेला होता. ” मी म्हणालो, ” जुक्कर च्या काऊंटरवरुन द्या. ” तर ते म्हणाले, ” तो हाफ डे गेलाय. ”
चरफडत पुजारीच्या माणसाची वाट बघत बसलो. तो आला चांगला साडेतीन वाजता. ” अरे जरा लवकर नाही का यायचे ” तर तो म्हणाला फोन केला होता कि. साहेबानी डोक्यावर चढवुन ठेवलेली माणसं हि, काय बोलणार.
अकाऊंटमधे बघितले तर बॅलन्स पण नव्हता. साहेब म्हणाले अगेंस्ट क्लिअरिंग द्या. त्यांची सहि घेऊन पैसे दिले. अकारणच परत सगळे टॅलि करावे लागले.

मग जरा देशपांडेबाईना क्लीअरिंगमधे मदत करायला गेलो, तर परत साहेबांचे बोलावणे आले. आत गेलो तर म्हणाले, ” कि जरा जुक्करचे स्टेटमेंट बघुन द्या. एरर दिसतेय. ” झाले परत त्याचे पोस्टिंग्ज चेक करत बसलो. आज सकाळपासुन नुसता वैताग आणला होता याने. त्याचे अक्षर म्हणजे दिव्यच. थ्री, फ़ाय आणि एट सगळे सारखेच. शेवटी एकदाचे टॅलि केले आणि साहेबाना सांगितले. मग मात्र राहवले नाही, मी म्हणालोच त्याना, ” कि कश्याला ऊगाच त्याला त्रास दिलात, दोन्ही काऊंटर्स संभाळले असते कि मी, नाहितरी मीच केले सगळे काम आज. ” तर साहेब म्हणाले, ” अहो तुम्ही जुन्या स्टाफ़पैकी. तुम्हाला ईथला जास्त अनुभव आहे. जुक्कर ब्रांचला नविन आहे, शिकेल हळु हळु, आता तुमच्या मिसेस असत्या तर केलेच असते ना तुम्ही. असो, काय म्हणताहेत त्या. तिथे काहि प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. तिथले मॅनेजर चांगले ओळखतात मला. आम्ही डहाणु ब्रांचला एकत्र होतो ना. ”
अर्ध्या तासात घरी पोहोचलो. तिची वाट बघत बसलो.

&%&%&%&%

तिचा दिवस

त्याची आवडती म्हणुन भरली वांगी करायला घेतली, तर नेमकी दोन किडकि निघाली. आणली होती चार, त्यात दोन किडकि, मग दोन वांगी आणि चार बटाटे घातले. दोन्ही वांगी त्याच्याच डब्यात घातली. सगळ्याना वाटुन खाणार ना तो.
नेहमी सकाळी कुकर लावताना, त्याची मदत लागते. झाकण दाबल्याशिवाय तो लागतच नाही. आज म्हंटलं आपणच करुन बघु या. काल ऊशीरापर्यंत वाचत होता, म्हणुन ऊठवले नाही. शिवाय त्याला ऊशीरा निघाले तरी चालतेच. कुकरच्या शिट्टीने तो ऊठलाच. माझे सगळे आवरले होतेच. पटकन निघाले मी. निघाले ते बरे, नाहितर रोज माझा डबा ऊघडुन बघतो तो, दोघांच्या डब्यात सारखेच असावे लागते सगळे त्याला. आज तर चिडलाच असता तो. माझ्या डब्यात नुसते बटाटेच होते ना.

लग्न झाल्यावर एकाच ब्रांचला दोघे राहुच शकणार नव्हतो. तो म्हणत होता, मी घेतो ट्रान्स्फ़र, मी म्हणाले, ” अरे मला सवय आहे ट्रेन्सची. आताच तर आम्ही ईथे शिफ़्ट झालोय. मीच घेते ट्रान्सफ़र. आणि शिवाय रश अवर्स च्या विरुद्ध प्रवास ना. ”

पण आता ऊलट्या बाजुला पण चांगलीच गर्दी असते. मोठ्या मुष्कीलिने चौथी सीट मिळते. रोज जवळ जवळ ऊभ्यानेच करावा लागतो प्रवास.

