« | »




संवाद - शिरीष कणेकर - भाग २



आजकाल तुम्ही क्रिकेटवर किंवा हिंदी चित्रपटसृष्टीवर फारसं लिहीत नाही अशी आम्हां वाचकांची तक्रार आहे. ह्याचं कारण काय?

अजूनही मधूनच सिनेमावर लिहितो कधीतरी. मधे एकदा लोकप्रभेच्या अंकात एक लेख लिहिलाय 'आमचा सिनेमा' म्हणून. पण गोष्ट खरी आहे. अगदी खरी आहे... अलिकडे मी लिहीत नाही याचं एक कारण असं आहे की ज्या काळावर मी लुब्ध होतो, ज्या काळावर माझे त्याकाळचे वाचक प्रसन्न होते तो काळ म्हणजे ५० ते ६० चा काळ. फार तर दोन वर्षे आधी, दोन वर्षे नंतर. ज्याला म्युझिक मधला 'golden period' आम्ही समजतो असं ते हिंदी चित्रपट संगीतातील सुवर्णयुग. त्या काळावर मी भरभरून लिहिलं, रसरसून लिहिलं अगदी. माझा असा अजिबात दावा नाही की त्याच्यानंतर म्युझिक संपलं वगैरे. असा अतिरेकी, टोकाचा विचार कधीही माझ्या मनात आलेला नाही. पण त्याच्यानंतर माझी involvement कमी झाली. आणि हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. बरोबर आहे का चूक आहे मला माहीत नाही, पण त्याच त्या गोष्टी परत परत करण्यात मला interest वाटत नाही.

उदाहरणार्थ, मी क्रिकेटवर, सुरुवातीच्या काळात तुम्ही बघितलं असेल की एक एक खेळाडू घ्यायचो अणि मोहिनीच्या दर अंकात लिहायचो. आज काय रोहन कन्हाय, आज काय Graham Pollock ... लोक चवीनं वाचायचे. पण मग हळूहळू मी ते कमी केलं कारण मलाच कंटाळा यायला लागला. काय होतं शेवटी त्याचा एक साचा ठरतो.. कितीही नाही म्हटलं तरी! एक सुरुवात करायची, मग त्या खेळाडूची उमेदवारीची वर्षे लिहायची, मग त्याचं कर्तृत्व लिहायचं, मग त्याच्या गाजलेल्या २-३ इनिंग्ज लिहायच्या किंवा bowling असेल तर स्पेल्स लिहायचे. 'क्रिकेटवेध' मध्ये अवलिया नावाचा एक आख्खा section आहे असा. म्हणजे तुम्ही तेंडूलकरवर पण तेच लिहिणार, लारावर पण तेच लिहिणार, रिचर्ड्स वर पण तेच लिहिणार. बाज तोच, साचा तोच. माणसं फक्त बदलणार आणि थोडे आकडे इकडे - तिकडे होणार.

मला याचा कंटाळा आला आणि मग त्यानंतर मी असे चरित्रात्मक, परिचयात्मक लेख लिहिले नाहीत. हीच गोष्ट 'यादोंकी बारात' ची. हे माझं अत्यंत गाजलेलं असं एक सदर आहे. सिनेमा कलाकारांची, संगीत दिग्दर्शकांची, निर्मात्यांची आणि गायकाची थोडक्यात ओळख करुन देणारी ही लेखमाला होती. हे साधारण ९३ लेख मी लिहिले 'यादों की बारात' चे. आणि शेवटच्या सांगता लेखात मी म्हटलं होतं की 'याही क्षेत्रात शतकाचा हव्यास बरा नव्हे'. शतकाच्या हव्यासापायी तुम्ही गुणवत्तेशी तडजोड करायला जाता. बॅट्समनदेखील बघा, शतकाच्या जवळ आले की चाचपडत हळूहळू खेळतात, केवळ तो शतकाचा पल्ला गाठायला. याच न्यायानं त्यावेळी मी ९३ वर लेखमाला थांबवली. मधे काही काळ गेला, काही वर्षं गेली. इतर काही लेखन झालं मधल्या काळात. आणि मग उरलेल्या लोकांवरती मी पुन्हा ती लेखमाला नव्यानं लिहायला घेतली. आशा भोसले, मन्ना डे, सैगल, बी. आर. चोप्रा, राज खोसला, शामा अशी कितीतरी माणसं राहिली होती त्यांच्यावरती ४५-५० लेख लिहिले आणि 'पुन्हा यादोंकी बारात' म्हणून ते पुस्तक आलं. आशा भोसलेच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. सध्या मी अमेरिकेत असताना त्याची दुसरी आवृत्ती परवा छापून आलीये.

