|
बी, दिर्घकथा लिहायला घेतलीच आहे वेळ मात्र लागतोय या ना त्या कारणास्तव. बघू या कसं काय जमतंय ते! दिवाळी अन्कांसाठी तुम्ही सांगितलेले लक्षात ठेवीनच. आत्ताच पहा ना! दोन-तीन तासांत पाचदा तरी डोकावलेच आहे! कम्प्युटर सुरु होताच मायबोलीचे मुखप्रुष्ठ समोर यावे अशीच व्यवस्था केलीय. तुमच्या सर्वच पोस्ट्स बद्दल खरेच आभारी आहे.
|
Bee
| |
| Friday, September 07, 2007 - 5:56 am: |
| 
|
अंकाला अजून वेळ आहे तसा पण खरच वेळेवर धावपड उडते नि साहित्य द्यायचे राहून जाते. तेंव्हा आत्तापासून कासवगतीने आपण आपले वेळेवर पुर्ण करायचे तुझी दीर्घकथा लिहून पुर्ण होईल तोवर.
|
Upas
| |
| Friday, September 07, 2007 - 3:01 pm: |
| 
|
नमस्कार अमि, तुम्ही रहाता तिथे देशमुख म्हणून माहीत आहेत का? त्यांनी NJ मधल्या library ला बरीच पुस्तके donate केली होती.. त्यांनी एक charity सुरु केलेय, ज्याच्या द्वारे पुस्तके मागवली जातात भारतातून, आणि हो BMM ला Ideal चा stall असतोच.. त्यांचा पत्ता असा Ideal Pustak Triveni, Narayan Smruti, Chabildas Road, Dadar (w), Mumbai 28,022-24304254, 24303362
|
उपास, मेल केलीय चेक करा प्लीज. तुमच्या मदती आणी माहितीबद्दल धन्यवाद.
|
Hkumar
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:28 am: |
| 
|
'धर्मयोद्धा' हे लक्ष्मण लोंढेंचे पुस्तक वाचले. एका धर्तीच्या कथांचा संग्रह आहे. प्रत्येक कथानायक हा सज्जन, तत्त्वनिष्ठ आहे. अर्थात त्यामुळे जगाच्या बाजारात तो पराभूत होत राहतो. अशी माणसे कितीही प्रलोभने समोर आली तरी आपल्या तत्त्वापासून विचलित होत नाहीत. परंतु, जगाच्या द्रुष्टीने मात्र ती खुळी ठरतात.
|
Dineshvs
| |
| Friday, September 21, 2007 - 1:23 pm: |
| 
|
एखाद्या मायबोलिकराने, मला फोन करावा. आवर्जुन भेट घ्यावी, आणि पहिल्याच भेटीत, जुनी ओळख असल्यागत, पोटभर गप्पा व्हाव्यात, हे माझ्या बाबतीत अनेकवेळा घडते. परवा, असेच एका मायबोलिकरणीला भेटायचा योग आला. पुस्तकांच्या दुनियेत दोघे हरवुन गेलो. आणि जाता जाता, तिने दोन पुस्तके भेट म्हणुन माझ्या हातात ठेवली. विषय माझ्या नेहमीच्या वाचनातले नसल्याने, दोन दिवसात दोन्ही पुस्तके वाचुन काढली. त्यापैकी एक आहे, व्होल्गा ते गंगा या नावाचे. ( मूळ हिंदी लेखक, महापंडित राहुल सांस्कृत्यायन, प्रथम आवृत्ती १९४४, मराठी अनुवाद, व्यं. श. वकील, मूल्य ५० रुपये, प्रकाशक लोकवांगमय गृह ) इ. स. पूर्व ६००० पासुन इ.स.