खरे म्हणजे मला कॅश काऊंटरचा एक्स्पिरियन्स. शेजारी शेजारी काऊंटर्स होते ना आमचे. तिथेच जमले प्रेम. एकमेकांशी गप्पा मारत आम्ही काऊंटर्स कसे संभाळतो, तेच कळायचे नाही स्टाफ़ला. पण खेळीमेळीचे वातावरण होते त्या ब्रांचला.

ईथे सगळेच सिनियर. माझ्या एजग्रुपमधले कुणीच नाही. गप्पा तरी कोणाशी मारणार. साहेबांची तर दोनच वर्षे ऊरली होती, रिटायर व्हायला.

अजुन त्याना कम्प्युटर नीट वापरता येत नाही. मग दर दहा मिनिटानी मला बोलावतात. काऊंटर सोडुन कसे जाणार. मग म्हणाले तु गॅरंटी चे बघत जा.

मला अजिबात नको होते ते टेबल. दिवसभर कोपर्‍यात बसुन रहावे लागायचे. रोज रोज गॅरंटी तरी कुठे लागणार कुणाला, मग मीच ओबीसी चे काम मागुन घेतले. त्याचे रिकन्सिलिएशन पेंडिंग होते.

कालच ते सगळे संपवले. बर्‍याच ओपन एंट्रीज दिसत होत्या. मी नवरे साहेबाना दाकह्वले सगळे. मी म्हणाले, ” कि एवढ्या सगळ्या ओपन एंट्रीज दिसताहेत. त्यात्या ब्रंचेसकडुन काहिहि कन्फ़र्मेशन आलेले नाही. तुम्ही जरा मान्याना सांगता का ? ”

तर ते म्हणाले, ” तुच बघ सगळे. माने आता काऊंटर सोडुन कुठे बघतील. ” मी म्हणाले, ” कॅश अवर्स नंतर बसायला सांगा, मी मदत करेनच. ” तर ते म्हणाले, ” कॅश अवर्स नंतर किती काम असतं माहितच आहे ना तुम्हाला. ”

मी मनात म्हणाले, हो ना जसा काहि मी संभाळला नाही, कधी कॅश काऊंटर.
मग घेऊन बसले सगळे जुने रेकॉर्ड. काहि काहि चेक्सचा तर ट्रेसच लागत नव्हता. ब्रांच डिटेल्स पण नव्हते लिहिलेले. जितके जमले तेवढे डिटेल्स शोधुन काढले. त्या सगळ्या ब्रांचेसना कन्फ़र्मेशन लेटर पाठवायला हवी होती. मी साहेबाना विचारायला गेले तर म्हणाले, ” एच ओ ला पाठवा डिटेल्स, ते बघतील काय करायचे ते. गेल्या वर्षी ऑडिटर्सचा रिमार्क आहे. स्टाफ पाठवायला सांगितला तर पाठवत नाहीत. ” मी मनात म्हणाले, आहे त्याच स्टाफ़ने नीट काम केले तर कशाला लागेल ज्यादा स्टाफ़.

तेवढ्यात लंच टाईम झालाच. आज सुरेखा नव्हती कंपनी द्यायला. जोशींची संकष्टी. मग एकटीच बसले खात. भरल्या वांग्याच्या चवीचे बटाटे. सगळे नाहीच संपवु शकले. डबा परत न्यायची पण चोरी. खाल्लेस का नाही, म्हणुन विचारत बसेल सारखा. लग्नापुर्वी मुद्दाम जास्त न्यायचे. सगळ्या पदार्थांची तारिफ़ करायचा. तेंव्हा वाटायचे ईम्प्रेस करायला करतोय म्हणुन, तर तसे नव्हते. आजहि रोजच्या जेवणाची करतो तारिफ़, वेडाच आहे.

लंच आटपुन जरा निवांत बसले तर आईचा फ़ोन. येत्या शनिवारी शेजारच्या अंजुच्या मुलीचे बारसे आहे म्हणुन. हॉस्पिटलला जाऊ शकले नव्हते, आता जायलाच हवे होते मला. आई म्हणत होती. शनिवार आहे, रहायलाच ये. मी म्हणाले विचारुन सांगते म्हणुन.