आता पुन्हा तिसरा भाग लिहा म्हणून वाचक मागे लागले आहेत, संपादक मागे लागले आहेत. पण अजूनतरी माझा तो 'मूड' नाहीये. खरं तर आता परत फार गुणी माणसं आहेत. कारण गुणवत्ता ही कोणत्याही एका पिढीची मक्तेदारी नसते असं माझं ठाम मत आहे. आता अमिताभ बच्चन, परेश रावल, ओम पुरी, शबाना आझमी असे कितीतरी चांगले कलाकार आहेत, रहमान सारखे गुणी संगीतदिग्दर्शक आहेत. पण आता लेखनाचा तोच form पुन्हा मी गाठावा का? गाठू शकेन का? पुन्हा त्या mode मधे जाऊन तसंच पुन्हा काही लिहू शकेन का? असा विचार करताना वाटतं की this is enough , पुन्हा तेच तेच करण्यात काही अकलमंदी नाहीये.

तुमच्या लेखनप्रवासात तुम्ही अचानक ललित लेखनाकडे कसे वळलात. ह्याचं काही खास कारण...कुछ खास वजह?

मी क्रिकेट आणि सिनेमातून हळूहळू अंग काढून घेण्याचं कारण ह्या विषयांवरचं प्रेम कमी झालं म्हणून नाहीये, तर एकेदिवशी मला असं लक्षात आलं की आपण विषयाच्या चौकटीत स्वतःला अडकवून घेतोय, बंदिस्त करून घेतोय. आपली ललित लेखनाची आणि जी काय इतर लेखनाची हौस आहे ती 'या माध्यमातून' अकारण भागवतोय. हे त्या विषयांना मारक आहे आणि ते वाचकांच्या दृष्टीने बरोबर नाही.

क्रिकेट लिहिताना you write cricket . त्याच्यामध्ये शब्दांच्या कोलांट्या, भाषेचं लालित्य, उपमा, अलंकार, उत्प्रेक्षा ही घुसडता कामा नये. क्रिकेटवर सरळ छान मुद्देसूद लिहा, पल्लेदार वाक्यं लिहा पण write cricket . त्यात बाहेरचं येता कामा नये. आणि जेव्हा या बाहेरच्या गोष्टी जास्त येताहेत असं माझ्या लक्षात यायला लागलं, तेव्हा मी 'tangent 19 घेऊन ललित लेखनाकडे वळलो.

सरळ लिहा ना हिंमत असेल तर ललित आणि राहा उभे समाजासमोर. काय ते तुम्हाला judge करतील ते चांगलं वाईट. त्या शिखंडीसारखे क्रिकेटच्या आडून बाण का मारताय तुम्ही? असा विचार करून काही वर्षांपूर्वी मी इतर विषयांकडे वळलो आणि ललित लेखनाला सुरुवात केली. देवाची लीला म्हणून ते यशस्वी झालं. मी ललित स्तंभलेखन केलं, daily columns लिहिले. मी लोकसत्तेमधे ६ महिने 'सूरपारंब्या' नावाचा column लिहिला. त्यानंतर ६ महिने पुन्हा daily, रोज महाराष्ट्र टाइम्स ला 'लगावबत्ती' नावाचा column लिहिला. ह्या सगळ्याची आणि एकूणच आजवरच्या ललित लेखनाची १०-१५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 'लगावबत्ती'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'सर्वोत्तम विनोदी वाङ्ग्मयाचा चिं. वि. जोशी पुरस्कार' मिळाला. ललित लेखनाला जे भरघोस यश मिळालं, त्यातूनच पुढे मग एकपात्री प्रयोगाचा विचार सुरु झाला.

गेल्या काही वर्षात तुमच्या लिखाणात थोडा गंभीर, serious सूर जाणवायला लागलाय. त्याबद्दल काही.

बरोबर आहे. मलाही जाणवतं की आजकाल मी थोडा जास्त हळवा, sensitive झालोय. आज मी ६३ आहे. ६३ व्या वर्षी जर हा हळवा सूर येणार नसेल तर कधी येणार? अलिकडे बरंच काही sensitive लिखाण, serious शब्द मी टाळतो, खूप झालंय माझ्याकडून. 'डॉ. कणेकरांचा मुलगा' म्हणून माझं पुस्तक आलंय त्यात एक वाक्य लिहीलंय मी सुरुवातीला की from a sentimental fool I graduated to become a sensitive idiot .