१९२२ पर्यंत आपल्या पुर्वजांची कहाणी यात ललित कथेच्या रुपात लिहिलेली आहे. आवश्यक तिथे ऐतिहासिक संदर्भ दिले असले तरी, हा काहि इतिहास नव्हे. पण सत्याच्या जितक्या जवळ जाता येईल, तितके जाण्याचा प्रयत्न केला आहे. एवढा मोठा काळ असल्याने, काहि मोजक्याच व्यक्तिरेखा इथे आल्या आहेत, पण त्यातले टप्पे मात्र महत्वाचे आहेत. हे पुस्तक ललित कथेच्या अंगाने लिहिल्याने अत्यंत वाचनीय झालेय. हा काहि समग्र इतिहास नाही, तसा दावाही नाही. सध्या मायबोलिवर चालत असलेल्या चर्चेच्या संदर्भात मला खालील उतारा, उल्लेखनीय वाटला, म्हणुन सगळ्यांसाठी इथे उधृत करतोय. ( त्या चर्चेत मला पडायचे नाही, हे मी आधीच स्पष्ट केलेय. शिवाय माझे स्वतःचे मत काय आहे हा मुद्दा इथे गौण आहे, माझे मत काहिही असले तरी, इतर प्रत्येकाला, स्वतःचे मत असावे, असे माझे मत आहे. ) इ. स. पूर्व ७०० वर्षांपुर्वी होवुन गेलेली विदुषी लोपामुद्रा आणि तिचा पति प्रवाहण यांच्यातला हा संवाद आहे. ( पृष्ठ ९३ ) " प्रवाहण, माझ्यावर प्रेम केल्याचा तुला पश्चाताप होत नाही ना ? " " प्रिये, तुझं प्रेम मला आईच्या दुधाप्रमाणे अनायासे मिळालं व ते माझ्या आपलेपणाचे एक अंग बनलं. मी संसारी पुरुष आहे लोपा ! तरी देखील तुझ्या प्रीतीचं मोल मला कळतं मनाचा प्रवाह सदा एकसारखा असत नाही. जेव्हा केव्हा मनात अवदास निर्माण होतो, तेव्हा मला जीवन दुर्लभ होवुन जातं. त्या वेळी तुझी प्रीती व तुझे सुविचार मला आपल्या हातानी वर उचलून घेतात. " " पण जेवढं तुला वर उचलायला हवं तेवढं माझ्याच्यानं होत माही, याचं वाईट वाटतं मला, प्रवाहण ! " " कारण, राज्य करायला मी जन्माला आलो. " " पण तेव्हा तर महाब्राम्हण बनण्याची तळमळ तुला लागलेली होती. " " त्यावेळी मला माहीत नव्हतं की मी पंचालपूरच्या ( कनोज ) राजभवनाचा वारस आहे म्हणून ! " " मग तू राजय्कारभाराव्यतिरिक्त अवांतर गोष्टीत का मन घालतोस ? काय गरज आहे त्याची ? " " म्हणजे ब्रम्ह्याला सोडून ब्रम्हापर्यंत उड्डाण घेतलं हेच ना ? पण लोपे, हि काही राजकारणावेगळी वस्तू नाही. राज्याला आसरा देण्यासाठीच आमच्या पूर्वज राजांनी वशिष्ट विश्वामित्राना एवढं सन्मानित केलं होतं. ते ऋषी इंद्र, अग्नी आणि वरुण यांच्या नावावर लोकाना राजाज्ञा मानायला प्रेरित करत असत. त्या वेळचे राजे जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी या देवतांच्या नावांवर खुप संपत्ती खर्च होणारे यज्ञ करत असत. आज देखील आम्ही यज्ञ करतो व ब्राम्हणाना दान दक्षिणा देतो. हे सारं आम्ही करतो याचं कारण जनतेनं देवतांच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवावा आणि असं मानावं की, हा गंधशालीचा भात, हा गोवत्साच्या मधुर मांसाचा रस्सा, ही विरल वस्त्रं आणि माणिक मोत्यांचे अलंकार यांचा उपभोग आपल्याला देवतांच्या कृपेनं मिळत आहे. " " त्यासाठी या जुन्या देवता पुरेशा होत्या. या नव्या ब्रम्हाची भर घालण्याची गरज कोणती ? " " पिढ्या लोटल्या तरी देखील इंद्र, वरुण, ब्रम्हा या देवता प्रत्यक्ष