मग जरा शेजारी पुस्तकांच्या दुकानात गेले. बारोमास त्याला हवे होते, ते घेऊन आले. पुस्तकावर ईतका खर्च का करतेस म्हणणारच तो. त्यावर माझे उत्तरहि ठरलेलेच.

परत आले तर भरत सायकल मार्ट मधला अकाऊंटंट येऊन बसला होता. त्याना म्हणे सायकल स्पेअर्स साठी गॅरांटी हवी होती. मी म्हणाले, ” अरे तुमचे फ़क्त करंट अकाऊंट आहे आमच्याकडे. बीजी फ़ॅसिलिटीच नाही तुमच्याकडे. कशी मिळणार तुम्हाला बीजी. ” तर तो म्हणाला, ” कि कसहि करुन आजच पाहिजे. ”
त्याला म्हणाले साहेबाना विचारुन सांगते. साहेब म्हणाले ” मागताहेत तर द्या. ” मी म्हणाले, ” फ़ुल एफ़्डी घ्यावी लागेल. ” तर म्हणाले, ” सांगा त्याला. ”
त्याला समजावता समजावता नाकी नऊ आले माझ्या. शेवटी त्याच्या ऑफ़िसला फ़ोन करायला लावला. त्यांच्याच नावे एफ़्डी राहणार होती. त्याना पटले. मी त्या अकाऊंटंटला म्हणाले, ” फ़ॉर्मॅट ठेव ईथे आणि युवरसेल्फ चा चेक घेऊन ये. ” तो गेला.
फ़ॉएमॅट बघितला तर तो हि अर्धवट. परत त्याची वाट बघत बसले. ताबडतोब त्यांच्या ऑफ़िसला फ़ोन केला. तर तो निघालाच होता. शेवटी बेनेफ़िशयरिला फ़ोन केला. टर्म्स नीट विचारुन घेतल्या. बीजी तयार ठेवली. तो चेक घेऊन आलाच होता, एफ़्डी पण मीच तयार करुन दिली. नाहितर सुरेखा नाही म्हणुन ते अडुन बसले असते. सगळा स्टाफ़ जुन्या मताचा. आपले टेबल सोडुन एक काम करणार नाही. नुसत्या चकाट्या पिटत बसतील. मी करते म्हणुन सगळे माझ्याच गळ्यात.

सगळे नीट फ़ोल्डरमधे घालुन साहेबांकडे सहिला पाठवले. ओरिजिनल बीजी त्याला दिली. तो खुष होवुन धावतच गेला. आणि गडबडीत रजिष्टरवर त्याची सहि घ्यायलाच विसरले. ताबडतोब त्याच्या ऑफ़िसला फ़ोन केला. पार्टनर म्हणाले ते येऊन सहि करतील म्हणुन. त्यावेळी नेमके साहेब बाहेर आले होते. म्हणाले, ” अशी कशी दिलीत. आता त्यानी नाही सहि केली म्हणजे. ” त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते. मी म्हणाले, ” नका काळजी करु. रेग्युलर कष्टमर आहेत ते. नाहीच आले तर मी जाऊन घेईन सहि. ”

आता तेवढ्यासाठी मला ताटकळत बसावे लागले. साडेचार झाले तरी कोणी आले नव्हते. त्यांचे ऑफ़िस कुठे आहे, याची चौकशी मी करतच होते, तेवढ्यात ते आलेच. हातात मिठाईचा बॉक्स. मी म्हणाले, ” त्याची काय जरुर, ” तर म्हणाले, ” कि तुमच्या को ऑपरेशनमुळे डिलरशीप मिळाली आज. ” मी ताबडतोब बॉक्स ऊघडुन स्टाफ़मधे वाटुन टाकला.

त्या गडबडीत निघायला १५ मिनिटे ऊशीरच झाला होता. नेहमीची गाडी मिळणार नव्हतीच. तो वाट बघत बसणार आता.

&%&%&%&%&%&%&%&%&%

आणि त्यांचा दिवस

तो आधीच आला होता. नेहमीप्रमाणे त्याने साफ़सफ़ाई केली. तिची वाट बघत बसला. नेहमीची वेळ टळुन गेली तशी त्याची अस्वस्थता वाढली.

