|
Shraddhak
| |
| Wednesday, January 11, 2006 - 11:12 pm: |
| 
|
त्या गावात मी पोचलो तेव्हा उन्हं उतरणीला लागली होती. दिवसभर कुठंतरी दडून बसलेली थंडी हलके हलके डोकं वर काढत होती. अशा गावात मस्तपैकी आळसात दिवस काढण्यासाठी येऊन राहावं खरं तर! पण मला आळस करून चालणार नव्हतं. गावच्या इनामदारांच्या बोलावण्यावरून इथे आलो होतो मी; त्यांच्या एका महत्त्वाच्या कामासाठी! सायकलवरून जाणार्या एकाला हटकून मी इनामदारांच्या वाड्याचा पत्ता विचारला. त्याने काही न बोलता उजवीकडच्या एका वाटेकडे निर्देश केला. मी त्याला ' धन्यवाद ' म्हणून त्या वाटेला लागलो. आजूबाजूला मस्तपैकी शेती पसरली होती. मला पीक काय, कुठलं यात काही फारशी गती नव्हती, मी नुसता चहूकडे पसरलेला तो हिरवा गालीचा डोळेभरून पाहत रमत गमत त्या वाटेनी चाललो होतो. .... थोडं अंतर पुढे चालून जाताच इनामदारांचा वाडा दृष्टीपथात आला. बांधकाम जुन्या पद्धतीचं होतं. कमी कमी होत जाणार्या संधिप्रकाशात तो वाडा बराच गूढ दिसत होता. मला तो पाहून एकदम महल वगैरे सिनेमे आठवले आणि मी स्वतःशीच हसलो. " रावसाहेब इनामदार आहेत का घरात? " वाड्याच्या मुख्य फाटकाशी पोचून मी आवाज दिला. आतमधून लगबगीने एक नोकर धावत आला. " कोण आपण? " " अर्जुन. इनामदारांनीच बोलवलंय कामासाठी. " तेवढ्यात स्वतः इनामदारच बाहेर आले. सत्तरीच्या घरात असावेत; पण माणूस भक्कम होता. खानदानी गोरा रंग, डोक्यावर बरंचसं टक्कल, पांढर्याशुभ्र भरघोस मिशा, अंगावर पांढराशुभ्र कुर्ता आणि तसंच धोतर.... रुबाबदार व्यक्तिमत्त्व होतं एकूण! " अर्जुनराव बरं झालं, लौकर आलात. आम्ही वाट पाहात होतो तुमची. पण फाटकाशी का उभे तुम्ही? या की आत. " त्यांचा तो आवाजही त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला साजेसा होता. मी फाटक उघडून आत आलो. डाव्या हाताला थोडा दूरवर गोठा होता. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते उजव्या हाताला असलेल्या गोष्टीने. एखाद्या वाघाची गुहा असावी तितपत लांबरुंद असं कुत्र्यासाठी बांधलेलं घर होतं ते. त्याचा बाहेरचा दरवाजा जाडजूड लोखंडी बार्सपासून बनवलेला होता. एखाद्या कुत्र्याला एवढा बंदोबस्त लागावा याचं मला नवल वाटलं. " इनामदार, काय वाघ वगैरे पाळलाय की काय? एवढा भलाथोरला पिंजरा... " मी गमतीने त्यांना म्हणालो. " तसंच म्हणा अर्जुनराव. वाघ्याच नाव आहे त्याचं. असली कुत्री इथं सहजासहजी गावत नाहीत. विश्वासराव, आमचे धाकटे चिरंजीव... त्यांना होती आवड प्राणी पाळण्याची. त्यांनीच आणला होता वाघ्याला कुठूनतरी. " ..... बोलत बोलत आम्ही बैठकीच्या खोलीत येऊन पोचलो. तेवढ्यात मगासच्या नोकराने तिथे चहा, चार फराळाचे जिन्नस आणून ठेवले होते. " घ्या अर्जुनराव. चहा घ्या. आमच्याकडच्या बसनी तुम्हाला बराच त्रास झाला असेल प्रवासाचा. " चहाचा घोट घेत घेत मी बोलू लागलो. " फोनवरून आपलं बोलणं झालंय तसं. पण मला पुन्हा एकदा तुमची सगळी कहाणी ऐकायची आहे. " इनामदार थोडं मागे सरकून तक्क्याला रेलून बसले आणि घसा खाकरून त्यांच्या त्या धीरगंभीर आवाजात सांगू लागले. " हे आमच्या