|
Dineshvs
| |
| Tuesday, October 24, 2006 - 4:36 pm: |
| 
|
नुकतेच मीना प्रभुंचे ग्रीकांजली पुस्तक वाचुन संपवले. ( मौज प्रकाशन, किंमत २५० रुपये, पृष्ठे २९१ ) मीनाताईंची दोन पुस्तके वगळल्यास, सर्व पुस्तके माझ्या संग्रहि आहेत. अगदी पहिल्या पुस्तकापासुनच त्या आवडुन गेल्या आणि प्रत्येक नव्या पुस्तकानंतर त्या आणखीनच आवडु लागतात, नव्हे अगदी जवळच्या मित्र वाटु लागतात. याची कारणे म्हणजे त्यांच्या लेखनातला पराकोटीचा प्रांजळपणा. अगदी पहिल्या वाक्यापासुन त्या वाचकाला जे विश्वासात घेतात, तो बंध पुस्तक वाचुन संपवले तरी सुटत नाही. या प्रांजळपणामुळे बाई आपली फजिती, आपल्या वेंधळेपणा, फटकळपणा काहिही लपवत नाही. एरवी कुणीहि लेखक उत्तर देणार नाही, असा या भटकंतीला लागणारा पैसा कुठुन येतो, या प्रष्णाचे उत्तरहि त्या प्रांजळपणे लिहुन जातात. याच प्रांजळपणातुन, त्या प्रत्येक म्युझियममधुन अगदी ठरवुन, त्या एक वस्तु चोरतात (?) त्याचीहि कबुली त्या देतात. त्याना प्रचीन संस्कृतिचे खुप आकर्षण आहे. त्याचा मागोवा घेत त्या एकेक देश अक्षरशः पालथा घालत असतात. आणि आपल्यालाहि त्यातला क्षण न क्षण अनुभवु देतात. त्याना प्रवासी देवी, प्रसन्न आहे असे, असे त्यांचे म्हणणे. त्यामुळे मांजर जशी चार पायावरच पडते ( त्यांचीच उपमा ) तश्या त्या अनंत अडचणी झेलत, योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी पोहोचतात. त्यांचे हे पुस्तक अर्थातच ग्रीसमधल्या प्रवासावर आधारित आहे. तसे आपण ग्रीस या ना त्या माध्यमात पाहिलेले असते पण मीना प्रभु आपल्याला एका भारतीय नजरेतुन सगळे परत दाखवतात. आपल्याला एरवी कधीहि कळल्या नसत्या अश्या अनेक गोष्टी उलगडुन दाखवतात. मिळालेल्या माहीतीतला कण न कण, आपल्याला वाटुन देतात. ( तरिही त्यांच्याकडे सांगण्यासारखे खुपच उरते हा माझा अनुभव आहे. ) टिव्हीवरच्या ग्लोब ट्रेकर सारख्या मालिकेतुन आपल्याला पृथ्वीवरच्या अनेक भुभागांचे दर्शन घडलेले आहेच, तो प्रवास एकांड्या शिलेदाराने केला आहे असे भासवले जात असले तरी त्या व्यक्तीसोबत कॅमेरामन आणि दिग्दर्शकाची टीम असते, हे आपल्याला माहित असते. मीना प्रभुंचा बहुतेक प्रवास हा स्वतःच्या हिमतीवर केलेला आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे त्यानी अनेक मित्रमैत्रीणी जोडलेल्या आहेत, त्यांची मदत त्याना होतेच, शिवाय ओघात ती माणसे आपल्यालाहि जवळची वाटु लागतात. अर्थात काहि त्रासदायक अनुभव आहेतच आणि त्या तेहि आपल्यासमोर मांडायला संकोचत नाहीत. ( यात केवळ भारतीय असल्याने सोसावे लागणारे अपमानहि आहेतच. ) त्या जरी प्राचीन संस्कृतीचा मागोवा घेत फिरत असल्या तरी इतिहासाबरोबर त्या भुगोल, निसर्ग, समाज या सगळ्यांचेच डोळस निरिक्षण करत असतात. या पुस्तकात ग्रीसबद्दल बरेच काहि आहे. ते अनोखेहि आहे. उदा. आपल्या सगळ्यांचा आवडता ईसाप, ईथेच होता, ईडिपस किंवा ईदि पुस चा अर्थ सुजलेल्या पायाचा, असे अनेक संदर्भ, अगदी सहज येतात. आणि