पाहिलेल्या नाहीत. आता कित्येकांच्या मनात संदेह निर्माण होवू लागला. " " मग ब्रम्ह काय संदेहातीत राहील ? " " ब्रम्हस्वरूप मी असे सांगितले आहे की, त्यामुळे कोणीही त्याला बघण्याबद्दल आग्रह धरणार नाही, जे आकाशाप्रमाणे असतं पण दिसत नाही. किंवा ऐकायला येत नाही, जे इथं तिथं सर्वत्र व्यापलेलं आहे ते बघण्याचा मुळी प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न उद्भवतो साकार देवतांच्या बाबतीत ! " " तू मारे आकाश आकाश म्हणून सामान्यांनाच नव्हे तर आरुणी उद्दालक यांच्या सारख्या ब्राम्हणाना देखील भ्रमात पाडलंस, ते काय प्रजेला भ्रमात ठेवण्यासाठीच ? " " लोपा, तू मला ओळखलंस. तुझ्यापासून काय लपवून ठेवणार ? हा राजभोग नित्य हाती ठेवायचा म्हणजे एक गोष्ट करणं, आवश्यक असतं. या संदेह निर्माण करणार्यांचीच मती कुंठीत करायला हवी. कारण देवता व त्यांची यशपूजा यांच्याबद्दल संदेह निर्माण करणारेच आमचे अतिभयंकर शत्रु होत. " " परंतु तू तर ब्रम्हाचं दर्शन व सत्ता याबद्दल बोलत असतोस ! " " सत्ता असली तर दर्शन पण व्हायला हवंच. पण ते इंद्रियांच्या योगानं नव्हे. इंद्रियांच्या योगे दर्शन व्हायची गोष्ट बोललो तर संदेहवाही त्याचं प्रत्यक्ष प्रमाण मागतील. म्हणुनच मी म्हणतो की त्याच्या दर्शनासाठी दुसरंच सूक्ष्मेंद्रिय असतं व ते इंद्रिय निर्माण करण्याची मी अशी काहि साधनं सांगतो, कि लोक छपन्न पिढ्या भटकत राहतील आणि श्रद्धा पण कायम राखतील. पुरोहितांची स्थूल शस्त्रं निकामी झाली असं पाहून मी हे सूक्ष्म शस्त्र निर्माण केलं. तू शबरांच्या जवळची तांब्यादगडांची शस्त्रं पाहिलीस लोपा ? " " तूझ्याबरोबर दक्षिणेतल्या जंगलात गेल्ये होत्ये तेव्हा पाहिली मी. " " यमुनेच्या पलिकडे ! शबरांची ती दगडाची व तांब्याची शस्त्रं काय आमच्या कृष्ण लौहाची ( अस्सल लोखंड ) बरोबरी करु शकतील ? " " नाही " " त्याचप्रमाणे वशिष्ट आणि विश्वामित्र यांच्या जुन्या देवता आणि यज्ञ शबरांच्या इतकी बुद्धी असणार्यानाच काय त्या संतुष्ट करू शकतील. पण त्या शहाण्या संदेहवाद्यांच्या कुशाग्र बुद्धीपूढं त्यांना टिकाव धरता येणार नाही. " " मग त्यांच्यापुढं तुझं ब्रम्ह देखील फ़िकं पडेल. तू बाहेर ज्ञानी ब्राम्हणांना शिष्य बनवून ब्रम्हज्ञान शिकवतोस व मी तूझ्या घरातच तुझ्या गोष्टी असत्य व फ़सव्या आहेत असं म्हणते. " " कारण तुला खरं रहस्य ( उपनिषद ) ज्ञात आहे. " " ब्राम्हण ज्ञानी असून देखील त्यांना तुझं रहस्य का कळत नाही. ? " " तू बघत आलीसच ! काही काही ब्राम्हणाना रहस्याचा पत्ता लागला तरी देखील ते माझं हे रहस्य ( उपनिषद ) आपल्याला फ़ायदेशीर शास्त्र मानतात. त्यांचं पुरोहितपण, त्यांची गुरूबाजी आता लोकांना अविष्वासकारक वाटू लागली होती. परिणामतः त्यांना