पूर्वजानं वाढवलेलं गाव. खूप पूर्वी आमच्या घराण्यातल्या कोणालातरी हे आणि आजूबाजूची पाच गावं इनाम मिळाली होती. त्याचाच त्याने मेहनत करून विस्तार केला. पुढच्या प्रत्येक पिढीने या जहागिरीवर राज्य केलं आणि इनामदारांच्या खजिन्यात भर घातली. इथल्या लोकांची संस्थानिक या नात्यानं काळजी घेतली. इंग्रज गेले तशी हे संस्थान देखील खालसा झालं. पण इनामदारांचा लौकिक तसाच राहिला. तोच दबदबा, तोच दरारा... आजही या गावचे जुने मालक म्हणून आम्हाला मान देतात लोक..... पण ही संपत्ती, ही सत्ता तशीच वाईट अर्जुनराव. मनावर संयम नसला तर ह्या गोष्टी आयुष्याचं मातेरं करतात हो. इनामदारांच्या आदल्या पिढ्या जरी गुण्यागोविंदाने एकत्र नांदल्या तरी पुढे पुढे जहागिरीवरनं तंटे, वाटण्या सुरु झाल्या. हळूहळू एकाचे दोन, दोनाचे चार होता होता साही गावं इनामदारांमध्ये आपापसांत वाटली गेली. या गावात आमचं कुटुंब आणि आमचे चुलतभाऊ दादासाहेब त्यांचं कुटुंब्; अशी दोन घरं आहेत इनामदारांची. वडील आणि काका एकत्र होते पूर्वी. पण पुढे पटेना झालं तेव्हा झाल्या वाटण्या.... जहागिरीची दुश्मनी फार वाईट. एकदा तुटलेली नाती काही केल्या पुन्हा सांधता येत नाहीत. आम्ही आणि दादासाहेब देखील कधी जुनी वैरं विसरून एकत्र झालो नाही. आमच्या पुढच्या पिढीवर देखील याचं सावट पडलंच. आमचे थोरले चिरंजीव, विश्रामराव, त्यांना मात्र या गोष्टींचा तिटकारा. त्यांनी शिक्षणासाठी म्हणून मुंबई गाठली आणि तिथून पुढे अमेरिका. त्यांना या भाऊबंदकीमुळे या गावात पाय ठेवायची इच्छा होत नाही. त्यांचा गावाशी तसा फारसा संबंध उरलेला नाही. दुसरे विश्वासराव. त्यांच्यात मात्र अस्सल इनामदारांचंच रक्त होतं. भडक डोक्याचे, रांगडे, शौकीन... विश्रामरावांच्या अगदी उलट. आठवीत शाळा सोडून दिली त्यांनी. खोटं का बोलू, मला आनंद झाला. शेती, इनामदारी, जुनी वैरं सगळं सांभाळायला मला एक वारसदार लाभला होता. दादासाहेबांचे तिन्ही मुलं यातच तर होते. प्रल्हाद, महादेव आणि धैर्यशील.... त्या तिघांना टक्कर द्यायला माझा विश्वास माझ्या बरोबरीने उभा राहिलेला पाहून मला हायसं वाटलं. ... विश्वासरावांना प्राण्यांचा भरपूर शौक. वाघ्याला त्यांनीच आणलं या घरात. त्याच्यावर फार जीव होता त्यांचा. तेही फार इमानी जनावर आहे बघा. विश्वासराव वारले तेव्हापासून वाघ्यादेखील दुःखात असल्यासारखा झालाय. आधी तो शिवारात मोकळा असताना कुणाची ताकद नव्हती तिकडे फ़िरकायची, आता दिवसरात्र त्या गुहेतच बंद असतोय. आधी त्याच्या भुंकण्याने अख्खं माळरान कापायचं, आता आवाजदेखील काढत नाही हो. फ़क्त विश्वासरावांच्या आई जेवण देतात तेवढं खातो. " " विश्वासराव कशाने वारले? काय कारण झालं? " इनामदारांच्या चेहर्यावर दुःखाची छटा पसरली. विषण्णपणे ते पुढे बोलू लागले. क्रमशः
|
Paragkan
| |
| Wednesday, January 11, 2006 - 11:38 pm: |
| 
|
Interestig start ...!!?
|
श्रद्धा छान सुरुवात लवकर कथा येउ देत.
|
Daizy
| |
| Thursday, January 12, 2006 - 4:58 am: |
| 
|
छान सुरुवात आहे. काहीतरी गुढ दिसते... घातपात वगैरे असेच कहीतरी आहे का ?