तरिही हे पुस्तक कुठेहि क्लिष्ट वाटत नाही. अलिप्तपणे विचार केला, तर मला स्वतःला, त्या जे चितन नोंदवतात ते खुप आपलेसे वाटते, मला या पुस्तकातले काहि उतारे ईथे नोंदवण्याचा अनावर मोह होतोय. ( पृष्ठ क्रमांक ११६ आणि ११७ वरचे हे उतारे बघा. ) " दिवसभर आपली दगदग चालते. छोट्यामोठ्या गोष्टीनी मनाला ताण पडत राहतात. धागे गुंतत राहतात. चिडचिडेपण येतं. तश्या अगदी क्षुल्लक गोष्टी असतात. कुठं किल्ली काढताना मोड सांडते, कधी दार नीट लागत नाही, कधी पत्त्याचा कागद मिळत नाही तर कधी नको तो फोन वेळ खातो. बारक्या बारक्या चुकानी चित्र बिघडत जातं. मनाला बारक्या गाठी पडत राहतात. नकोनकोसं करुन आपल्याला अशांततेच्या काठी घेऊन जातात. मी मिटल्या डोळ्यानी बसलेली. आपल्या ऐंशी टक्के संवेदना डोळ्यांवाटे आत येतात. बाकि ज्ञानेन्द्रियं उरल्या वीस टक्क्यांत. अतिशय आनंदाच्या वा अतीव दुःखाच्या वेळी डोळे मिटतात. दुःख पुन्हा पाहुन आपल्याला त्यात भर घालायची नसते, तर आनंदाच्या क्षण मिटल्या डोळ्यानी घट्ट धरुन ठेवायचा असतो. त्याला चिरंजीव करायचा प्रयत्न असतो तो. डोळे मिटलेलेच होते. त्या छळवादी ऐंशी टक्क्याना सुट्टी मिळाली. सगळ्या निरगाठी सुटुन गेल्या. मनाची मखमल साफ मऊ होवुन परत लवलवत होती. सैलावलेली सुखद गुंगी चढत होती. केवळ कान जागे होत होते. आता सागराचं नि माझं मुक हितगुज सुरू झालं. पुढे सरणार्या लाटांचा बारीक आवाज. त्या परतताना वाळूतुन उमटणारा नर्म सीत्कार. समुद्राचा श्वासोच्छवास मला ऐकु येत होता. कानातून हळूहळू मनात भिनून तो माझ्या रंध्रारंध्राला शांतवत होता. या समुद्रातून मी एकेकाळी बाहेर आले. तशाच बाहेर आलेल्या आफ़्रोदीतीचा अंश माझ्यात आहे. बुद्धाचा आहे. औरंगजेबाचासुद्धा आहे. मरणानंतर आपलं काहि उरत नाही म्हणतात पण आपलं काहि मरतहि नाही. सरतहि नाही. अब्जावधी अणू अणू वेगळे होऊन पुन्हा एकत्र येतात. " पुन्हा विटा पुन्हा भिंती पुन्हा बांधायचे घर " तो अणू कधी दवबिंदू होऊन, कधी कोवळ्या पानाच्या रूपात तर कधी लाव्हाच्या पाषाणात परतून येतो. श्रीकृष्णानं हजारो वर्षांपुर्वी सांगितलेला आत्मा म्हणजे हा अणूच तर नव्हे का ? फ़क्त एका शरिराला एकच आत्मा नसून अनंत कोटी ब्रम्हांड भरून आत्मे असतात. त्यांचं पुसटसं निजस्वरूप मनात उमटत होतं का ? एकटी, एके ठायी, मन आत ओढुन, कानात प्राण आणून अविचल झाले होते. " पुस्तक वाचुन संपवल्यावर असे काहि विचार मनात रुंजी घालत राहतात. मग आगामी " रोमराज्य " ची आठवण होते. मग हेहि आठवतं कि त्याना ईराणलाहि जायचे आहे. त्यांचे हस्ताक्षर आणि त्याना पाहण्यासाठी माझ्या पानावर डोकवा बघु.
|
Sakhi_d
| |
| Monday, March 12, 2007 - 11:51 am: |
| 
|
Dineshvs खरच खुप छान पुस्तक आहे आणि त्याची इतर पुस्तके पण छानच आहेत. त्यांचे लिखाण हे फ़क्त प्रवास वर्णन नसते तर त्या त्या जागेचा इतिहास, भुगोल, समाजशास्त्र सारेच येते... माझ्याही आवडत्या लेखिकानपैकी त्या एक आहेत...
|
|
|