|
Moodi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 1:17 pm: |
|
|
चिरोटे. साहित्य : १ मोठी वाटी बारीक रवा, १ टीस्पून तेलाचे मोहन, चिमुटभर मीठ, २ टेस्पून आंबट ताक, दीड वाटी साखर, पाऊण वाटी पाणी, केशर अन वेलचीपूड(वेलदोडापूड), १ टेस्पून तांदाळाची वस्त्रगाळ पिठी. कृती : रव्यात मीठ, मोहन अन ताक घालून पीठ घट्ट मळावे. २ ते अडीच तास झाकून मग नंतर काढून चांगले कुटून पीठ मऊ करुन मळून घ्यावे. मग भिजवलेल्या पीठाच्या ६ पातळ पोळ्या लाटाव्यात. एका पोळीवर पातळ गरम तूप घालून थोडी तांदळाची पिठी भुरभुरवुन मग त्यावर दुसरी पोळी ठेवावी.परत तूप पसरवुन तिसरी. अशा पद्धतीने सार्या पोळ्या रचाव्यात. मग त्याची वळकटी करुन साधारण दीड इंचाचे तुकडे( अळू वडीला कापतो तसे) कापून घ्यावे. मग परत पातळ लाटावे.. नेहेमीसारखे तळावे अन निथळले की साखरेच्या गरम पाकात टाकावेत. चिरोट्यात पाक मुरला की ताटात तिरके करुन किंवा चाळाणीवर निथळत ठेवावेत, म्हणजे जास्तीचा पाक उरेल. चिरोटे कमी तळले गेले की मऊ पडतात. साखरेचा पाक : साखरेत निम्मे पाणी घालून २ उकळ्या काढून नेहेमीप्रमाणे २ तारी पाक करावा. नंतर केशर वेलदोडा पूड टाकावी. पाक झाल्यानंतर मंद गॅसवर गरमच ठेवावा( उकळू नये)
|
Mrinmayee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 1:53 pm: |
|
|
मूडे, या शनिवारी १५ लोक आहेत जेवायला. चिरोटे करते तुझ्या कृतीप्रमाणे. तु सांगितलेलं प्रमाण किती जणांना पुरेल? तसंच, ६ पोळ्यांच्या थराची वळकटी करायच्या आधी सुक्यामेव्याची पावडर आतल्या पोळीवर पसरून मग लाटून तळले तर चांगले लागतील का? (बकलावा स्टाईल!)
|
Prady
| |
| Tuesday, August 01, 2006 - 1:57 pm: |
|
|
चिरोट्या साठी माझ्या पण काही tips १) चिरोट्याचं पीठ नेहेमी थंड पाण्याने भिजवावं. fridge मधलं पाणी वापरावं. ह्यामुळे पीठ मऊ राहातं आणी फार कुटावं लागत नाही. २)डालडा आणी तांदळाचं पीठ एकत्र भरपूर फेसून हे साठं वापरून केलेले चिरोटे पण छान होतात. ३)चिरोट्याच्या सगळ्यात आतल्या वळीमधे तळताना सुरी घालावी आणी तेलात उभा धरून वळकट्यांवर झार्याने तेल उडवावं. सगळ्या पाकळ्या छान फुलून येतात. ४) वळ्या करताना सगळ्यात आतली पिवळ्या, त्याच्या बाहेर २-३ गुलाबी आणी सगळ्यात बाहेर हिरवा अशा रंगाच्या मैद्याच्या पोळ्या वापरल्या तर छान गुलाबाच्या फुला सारखे चिरोटे तयार होतात. मूडी पुढच्या वेळी मी पण ताक घालून पाहीन.
|
Moodi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 2:00 pm: |
|
|
हो गं प्रज्ञा. तुझ्या ह्या टिप्स पण छान आहेत. अगं पण आजकाल डालडा कमी वापरला जातोय, अन वापरुही नये(कोलेस्टेरॉलची भीती).
|
Moodi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 2:07 pm: |
|
|
मृण्मयी १५ लोकांना नाही पुरायचे असे मला वाटतयं, तरी साधारण १८ ते २२ होतात मध्यम आकाराचे केले तरी.( गोड आवडणारे २ ते ३ तरी खातात ना) हे बकलावा स्टाईलची आयडीया छान आहे, पण मी बकलावा सुद्धा केला नाहीये, पण कृती तशीच आहे त्यामुळे करुन बघ. पण जास्त केले तरी टिकतात ४ दिवस अन आदल्या दिवशी रात्री करुन ठेवले तरी चालतात.
|
Psg
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:29 am: |
|
|
मूडी, पाकातले चिरोटे करायचे नसतील तर तळून झाल्यावर त्यावर पिठीसाखर भुरभुरायची. असेही छान लागतात. आणि अगं जवळजवळ वाटीभर तूप लागते- प्रत्येक थरावर लावायचे असते ना. तू साहित्यात लिहायचे विसरलीस का?
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:16 pm: |
|
|
अगं psg मी तुझा मेसेज आता रात्री ( आमच्या वेळेस) बघीतला सॉरी गं. अगं हे साधे चिरोटे आहेत. ते दुसरे साटावाले चिरोटे लिहीते मी. हो त्याने छानच होतात. पिठीसाखरवाले नाहीत ना हे म्हणून नाही लिहीले.
|
Psg
| |
| Thursday, August 03, 2006 - 11:12 am: |
|
|
ओके, म्हणजे माझाच गोंधळ झाला पाकातल्या चिरोट्यांना इतकं तूप लागत नाही तर. बरं मग आता ते बिन पाकाचे, पिठीसाखरेचे चिरोटे पण लिही.. अजून एक strike झालं.. या पीठाच्या साध्या, म्हणजे थर न करता साध्य पुर्या केल्या तर पाकातल्या पुर्याचीच रेसिपी आहे ही
|
Moodi
| |
| Thursday, August 03, 2006 - 2:08 pm: |
|
|
हो रवा भिजवुन नीट कुटला गेला की त्याच्या पुर्याच छान होतात. हे दुसरे चिरोटे. साहित्य : १ मोठी वाटी मैदा, १ तेस्पून तेलाचे मोहन, चिमुटभर मीठ. साट्यासाठी : ३ टेस्पून तूप, १ टेस्पून तांदळाची पिठी( ही अगदी मुलायम असावी). तूप किंवा रीफाईंड तेल, १ वाटी पिठीसाखर, अर्धा ते १ टीस्पून वेलदोडापूड. कृती : मैद्यात मोहन अन मीठ घालून गार पाण्याने मैदा घट्ट मळावा. आणि २ तास झाकून ठेवावा. एकीकडे साट्यासाठीचे तूप पांढरे होईपर्यंत अगदी मुलायम फेसावे, त्यात तांदळाची पिठी घालून परत फेसावे. एगबिटरने फेसले तरी चालेल. मग मैद्याच्या ६ एकसारख्या लाट्या कराव्यात. या लाट्या तांदळाच्या पिठीवर पातळ लाटाव्या व ओल्या कपड्याखाली झाकून ठेवाव्या. फडके नीट पिळून घ्यावे, पाणी रहाता कामा नये. साट्याचे मग ३ भाग करावेत. आधी एक पोळी पोळपाटावर ठेवुन त्यावर एका भागापैकी थोडा साटा लावावा, त्या पोळीची घट्ट गुंडाळी करावी. मग दुसर्या पोळीवर पहिल्या भागापैकी उरलेला साटा लावावा व त्यावर कडेला म्हणजे सुरुवातीला आधीच्या पोळीची गुंडाळी ठेवावी. अन दोन्ही एकत्र घट्ट गुंडाळावे. अशा तर्हेने उरलेल्या पोळ्यांची गुंडाळी करुन साधारण दीड इंचाचे तुकडे करावे. अन दाबून कपलेल्या भागाकडून लाटावे. कढईत तूप किंवा तेल तापवून एकेक चिरोटा तळावा. टाकल्याबरोबर लगेच हलकेच दाबावा. रंग बदलून फुगला की उलटवावा. त्याचे पदर सुटले पाहीजेत अशा पद्धतीने तूप त्यावर उडवावे. ते तूप निथळून तो कडक झाला की मग लगेच ताटात काढुन गरम असतानाच त्यावर पिठीसाखर अन वेलदोडापूड एकत्र करुन थोडी थोडी घालावी. सुकले की डब्यात भरावे( खाल्ले तरी चालेल). जर पोळ्यांची तशी गुंडाळी नाही जमली तर एका पोळीवर थोडा साटा लावुन दुसरी त्यावर ठेवावी मग परत साटा लावावी अशा सहाही पोळ्या एकमेकीवर ठेवून गुंडाळी करुन, कापुन चिरोटे करावेत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|