त्या दक्षिणेपासुन वंचित व्हावं लागलं असतं की जिच्यामुळे त्यांना वाहनादाखल उत्तम वडवा रथ, उत्कृष्ठ आहार, निवासाला सुंदर प्रासाद व भोगासाठी सुंदर दासी मिळू शकतात. " " हा तर व्यापार झाला " " होय, व्यापारच. आणि तो देखील असा की त्यात मुळी तोट्याचे भयच नाही. यासाठीच उद्दालकासारखे शहाणे ब्राम्हण हातात समिधा घेऊन शिष्य होण्यासाठी माझ्याजवळ येतात. मी देखील ब्राम्हणांचा गौरव करून उपनयन केल्याशिवाय, विधिवत गुरू झाल्याशिवाय त्यांना ब्रम्हज्ञान शिकवतो. " " किती निकृष्ठ भावना आहे ही, प्रवाहण " " कबूल, पण आमच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने हे सर्वांत उपयुक्त साधन आहे. वशिष्ट व विश्वामित्र यांची नौका हजार वर्षे देखील कामी पडू शकली नाही. प्रवाहण जी नौका तयार करीत आहे ती राजे, आमंत व परधनाचा भोग घेणार्याना पुढची दोन हजार वर्षं उपयोगी पडेल. यज्ञारुपी नौका मला बळकट वाटली नाही लोपे ! म्हणून मीही बळकट नौका तयार केली. तिचा ब्राम्हण व क्षत्रिय यांनी मिळून योग्य उपयोग केला तर ते ऐश्वर्याच्या अक्षय भोग घेऊ शकतील. आणिक लोपे, या आकाशब्रम्हापेक्षा देखील मोठा असा मी दुसरा शोध लावला. " " कोणता ? " " मरून पुन्हा जगात येणं पुनर्जन्म ! " " हे तर मोठं मजबूत जाळं दिसतं. " " आणि सर्वात अधिक उपयुक्त देखील. ज्या ज्या प्रमाणात आम्हा सामंत, ब्राम्हण, व्यापार्यांच्याजवळ अपार संपत्ती एकत्रित होवू लागली, त्या त्या प्रमाणात परिणामतः साधारण प्रजा निर्धन होवू लागली. या निर्धन कारागिराना, शेतकर्याना व दासदासीना उत्तेजित करणारे देखील आता दिसू लागले. ते सांगतात. तुम्ही आपली कमाई दुसर्याना देऊन स्वतः मात्र कष्ट करता. ते तुम्हाला फ़सवायला सांगत सुटतात की या त्याग, कष्टदानाच्या योगानं तुम्ही स्वर्गात जाल. कोणी देखील मरुन ते उच्चनीच ते स्वर्गसुख पाहिलेलं नाही. याचं उत्तर हे असं आहे, या जगात जे भेद, लहानमोठ्या जाती, निर्धन धनिक वर्ग हे सारे पूर्वजन्मातल्या कर्मफ़लामुळं. अशा रीतीनं आम्ही पुर्वजन्मींच्या सुकृत दुष्कृताचं प्रत्यक्ष फ़ळ दाखवून देतो ! " " तर मग चोर देखील आपल्या चोरीच्या मालाला पूर्वजन्माची कमाई म्हणेल ! " " परंतु त्यासाठीच आम्ही आधीपासुन देवता, ऋषी व जनश्रद्धा यांची मदत घेतलेली आहे. त्यामुळं चोरीचं धन हे पूर्वजन्माची कमाई मानीत नाही. या जन्मी परिश्रम केल्याशिवाय कमावलेलं धन हे आम्ही देवतेच्या कृपेनं मिळालं म्हणून आधी सांगत होतो, पण जेव्हा देवता व त्यांची कृपा यांच्याबद्दल संदेह निर्माण होवू लागला तेव्हा आम्हाला दुसरा नवा उपाय शोधणं जरूर होतं. ब्राम्हणात हा उपाय शोधण्याची शक्ती उरली नाही. जुन्या ऋषीचे मंत्र व वचनं घोकण्यातच आयुष्याची चाळीस पंचेचाळीस वर्षं घालवितात, त्याना