|
Shyamli
| |
| Thursday, January 12, 2006 - 5:10 am: |
| 
|
काहीतरि नवीन दिसतय येउदे पुढच
|
Shraddhak
| |
| Thursday, January 12, 2006 - 6:47 am: |
| 
|
" इनामदारांची संपत्ती गडगंज आहे, हे जगजाहीर आहे. पण पाच सहा महिन्यांपूर्वी आमच्या मालकीच्या शेतात इनामदारांचा खजिना पुरला गेला असल्याची हूल उठली. कुणालाच खरं खोटं माहीत नव्हतं पण खजिन्याचा खरा वारस कोण या मुद्द्यावरून जुनं वैर पुन्हा उफाळलं. दादासाहेब आणि त्यांचे तिन्ही मुलगे खजिना कुठल्याही परिस्थितीत आपलासा करायच्या इरेला पेटले. विश्वासरावांना जसं हे कळलं तशी त्यांनी दादासाहेबांच्या कुटुंबाला धडा शिकवायचा निर्णय घेतला. तो खजिना ते त्यांच्या ताब्यात कदापि जाऊ देणार नव्हते. दोन्ही घराणी पुन्हा एकदा कुणी न पाहिलेल्या खजिन्यासाठी एकमेकांविरुद्ध उभी ठाकली. खजिना कुठे?, खरंच आहे का? वगैरे शहानिशा न करता विश्वासरावांनी एकदम अशी टोकाची भूमिका घेणं आम्हाला पटत नव्हतं. पण त्या खजिन्याच्या मोहाने आम्हीदेखील आंधळे झालो होतो. उघड उघड प्रखर विरोध कधीही केला नाही आम्ही विश्वासरावांना. आणि त्यामुळेच हो... त्यामुळेच मुलगा गमावून बसलो आम्ही आमचा.... " रावसाहेबांचे डोळे पाणावले. काही वेळ डोळे मिटून ते शांत बसले होते. काही वेळाने ते पुन्हा बोलू लागले. " वाड्यामागचं माळरान जिथे संपतं आणि आमच्या जमिनीची हद्द सुरु होते तिथे एक सतीचं देऊळ आहे. इनामदारांच्याच घराण्यातली सती.... तिच्या देवळाच्या आसपासच कुठेतरी तो खजिना पुरलाय, अशी कुणकुण विश्वासरावांना लागली. आता सावधगिरीने पावलं उचलायला हवी होती. दोन तीन दिवसांतच पौर्णिमा येत होती. त्या रात्रीच तिकडे जाऊन शोध घ्यायचा बेत पक्का केला विश्वासरावांनी. सोबत फ़क्त आमचा विश्वासू नोकर महिपत आणि वाघ्या यांनाच ते घेऊन जाणार होते. शिवार आमचंच असल्याने तशी फारशी भीती नव्हती. पण कसा कोण जाणे दादासाहेब आणि त्यांच्या मुलांना याचा सुगावा लागला. आणि.... त्यांनी विश्वासरावांनाच संपवायचा घाट घातला. मला याची काहीच कल्पना नव्हती. पौर्णिमेला ठरल्याप्रमाणे विश्वासराव महिपत आणि वाघ्याला घेऊन बाहेर पडले आणि शेताकडे गेले. फ़क्त एकटा वाघ्याच जिवंत परत आला त्यातून..... " " म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दादासाहेब आणि त्यांच्या मुलांनी.... " " हे त्यांनी येऊन सांगितलंय मला अर्जुनराव.... पण त्यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नव्हता माझ्याकडे. कोर्टकचेर्या करून माझ्या पदरात काहीच पडणार नव्हतं. माझा एकुलता एक आधार; विश्वासराव गेल्याने मी एकटा, कमजोर पडलो होतो. त्यांच्याविरुद्ध उभं ठाकण्याची ताकद माझ्यात उरली नव्हती. माझा पोरगा गमावल्याच्या दुःखात आम्ही सर्व चूर होतो. बरेच दिवस लोटले. खजिना शेवटी कोणाच्याच हाती लागला नाही. पण आमचा मुलगा आम्ही गमावला. आमच्या हातात केवळ ते दुःख सहन करत आला दिवस जगणं उरलं होतं. " " मग? आता काय झालं रावसाहेब? " " प्रल्हाद आणि महादेव........... दोघेही या जगात नाहीत आता. आणि दादासाहेबांचा संशय आहे माझ्यावर! " क्रमशः
|
Zelam
| |
| Thursday, January 12, 2006 - 8:27 am: |
| 
|
bravo श्रद्धा, मस्त लिहितेयस, पुढचं लवकर येउदे
|
Prajaktad
| |
| Thursday, January 12, 2006 - 3:05 pm: |
| 
|
मस्तच उत्स्तुकता ताणलीय!लिहि पटकन पुढच
|
Yog
| |
| Thursday, January 12, 2006 - 4:17 pm: |
| 
|
वाह! सही चाललय, येवू दे पुढच लवकर...
|
श्र,लई भारी.. उत्सुकता ताणली जायला सुरूवात झाली आहे... आता झक्कास रंगव गोष्ट पुढे..
|
Bhagya
| |
| Thursday, January 12, 2006 - 10:25 pm: |
| 
|
खतरनाक....श्रद्धा येऊ दे पुढचं....
|
Jo_s
| |
| Thursday, January 12, 2006 - 11:48 pm: |
| 
|
श्रद्धा, मस्तच तुझ्या गोष्टी फारच वेगळ्या आणि कसलेल्या लेखका सारख्या आहेत तुझी पुस्तक पब्लिश झाल्येत का? असली तर सांग. सगळी वाचू.
