|
Shrini
| |
| Thursday, January 11, 2007 - 4:49 am: |
| 
|
जी ए कुलकर्णी यांच्यावर, विद्या सप्रे - चौधरी यांनी लिहीलेले 'गूढयात्री' हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले. या पुस्तकामुळे जी एंचे वाचन, चिंतन, आवडी, बुद्धीमत्ता, त्यांच्या अंगी असलेल्या इतर कला यांच्याबद्दल अधिक तपशील मिळतात हे खरेच, पण या सगळ्यांची कल्पना त्यांच्या साहित्यावरूनही येऊ शकते. मला ज्या कारणाकरता हे पुस्तक सर्वात आवडले ते कारण म्हणजे जी. एं नी त्यांच्या कथांच्या सांगितलेल्या जन्मकथा. शिंपला वाळूचा एखादा अतिसूक्ष्म कण आपल्या पोटात घेतो, आणि स्वतःच्या जगण्याची किंमत देऊन त्याचे मोत्यात रूपांतर करतो. जी एंच्या लिखाणाला याहून वेगळी उपमा मला सुचत नाही... आणि त्यांचे 'प्रतिभा म्हणजे काय' यावरचे भाष्य तर तोंडपाठ करून ठेवावे असे आहे. प्रत्येक जी ए प्रेमीने / नी हे पुस्तक अवश्य वाचावे ही माझी आग्रहाची शिफारस आहे!
|
Sarang23
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:06 am: |
| 
|
shrini बाकीचे details दिलेस तर बरे होईल. प्रकाशन... availability वगैरे
|
Seema_
| |
| Thursday, January 11, 2007 - 4:56 pm: |
| 
|
श्रिनी कुठुन मिळाल हे पुस्तक तुला? सांगितलस तर मला मागवता येईल . मी सोनपावले, पत्राचा संग्रह , सांजशकुन मागवलय . रमलखुणा,हिरवे रावे पिंगळावेळ इत्यादी वगैरे आहेत माझ्याकडे .
|
Shrini
| |
| Wednesday, January 17, 2007 - 10:26 am: |
| 
|
पुस्तकाचा प्रकाशन तपशील आणि जी एंचे प्रतिभेवरचे भाष्य लवकरच इथे टाकतो.
|
Bee
| |
| Monday, January 22, 2007 - 3:46 am: |
| 
|
श्रिनी, धन्यवाद! तुला वेळ मिळेल तेंव्हा टाक..
|
Rar
| |
| Monday, February 12, 2007 - 11:49 pm: |
| 
|
श्रीनी, तू सांगीतल्याप्रमाणे 'गूढयात्री' पुस्तकातील जी.एं चे प्रतिभेच्या संदर्भात असलेले लिखाण इथे पोस्ट करत आहे. गुरुदेव, आता लिखाणावरचे आपले विवेचन चालू करायला हरकत नाही. ---------- लहानपणापासून मला शब्दांच्या अर्थाशी खेळण्याचे वेड आहे. एका शब्दाचे किती अर्थ असू शकतात, हे ताणत न्यायला मला खूप आवडतं. म्हणून तर मला शब्दकोडी सोदवण्याचा नाद लागला. जेवणानंतरची विश्रांती घेताना वृत्तपत्रांतल्या शबदकोड्यांकडे नजर टाकल्याशिवाय मला राहवत नाही. 'टाइम्स' आणि 'हिंदू' मधील कोडी तर खूपच गुंतागुंतीची असतात. ती पाहात असताना खरोखरच इंग्रजीतील शब्दवैपुल्याची कल्पना येते. पण मी या कथांतील पात्रांना नावं देणं शक्यतो का टाळलं? एखादी गोष्ट नाव असलेल्या माणसाची असल्यास ती फ़क्त त्याची गोष्ट असते. पण एखाद्या अनामिकाची कथा ही विश्वातील मानवजातीची कथा असते. अंकगणित सोपं असतं. त्यात एका कपाटाची, पुस्तकाची, आंब्यांची किंमत ठरलेली असते आणि त्यातील गणिताचं उत्तर निश्चितपणे एकच असतं. माझ्या मते ज्या प्रश्नाला नेमकं एकच उत्तर असतं, तो प्रश्नच नव्हे. खेळात लहान मुलांना उगाच लिंबलोणचं म्हणून घेतात ना? त्याप्रमाणे आयुष्यात पोकळ शब्द असल्या प्रश्नांची संगत घेउन येतात. तसले एक उत्तरी प्रश्न सोडवण्यात मला अर्थच वाटत नाही. खरा प्रश्न अनेक उत्तर स्वत्:च्या चेहर्यावर घालून पाहात असतो आणि तसल्या प्रश्नांना अंतिम उत्तरच नसतं. उत्तर सापडलं की प्रश्न मरतो. म्हणून प्रत्येक नि:संदिग्ध उत्तर हे पितृघातकी असतं. उत्तर मिळाली की प्रश्न संपले. प्रश्न संपले की माणूसही संपला. म्हणून मला सतत एक प्रश्नचिन्ह समोर हवंच. गणिताला अमूर्तता, गूढता प्रदान करण्यासाठी बीजगणित येतं. आणि मग a x b किंवा (a+b) 2 अशी सूत्रं तयार होतात. यात शेळी, धोतर वा लिंबू यांची किंमत नसल्यामुळे ते जास्त सखोल होतं. तरीही a x b किंवा a2 + 2ab + b2 ला अर्थ असतो तो मर्यादित स्वरूपातच! पण त्या नंतरची एक अवस्था असते. त्या विशिष्ट पातळीवर शब्द वा अक्षरं मंत्रयुक्त स्वरुपात प्रकट होतात. शाक्त पंथीयांच्या काही 'यंत्रात' या अक्षरांनाच निराळा व निराळ्या पातळीवरच अर्थ प्राप्त होतो. श्रीचक्र नावाचं यंत्र किंवा आकृती असते. त्यात केवळ त्रिकोणच विविध प्रकारे वापरलेला असतो. देवीयंत्र नावाच्या आकृतीत अ आणि क हीच अक्षरं निरनिराळ्या रूपात स्पष्ट होतात. दीक्षा घेतलेल्या व्यक्तींना हा अ आणि बीजगणितातला 'a' यातील फ़रक स्पष्टपणे जाणवतो. कलेतील ही अवस्था म्हणजे या वेळी शब्द किंवा शब्दसमूह हे एखादे मंत्ररूप लेउन सामोरे येतात. या ठिकाणी कसब, कारागिरीचा प्रदेश संपून प्रतिभेचा प्रांत दृष्टिपथात येतो. हे भाग्य लाखांत एकाला, दहा हजार वर्षात एखाद्याच व्यक्तीला प्राप्त होतं. द्रष्टा म्हणून व्यासांखेरीज एकही नाव जीभेवर येत नाही. त्या नंतरच्या निरामय, निरंजन अवस्थेत शब्दांवरील अर्थाची उरलीसुरली टरफ़लं गळतात आणि उरतो तो केवळ शुद्ध स्वर! अशी स्वरसिद्धी फ़ारच थोड्यांना लाभते. त्या स्वरसिद्धीचा लेश तरी प्राप्त व्हावा, म्हणून मी या आध्यात्मिक स्वरूपाच्या कथा लिहीताना पात्रांना क्वचितच नावं दिली. आता शाक्त यंत्रातील अक्षराप्रमाणे त्यांना किंचित का होईना, मंत्रजीवन यायला हवं. त्यासाठी जन्मत:च कविस्पर्श हवा. हा स्पर्श 'ग्रेस' ला आहे. आरती प्रभूतही तो काही ठिकाणी जाणवतो. किंग मिडासला हात लावेल तिथं सोनं होण्याचा वर मिळाला. मिळो बापडा! मी हात लावेन तिथं या स्वरूपाच्या प्रतिभेच्या मोहोरा उधळाव्यात, असं वरदान मला कुणी देईल? -------------------------- गूढयात्री - जी. ए. कुलकर्णी यांची वैयक्तीक व वाड्मयीन जीवनकथा लेखिका : विद्या सप्रे-चौधरी पारख प्रकाशन, बेळगाव. प्रकाशकांचा पत्ता : सौ. आशा वि. जवळकर, २१ चर्चस्ट्रीट, कॅम्प, बेळगाव ५९०००१. पुस्तकाची किंमत : १५० रुपये.
|
Bee
| |
| Tuesday, February 13, 2007 - 5:49 am: |
| 
|
धन्यवाद, आरती. धन्यवाद श्रिनी. खरच छान आहे हे भाष्य..
|
Shrini
| |
| Tuesday, February 13, 2007 - 8:49 am: |
| 
|
Thanks, Rar! .. .. 
|
Mitwa
| |
| Friday, January 18, 2008 - 1:29 am: |
| 
|
अतिशय उत्क्रुष्ट व संग्राह्य असे हे पुस्तक आहे. लेखिका सौ. विद्या ताईनी या पुस्तकाच्या रुपाने एक खजिनाच जी.ए. रसिकाना उघडून दिला आहे. मितवा.
|
|
|