|
Dineshvs
| |
| Thursday, February 15, 2007 - 4:29 pm: |
| 
|
थोरल्या गुंजेचं झाड उंचीला अगदी सोनमोहिरासारखं ( पेल्टोफ़ोरम ) उंचधिप्पाड असतं. त्याची पानहि संयुक्त, पण पर्णदलं जरा अधिकच गोलटमोल आणि झाडावर पानाचे पिसारेहि विरळ. मुख्य म्हणजे अख्ख्या झाडाला शिस्त म्हणुन नसते. इकडुन अंबाड्याचं शेपुट बाहेर आलेलं, तिकडुन चार पाच बटा डोळ्यावर आलेल्या, कुठे तरी पोलक्याची बाहि खालीवर झालेली, पदर खांद्यावर अघळपघळ पडलेला, असा बेंगरुळ कारभार असतो. अणि म्हणूनच, या बेशिस्तीमुळे याचं एक झाड दुसर्यासारखे दिसत नाही. सहज ओळखता येऊन नजरेचं लक्ष्य बनत नाही. गुलमोहोर, सोनमोहोर, कासोड, बहावे शिस्तीचे, एकसारखी रुपं घेऊन येतात, म्हणून फ़ुलं नसली तरी फ़ांद्याच्या झोकामुळे, खोडाच्या डौलामुळे, पानांच्या जाळीदार पिसार्यामुळे ओळखू येतात. आणि नाहीच तर फ़ुलांचे बहर म्हणजे यांचे हुकमी एक्के ! पण थोरळ्या बाईंचे सारंच ’ लो की ’ ! फ़ुलांचे फ़ुलबाज्यांसारखे सुंदर तुरे असतात, पण त्यांचा रंगहि माफ़क पिवळा. बरं हे तुरे नजरेस पडावे म्हणून बाई पानं तरी गाळतील का ? नाहीच, त्यामुळे पानांच्या गर्दीत लपलेले हे तुरे मान वर करुन बघितले तरच दिसतात. पण दिसतात तेव्हा बहारच ! फ़ांदीवर एकाच बिंदूतुन निघणारे हे उभ्या तुर्यांचे गुच्छ म्हणजे झाडावर ठिकठिकाणी डुलणारे शिरपेचच. ऑस्ट्रेलियन बाभळीलाही अशा फ़ुलबाज्या असतात. पण त्या भलताच दिखाऊ; एकांड्या, पिवळ्या जर्द आणि सुवासिक ! फ़ुलांचे असे गुच्छ तुरे म्हणुन शेंगाचेहि घोस. कोवळ्या शेंगा अगदी हिरव्यागार आणि आतल्या ’ बी ’ चा गोल गरगरीत आकार बाहेरुन दाखवणारी गर्भार पोटं. या शेंगांचे घोस कल्पनेत आणायचे असतील तर तुरीच्या दहाएक जून शेंगा घ्या. त्यांना फ़रसबीचा हिरवागार रंग द्या. आणि पाचपटीनी त्यांची लांबीरुंदी वाढवा. गुलमोहोर जेव्हा फ़ुलावर असतो तेव्हा, रतनगुंज हिरव्यागार घोसांनी लगडलेली आणि गुलमोहोराचा लाल रंग पावसानी धुवून काढला कि आपल्या लालभडक डोळ्यांनी रतनगुंजेची शेंग जग बघायला निघते. हि शेंग उकलताना दोन्ही धाराना सुटत जाते. आणि सुटताना अक्षरशः इतके आळोखेपिळोखे देते कि बिया गळुन पडल्यावर झाडावर राहतात त्या तपकिरी शेंगपापुद्र्याच्या गुंडाळ्या …. झाडाच्या डोक्यावर ठिकठिकाणी ही गुंतवळ दिसत असते ! माझ्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर तीनचार झाडं आहेत या गुंजांची. पाऊस पडून गेल्यावर पानं हिरवं पाणी न्हाली की हे, त्यांच्या डोक्यावरचं शिप्तर अधिकच सलू लागतं. आणि मग मोठ्या दातांचा कंगवा घेऊन या झाडाचे केस विंचरून हा सर्व गुंता काढायचा मोह होत राहतो मला ! $&$&$&$&$ वाचलं ना, किती प्रत्ययकारी वर्णन आहे ते. १९९३ च्याहि आधी मटा मधे डॉ शरदिनी डहाणूकरानी एक लेखमाला लिहिली होती. त्याचेच पुढे हिरवाई नावाचे पुस्तक निघाले. ( ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे ७१. मूल्य २०० रुपये ) वरचा उतारा आहे, पान १० वरचा. मधे हे पुस्तक बाजारातुन गायब झाले होते, खरे तर त्यांच्या शैलीला छायाचित्रांची गरज नाही, पण मूळ मालिकेत सुंदर चित्रे होती. पहिली आवृत्ती सचित्र होती. नंतरच्या आवृत्त्या चित्रविरहित होत्या. आता परत सचित्र आवृत्ती निघाली आहे. मुखपृष्ठावर गायत्री म्हणजेच गम ग्वायकमच्या निळ्या फ़ुलांचे देखणे छायाचित्र आहे. पण दुर्दैवाने आतली छायाचित्रे मात्र दर्जेदार नाहीत. ईतक्या वर्षानंतरहि मला मूळ लेखमालिकेतली छायाचित्रे अगदी स्पष्टपणे आठवताहेत. मूळ छायाचित्रकारांपैकी मृदुला नाडगौडाचे प्रत्यक्ष भेटुन कौतुक केल्याचेहि आठवतेय. पण या आवृत्तीतली छायाचित्रे मात्र तितकी स्पष्ट नाहीत. हि केवळ बारिकशी तक्रार, पण पुस्तकातला प्रत्येक लेख हे त्या झाडाचे व्यक्तिचित्रण आहे. झाडाना लेखिकेनी सोयरेच मानले. आणि त्यांच्यासारख्या विद्वान लेखिकेने हे लेख लिहिल्यामुळे झाडांची शास्त्रीय नावे, त्या लॅटिन शब्दांचे अर्थ, औषधी उपयोग, त्यांचे पत्ते, असा भरगच्च मजकूर आहे. हे सगळे वाचल्यावर, त्यानी ज्या झाडांबद्दल लिहिले नाही, त्या मंडळींबद्दल कणव वाटते.
|
Surahi
| |
| Friday, April 20, 2007 - 5:55 pm: |
| 
|
हिरवाइ ची नवी आवरुत्ती आली आहॆ आणी फ़ार सुंदर आहे.छायाचित्रे तर अति सुन्दर! एका निसर्ग प्रेमी लेखिकेचे दशन घड्ते.
|
|
|