अलीकडे २ - ३ पुस्तकं आली आहेत. 'मनमुराद', 'चापटपोळी', 'खटलं आणि खटला' नावाची. त्यातही खूप sensitive असं लिखाण झालंय. असं का लिहिता? विचाराल तर, असं लिहावंसं वाटतं म्हणून मी असं लिहितो. मी काय असं कागद घेऊन, ठरवून लिहायला बसत नाही की चला, आता जरा वाचकांच्या डोळ्यातून पाणी काढूया. मला वाटतं ते मी लिहितो. मग ते विनोदी असेल, रडवणारं असेल, serious असेल.. ते वाचनीय असावं हाच माझा एकमेव हेतू असतो. माझ्या मनामधे कुरतडणारं जे काही आहे ते मी कागदावर उतरवून काढतो इतकंच. फक्त अभिमान एकाच गोष्टीचा आहे मला की एकाचवेळी दोन्ही, विनोदी आणि गंभीर लिखाण करू शकतो. एक तरल लेख लिहून बाजूला ठेवतो आणि कागद ओढून एक विनोदी लेख लिहायला घेतो. देवाची लीला आहे, दुसरं काही नाहीये. पण मला ही स्वतःची developement वाटते.

हिंदी चित्रपटावर एकीकडे मनापासून प्रेम करत असतानाच सिनेमा बघण्यातल्या पूर्वीच्या आणि आताच्या thrill मधे, excitement मधे तुमचा तुम्हाला फरक जाणवतो का? एका अस्सल फिल्लमबाजाप्रमाणे 'शुक्रवारची' वाट अजूनही पाहता का?

मुळात पहिली गोष्ट अशी आहे की थेटरात जाऊन सिनेमा बघण्याचं वय आता राहिलं नाही. या वयात आयुष्यात मुळातच excitement कमी होते. त्यावेळचं ते थेटरात जाणं, त्यासाठी तिकिटाचे पैसे मिळवणं किंवा कुठे मॅनेजरच्या, डोअरकीपरच्या ओळखीनं आत घुसणं ही जी excitement होती, ती आज तुम्ही थेटरात जा, निमंत्रित म्हणून जा किंवा घरी सिनेमा बघा कश्यातच राहिली नाही ती. त्यामुळे तेव्हा सिनेमा बघणारा आणि आज सिनेमा बघणारा ही दोन वेगळी माणसं वाटतात मला. आता appeal पण कमी झालंय. पूर्वी ज्या गोष्टीनी तुम्ही एकदम असे excite होत होता तसं आता होत नाही. त्यात काही नावीन्य राहिलं नाहीये. त्यामुळे सिनेमा हे एकच माध्यम असलं आणि बघणारा मी एकच माणूस असलो तरी दोन कालखंडांमधली ही दोन माणसं ठरतात. आणि यातलं मला जास्त जवळचं कोण हे ठरवणं अवघड आहे.. कारण दोन्ही माझीच रुपं आहेत हो. वयोमानाप्रमाणे झालेली ही gradual growth वाटते मला.

अगदी शाळकरी मुलाप्रमाणे शुक्रवारची वाट पाहात नाही आता; पण ह्याचं कारण वयानुसार पडलेला फरक. लक्ष मात्र नक्की असतं की तो 'फना' येतोय आता, बघायला पाहिजे. एवढं डोक्यात नक्की येतं आणि या वयाला ते पुरेसं आहे असं मला वाटतं. कितीतरी लोक मी असे बघितले आहेत की ज्यांनी या वेडाचं आयुष्यात पुढे काहीही केलं नाहीये. "लहानपणी आम्ही असे सिनेमे बघायचो आणि पिटामधे असे धावायचो" असं सांगणारे लोक गेल्या २० वर्षांत सिनेमाच पाहिला नाही असं सांगताना भेटतात. त्यामानानं मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या आवडी गेल्या नाहीयेत. आजही क्रिकेटसाठी मी तेवढाच वेडा आहे, आजही सिनेमाची मला तशीच, तेवढीच नाही म्हणता येणार, पण तशीच आवड आहे. मी 'रंग दे बसंती' बघतो, गेल्यावर आता 'फना' बघणार आहे, इथे कुठे काही मिळालं तर बघणार. आवडतं मला. देवाचा मी अतिशय ऋणी आहे की बदलत्या वयानुसार माझी taste त्यानी वेगळी केली नाहीये.

गेल्या पन्नास वर्षांत हिंदी चित्रपटाच्या बदललेल्या चेहर्‍याविषयी तुम्हाला काय वाटतं? ह्या बदलाला तुम्ही कसे सामोरे गेला आहात?

साधी गोष्ट आहे. तुम्ही ज्या गल्लीत राहता ती गल्लीदेखील ५० वर्षांपूर्वी होती तशी राहिली आहे का? तर नाही... थोडक्यात काळाच्या ओघात गोष्टी बदलत जातातच. काही चांगले बदल होतात, काही वाईट बदल होतात. आजकाल फारच छान सिनेमे निघतात. मधल्या काळात अत्यंत टाकाऊ सिनेमे निघत होते. त्याला काही आशय नाही, अर्थ नाही. पण आता लोक वेगवेगळे प्रयोग करताहेत. बघा ना आता तो 'डरना जरुरी है" ४-५ वेगवेगळ्या गोष्टी घेऊन करताहेत. 'रंग दे बसंती' काय parallels दाखवून किती सुंदर सिनेमा घेतलाय.