|
Shraddhak
| |
| Friday, January 13, 2006 - 6:28 am: |
| 
|
" संशय? त्यांची तर खात्री असायला हवी ना रावसाहेब? " मी काहीशा छद्मी आवाजात म्हणालो. " तुमच्या मुलाला त्यांनी संपवलं.... आणि सूड म्हणून त्यांच्या मुलांना तुम्ही..... " माझं वाक्य अर्धवट तोडत रावसाहेब काहीशा खिन्न सुरात म्हणाले; " विश्वासरावांच्या मृत्यूनं आम्ही मोडून पडलोय, अर्जुनराव. एवढा तरणाताठा पोरगा गमावल्यानंतर आम्हाला खरोखर या दुश्मनीचा, या इनामदारीचा तिटकारा आलाय. काय मिळवलं हो आम्ही यातून? एक मुलगा या जगात राहिला नाही आणि दुसरा आमच्यापासून हजारो मैल लांब... असून नसल्यासारखाच! एवढा पैसा, इनामदारी असून आम्हाला जगण्याचा आधार उरलेला नाही. .... खेरीज दादासाहेबांचं आणि त्यांच्या मुलांचं केवळ आमच्याशीच वैर नव्हतं. " " मग आणखी कोण? " " अजून बरेच लोक..... आयुष्य गेलं ज्यांचं वाईट धंदे करण्यात; त्यांचे मित्र अन शत्रू एकसारखेच असतात अर्जुनराव. प्रल्हाद, महादेव आणि धैर्यशीलच्या आयुष्यातला एकही दिवस भांडणं, कलागती, कारस्थानं यांच्याशिवाय गेला नाहीय. घरातल्या पिढीजात इनामदारीनं मस्तवाल बनवलं त्यांना! लोकांच्या जमिनी बळकावणं, बेकायदेशीर धंद्यांतला सहभाग आणि भरीला त्यांचे त्याच धंद्यांतले मित्र..... कधीतरी त्यांच्यावर उलटणारच होतं. " " तुमचं म्हणणं आहे की प्रल्हाद आणि महादेव ला तुम्ही मारलेलं नाही.... " " खंडोबाची आण घेऊन सांगतो, आम्ही त्यांना मारलेलं नाही. आमचा तसा इरादादेखील नव्हता. तुम्हीच विचार करा अर्जुनराव... आम्हाला संपवायचं असतं तर आम्ही तिघांना एकदम संपवलं असतं. त्यातला एकही जिवंत राहिला आणि त्याला या सगळ्या प्रकरणात माझा हात आहे असा सुगावा लागला असता तर त्याने आम्हाला जिवंत सोडलं असतं का? तुम्हीच सांगा. " " बरं प्रल्हाद आणि महादेवच्या घातपातामागे कोणाचा हात आहे असं तुम्हाला वाटतंय? " " सध्या तरी एकच व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल आम्हाला संशय आहे. त्यांच्या बेकायदेशीर धंद्यातल्या त्यांचा भागीदार... सूर्या! पहिल्यानंच सांगतो.. हा आमचा केवळ अंदाज आहे. दादासाहेबांच्या गोतावळ्याची जितकी खबर आम्हाला आहे त्यावरून बांधलेला. तो चुकीचादेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याने तुमच्यावर सोपवलेल्या कामगिरीचं महत्त्व कमी होत नाही. हां तर सूर्या.... त्याच्याबद्दल आम्हाला फारशी माहिती नाही. तो मुंबईमधला दादा होता. कुठल्याशा खुनाच्या केसमध्ये पकडले जाण्याच्या भीतीने त्याने मुंबई सोडली आणि आमचं गाव जवळ केलं. लवकरच तो प्रल्हादला सामील झाला आणि आपले सगळे बेकायदेशीर धंदे त्याने इनामदारांच्या भक्कम पाठिंब्याने सुरु केले. " " पण मग त्याने प्रल्हाद आणि महादेवला का मारलं असेल? ते त्याचे भागीदार होते, नाही का? " " कारण तेच, अर्जुनराव... सत्ता! सूर्या कितीही मोठा गुंड असला तरी इनामदारांच्या दरार्यापुढे त्याचा हुकूम फ़ारसा चालणार नव्हता. खेरीज या काळ्या धंद्यात मिळवलेल्या पैशाचे सरळसरळ चार वाटे पडत होते. सूर्याला सगळी संपत्ती स्वतःसाठी हवी होती. खेरीज त्याला इनामदारांना स्वतःच्या काबूत ठेवायचं असणार. प्रल्हाद आणि महादेवला वाटेतून बाजूला करून हे सहज शक्य होतं. " " मग त्याने धैर्यशीलला का सोडावं? " मी विचारलं. " आम्हालादेखील ते कळत नाही. कदाचित सूर्याला धैर्यशीलपासून इतका धोका वाटत नसावा. धैर्यशील तिन्ही भावंडातला सगळ्यात धाकटा मुलगा. जेमतेम वीस वर्षांचा आहे तो.... कदाचित धैर्यशील त्यादिवशी गावात नव्हता, म्हणूनदेखील वाचला असेल. प्रल्हाद आणि महादेव मात्र बळी पडले. ते नेमके कसे मेले याबद्दल आम्हाला काही फारशी कल्पना नाही. त्या रात्री ते दोघेच कुठल्यातरी महत्त्वाच्या कामाला म्हणून उशिरा घराबाहेर पडले होते. पण जिवंत