Farend
| |
| Sunday, October 22, 2006 - 11:39 pm: |
| 
|
'हा तेल नावाचा इतिहास आहे', ले. गिरीश कुबेर. तेलाचे राजकारण, तेल कंपन्यांचा उगम, आंतरराष्ट्रीय डावपेच वगैरे बद्दल अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली आहे. सुरुवातीच्या भागात तेलाचा शोध लागत गेला तसा कोणी त्याचा फायदा उठवला, त्यात त्यांना काय अडचणी आल्या त्याची माहिती, स्टॅंडर्ड ऑईल, शेल, ब्रिटिश पेट्रोलियम वगैरे कंपन्यांनी कशी बाजारची गरज ओळखून आपला फायदा करून घेतला याबद्दल आहे. मग पुढे १९३० च्या सुमाराला अरब देशांमधे तेल सापडल्यावर बरीच राजकिय आणि आंतरराष्ट्रीय समीकरणे कशी बदलली याचे वर्णन आहे.परंतू याच 'काळ्या चिकट द्रावाचे' पूर्वी लोक काय करत होते त्याबद्दल फारशी माहिती नाही (एखाद दुसरा उल्लेख आहे). आणि फोर्ड वगैरे लोकांनी जेव्हा मोठ्या प्रमाणावर कार निर्मितीच्या योजना आखल्या तेव्हा त्यांनी त्यासाठी तेल कसे उपलब्ध असेल हे पाहिले त्याची माहितीही यात असती तर बरे झाले असते. तरीही मला तरी बरीच नवीन माहिती मिळाली हे वाचून. उदा: आत्ता शेव्हरॉन वगैरेंचे उत्पन्न आपल्याला खूप जास्त वाटते, तर १०० वर्षांपूर्वी अशा जवळजवळ सात कम्पन्या ज्या कम्पनीच्या विभाजनामुळे तयार झाल्या त्या स्टॅंडर्ड ऑईल चे उत्पन्न किती असेल. त्याखेरीज शेल नावाचा उगम, रॉयल डच ची माहिती खूप छान आहे. या तेलाने महायुद्धांत सुद्धा किती निर्णयांवर आपला प्रभाव टाकला हे कळते. नुकताच Syriana पाहिला असल्यामुळे विकसीत देशांचे आणि तेल कम्पन्यांचे हितसंबंध हे अरब देशांची भवितव्ये ठरविण्यास कसे कारणीभूत होतात ते पाहिले होते (उदा: एका अरब देशात लोकशाही आणू पाहणारा आणि तेलाचे खुले मार्केट उघडू पाहणारा, म्हणजे पर्यायाने इतर देशांना तेल विकू पाहणारा जो शेख असतो त्याची सीआयए करवी राजकिय हत्या होते आणि त्याच्या जागी जुनाट विचारांचा पण अमेरिका धार्जिणा असा त्याचा भाऊ सत्तेवर येतो) या पुस्तकांतील काही माहिती तशीच वाटते. पण यातील माहिती काल्पनिक नाही, हे खरोखरच इतिहासच्या स्वरूपात लिहिलेले आहे. साधारण १८६० मधे चालू होउन नंतरच्या सर्व महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घटनांचा तेलाशी संबन्ध दाखवला आहे. त्याचा योग्य त्या ठिकाणी भारताच्या दृष्टीकोनातून ही विचार केलेला आहे. आणि हे सर्व अत्यंत सोप्या भाषेत लिहिल्यामुळे पुस्तक एकदम वाचनीय झाले आहे. हल्ली पेपर मधे वगैरे अश्या (ललित साहित्य सोडून इतर) विषयांवरचे जे लेख वाचायला मिळतात त्यात बर्याच वेळा विषयाची माहिती बरीच असली तरी ते ईंग्रजीतून भाषांतर केल्यासारखे लेख वाटतात, पण या पुस्तकात तसे अजिबात वाटत नाही. आणि हे काहीही नसते तरी या विषयावरचे पुस्तक मराठीत लिहिल्याबद्दल सुद्धा लेखाला धन्यवाद दिले पाहिजेत.
|