गॅलरित ऊभा राहुन तिची वाट बघत ऊभा राहिला. तिथुन बाराच लांबवरचा रस्ता दिसत होता. शेवटी त्याला ती येताना दिसली. त्याने हात ऊंचावला. जसे काहि तिला घर माहितच नव्हते. वेळेपेक्षा तब्बल वीस मिनिटे ऊशीर झाला होता तिला.

बिल्डिंगच्या गेटमधे आलेली दिसताच तो दार ऊघडुन ऊभा राहिला. ती झपझप जिना चढुन वर आली.

” का गं एवढा ऊशीर. गाड्या लेट होत्या का ? ” त्याने विचारले. ” अरे घरात तर येऊ दे. किती काळजी करशील. पंधरा वीस मिनिटेच तर झाला असेल ऊशीर. नेहमीची गाडी चुकली ना आज, ” तिने उत्तर दिले.

तिने हातपाय धुवुन घेतले, तोवर त्याने बशीत चिवडा काढुन ठेवला. ” चहा झाला का रे तुझा ” तिने सहज विचारले.
” तुझ्याशिवाय कधी घेतो का मी संध्याकाळचा चहा. ” त्याने लटक्या रागाने विचारले. ” नाहि रे, आज मला खुप ऊशीर झाला ना, म्हणुन विचारले. ” तिने उत्तर दिले.
तिने चहा ठेवला. तो तिच्याभोवतीच घोटाळत राहिला.
त्याने कप घेतले. या चहासाठी बश्या घ्यायच्याच नाहीत असा त्यांचा नियम होता.

” तुला आठवतय, लग्नापुर्वी आपण त्या ईराण्याकडे कसा रोज संध्याकाळी चहा पित बसायचो ते. ” त्याने आठवण काढली. ” हो ना, सगळे विचारायचे कि रोज एवढे काय बोलत बसता म्हणुन. सगळ्यानी ओळखलच होतं ” , तिनेहि दुजोरा दिला.

” ए तुला खुप त्रास होतो का, रोजच्या प्रवासाचा. आपण ट्रान्स्फ़र करुन घेऊया का ” त्याने काळजीने विचारले.
” नको रे बाबा, लांब जायचे असले तरी गर्दी नसते गाड्याना. येताना एखादी डुलकि पण लागते बघ ” . तिने खुलासा केला.

” अग आज भरली वांगी छानच झाली होती. सगळ्यानी रेसिपी विचारलीय. जास्त दिली असतीस तरी संपली असती. ”
त्याने ऊत्साहाने सांगितले.
” हो रे छानच झाली होती. वांगी पण छान मिळाली होती. परत मिळाली तर जास्त घेऊन येऊ. म्हणजे मोठा डबा भरुनच देईन तुला ” , तिने आश्वासन दिले.

” तुला त्या भिसेबाई माहित आहेत ना, त्याना नातु झाला आज. खुप वर्षे वाट बघितली त्यानी. आज आल्या नव्हत्या, पण मला मुद्दाम फ़ोन करुन सांगितले. आपण गेले पाहिजे हं त्यांच्याकडे एकदा. कितीदा तरी बोलावले त्यानी ” , त्याने सहज माहिती पुरवली.

” अरे हो ना. तुला सांगु. मी त्यांच्याकडेच तुझ्याबद्दल चौकशी केली होती. ” तिने एक गुपित ऊघड केले.

” वा, म्हणजे सगळी चौकशी करुन प्रेमात पडलीस वाटतं, काय म्हणाल्या होत्या त्या. ” त्याने ऊत्सुकता दाखवली.

” त्या म्हणाल्या, माझ्या लेकीचे लग्न झालेय म्हणुन, नाहीतर मीच जावई करुन घेतला असता त्याला. ” तिने खरेखुरे सांगुन टाकले.