परत आले नाहीत. दोन महिने झाले या गोष्टीला. त्यांच्या मृत्यूचा तपास चालू आहे; पण अजून त्यात फारशी प्रगती नाही. गेल्या दोन महिन्यांत एकाही संशयिताविरुद्ध म्हणायसारखा पुरावा मिळालेला नाही. तसं सगळं काही थंडावलंय आता. पण.... धैर्यशीलच्या जिवाला अजूनदेखील धोका आहे असं मला वाटतं. " .... इनामदारांची कहाणी सांगून संपली होती. माझ्या डोक्यातले अजून बरेच प्रश्न अनुत्तरित राहिले होते. परंतु, त्यांची उत्तरं रावसाहेबांकडून मिळण्याची मला फारशी शक्यता वाटत नव्हती. मी मुख्य मुद्द्याला हात घातला. " मी धैर्यशीलचा संरक्षक म्हणून काम करावं, अशी तुमची इच्छा का आहे? त्याच्यासाठी एखादा बॉडीगार्ड दादासाहेबांना देखील नेमता येईल की! " " तुम्हाला ते कळणार नाही नीटसं अर्जुनराव... पण दादासाहेबांच्या गोटातली परिस्थिती जास्त भयानक बनलीय. प्रल्हाद आणि महादेव बरोबर सतत असल्याने त्यांच्या कंपूत सूर्याचा त्यांच्याच तोडीचा दरारा आहे. आणि तो जर धैर्यशीलच्या जिवावर उठला तर ती माणसं सूर्याला साथ देतील. घरात धैर्यशीलला फारसा धोका नाही; पण बाहेर त्याच्यावर कुठेही हल्ला होऊ शकतो. पण दादासाहेबांना हे बहुधा उमजलेलं नाही. प्रल्हाद आणि महादेवच्या मृत्यूने ते पुरते खचले आहेत. आणि त्यांचाच विश्वासू सहकारी म्हणवणार्या सूर्यावर ते सध्या विसंबून आहेत. " मी गोंधळात पडलो. वर्षानुवर्षं चालत आलेली दोन्ही घरातली दुश्मनी पाहता धैर्यशीलच्या जीविताची काळजी करण्याचं रावसाहेबांना काय कारण होतं? माझा तो प्रश्न त्यांना जणू ऐकू आला असावा तशा सुरात ते म्हणाले; " तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित अर्जुनराव. पण विश्वासरावांच्या मृत्यूनं बदलून टाकलंय आम्हाला. मुलगा गमावल्याचं जे दुःख आम्ही भोगतोय; ते दादासाहेबांच्या वाट्यालादेखील आलंच आहे. पण किमान त्यांच्या घराण्याचा एकतरी वारस जिवंत राहावा, असं आम्हाला वाटतंय. विश्वासरावांचा जर तसा मृत्यू झाला नसता तर आम्ही दादासाहेबांच्या कुटुंबाची इतकी चिंता कधीच केली नसती. पण आज परिस्थिती वेगळी आहे अर्जुनराव. आमच्यावर विश्वास ठेवा. यात कुठलीही लबाडी नाही. आमचा तसा हेतूदेखील नाही. " ......... बराच वेळ झाला होता. ' पानं वाढली आहेत. ' असा निरोप घेऊन त्यांचा नोकर, संपत पुन्हा आला, तेव्हा आम्ही बैठकीवरून उठलो. जेवणं झाली..... आम्ही पुन्हा बाहेरच्या बैठकीवर येऊन बोलत बसलो. इनामदारांनी मला दुसर्या दिवसापासूनच धैर्यशीलच्या मागावर राहायला सुचवलं. दादासाहेबांच्या माणसांना फारसा सुगावा न लागू देता ते कसं करता येईल, यावर मी आणि रावसाहेबांनी बर्याच वेळ खल केला. रात्रीचे अकरा झाले असावेत. माझ्या कानावर कुत्र्याच्या रडण्याचे स्वर आल्यासारखे वाटले. " रावसाहेब... तुम्ही काही ऐकलत? " " वाघ्या रडतोय तो.... विश्वासरावांच्या आठवणीने! आज पौर्णिमा आहे ना? आज तीन महिने झाले बरोबर विश्वासरावांना जाऊन! " .... मी पहिल्या मजल्यावरच्या मला नेमून दिलेल्या खोलीत जाऊन बिछान्यावर पडलो. अजूनही वाघ्याच्या रडण्याचा आवाज कानावर येत होता. त्या आवाजाने की कोण जाणे, मला नीट झोप येईना. धैर्यशीलच्या सुरक्षेसाठी काय काय उपाय करता येतील?, याचा विचार करत मी मध्यरात्री केव्हातरी झोपी गेलो. क्रमशः
|
Prajaktad
| |
| Friday, January 13, 2006 - 12:18 pm: |
| 
|
श्र!ज्या तोडीच तु लिहतेस ना त्यावरुन कथा संपायच्या आत सांगते या कथेवर उत्तम मराठी चित्रपट निघेल. लिही पट्पट..
|
Ninavi
| |
| Friday, January 13, 2006 - 12:23 pm: |
| 
|
श्र, मस्तच गं. खरंच डोळ्यासमोर चित्रपट उभा केलास. सुंदर शैली आहे तुझी लिहिण्याची. लवकर लिही पुढचं.
|
Tulip
| |
| Friday, January 13, 2006 - 12:40 pm: |
| 
|
झक्कास श्रद्धे! लिख जल्दी जल्दी!!
|
आगे बढो... to be continued...