कुठली एखादी नवीन गोष्ट सुचणार ? " " पण, प्रवाहण तू देखील घोकंपट्टीत बरंचसं आयुष्य घालवलंस ! " " फ़क्त सोळा वर्षं ! चोविशीमधे मी ब्राम्हणांची विद्या पार करून बाहेरच्या जगात आलो होतो. इथंच मला अधिक शिकायला मिळालं. राज्यकारभाराच्या अंतरंगात शिरल्यावर मला आढळून आलं की, ब्राम्हणांनी बनवलेली जुनी नौका खिळखिळी झाली. " " म्हणून तू ही बळकट नाव बनवलीस ? " " सत्य आणि असत्य याचा मी विचार करत नाही, माझं लक्ष आहे कार्यभागावर ! लोपे, जगात पुन्हा जन्म घेऊन परत येण्याची गोष्ट आज नवीन वाटे व तुला तिच्या आड दडलेला स्वार्थ दिसतो, पण माझ्या ब्राम्हण चेल्यांनी ती आत्ताच डोक्यावर घेऊन नाचायला सुरूवात केली. पितरांचे व देवतांचे रस्ते ( पितृयान, देवयान ) समजून घेण्यासाठी लोक बाराबारा वर्षं गायी चारायला सिद्ध होत आहेत. लोपे, तू नि मी त्यावेळी असणार नाही, परंतु एक काळ असा येईल की, त्यावेळी सार्या दरिद्री प्रजा या पुनर्जन्माच्या भरवशावर जीवनातील कटुता, कष्ट आणि अन्याय सहन करण्यासाठी तयार होतील. स्वर्ग व नरक समजावून सांगायला हा किती सोपा उपाय मी काढला, लोपे ! " " पण आपल्या पोटासाठी शेकडो पिढ्याना आगीत लोटल्यासारखं होतय हे. " " वसिष्ट आणि विश्वामित्रानी पोटासाठी वेद रचले. उत्तर पांचालाचा राजा दिवोदास यानं काहि शबरदुर्ग जिंकले म्हणुन त्याच्या विजयावर कविताच कविता रचल्या. पोटाची व्यवस्था लावणं काही वाईट नसतं, आणिक आम्ही जेव्हा आमच्याच नव्हे तर आमच्या मुलां नातवांच्या, भावाबंदांच्या पोटांची सोय हजारो वर्षांपर्यंत करू शकतो तर आम्ही शाश्वत यशाचे भागीदार बनतो. प्रवाहण असं कार्य करीत आहे, की जे पूर्वज ऋषी करु शकले नाहित, जे धर्माच्या नावावर अन्नार्जन करणारे ब्राम्हण देखील करू शकले नाहीत. " " तू फ़ार निष्ठुर आहेस रे प्रवाहण. " " पण मी माझं कार्य योग्यतापूर्वक पार पाडलं "
|
Ksha
| |
| Friday, September 21, 2007 - 2:12 pm: |
| 
|
हो हो. आणि हे सगळं त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगून स्वतच्या पायावर कुर्हाड मारून घेण्याची व्यवस्था पण केली.
लॉजिकली विचार करा. मी जर हे सर्व काल्पनिकरित्या निर्माण करण्याइतका हुषार असेन तर ते प्रामाणिकपणे मान्य करून लिहून ठेवण्याचा गाढवपणा करेन का? याचाच अर्थ हे ज्याने रचले तो मूळ कर्ता नाही. असो. तुम्हांला ज्यांत विश्वास असेल ते करत रहा.
|
Ksha
| |
| Friday, September 21, 2007 - 2:14 pm: |
| 
|
अर्थात, इथे ही चर्चा सुरू करण्याचा उद्देश नाही. विषयांतर झाले असेल तर पोस्ट काढून टाकावी.
|
Tiu
| |
| Friday, September 21, 2007 - 7:43 pm: |
| 
|
दिनेशदा...उतारा इथे post केल्याबद्दल धन्यवाद! हे पुस्तक मिळवुन वाचायलाच हवं आता असं वाटतंय!