संगीत म्हणाल तर पूर्वीचं ते फारच melodious होतं हो. आता एक थोडेसे लोक देतात. रहमान देतो, नदीम - श्रवण देतात, एखादं गाणं अन्नू मलिक चांगलं देतो. पण अशी अपवादात्मक उदाहरणं सोडली तर खरोखरच संगीताचा दर्जा खूप कमी आहे. ज्यांनी melody ऐकली आहे, त्यांना आजकालचं संगीत कमी वाटतं ही वस्तुस्थिती आहे. Acting सुधारलंय. पूर्वी models ही acting न करण्याबद्दल प्रसिद्ध होते. कबीर बेदी, झीनत अमान हे models होते आणि ते शेवटपर्यंत models च राहिले. आजकाल models जे येतात ते actor च्या तोंडात मारण्याइतकं काम करतात. कारण आजच्या modelling ला acting लागते. आजकालच्या काही जाहिरातींतली acting बघतो ना. आठवण राहते. पूर्वी आम्ही जे सिनेमातले सीन आठवायचो ना, काय दिलीप कुमारनी acting केलं, काय राजकपूरनी shot दिला होता, तश्या जाहिराती लक्षात राहतात acting मुळे. सिनेमाचं एकूणच technique सुधारलंय, editing चांगलं झालंय, सिनेमाचा वेग वाढलाय, सिनेमा रेंगाळत नाही. त्यावेळचे काही जुने सिनेमे मी आज बघितले ना तर मला कंटाळा येतो, गंमत वाटते की आपण हे कसं सहन केलं होतं त्या काळी?

मला स्वतःला हे काही बदल खूपच चांगले वाटतात. काय आमच्या वेळेला सिनेमे निघायचे, शांतारामबापू काय काढायचे सिनेमे आणि आजकाल काय घाणेरडे असं मला अज्जिबात वाटत नाही. काहीतरी माणसं करताहेत creative . त्यामुळे तेव्हाचा सिनेमा छान होता आणि आताचा वाईट हे अत्यंत चुकीचं बोलणं आहे. तुम्हाला बघायचा नाही, तर सांगा की आता आमचा interest गेलाय. सिनेमाला दोष देऊ नका. आमचं सिनेमा बघायचं वय संपल्यावरच नेमकी सगळ्या कलाकारांची, दिग्दर्शकांची, निर्मात्यांची क्षमता गेली, कुवत संपली असं कसं होईल? पण accept करायची तयारी नसेल की तसे क्रिकेटपटू नाहीत, तसे सिनेमे नाहीत, तशी नाटकं नाहीत तर मात्र अवघड आहे. इथे आपण गोष्टी करतोय ते रैना batting ला आलाय किंवा पठाण इथपासून ते विजय हजारेपर्यंत. आणि जेव्हा एवढी मोठी generation gap असते तेव्हा माणसाची निष्ठा विभागली जाते.

सुदैवानी माझी ती विभागली गेली नाहीये. सेहवाग हा कोणाहीइतकाच चांगला खेळणारा batsman आहे. आमच्याकाळी विठ्ठल मारायचा, सी. के. नायडू मारायचा हे खरं असलं तरी त्यामुळे सेहवाग कमी दर्जाचा होत नाही. जो माणूस लंचपूर्वी सेंच्युरी काढायला एका रननी हुकला, जे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणी केलं नाही, त्याला कमी ठरवणं हा बुद्धीचा कोतेपणा दिसतो हो. थोडं open mind ठेवून appreciate करायला शिकलं पाहिजे.

ह्या सिनेमाच्या वेडापायी लहानपणी तुम्ही कधी अडचणीत आला आहात का?

नाही. कधीच नाही. घरातून परवानगीचा वगैरे कधी प्रश्नच नव्हता. ८ वी ते ११ वी, ज्यावेळचे सगळे सिनेमे बघितल्याचं मला आठवतंय, त्यावेळी माझे वडील मालेगावला 'मेडिकल ऑफीसर' होते. त्यावेळी आमच्या थेटरात ओळखी होत्या; त्यामुळे मला काय सिनेमाला पैसे वगैरे द्यावे लागायचे नाहीत. सरळ जायचं आणि सिनेमा पाहायला बसायचं. शिवाय मालेगावसारख्या ठिकाणी त्या काळी म्हणजे ५५-५६ साली करमणुकीची काही फारशी साधनं नव्हती, पतंग वगैरे होते पण इतर फार काही नाही. शाळा सकाळची असायची, त्यामुळे दुपारी ४ च्या शोला जाऊन बसायचो. त्या ५ वर्षे मी खूप म्हणजे खूप सिनेमे पाहिले.