|
Maitreyee
| |
| Friday, January 13, 2006 - 1:28 pm: |
| 
|
मस्त च गं श्रद्धा! सही चाललय. या वेळी एकदम वेगळा प्रकार दिसतोय! या प्लॉट मधे एखादी बोले तो झक्कास' लव श्टोरी नाही वाटते
|
Manee
| |
| Friday, January 13, 2006 - 1:40 pm: |
| 
|
वाह श्रद्धा! एकदम मस्त! आता पुढचे भाग टाक पटापट.
|
Ammi
| |
| Monday, January 16, 2006 - 2:14 am: |
| 
|
श्र फारच मस्त.ऽ आगे बढो...तू लिहीलेलं खूप आवडलं..
|
Shraddhak
| |
| Monday, January 16, 2006 - 4:41 am: |
| 
|
दुसर्या दिवशी विशेष असं काही घडलं नाही. आणि मला नेमून दिलेलं कामही मी सुरु करू शकलो नाही. याचं एकमेव कारण म्हणजे धैर्यशील गावात नव्हताच! अधिक खोदून चौकशी केली असता पत्ता लागला की, जवळच तालुक्याच्या गावी त्याने बारावीसाठी म्हणून कॉलेजला ऍडमिशन घेतली होती. शिक्षणात प्रगती यथातथाच पण समानशील मित्रांचा कंपू मात्र जमा झाला होताच! त्यांच्याचसोबत उनाडक्या करायला म्हणून तो महिन्यातून एकदातरी तालुक्याला चक्कर मारत असे. .... मी निरुद्देश गावात भटकत राहिलो. दुपारचे बारा झाले असावेत. ' वाड्यावरच जेवायला या. ' असं इनामदारांनी सांगितलं होतं. त्यात बराच वेळ मोडला असता. शिवाय इनामदारांनी मला कामगिरीविषयी विचारलं असतं तर खास सांगण्यासारखं माझ्याजवळ आतापावेतो काहीच नव्हतं. मी आपला मोहरा बस स्टॅंडकडे वळवला. तिथे असणार्या एकमेव हॉटेलमध्ये घाई घाईने काहीतरी खाऊन मी पुन्हा इनामदारांच्या वाड्याची वाट धरली. वाड्याजवळ आल्यावर थोडं अलिकडे एक पायवाट डावीकडे फुटली होती. ती वाड्याला वळसा घालून थेट वाड्यामागच्या माळरानाकडे जात होती. मी त्या वाटेने माळरानाकडे येऊन पोचलो. दूर काही अंतरावर सतीचं देऊळ दिसत होतं. पलिकडे इनामदारांच्या शेतातलं हिरवंगार पीक डोलत होतं. भर दुपारची वेळ. सतीच्या देवळाजवळ चिटपाखरूदेखील नव्हतं. मी देवळाच्या पायर्यांवर जाऊन बसलो. भोवतालची ती शांतता मला अस्वस्थ करू लागली. वारा आता पडला होता. सारं शिवार अगदी स्तब्ध होतं आता.... लख्खकन अस्वस्थतेचं कारण उमगलं.... ' इथे आसपासच विश्वासराव खजिना शोधायला आले असताना मारले गेले..... इथेच! जवळपास! कोणीच वाचलं नाही. विश्वासराव... महिपत.... वाचला एकटा वाघ्या! ' क्षणभर माझ्या अंगावर काटा उभा राहिला. " रावसाहेब इनामदारांकडचं पावनं जनू! " अचानक आलेल्या या आवाजाने मी एकदम दचकलो. पन्नाशीच्या आसपासचा एक फाटका माणूस जवळच उभा राहून माझ्याकडे रोखून पहात होता. त्याची ती माझ्यावर रोखलेली नजर मला पुन्हा अस्वस्थ करून गेली. अंगावर विटलेलं, फाटकं धोतर, डोक्याला कळकट मुंडासं, चेहर्यावर दाढीचे खुंटं वाढलेले, केसांचं जंगल, आणि भरीस भर माझ्याकडे रोखलेली त्याची ती नजर.... " दादासाहेब इनामदारांचा निर्वंस हुनार हाय. " माझ्याकडे पाहत तो थंड स्वरात म्हणाला. " अं... " मला लौकर उमगलंच नाही तो काय म्हणतोय ते. " निर्वंस हुईल दादासाहेबांचा... सतीमाय साक्षी हाय. त्येंनी मारलं इस्वासरावाला. आता रावसाहेब बदला घेतल्याबिगर राहायचे नाहीत. लई जीव हुता रावसाहेबांचा इस्वासरावांवर. हितंच मारलं त्येंनी इस्वासरावाला... हितंच मारलं. रावसाहेब सोडणार न्हाईत. बदला घेतल्याबिगर राहनार न्हाईत. परलाद आन म्हादेवला मारलं त्येंनी... धैर्यशीलला बी ते सोडायचं न्हाईत..... " तो बरंच असंबद्ध बडबडायला लागला. माझ्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. " ए चल, काहीतरीच बडबडू नकोस. " कोण, कुठला माणूस... संतापून मी एकेरीवर आलो एकदम. " रावसाहेबांनीच मला धैर्यशीलचा अंगरक्षक म्हणून नेमलंय. " अनवधानाने मी