|
Dineshvs
| |
| Saturday, September 22, 2007 - 6:38 am: |
| 
|
Ksha हे सगळे ललित लेखन आहे. काल्पनिक आहे. लॉजिकलीच विचार करायचा तर खासगीरित्या, तीसुद्धा विदुषी असलेल्या पत्नीजवळ अशी कबुली देणे अगदीच अशक्य नाही. इतिहास हा रुढ आणि उपलब्ध साधनांच्या आधारे लिहिला जातो. ललित लेखनाला अशी मर्यादा नसते. असो.
|
Hkumar
| |
| Saturday, September 22, 2007 - 8:14 am: |
| 
|
गेले वर्षभर मी 'यांनी घडवलं सहस्रक' हा मोठा ग्रंथ वाचत आहे.त्यामध्ये सन १००० ते २००० या कालखंडात आपल्या कार्याने मानवी जीवन प्रभावित करणार्या व्यक्तींचा परिचय आहे. ग्रंथाचे क्षेत्रनिहाय ९ विभाग आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे यात जसा म. गांधी, आइनस्टाइन व अनेक सत्पुरूषांचा समावेश आहे तसेच औरंगजेब, हिटलर, ओसामा बिन लादेन इ. 'खलनायकांचाही' उल्लेख आहे. पुस्तकाचे संपादन सुहास कुलकर्णी व चंपानेरकर यांचे.
|
Adm
| |
| Wednesday, December 05, 2007 - 8:43 am: |
| 
|
सध्या जरा वेळ मिळाल्यामुळे बरच वाचन चालू आहे... सुधा मूर्तींची डॉलर बहू, माणसांच्या गोष्टी आणि वाईज अंड अदरवाईज वाचलं.. डॉलर बहू कादंबरी आहे.. पण इतर दोन मला ब्लॉग सारखी वाटली एकदम.. लिहायची शैली मात्र छान आहे.. नंतर एक सिडने शेल्डॉन पण वाचलं.. नेहमीप्रमाणेच एकदम मनोरंजक.. आता चकवा चांदण वाचायला घेतलय.. फारच मोठं आहे.. बघू कसं जमतय..
|
Hkumar
| |
| Wednesday, December 05, 2007 - 10:09 am: |
| 
|
बर्याच दिवसांनी या BB वर कोणीतरी वाचणारे भेटले अन बरे वाटले.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 05, 2007 - 4:54 pm: |
| 
|
योध्दा सन्यासी लेखक वंसत पोतदार. विवेकानंदांच्या जिवनावर आधारीत हे पुस्तक. चरीत्रात्मक पुस्तक आहे पण फार मोठे नाही. विवेकानंदांच्या जिवनातील काही घडामोडी, प्रसंग घेउन हे पुस्तक लिहीले आहे. लेखक स्वत मराठी असल्यामुळे चुकीचे भाषांतर टाळले गेले आहे. ऐकदा वाचन्यासारखे नक्कीच.
|
एच कुमार, इथे वाचणारे बरेच आहेत. फक्त ह्या बीबी ला भेट देणारे कमी आहेत. मी परत एकदा कॅच २२ वाचले. योझेरीयन जबर्याच. मराठीमध्ये अशा अप्रतीम उपहासात्मक कादंबर्या वाचल्याचे आठवत नाही. राग दरबारी ही एक हिंदी कादंबरी अशीच उच्च आहे. मराठीमध्ये त्यातल्या त्यात उपहासात्मक श्रेणीच्या जवळ जाणारी म्हणजे कोसला. कुणाला बाकी कुठली आठवते का ह्या स्टाइलची?
|
Slarti
| |
| Thursday, December 06, 2007 - 6:00 am: |
| 
|
उपहासात्मक म्हणाल तर नंदा खरे यांनी लिहीलेली 'अंताजीची बखर' ही ग्रंथाली प्रकाशित कादंबरी आहे. पेशवाईचे सुरेख कीटकावलोकन केले आहे.
