« | »




निळी वेलांटी

निळे पाखरु
अवचित आले
नजरेच्या डाव्या कोपर्‍यात
अलगद उतरले

मी नको नको म्हणताही
नजर त्याच्याकडे वळली
.. क्षणभरच
पुन्हा फिरली
रेखू लागली
अंगणातल्या ओल्या सड्यावर
सैरभैर रांगोळी.

निळे पाखरु
पाहत राहिले
मान तिरकी धरुन
एकदा माझ्याकडे
एकदा माझ्या नजरेकडे
एकदा नजरेतल्या रंगविरल्या रांगोळीकडे.
मग काही सुचल्यासारखे
किंचित हसले,
पंखांत चोच खुपसून
त्याने अंग फुलारले
अन् येण्यातली सहजता
तसूभरही ढळू न देता
अंगणभर एक वेलांटी मारून
निघून गेले दूरात
निळी वेलांटी माझ्यासाठी
.. फक्त माझ्यासाठी ठेवून

विस्मय लपविण्याचा नेहमीचा अट्टाहास विसरुन
मी पाहत राहिलो
एकदा त्या डाव्या कोपर्‍यातले निळे पीस
एकदा निळी वेलांटी
एकदा अंगणातली रंगबावरी रांगोळी!

-परागकण.