माझ्या कामाची वाच्यता केली त्याच्यापुढे.... त्याच्यावर मात्र याचा काहीही परिणाम झालेला दिसत नव्हता. " लई आतल्या गाठीचं हाईत ह्ये इनामदारबी.. इस्वास न्हाई बसत न्हवं तुमचा. मंग जा की, इचारा त्येस्नी, परल्हाद आन म्हादेवचा मुडदा गावला कुटं? ह्याच शेतात न्हवं का? रावसाहेब इनामदार धैर्यशीललाबी जित्ता ठेवनार न्हाईत. बगाल तुमीबी. धैर्यशील न्हाई जित्ता राह्यचा आता. " तो चटकन वळला आणि लांब लांब ढांगा टाकत नाहीसा झाला. माझ्या डोक्यातल्या विचारांचं काहूर पुन्हा एकदा उफाळलं. याच शेतात मेले ते दोघंदेखील? म्हणजे तो माणूस म्हणाला ते.....? " इथं बसला आहात का अर्जुनराव? आणि तो वेडा इथं काय करत होता? " इनामदारांचा आवाज ऐकून मी चमकलो. दूरवर त्या माणसाची आकृती अस्पष्ट होत होती. " इनामदार, प्रल्हाद आणि महादेवचे.... " माझं वाक्य अर्धवट तोडत रावसाहेब तुटक स्वरात म्हणाले, " हो इथंच मेले तेदेखील...... " क्रमशः
|
Shraddhak
| |
| Monday, January 16, 2006 - 4:46 am: |
| 
|
लोक्स, आतापर्यंतच्या सर्व प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद. पुढची कथा टाकेनच. जरा धीर धरा. 
|
Arun
| |
| Monday, January 16, 2006 - 5:07 am: |
| 
|
श्र : मस्तच आहे कथा. एकादमांत इथपर्यंत सगळी वाचून काढली. आता पुढची येऊ दे फटाफट .....
|
Psg
| |
| Monday, January 16, 2006 - 5:38 am: |
| 
|
श्र, गूढ लिहिलं आहेस. छान जमल आहे. (पण आता tension फ़ार झाल.. एखादी फ़र्मास लावणी होउन जाउदे! )
|
सही कथा श्रद्धा!!!!! अगदी हटके..
|
Megha16
| |
| Monday, January 16, 2006 - 9:13 am: |
| 
|
श्रदधा,खुप छान कथा आहे.एकादमात सगळी वाचल्याने खुप च उत्सुकता लागली आहे पुढ्ची..... लवकर येऊ दे पुढ्ची कथा....
|
Avdhut
| |
| Monday, January 16, 2006 - 9:27 pm: |
| 
|
श्रद्धा जबरदस्त कथा नवीन भागाची वाट बघतोय, लवकर
|
sahI gaM Eawo ..
|
Shraddhak
| |
| Tuesday, January 17, 2006 - 4:35 am: |
| 
|
" आणि तरीही तुम्ही म्हणता तुम्ही त्यांना मारलं नाही म्हणून? " माझ्याही नकळत माझा आवाज चढला. " हे शेत, हे देऊळ तुमच्या मालकीचं आहे. प्रल्हाद आणि महादेवला मारायचं सबळ कारण तुमच्याकडे आहे. तरीही तुम्ही त्यांना मारलेलं नाही. वा! मी यावर विश्वास ठेवावा, अशी तुमची वर अपेक्षा.... " " अर्जुनराव, अगदी पोलिसांच्या पद्धतीने विचार करताय की! आमचं शेत आहे, आमची जागा आहे आणि प्रल्हाद, महादेववर सूड उगवायला आमच्याकडे सबळ कारणदेखील आहे.... बरोबर! पण एवढं असूनदेखील आम्ही त्यांना मारलेलं नाही हेही तेवढंच सत्य आहे. अहो, प्रल्हाद आणि महादेवच्या मृत्यूनंतर दोन महिने उलटून गेले तरी धैर्यशील जिवंत आहे, तो कसा काय? संपवायचं असतं तर त्यालादेखील गेल्या दोन महिन्यांत त्याच्या भावांच्या वाटेनी पाठवलं नसतं का? " क्षणभर इनामदारांचा चेहरा हिंस्त्र झाला. विश्वासरावांच्या मृत्यूचा घाव नाहीतरी इतक्या लौकर बुजणं शक्य नव्हतंच! " तो कोण होता? " मी एकदम विषय बदलला. " तो.... तो वेडा आहे... नार्या त्याचं नाव! पूर्वी नोकर होता आमचाच. पण कशामुळं तरी परिणाम झाला डोक्यावर! आता त्याच्या मनाने घेतलंय की आम्ही त्याच्या जिवावर उठलो आहोत. त्याला आमच्याबद्दल बरंच काही माहीत झालंय आणि ते त्याने कोणाला सांगू नये म्हणून आम्ही त्याला धमकावतो, असं त्याला वाटतं. मी फार आतल्या गाठीचा माणूस आहे हे त्याने तुम्हाला सांगितलं असेल ना? " इनामदारांचा चेहरा वरकरणी कोरा वाटला तरी त्यामागे बरीच खळबळ चालली आहे असं मला जाणवून गेलं. ते सत्य होतं की भ्रम? संध्याकाळ होत आली