|
Psg
| |
| Thursday, December 06, 2007 - 6:28 am: |
| 
|
कविता महाजनांचे 'ब्र' वाचले.. स्त्री- मग ती अगदी उच्चवर्गीय असो की पार आदिवासी- तिला कोणत्या ना कोणत्या प्रकारची उपेक्षा- मग ती समाजाकडून असो की नवर्याकडून- कशी सतत सहन करावी लागते याचं अस्वस्थ करणारं वर्णन आहे पुस्तकात. कथेची हीरॉईन- प्रफ़ुल्ला- परीस्थितीने सुखवस्तू.. पण नवर्याकडून सतत अपमान आणि हेटाळणी वाट्यास आलेली- इतकी की बाई स्वतंत्र विचार करायलाच विसरून गेलेली.. सतत मनावर दडपण नाहीतर भिती. पण 'प्रगत' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तिला तिची एक वेगळी वाट सापडते. आदिवासी भागातील प्रथा, तिथल्या स्त्रीयांचा राजकारणातला सहभाग, त्यांना रोजच अनंत समस्यांना द्यावे लागणारे तोंड, तरीही त्यांनी त्यातून काढलेली वाट- या सगळ्यातून प्रफ़ुल्ला स्वत:ला नव्याने ओळखते. ग्रामिण राजकारण, स्वयंसेवी संस्थांना 'स्वयंसेवी' रहाण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात त्याचे चित्रण, तसंच सर्व पातळीवरच्या पुरुषांचा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टिकोन आणि स्त्रीयांनी त्यावर काढलेले तोडगे सगळ्याचाच परामर्श लेखिका घेते, आणि समर्थपणे घेते. पुस्तक अस्वस्थ करून सोडतं. राजकारण किती गलिच्छ आहे हे पुन्हा एकदा समोर येतं. मी तरी ४० पानांच्यावर एका बैठकीत वाचू शकले नाही. शेवट मात्र पॉझिटिव्ह आहे, दिलासादायक आहे. जरूर वाचा
|
Zakasrao
| |
| Thursday, December 06, 2007 - 2:09 pm: |
| 
|
पुनम खरच छान आहे ते पुस्तक. प्रफ़ुलाच रुपांतर फ़ुला आणि त्यावेळचे तिच्या मनातले विचार मस्त आहेत. एकदा जास्तीत जास्त काय होइल असा विचार केल्यावर मनातल निर्भय होण हे मला आवडल. आता कविता महाजन यांचीच "भिन्न" आली आहे. छान आहे अस वाचलय त्याच्या समीक्षेत. नक्कि वाच. मी हि मिळाल की वाचनारच आहे.
|
आइला, स्लार्टी, खरच की. मी विसरलोच. अंताजीची बखर एक अप्रतीम सटायर आहे. त्यात अंताजी जेव्हा पहिल्यांदा नॉन-वेज खातो तेव्हा बेट्याला माहिती असते की ते नॉन-वेज आहे. पण खायच्या आधी विचारतो, "काहेकी सब्जी?". त्यानंतर आमच्या घरात नॉन-वेज आणले की हमखास काहेकी सब्जी असे विचारुन मग सगळे खातात. हेच नंदा खरे 'आजचा सुधारक' ह्या मासिकाच्या संपादक मंडळावर आहेत. अतिशय निष्ठेने हे मासिक चालवले जाते. एकही जाहिरात नसते. सगळे पटेलच असे नाही (समाजवादी पगडा जास्ती आहे त्यांच्यावर आणि मी पडलो संघीष्ट). पण बुद्धीला चांगला खुराक असतो.
|
Slarti
| |
| Friday, December 07, 2007 - 11:35 am: |
| 
|
त्यांची दोन पुस्तके मला माहिती आहेत एक अंताजी आणि दुसरे '२०५०'. तेही मला आवडले होते. छान विज्ञान कादंबरी आहे. मध्यंतरी एक कादंबरी वाचली. बड्या घरातील पण आता किराणामालाच्या दुकानात पुड्या बांधणारा माणूस, त्याचा संसार, वगैरे होते. तेही आवडले होते मला. त्यात शेअरबाजारातील गुंतवणूक वगैरेवर भाष्य केले होते. तीही नंदा खर्यांचीच होती का ? तिचे नावही आठवत नाही आता. ग्रंथालीचेच होते तेही.
|
|
|