” अरे हो, तुझ्यासाठी आशाची नविन कॅसेट आणलीय. ” त्याला आठवले. ” मग लावलीस का नाही, ” तिने विचारले.
” तुझ्यासाठी आणलीय ना, ओपनींग तुझ्या हस्ते. ” त्याने बाजु मांडली.
त्याने तिच्या हातात कॅसेट ठेवली. तिचे आशाची हसरी छबी डोळाभर बघुन घेतली. काळजीपुर्वक कॅसेट ऊघडली.
आशाच्या आवाजाच्या धारेत ते दोघे काहि काळ हरवुन गेले.
” तुला सांगितले होते ना मी, कि आता मी बीजी बघते. आज जरा ज्यादा काम करुन एक बीजी करुन दिली, तर तो कष्टमर एकदम खुष होवुन गेला. मला मिठाईचा बॉक्स आणुन दिला. तु सांगितल्याप्रमाणे तिथल्या तिथे ऊघडुन सगळ्या स्टाफ़ला वाटुन टाकली मिठाई. ” तिने सहज सांगितले.
” अगदी छान केलेस. बॉक्स न ऊघडता घरी आणला असतास तर तुझ्या माघारी बरिच चर्चा झाली असती. ” त्याने सावध केले तिला.
” बाकि काय म्हणतेय नविन ब्रांच. नविन मैत्रीणी भेटल्या कि नाहीत. ” त्याने विचारले.
” न भेटुन जातात कुठे. दिवसभर एकत्र असतो, मग होतातच गप्पा. ” तिने सांगितले.
तो म्हणाला, ” हो ना, हा रुल नसता तर आपण एकाच ब्रांचला असतो नाही. मग तश्याच गप्पा मारत बसलो असतो, ” त्याने बोलुन दाखवले.
” कुणास ठाऊक, मग कदाचित बोललाहि नसतास. आता काय बोलायचं बायकोशी म्हणाला असतास. मला वाटतय तु मुद्दामच लांब पाठवलस मला, निदान आठ दहा तास तरी मोकळीक मिळावी म्हणुन, ” तिने थट्टा केली, पण त्याने तो दुखावल्याचं तिच्या लगेच लक्षात आलं.
” अरे तुझ्यासाठी बारोमास आणलय बघ, ” तिने पुस्तक देत सांगितलं. त्याच्या डोळ्यात चमक आली, तरिहि तो म्हणाला ” कश्याला केलास खर्च, लायब्ररीत क्लेम लावला होता ना मी. ”
” आपलाहि संग्रह असावा असे तु म्हणतोस ना, म्हणुन आणले. ” तिने समजुत काढली.

” तुला सांगायचे राहिलेच, आज आईचा फ़ोन आला होता. येत्या शनिवारी शेजारी बारसं आहे म्हणुन. आई रहायलाच ये म्हणत होती. सगळे आटपेपर्यंय ऊशीर होईल म्हणाली. जाऊ ना, ” तिने विचारले.

त्याने नुसतेच हं केले.

” न्यायला येशील का रे मला ? ” तिने परत विचारले.

The End.

Shyamli
Wednesday, January 25, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय दीनेशजी एवढ्च...........
पुढे?


Dineshvs
Wednesday, January 25, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, दिवस संपला, रात्र झाली, कथा संपली.

Pama
Wednesday, January 25, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश सुऽऽऽरेऽऽखऽ... मी अगदी मनापासून स्पष्ट सांगते.. अत्ता मी अगदी असच काही लिहिणार होते, लिहिण्यासाठी हा बीबी उघडला तर तुमची ही कथा दिसली.. मी एव्हढी खूष झाले. :-)मस्तच लिहिलयत!!! आता माझा बेत cancel
सुधीर गाडगीळांचे' तो आणि ती' असे एक सदर यायचे लोकसत्तात.. वाचलयत का?


Dineshvs
Wednesday, January 25, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा ये बात सहि नही है. एका चांगल्या कथेला मायबोलिकर मुकले असे होईल. त्यामुळे बेत Cancel नाहि करायचा.
ते गाडगीळांचे सदर वाचतो मी अधुनमधुन.


Anilbhai
Wednesday, January 25, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा
अस cancel नाही करायच. आता तु पुढच लिही.
श्यामली ला वाचायचय
:-) ~D

Shyamli
Wednesday, January 25, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई मी कथेच नावच नव्हत वाचल
त्याचा दिवस..........
घेतेय



Moodi
Wednesday, January 25, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश धम्माल आली हो.
नवरा बायको जेव्हा दोघेही नोकरी करत असतात अन तेही मुंबई सारख्या लोकलच्या बांधलेल्या वेळात तेव्हा त्यांचा तेवढाच बांधलेला जीवनक्रम अगदी डोळ्यासमोर छान जिवंत केलात.