होती. आम्ही वाड्याकडे परतलो. मुख्य फाटकातून आत शिरताना मी पुन्हा एकदा उजवीकडच्या गुहेकडे नजर टाकली. त्या क्षणी पहिल्यांदा मला वाघ्या दिसला. आणि त्या गुहेच्या दाराशी इनामदारांनी इतके भक्कम लोखंडी बार्स का बसवले असतील; याचं कारण चटकन उमगलं. कमीत कमी साडेतीन फूट उंच आणि प्रचंद ताकदीचं जनावर होतं ते! इनामदारांनी जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर थोपटलं. माझ्याकडे वळून ते म्हणाले, " विश्वासरावांचा फार भरोसा होता याच्यावर.... वाघ्या सोबत असताना मला कुणीच काहीही करू शकत नाही असं म्हणायचे ते.... पण त्या दुष्टांनी दावा साधला. मारलं त्यांनी विश्वासरावांना! " " प्रल्हाद आणि महादेव नेमके कसे मेले? " " आम्हालादेखील त्याबद्दल फारशी माहिती नाही हे तुम्हाला कालच सांगितलं आम्ही.... पण आमच्या काही माणसांनी काढून आणलेली माहिती तुम्हाला सांगतो. दोन महिन्यांपूर्वीची पौर्णिमा! रात्री साडे अकरा बाराच्या सुमाराला ते दोघं घरातून महत्त्वाच्या कामाला जातो असं सांगून घरातून बाहेर पडले. सूर्या आणि ह्या लोकांची बेकायदेशीर कामं रात्री उशिराच चालायची म्हणून दादासाहेबांनी त्यांच्या बाहेर जाण्याला फारशी हरकत घेतली नाही. पण दुसर्या दिवशी सकाळपर्यंत ते परत आले नाहीत, तेव्हा त्यांना काळजी वाटली... तेवढ्यात सूर्या वाड्यावर हजर झाला आणि त्याने त्यांना ' हे दोघे कुठे आहेत? ' असं विचारलं. आदल्या रात्री त्याची आणि या दोघांची भेट झालीच नव्हती हेही त्याने सांगताच दादासाहेबांच्या त्या दोघांच्या शोधात माणसं पिटाळली. त्या दोघांचे मुडदे सतीच्या देवळाशेजारी आढळले. " कशाने मारलं दोघांना? म्हणजे कुठलं शस्त्र वगैरे....... " " त्यांच्या अंगावर कुठल्याही शस्त्राने मारल्याच्या खुणा नव्हत्या. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये त्यांना विषबाधा देखील झाली नसल्याचं लिहिलं होतं. त्यांच्या अंगावरच्या कपड्यांची मात्र पार दुर्दशा झाली होती. कुठूनतरी त्यांना फरफटत त्या देवळाजवळ आणून टाकलं असावं असं वाटत होतं. फक्त पोलिसांना आढळलेल्या दोन अगदी विचित्र गोष्टी त्यांनी नोंद केल्या आहेत. " त्यांच्या चेहर्यावर प्रचंड भीतीचे भाव होते आणि त्यांच्या अंगावर लांडगा किंवा तत्सम जनावराने ओरबाडल्या, चावल्याच्या खुणा होत्या. " " या भागात जंगली श्वापदं आहेत? " " नसायला काय झालं? बक्कळ आहेत. गावाच्या पश्चिमेला जंगल आहे घनदाट... तिथून कधी मधी जंगली प्राणी येतात......... " " हं... कदाचित त्यांना तिथे आणून टाकल्यावर त्या वासाने एखादं जनावर आलं असण्याची शक्यता आहे... पण ते भीतीचं काय? त्यांना इतकी कशाची भीती वाटली असावी? " खरंच नक्की काय झालं होतं? क्रमशः
|
Ammi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 4:41 am: |
| 
|
झक्कास... ये दिल मान्गे मोर..येवू दे पूढचा भाग़.
|
Psg
| |
| Tuesday, January 17, 2006 - 6:21 am: |
| 
|
श्र, रंग जमला आहे! रहस्यमय ष्टोरी आता कोणते वळण घेणार?
|
Milindaa
| |
| Tuesday, January 17, 2006 - 7:33 am: |
| 
|
मला आता पुढे काय होणार याचा अंदाज येतो आहे असा भ्रम होतो आहे का ? psg, तुला अचानक काम नाहीये असे दिसते आहे
|
Anilbhai
| |
| Tuesday, January 17, 2006 - 7:57 am: |
| 
|
मलाही असाच भ्रम होतो आहे. सही आहे .. सगळी एकदम टाकायला हवी होती ग 
|
Phdixit
| |
| Tuesday, January 17, 2006 - 8:19 am: |
| 
|
मस्त श्र पुढचा भाग येउ देत लवकर
|
Paragkan
| |
| Tuesday, January 17, 2006 - 10:40 am: |
| 
|
सगळी एकदम टाकायला हवी होती ग >>>> खरंय ..
|
|
|