इतक्या लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही सिनेमे बघत आला आहात, क्रिकेटच्या शेकडो इनिंग्ज तुम्ही बघितल्या असतील. आणि केवळ ह्याच नाही तर इतरही खूप वेगवेगळ्या विषयांवर गेली अनेक वर्षे लेखन करत आला आहात, किस्से सांगत आला आहात. मला खरोखरच उत्सुकता आहे की ही एवढी प्रचंड आणि तरीही नेमकी माहिती तुमच्या लक्षात कशी राहते? त्यासाठी तुम्ही काय नोट्स, टिपणं वगैरे काढता का?

चांगला प्रश्न आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित पण हे नोट्स वगैरे काढणं मी कधीही केलेलं नाही, अजूनही करत नाही. माझा 'अभ्यासू' म्हणतात तो पिंड नाहीये. मी कायम रसिक होतो, रसिक राहिलोय. आणि खरं तर अभ्यास नाही म्हणूनच हे आवडत आलंय.

माझ्या क्रिकेटप्रेमाला, चित्रपटवेडाला जर कधी हे अभ्यासाचं वळण लागलं असतं, तर माझं हे वेड त्याक्षणी सुटलं असतं. प्रेमापायी, आवडीपायी आपोआप अभ्यास होणं वेगळं पण त्याला एक असं मूर्त स्वरूप देऊन, याद्या तयार करून अभ्यास म्हणणं असं कधीही मी काहीही आयुष्यात केलेलं नाही.

मी एकही गाणं कधीही लिहून ठेवलेलं नाही. मी सगळ्यात मोठा लेख लिहिला होता लतावर 'गाये लता गाये लता' म्हणून. त्याच्यात शेकडो गाण्यांचा उल्लेख आहे, पण त्यातलं एकही गाणं कधी मी लिहून ठेवलं नाही. केवळ स्मरणशक्तीच्या आधारावर लिहिली होती ती गाणी. मी जे सांगतोय हा माझा स्वभाव सांगतोय. त्याच्यामागे काही आग्रही किवा अभिमानाची भूमिका नाहीये किंवा मी काय मोठं कर्तृत्व गाजवलंय असंही काही नाहीये. मी फक्त काय करत होतो ते तुम्हाला सांगतोय. तर खुद्द लता मंगेशकरांची मुलाखत घेतली होती मी पहिल्यांदा ८३ साली. 'एक वेडा पीर लताला भेटतो' असं त्याचं शीर्षक होतं आणि त्या मुलाखतीची, त्या सगळ्या लेखामागची प्रेरणाच ती होती की एक वेडा पीर लताला भेटतो. ती मुलाखत लोकसत्तेने छापली होती. १३ स्तंभ... म्हणजे कल्पना करा केवढी मोठी मुलाखत असेल. लताशी बोलताना मी एकही शब्द उतरवून घेतला नव्हता.

ःयाचं कारण काय आहे की एकतर स्मरणशक्ती बर्‍यापैकी आहे. लक्षात राहतं. आणि साधारण ढोबळमानानं नाही लक्षात राहात तर तसंच्या तसं लक्षात राहतं. आणि दुसरं म्हणजे समोरचा माणूस लिहायला लागला की बोलणारा फार conscious होतो. त्याला उगीच वाटतं की समोरचा नोट्स काढतोय, आपण तोलूनमापून बोलावं.

हे असं मला पहिल्यापासून वाटत आलंय. त्यामुळे मुलाखत घेताना मी काहीही लिहिलं नाही, पण नंतर लिहीलेली तयार मुलाखत मात्र नेऊन दाखवली कारण असली नको ती 'रिस्क' कशाला घ्यायची ना? लताबाईंना काही खटकणारं असेल तर त्या सांगतील. लतादीदींनी त्यातला एक शब्दही बदलला नाही, ती मुलाखत तशीच्या तशी छापून आली.

आम्ही जसे शिरीष कणेकर, अशोक राणे यांचे सिनेमावरचे लेख वाचत मोठे झालो, तसं तुम्ही कोणी लिहिलेले सिनेमाविषयक लेख आवर्जून वाचायचात?

खूप कमी लोक होते. एक - दोनच नावं असतील. एक इसाक मुझावर म्हणून, जे अजूनही लिहितात. मला खूप वरिष्ठ आहेत ते. सिनेमाची त्यांना जितकी माहिती आहे ना, त्याच्या पासंगालाही पुरेल इतकी माहिती माझ्याजवळ नाही. सिनेमाचं त्यांना इतकं वेड आहे की दुपारी वेळ असला की कानडी सिनेमालापण ते जाऊन बसतात. आणि दुसरे र. गो. सरदेसाई म्हणून एक होते. आता हयात नाहीयेत ते. फार छान लिहायचे. सिनेमाचं परीक्षण वगैरे फार रंगवून आणि सुंदर लिहायचे. अशी दोनच नावं मला प्रकर्षानं आठवताहेत.

कणेकरी, माझी फिल्लमबाजी चे 'वन मॅन शोज' भारतात किंवा आता इथे परदेशात करताना श्रोत्यांच्या प्रतिक्रिया बघून ऐन वेळी प्रयोगाच्या संहितेत, मांडणीमधे काही बदल करावा लागतो का आणि तसे बदल तुम्ही करता का?

दोन गोष्टी आहेत. एक तर बदल करता येत नाही आणि मी बदल करतही नाही. प्रयोगाला समोर समजा ५०० माणसं बसली असतील तर ती ५०० माणसं एकसंघी नसतात. प्रत्येकाच्या विनोदाची कल्पना, पातळी, आवडी-निवडी, स्वभाव हे संपूर्ण वेगळे असतात. एखाद्या विनोदावर कधी कोपर्‍यातला एखादाच माणूस हसतो, कधी संपूर्ण हॉल हशा - टाळ्यांनी दुमदुमून जातो तर कधी कोणीच हसत नाही. त्यामुळे तुम्हाला नक्की एक असा निर्णयच घेता येत नाही बदल करण्यासाठी.

दुसरी गोष्ट अशी की रंगमंचावर आल्याआल्या 'हे' श्रोते वेगळे आहेत, त्यांना काय आवडेल हे त्या क्षणी नुसतं पाहून समजत नाही. आणि जरी समजलं तरी तिसरी गोष्ट अशी की नाटकासारखी संहिता बसवलेली असते. शब्दन् शब्द, comma and comma अगदी pause देखील बसवलेला आहे. तेव्हा अश्या लिहिलेल्या, बसवलेल्या, censor केलेल्या संहितेत ऐनवेळी तुम्ही बदल करू शकत नाही.

त्यामुळे जसं असतं तसं करतो, एक शब्दही इकडेतिकडे करत नाही. मग प्रयोग चुनाभट्टीला असूदे, नाहीतर कॅलिफोर्नियाला. ज्या अर्थी मी आजवर १३ देशात प्रयोग केले आहेत, फिल्लमबाजी चे ८५० - ९०० प्रयोग, कणेकरीचे ३५० आणि फटकेबाजीचे साधारण ११५ प्रयोग केलेत, त्याअर्थी थोडाफार अंदाज मला असावा की जे सगळीकडे चालेल, सगळ्यांना समजेल, सगळीकडे appeal होईल असंच काहीतरी हातून निर्माण झालं पाहिजे. याची काळजी माझ्याकडून घेतली गेली असावी की जेणेकरुन मी इतक्या ठिकाणी प्रयोग करु शकलो.

पहिल्या प्रयोगातलं नावीन्य, उत्साह आज जवळ जवळ १००० च्या घरात प्रयोग झाल्यानंतरही कशामुळे टिकून आहे? एक कलाकार म्हणून तुमचं मत काय?

याच्या मागचं रहस्य एकच की दरवेळी, दर प्रयोगाला समोरचा प्रेक्षक, समोरचा श्रोता वेगळा असतो, response वेगळा असतो. त्याच्याकडून वाट्याला येणार कौतुक किंवा निर्भर्त्सना नवीन असते. कलाकारासाठी ही खरी excitement असते. म्हणून तर नाटकाचे एवढे प्रयोग करतात लोक. आता मी जेव्हा रविवारी कॅलिफोर्नियामधे प्रयोग केला, तेव्हा माझ्यादृष्टीनी तो सगळा प्रेक्षकवर्ग नवीन होता. प्रत्येक दाद आली, हशा आला किंवा टाळ्या आल्या की एक विलक्षण हुरूप येतो, त्यामुळे अजिबात कंटाळा येत नाही.

तुम्हाला खूप सांगायचंय, पण ऐकायला कोणी नाही. तुमच्यासारख्या गोष्टीवेल्हाळ माणसाला असा कधीतरी अनुभव आला आहे का?

मुळीच नाही, कधीच नाही.उलटं फार ऐकायला मला माणसं मिळतात आणि माझी दमछाक होते असं कधीकधी मला वाटायला लागलंय. आमचा मित्रांचा अड्डा तर आहेच. हे मित्रांचे अड्डे कधीकधी फार कामाला येतात. म्हणजे ते डोकं ताळ्यावर ठेवायला तुम्हाला मदत करतात, ते जमिनीवर आणून आपटतात तुम्हाला. त्यांच्या लेखी तुमचं नाव, गाव, कर्तृत्व ह्याला काहीही किंमत नसते. ते साधे आणि सरळ मित्र असतात आणि ते तुम्हाला काहीही बोलू शकतात.

परवा माझ्या रोजच्या बैठकीतला मित्र मला म्हणाला 'अरे माझ्यापेक्षा चार मराठी शब्द तुला जास्ती येत असतील. बाकी काय अक्कल आहे तुला?' अस तो मला चारचौघात म्हटला.. आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की असे 'मित्र' आहेत्; कुणी लांगूलचालन करणारे 'भगत गण' नाहीयेत. ते माझं लिखाण वाचत असतील - नसतील, त्यांना आवडत असेल - नसेल्; त्यानी काहीही फरक पडत नाही आम्हाला. तर असे हे Pure मित्र! इथे आता अमेरिकेत तर बोलून बोलून माझ्या जीभेचे तुकडे पडले हो. लोक जमतात रात्री ३ - ३ वाजेपर्यत आम्ही गप्पा मारत होतो, मजा येते.

कधी ऐकायची इच्छा होते तेव्हा ऐकण्यासारखं जर कोणी बोलत असला तर जरूर आपसूक ऐकतो. मुळात माझ्याकडे इतकं सांगण्यासारखं निर्माण का होतं तर मी ऐकलेलं असतं म्हणून. कुठे कुठे कोणाकोणाच्या गमती ऐकलेल्या असतात त्या pass on करता येतात. त्यामुळे कोणत्याही चांगलं बोलणार्‍याला चांगला श्रोता असणं क्रमप्राप्त आहे, इलाज नाही असं मला वाटतं.


'सूरपारंब्या' ह्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेमधे तुम्ही लिहिलंय की "माझं एकही पुस्तक न वाचणारा माझा मुलगा डॉ. अमित यास". तुमच्या लिखाणाबद्दल तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? आणि त्या ऐकून तुम्हाला काय वाटतं?

(हसून) माझा मुलगा माझं लिखाण वाचत नाही. मुलगी वाचत नाही. बायको वाचते की नाही माहीत नाही, कधी बोलली तरी नाही. मला माहितीये उत्तरं फार न पटण्यासारखी आणि खोडकर वाटताहेत. पण दुर्दैवानं ती खरी आहेत त्याला मी काय करू? क्रिकेटचा आणि मुलीचा प्रश्नच नाही. मुलाला थोडीफ़ार आवड आहे इतकंच, पण विशेष काही नाही.

आणि यावर मला विचाराल तर मला काहीही वाटत नाही. कारण आवडीनिवडी ह्या वंशपरंपरागत चालत राहिल्या पहिजेत असं थोडंच आहे? त्यांचं जग वेगळं आहे, ते त्यांच्या विश्वात आहेत. मुलगा अमित डॉक्टर आहे. तो इथे अमेरिकेत सिनसिनाटीला Ph.D. करतोय. मुलीचं, श्वेताचं लग्न झालंय आणि सध्या ती अमेरिकेत school counseling मधे masters करतीये.

इतक्या वेळा अमेरिकेच्या दौर्‍यावर येता, कधी जाऊन बेसबॉल बघावासा वाटला आहे का? शिवाय अजून इतर कुठले खेळ आवडतात का?

टेनिस बघतो आणि soccer पण बघतो कधीकधी. पण बेसबॉल वगैरे शक्य नाही. क्रिकेट म्हणजे फक्त क्रिकेट. मी baseball किंवा football TV वर पण बघत नाही. जसं हिंदी सिनेमा म्हणजे फक्त हिंदी सिनेमा. तरी हल्ली इंग्रजी सिनेमा बघतो मी. पण हिंदी सिनेमा हीच मला जास्त appeal होणारी गोष्ट आहे.

क्रिकेटमधे तुमचे आजोबा दर्दी होते, त्यामुळे क्रिकेटवेड हे कदाचित तुम्हाला त्यांच्याकडून मिळालं असावं...त्याच धर्तीवर तुमच्या घरात कोणी सिनेमाचे शौकीन होते का?

मला वाटतं की सिनेमाच्या या वेडाची सुरुवात माझ्यापासूनच झाली असावी. तशी माझी आई नाटकात काम करायची, ती गायची सुद्धा. HMV नी तिच्या २ records ही काढल्या होत्या भावगीतांच्या. दत्ता डावजेकरानी संगीत दिलं होतं. सिनेमाची पण तिला offer आली होती. पण ती फार लवकर, तिच्या वयाच्या २६ व्या वर्षीच वारली आणि मग ते सगळं तसंच राहून गेलं.

तुम्ही आजवर अनेक प्रकारचं लेखन केलंय. विनोदी केलंय, गंभीर विषयावर लिहिता. पण लेखनक्षेत्रातली किंवा इतरही क्षेत्रातली तुमची श्रद्धास्थानं कोणती?

पु.ल. आहेतच. त्याचबरोबर मराठीतले जयवंत दळवी माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. इतका versatile लेखक दुसरा नाही. त्यांनी प्रवासवर्णनं लिहिली, कथा - कादंबर्‍या लिहिल्या, नाटकं लिहिली, विनोदी लेखन केलं. आणि सगळंच अप्रतिम.

लता मंगेशकर एक आहे की जिच्या गाण्यानी आपल्याला इतका आनंद दिलाय, 'जिने का बहाना' म्हणतात तो दिलाय. त्या बाईशी आपली ओळख असावी, जिव्हाळ्याचे संबंध असावेत, त्या बाईशी फोनवर बोलता यावं, भेटता यावं. आयुष्य सार्थकी लावणारी गोष्ट वाटते मला.

तुमचे आगामी काही projects , लेखन वगैरे?

मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं मी नोट्स वगैरे काढत नाही, तसंच पाहिलं तर 'आगामी संकल्प' किंवा projects in pipeline असं काही माझं आयुष्य नाहीये. काही उत्स्फूर्तपणे वाटलं तर लिहितो. पुढच्या वर्षी 'या कातरवेळी' नावाचा एक 'वन मॅन शो' घेऊन येतोय अमेरिकेला.

'माणूस दुसर्‍याच्या व्यसनाला हसतो' ह्या वाक्यावर हशा येत असला तरी यात एक वेदना दडलेली आहे हे जाणवतं.....

खरंय तुमचं. अनेकदा असे प्रसंग घडतात. आता अलीकडेच आमचा एक रोजच्या बैठकीतला मित्र दारू पिऊन गेला. त्याला हसण्यात, चिडवण्यात, टोचण्यात, घालून पाडून बोलण्यात आम्ही काही वर्षे घालवली.. पण त्याची दारू काही सुटली नाही. आणि अगदी तरूणवयात तो ह्या व्यसनापायी गेला. त्याला हसताना, त्याची चेष्टा करताना, त्याला बोलताना आमच्या ध्यानीमनीही नव्हतं की ह्याचं मरण इतक्या जवळ आलंय. अश्या वेळी मग विचारांचा सगळा एकदम गोंधळ उडतो आणि वेदना जाणवायला लागते.

तुमच्या आयुष्याच्या एकूणच ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला ज्यांच्याकडून काही शिकायला मिळालंय, अशांबद्दल काही सांगाल का?

खूप माणसं आहेत. ज्यांच्याकडून खरोखरच काही शिकावं असं वाटलं, त्या माणसांची नावं पण बाहेर कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही. खूप साधी, दुसर्‍यासाठी त्याग करणारी, आपल्या अन्नातले दोन घास काढून दुसर्‍याला देणारी माणसं आहेत ही. त्यांच्या नावाला म्हणाल तर काही अर्थ नाही. आता इस्लामपूरचा कुलकर्णी असं म्हटल्यावर काय समजणार कोणाला? पण ज्यांनी खूप काही शिकवलं ती बहुतांशी अशी नाव नसलेलीच माणसं आहेत. अनेक लोक असे आहेत की ज्यांच्या पोटी अपंग, मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलं जन्माला येतात. त्यांचं सगळं आयुष्य त्यातच बरबटून गेलेलं असतं. पण ते लोकही उत्साही असतात, हसतमुख राहतात. बघून अनेकदा आपला धीर खचतो. पण ही माणसं रसरसून समाजात जगत असतात, हसत असतात, हसवत असतात.

आपण लहान - लहान गोष्टींमधे रडत असतो, आमचं नशीब खोटं म्हणून कपाळाला हात मारून घेतो. पण हे लोक जिद्दीने जगत असतात. खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे यातून, खूप शिकण्यासारखं आहे.

आजच्या ह्या रंगलेल्या गप्पांच्या मैफिलीचा शेवट तुम्ही एखादा किस्सा सांगून करावा असं मला वाटतंय. तुमच्या कायम स्मरणात राहिली अशी एखादी घटना....

ज्या एच्. एम्. व्ही. कंपनीने माझ्या कार्यक्रमांच्या कॅसेट्स काढल्या, तिथे बांदोरकर म्हणून ऑफिसर आहेत. त्यांनी मला एकदा सांगितलं की माझी कॅसेट त्यांनी त्यांच्या एका भाच्याला दिली. तो terminally ill होता, त्याला कॅन्सर झाला होता. त्यातच वारला तो. १५ वर्षांचा तो मुलगा, हॉस्पिटलमधे सारखी ती कॅसेट ऐकायचा आणि खळखळून हसायचा....

हे ऐकल्यानंतर मला काय बोलावं सुचेना हो! त्याच्या ह्या अश्या अवस्थेतही त्याला दोन वेळेला का होईना आपण हसवू शकलो असू, त्याच्या आयुष्यात आपल्यामुळे क्षणभर का होईना आनंद निर्माण झाला असेल, तर देवाच्या दरबारी आपली काहीतरी पुण्याई जमा झाली असं मला वाटतं.....आणखी काय सांगणार? इतकंच!

(ह्या मुलाखतीसाठी 'संवाद' उपक्रमात सामील असणार्‍या आणि नसणार्‍याही अनेक लोकांची प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या खूप मदत झाली आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.)

-- रार