एक छान गोष्ट आठवली. नवरा मुंबईला रहात असतो नोकरी साठी अन बायको पुण्याला. फक्त शनीवारी येऊन त्या रात्री अन रवीवारी भेटतात ते एकत्र.
एकदा असेच एकमेकाला भेटायला म्हणुन ते अचानक निघतात पण सरप्राईज भेट म्हणुन एकमेकाना सांगत नाहीत. अन दोघांच्या गाड्या विरुद्ध दिशेने येत असतात अन नेमक्या शेजारीच बंद पडतात. ती ठरवते उतरुन दुसरी गाडी पकडावी अन तो तेच ठरवतो, अन नेमके स्टेशनवरच त्यांची भेट होते. अशीच छान रंगवली होती ती गोष्ट.


Pama
Wednesday, January 25, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा.. चांगल्या कथेला मुकेल कि नाही ते माहीत नाही.. काही दिवसानी लिहिण्याचा करीन प्रयत्न..:-)
अनिलभाई..दिवस संपला, रात्र झाली, कथा संपली... यापुढची कथा प्रत्येकानी आपाअपली लिहायची..


Avdhut
Wednesday, January 25, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh मस्त कथा. आजचा आमचा पण Office मधाला दिवस चांगला केलात.
Pama आता तु 10 वर्षा नंतर चा या दोघांचा एक दिवस लिही.


Maitreyee
Wednesday, January 25, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Avdhut अगदी आत्ता हेच लिहिणार होते मी, याचा पार्ट २ लिहा, काही वर्षानन्तरचा दिवस :-)

Lalu
Thursday, January 26, 2006 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही वर्षानंतरचा कशाला, दुसराच दिवस लिहीता येईल. हा राजा राणीचा होता, दुसरा भांडाभांडीचा. :-) ~D

Nalini
Thursday, January 26, 2006 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, खुपच छान लिहिलेस.

Megha16
Thursday, January 26, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश
मस्त कथा आहे.मांडली पण छान आहे.


Athak
Thursday, January 26, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश , छानच लिहीलेस नेहमीच्या खास अन साध्या सोप्या शब्दात
लालु त्याला दुसरा दिवस नको ग , रोज थोड तोंडीला असल की जेवण छान जात :-)


Champak
Thursday, January 26, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतकी इच्छा च ही त दुसरा भाग HH ला लिहायला सांगा

Yog
Thursday, January 26, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, झक्कास! एकदम ओरिजीनल.

Charu_ag
Thursday, January 26, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, क्या बात है!
पमा, आता दुसरा भाग येऊदेत.


Bhagya
Thursday, January 26, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरळ, सहज आणि सुन्दर. अजून काय लिहु?

Aj_onnet
Friday, January 27, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा. दिनेश छानच! कोणीतरी लिहा बुवा दुसरा भाग याचा.

Moodi
Friday, January 27, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेचा दुसरा भाग न आलेला बरा. प्रीतीतले क्षण प्रीतीतच रहावेत.


Avdhut
Friday, January 27, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi काही वर्षानतर प्रीत सरते असे का गृहीत धरतेस. चित्र बदलेल पण प्रीत तशीच राहू शकते.

Chinnu
Friday, January 27, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण मूडीशी सहमत. दिनेश, तुमची कथा गोडवा निर्माण करुन रेंगाळत राहीली आहे मनात अजुन. :-)

Moodi
Friday, January 27, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहं!! उलट प्रीत कायम रहाते हेच मी गृहीत धरलय. वास्तव वारंवार नको. म्हणुन वाटत की याची घर घर की कहानी नको व्हायला नाहीतर केकुकका सुरू आहेच टीव्हीवर.

Daizy
Saturday, January 28, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही मुडीला सहमत आहे. वाचुन खरच हलके वाटले. असे खरच आहेत माझ्या पाहण्यात. किती सुंदर जगतात ते आयुष्य !
दिनेश खुप छान लिहीता तुम्ही. आता रविवार छान जाईल माझा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators